सोमवार, २२ जुलै, २०२४

सावरकरांची 'ती' उडी

  🔹 अत्रे उवाच... (८)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी  मोरिया बोटीतून मारलेली उडी साऱ्या जगाचे लक्ष वेधून भारतातील ब्रिटिश सरकारच्या वृत्तीला दिलेला मोठा झटका होता. सावरकर यांचे ते धाडस खरे म्हणजे शब्द आणि भावनेत वर्णन करता येत नाही. त्यांची देशाविषयीची निष्ठा, स्वातंत्र्य मिळविण्यासाठीची तळमळ अशा भावनांचा तो उद्रेक होतो. हे सावरकर ज्यांना आमचे म्हणावेसे वाटतात, त्यालाच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला समजून घेण्याची जाण येऊ शकते. अशा या सावरकरांच्या त्या उडीचे अत्रे यांनी मांडलेले सत्व म्हणजे सावरकरांच्या क्रांतिचे तत्त्वच उलगडणारे ठरावे.

२९ जुलै १९०९ ची ती रात्र. वीर सावरकर त्या रात्री 'ब्रायटन'च्या रम्य समुद्रकाठी गेले होते. त्यावेळी उन्हाळा होता. त्या ऋतूत रात्री सूर्य दहा किंवा अकरा वाजता मावळतो. समुद्राच्या किनाऱ्यावर असंख्य स्त्री-पुरुषांचे थवेच्या थवे अर्धनग्न गणवेशात हसतखिदळत हिंडत होते. पण सावरकरांच्या डोक्यावर असंख्य संकटे थैमान घालत होती. जेष्ठ बंधू बाबाराव सावरकरांना थोड्याच दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. एक जुलै रोजी 'कर्झन वायली'चा 'मदनलालजी धिंग्रा' यांनी खून केलेला होता. त्या खुनाच्या निषेधाची सभा लंडनमध्ये कॅक्स्टन हॉलमध्ये भरलेले असताना, त्या निषेधाच्या ठरावाला सावरकरांनी विरोध केला, तेव्हा त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्याचे पडसादही सावरकरांच्या डोक्यात निनादत होते. अशा संत्रस्त मानसिक अवस्थेत त्या रात्री सावरकर त्या ब्राईटनच्या किनाऱ्यावर बसले असताना समोरच्या सागराकडे बघून ते रडू लागले, नि रडता रडता त्यांच्या ओठातून पुढील अमरकाव्य प्रकट झाले -
ने मजसी ने, परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला!

     आपल्या प्रिय मातृभूमीचे दर्शन या जन्मी आपल्याला फिरून होईल की नाही, अशा साशंक मन:स्थितीत सावरकर बसले असताना, मातृभूमीच्या प्रेमाचे नि सेवेचे असले हृदयद्रावक काव्य त्यांच्या मुखामधून प्रकट व्हावे, हा एक मानवी बुद्धीचा आश्चर्यकारक चमत्कार नव्हे काय? या कवितेच्या शेवटच्या कडव्यात--
जरि आंग्लभूमी भय भीता  रे
अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तीस आता  रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला 
सागरा प्राण तळमळला 

सावरकरांना अगस्तीच्या समुद्र प्राशनाची पौराणिक कथा आठवावी हे पाहिले म्हणजे, त्यांच्या सर्वांगात मुरलेला भारतीय संस्कृती निष्ठेबद्दल आदर वाटू लागतो. १३ मार्च १९१० पर्यंत सावरकर फ्रान्समध्ये होते. त्या दिवशी संध्याकाळी पॅरिसहून सावरकर निघाले, ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लंडनला पोहोचले. तेथे त्यांना अटक करण्यात आली. १३ मार्च १९१० पासून ते एक जुलै १९१० पर्यंत ते इंग्लंडमधल्या ब्रिक्सटन तुरुंगात होते. त्या रात्री त्यांना 'मोरिया' नावाच्या बोटीने हिंदुस्थानाकडे रवाना करण्यात आले. मोरिया बोट चालू लागल्यावर सावरकरांच्या विचारांनाही गती मिळाली. मोरिया बोटीशी यांत्रिक चक्रे जशी जशी जोर जोराने फिरू लागली, तशी तशी सावरकरांच्या विचारांची चक्रे ही जोरजोराने फिरू लागली. मोरिया बोटींचा प्रवास पहिले तीन-चार दिवस सुखाचा झाला. पण ती पोट 'बिस्के'च्या उपसागरात गेल्यानंतर वादळी वारे सुरू झाले. लाटांचे प्रचंड तडाखे बोटीच्या दोन्ही बाजूंना बसू लागले, आणि त्यामुळे बोट जोरजोराने डोलू लागली. त्याचवेळी साधेल त्या ठिकाणी बोटी मधून निसटून जाण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये डोकावू लागली. मोरिया बोट बहुधा 'मार्सेलस' येथे थांबणार नाही , असे त्यांना कोणीतरी सांगितले होते. पण यदाकदाचीत जर ती बोट थांबलीच तर आपल्याला बोटीतून पळविण्याचा प्रयत्न आपले लंडनमध्ये काही क्रांतिकारक सहकारी मित्र केल्या वाचून राहणार नाही असा त्यांना विलक्षण विश्वास वाटत होता. बोटीतून निसटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे त्यांच्या खोलीतल्या केबिन पोर्टहोल मधून. पण पोर्ट होल मधून आपले शरीर बाहेर निघण्याची शक्यता कितपत आहे, याचा आगाऊ अंदाज घेण्यासाठी बिस्केच्या उपसागरात बोट डावी उजवीकडे हेलकावे घेत असताना, सावरकर झोकांड्या खात-खात एका पोर्टफोलपाशी गेले, आणि हाताने आधार घेण्याच्या मिषाने त्यांनी निमिषार्धात 'पोर्टफोल'चे कच्चे मोजमाप घेतले. मंगळवार दि. ७ जुलै १९१०रोजी रात्री मोरिया बोट ही मार्सेलसला असल्या जाऊन पोहोचली. सावरकरांच्या सुदैवाने मार्सेलस बंदरात ती बोट आल्यानंतर तिच्यात काहीतरी यांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो दुरुस्त करण्यासाठी ती बोट बंदराच्या धक्क्यापासून फारच थोड्या अंतरावर उभी करण्यात आली. त्याचवेळी बोटीतून निसटून जाण्याविषयीचा त्यांच्या मनातला संकल्प फिरून प्रबळ झाला. पहाटेची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली तस तसा सावरकरांच्या मनातला अस्वस्धपणा वाढू लागला. बोटी मधून निसटून पोहून सुरक्षित ठिकाणी जाऊन वर पोहोचावयाचे असेल, तर त्यावेळच्या इतकी सोयीची संधी फिरून आपल्याला कदापी मिळणार नाही, ही गोष्ट त्यांना स्पष्टपणे तेव्हाच कळून चुकली होती. लहानपणी नाशिक येथे असताना गोदावरी नदीत   त्यांनी पोहण्याचा सराव केला होता, तथापि समुद्रात पोहण्याचा त्यांना कधीही अनुभव नव्हता. पण आपल्याला पकडून हिंदुस्तानात नेल्यानंतर कदाचित आपल्याला काळ्या पाण्याची वा फाशीची शिक्षा झाली, तर कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा अफाट दर्यात लाटांशी झगडता झगडता मरण आले, तर ते पत्करले, असा विचार करून त्यांनी त्या बोटीतून काय वाटेल ते झाले तरी बाहेर पडण्याचा निर्धार केला. एवढ्यात सकाळ झाली. यापुढे कसे करू आणि काय करू या विचारात वेळ घालवण्यापेक्षा जो काही सोक्षमोक्ष व्हायचा असेल तो आत्ताच्या आत्ता करून घेतलेला बरा, कारण 'Now or Never' असा निर्धार करून सावरकर आपल्या बिछान्यावरून हळूच उठले, आणि बाहेर पहार्यावर असलेल्या एका हिंदी शिपायाला त्यांनी अत्यंत आर्जवी स्वरात आपल्याला शौचकूपाकडे घेऊन जा अशी विनंती केली. सावरकर शौचकुपात शिरले आणि त्यांनी शौचकुपाचा दरवाजा आतून बंद करून घेतला. बाहेर पहारेकरी उभा होता, त्याला आतले काही दिसू नये म्हणून सावरकरांनी आपल्या अंगावरचा झोपण्याचा झगा लगबगीने काढून आरशाच्या वर असलेल्या हुकावर अडकवून ठेवला. अंगावरले उरलेले कपडे उतरून सावरकरांनी पोर्टहोलकडे उडी घेतली. पोर्टहोल मधून हळूहळू ते आपले शरीर बाहेर काढू लागले. आपले शरीर संकुचित करून त्या पोर्टहोलमधून बाहेर पडताना सावरकरांना केवढा प्रयास पडला असेल, त्यांचे शरीर किती ठिकाणी रक्तबंबाळ झाले असेल, आणि त्यांच्या अंगावरील कातडे केवढ्या मोठ्या प्रमाणात सोलून निघाले असेल याचे वर्णन मोठमोठ्या महाकवींना देखील शब्दाने करता येणार नाही. अखेर सावरकरांचे शरीर पोर्टहोलमधून सही सलामत बाहेर पडले. "स्वातंत्र्य लक्ष्मी की जय" असा घोष मनातल्या मनात करून अखेर सावरकर समुद्र पृष्ठावर येऊन आदळले. त्याचवेळी सावरकरांवर पहारा करणारा शिपाई शौचकूपाचे तावदान फोडून आत शिरला तेव्हा सावरकर पोर्टहोल मधून बाहेर पडल्याचे त्याला समजले. एवढ्यात खाली काय प्रकार घडला ते बोटीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी सावरकरांच्या मागोमात तशीच समुद्रात उडी मारली आणि तो पोहत पोहत सावरकरांचा पाठलाग करू लागला. तर दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सावरकरांच्या रोखाने गोळ्या झाडायला सुरुवात केली. तेव्हा सावरकरांनी मधून मधून समुद्राच्या पृष्ठाखाली बुडी मारून अंतर्भागातून पोहण्यास सुरुवात केली. सावरकर मार्सेलसच्या धक्क्यावर जाऊन पोहोचले. बॅरिस्टरीचा अभ्यास करीत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केलेला होता. म्हणून मार्सेलसच्या धक्क्याला हात लागताच आपण फ्रान्सला पोहोचलो असा विचार त्यांच्या मनात तक्षणी आला.  धक्क्याची भिंत चढता चढता दोनदा ते घसरून खाली पाण्यात पडले. पण अखेर शेवटाचा अचाट निर्धार करून ते धक्का चढून वरच्या जमिनीवर उभे राहिले. 'झालो फिरून स्वतंत्र झालो!' अशा चैतन्यवृत्त विचाराने उत्स्फूर्त होऊन त्यांनी भोवतालचा सुंदर देखावा एक वेळ नीट न्याहाळून पाहिला आणि ते एकदम थूम पळत सुटले. जवळ जवळ दोन अडीच फर्नांडिस ते पळाले. वाटेत त्यांना ट्रॅम दिसली. पण ते अर्धनग्न आणि भिजलेले असल्यामुळे त्यांना ट्रॅममध्ये चढून बसणे अशक्य होते. सावरकर पळत चालले आहेत नि ब्रिटिश पोलीस अधिकारी त्यांचा पाठलाग करीत चालले आहेत हे दृश्य तेव्हा रस्त्यातल्या काही फ्रेंच लोकांनी पाहिले. तेव्हा त्यानी चोर चोर म्हणून हाकाटी करून सावरकरांच्या मागे धावण्यास सुरुवात केली. अखेर सावरकर थकले, रात्रभर त्यांना झोप नव्हती. त्याखेरीस त्यांनी जो प्राणांतिक धोका पत्करला होता, त्याचा थकवाही त्यांच्या मनावर तरंगत होता. शेवटी रस्त्यातल्या एका फ्रेंच शिपायासमोर जाऊन ते उभे राहिले, आणि आपण यापुढे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेत आहोत, असे त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तेवढात त्यांचा पाठलाग करणाऱ्या लोकांनी आणि ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना गाठले. फ्रेंच शिपायाने सावरकरांना त्यांच्या हवाली केले. अटक करून सावरकरांना पुन्हा मोरिया बोटीवर नेण्यात आले. बोटीवर पोहोचता क्षणीच पाहारेकर्यांने त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूस जोराने गुद्दा मारला, त्यानंतर सावरकरांना हातकड्या, पायकड्या घालून त्यांच्या केबिनमध्ये कोंडून टाकण्यात आले. दिनांक ९ जुलै रोजी सकाळी मोरिया बोटीने मार्सेलस सोडले. बोटीचा पुढचा प्रवास सुरू झाला. सावरकरांना पकडणे नि त्यांना ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधिन करणे हे गैरवासाठी प्रकार झाले, हे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केले. पण शेवटी सावरकरांसारख्या एका राष्ट्राच्या बंदीवानाला दुसऱ्या राष्ट्राच्या हस्तकाने चुकीने पकडल्यामुळे त्याला परत त्या राष्ट्राचा अधिकाऱ्यांच्या हवाली केले, हे योग्यच झाले, असा निर्णय हेगने दिला. या निर्णयाचा साऱ्या जगात निषेध झाला. पण ब्रिटिश सरकार त्यावेळी त्या टिकेचा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते. हेगचा प्रतिकूल निकाल जाहीर होऊन त्याचा साऱ्या जगाने धिक्कार केला तरी त्यांनी सावरकरांना ५० वर्षाची दोन काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. सावरकर फ्रेंच किनाऱ्यावर जेव्हा पोहोचले, तेव्हा त्यांचे फ्रान्समधले सहकारी त्यांना भेटले असते, आणि त्यांनी त्यांना आपल्या मोटारीत घालून पळवून नेले असते, तर काय घडले असते? असा विचार करायला कालिदास, भवभुती यांनाच आमंत्रण झाडायला पाहिजे. मग सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा होऊन अंदमानात जावे लागले नसते, आणि मग मग काय काय झाले असते? ते कसे सांगू? कदाचित भारताचा इतिहास बदलला असता, आणि जाऊद्या..... पुढचा तर्कच नको!

       
४/३/१९६६.

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा