२८ मे २०२४ या दिवशी स्वातंत्र्यवीरांची १४१ वी जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कवितांचा आशय समजून घ्यावा आणि त्यांच्या संस्कृत प्रचुर साहित्याची ओळख व्हावी, नव्या पिढीला त्यांची भाषा, त्यातील सौंदर्य कळावे, यासाठी आदित्य विवेक शेंडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा या कवितेचे आगळे रसग्रहण केले आहे. तरुण भारतच्या दि. २६ मे च्या अंकातही हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या सौजन्याने हा लेख प्रज्वलंतच्या वाचकांसाठी मुद्दाम देत आहोत.
स्वा. विनायक दामोदर सावरकरांची कविता... मुळात कविता ह्या शब्दाचा अर्थ तो काय? मूळ आदीश गजानन! त्यास “कविनां कवी:” हे ब्रीद लावून त्याचा गौरव जो केला जातो तिथे कवि ह्या शब्दाचा अर्थ “कविता रचणारा तो” असा मर्यादित आहे का? छे! कवि म्हणजे बुद्धिमान! आपले मराठी शब्द हे आपल्या संस्कृतीच्या प्राचीनत्वामुळे अनवधानाने अशा दिव्य अर्थांना आपलेसे करीत करीत अगदी त्यांना मानवी मर्यादेत बसवतातच.! जसे आद्य कवि हे श्री गजानन! श्री विघ्न विनायक तसे आजचे अद्यतन कवि म्हणजे स्वातंत्र्यविनायक. महापुरुषांचे चरित्र हे कळायला मुळात दुर्बोध.! त्यांचे विचार हे विवेकाच्या मुशीतून आलेले त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वार्थ हा काही त्या अग्नित हात घालण्यास धजत नाही. आणि होतं असं की समजत तर सगळं असतं. पण कृतीत काही ते उतरत नाही. अशावेळी चाणक्य म्हणतो तसं “अग्निवत् आश्रयेत्” असं म्हणत त्या चरित्राच्या धगेत ऊब घेत; शक्य झाली तर आपली संसाराची भाकरी भाजून घेण्यास जनसामान्य कमी करीत नाहीत.!
तात्याराव! अख्या देशास सावरणारे म्हणूनच की काय सावरकर.! असे युगपुरुष एकटे असतात. तत्वानुगामी असतात. त्यांस जवळचं असं फारसं कुणी लाभत नाही. कारण सत्याच्या मार्गाने चालणारे त्यांच्यासारखे विरळेच. ह्या मार्गाने चालताना त्यांना आधार असतो तो म्हणजे तेजाचा..! ऊर्ध्वगामी तत्वाचा.! अग्नी हा पावक आहे. शुद्ध करणारा आहे. प्रलयकाली सारं जगत् भस्म करणारा आहे. पण ज्यांच्यामध्ये सत्य हे प्रतिष्ठित झालेलं आहे त्यांच्यासाठी मात्र तो शीतल आहे. कल्याणकारी आहे. अशा लोकांना तो आपलासा वाटतो. कारण हेतूच्या शुद्धीमुळे ते त्या अग्नितत्वाशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे सहजच हात पोळण्याचा दोष अग्निला जात नाही.
ह्या अग्निचे दोन गुण – तेज आणि उष्णता. ह्या महापुरुषांचे सुध्दा तेच.! दाहक प्रखरता ही त्यांच्या आचारात दिसते ती स्वतःसाठी.! कर्तव्य कठोरतेची! आणि इतरांना मात्र ऊब जाणवते. दुसरं ते तेज! हे तेज त्यांच्या बुद्धीत मुरतं आणि भावनेच्या परिपूर्ण प्रगल्भतेतून प्रतिभेच्या रुपाने बाहेर पडतं. हे खरं कवित्वं.! ज्यामधे असतो काळाचा अभ्यास. कठोपनिषदात सांगितलेलं श्रेयस.! तिथे मनास ठणकावून सांगितलं जातं की “जोपर्यंत निजमातृविमोचनाच्या ध्येयाची, कर्तव्यांची इतिश्री होत नाही तोपर्यंत हे मना! तुला सुखाचा अधिकार नाही.!” अशा वेळी सावरकरांसारखे योगमार्गी पुरुष त्यांच्या आधी येऊन गेलेल्या आणि तद्वतच महान कार्याची उभारणी केलेल्या ज्ञानवृद्ध, पराक्रमी राजर्षीस सहज हाक मारतात ती अशी..
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा!
“हिंदुशक्ति-संभूत” हा शब्द एका क्षणात आपल्या आर्यांचा; आपल्या हिंदूंचा इतिहास, ती जिद्द, तो दौर्दम्य आत्मविश्वास आपल्यासमोर उभा करतो.! कसं आहे ते तेज? ते आमच्या मूळ संस्कृतीच्या उदयीच्या बिंबाचं तेज आहे. सनातन तेज. इथे “संभूत” हा शब्द तात्याराव वापरतात. “सं” म्हणजे परिपूर्णतेने. “भूत” म्हणजे असलेले, अवतरलेले.! हे “दीप्ततम्” म्हणजे दिप्तीमान असं तेज. ज्याने डोळे दिपून जावेत असं तेज. परिपूर्णतेने जे आलेलं आहे असं. किती सहजतेने छत्रपतींना सावरकरांनी पूर्णावतारी केलं आहे.! अनेक परकीय आक्रमणे थोपवून, त्यांना शिकवून, त्यांना उदात्त शिकवण देऊन, त्या सगळ्या अनार्यांनाही आर्य करुन टाकणारी ही हिंदुशक्ती! देवांशी स्पर्धा करणारी! अनेक देवी देवता नव्याने निर्मिणारी! नीतिमान सनातन शक्ती. तिचं परिपूर्ण तेज ज्या पुरुषात एकवटलं त्याला ही हाक!
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा..!
अशी ही हिंदू शक्ती कशातून उद्भवते हो? ती जन्मोजन्मींच्या तपस्येने तपाने घडत असत्ये. म्हणूनच की काय तथाकथित आस्तिक्य आणि नास्तिक्य ह्यांच्या रेषा पुसत सावरकर ईश्वरी ओजा असं म्हणून आदिपुरूष शंकरांशी शिवरायांची तुलना करताना दिसत आहेत.
“क्लेशकर्मविपाकाशयैः अपराम्रुष्ट पुरुषविशेष अिती ईश्वरः” (क्लेश,कर्म, विपाक आणि आशय ह्यांच्यापासून जो अलिप्त तो पुरुषांमधील म्हणजे आत्मतत्वातही विशेष असा तो म्हणजे ईश्वर.)
ही योगशास्त्रातली ईश्वर ह्या शब्दाची फोड तात्यारावांना ज्ञात होतीच. नव्हे तसं त्यांनी आत्मचरित्रात म्हणूनही ठेवलं आहेच. अंदमानात असताना सकाळच्या वेळी थोडा काळ व्यायामासाठी जे काही जावयास मिळे त्यावेळी तात्याराव योगसूत्रे म्हणून त्यावर चिंतन आरंभित! अशा ह्या ज्ञानसुर्याला शिवरायांना साद घालताना तो पुराणपुरुष आठवला नाही तरच नवल.! आणि तोही तपःपूत झालेला.. पुराणात तप:पूत रुद्राचे डोळे पाणावले आणि त्यातून जे अश्रू भुमीवर स्खलित झाले त्यातून रुद्राक्ष उगम पावले अशी कथा आहे. हाच भाव ठेवून तप:पूत असं तुझं ओज घेऊन तुम्ही ह्या आर्यवर्ताकडे दयार्ददृष्टीने बघा. असंच सावरकर सुचवित असावेत. आता तपस्यापूत हे विशेषण लावताना तपस्या ह्या शब्दातला तप हा शब्द! त्याचं वजन काही निराळंच! तप म्हणजे कष्ट करणं. मग ते शारीरिक असो..बौद्धिक असो.. मानसिक असो वा आत्मिक असो! लागतात ते कष्टच आणि हे कष्ट दोहोंकडे लागतात. वैयक्तीक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर! वैयक्तिक पातळीवर अभिलाष शून्य राहून शिवप्राप्तीसाठी फक्त पानांवर उदार निर्वाह करणारी आणि नंतर त्याचाही त्याग करुन अपर्णा ठरलेली पार्वती ही सुद्धा तपच करीत होती आणि राष्ट्र उत्थानासाठी रक्ताचं पाणी करुन प्रत्येक प्रांतात वणवण फिरुन हिंदूसंघटन करुन हिंदुश्री मिळवणारा चाणक्यही तपच करीत होता.! हीच देवी पार्वती महिषासुर वधासाठी मात्र परिग्रह करती झाली आणि चाणक्य हा वैयक्तिक जीवनात मात्र संन्यासासारखाच जगला.! हे आमच्या हिंदूचं तप. ते जेव्हा पूर्ण होतं, पूत होतं तेव्हा ते हिंदुश्री प्राप्त करणारं ठरतं.
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा.!
अपरिग्रह स्थैर्ये सर्वरत्नोपस्थानम् ! ह्या तत्वास स्मरुन ती श्री ज्याने मिळविली तो वितराग, अभिलाषशून्य झालेला असा हा सौभाग्य म्हणून जे जे काही अस्तित्वात आले त्याचा साजंच ठरला. हे तर श्रींचं राज्य म्हणून अलिप्तता बाळगून राज्य सांभाळता झाला. खऱ्या अर्थाने छत्रपति! त्या छत्राचा पति, पालनकर्ता झाला.! हिंदुशक्तीमुळे सदाशीव ठरला! हिंदुश्री मुळे विष्णुरुप बनला.! नराग्रणी, नृसिंह ठरला.म्हणूनच तात्याराव अुद्गरले!
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा..!
सहाजिकच असं कर्तृत्वं डोळ्यासमोर आलं की हिंदू मन लागलीच नतमस्तक होतं. तात्याराव फक्त नतमस्तक झाले नाहीत! त्यांनी ती भावना लागलीच शब्दांत ओवून टाकली ती अशी…
करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरण तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
हे वंदन, अभिनंदन आणि पूजन अंतःकरण चतुष्टयातून म्हणजे मन,बुद्धी चित्त आणि अहंकार हे सगळं त्याच्या चरणी वाहिल्याने होत असतं. सावरकरांनी हे सारं आधीच मातृभूमीच्या स्थंडीलावर लोटून दिलं होतं. शिवाजी महाराज हे त्या मातेचेच सुपुत्र आणि तिच्याशीच अेकरुप झोलेले. त्यामुळे प्रार्थना तर या आधीच ह्या साऱ्या महापुरुषांपर्यंत केव्हाच पोहचलीच होती. पण आजची ही प्रार्थना काहीशी वेगळी असावी. ती होती..
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या..
आता थोडं थांबू गंभीरतेने ह्या विषयाचा उहापोह करू. गूढाशा शब्दामधे गूढ आणि आशा असे दोन शब्द आहेत इंग्रजीमध्ये enigmatic aspirations असा प्रयोग त्याबद्दल करता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक सवय ही की ते शब्द फार जपून वापरत . कुठला शब्द आपण केव्हा वापरला आहे हेही त्यांना ज्ञात असे. अर्थात कायद्याचे अभ्यासक असेच असावयास हवेत पण त्याहून खोल जाण तात्यारावांना होती ती म्हणजे कर्माशयाचीं. योगशास्त्रातील कृत, कारीत आणि अनुमोदित कर्मांबद्दल ते फार जागरूक असत. महाभारतातल्या “धर्माचं पर्यावसन कशात होतं” या यक्ष प्रश्नाला जे युधिष्ठिराने “दक्षतेत” हे उत्तर दिलं होतं त्याचं प्रत्यंतर वीर सावरकरांच्या चरित्रातून ठाई ठाई येतं. ही दक्षता होती कर्तव्यतत्परतेची. स्वातंत्र्यासाठी कुणीतरी जळायलाच हवे मग ते कुणीतरी “मी” का नाही? हा प्रश्न ते सतत स्वतःला विचारीत असत आणि स्वतःस अग्नि परीक्षेत झोकून देत असत. त्यांची गूढाशा ही स्वातंत्र्यप्राप्ती आणि हिंदू पुनरुत्थान यांशी निगडित होतीच पण वैयक्तिक जीवनात; अज्ञानाचे रुद्धद्वार, जगन्नाथाचा रथोत्सव, सप्तर्षी या त्यांच्या कवितांच्या उहापोहातून हेही लक्षात येते की विश्वामागल्या मूळ शक्तीचं कोडं ते आयुष्यभर सोडवीत होते. एक विलक्षण आस अशा महात्म्यांना लागून असते. खऱ्या शुद्ध ज्ञानाची. त्याच्या मागे ते आयुष्यभर, जन्मानुजन्म धावत असतात मग त्यामधेच त्यांना हेही अुमगतं की कठोपनिषदात आदेशलेली तीन प्रकारची जी कर्मे ती केल्याशिवाय मुक्ती नाही. ती कर्मे म्हणजे प्रारब्ध कर्म, कर्तव्य कर्म आणि ब्रह्मकर्म. आपली मातृभूमी परदास्यतेत असताना, आमच्या देशाची लोकं हालात जगत असताना चवीने बीसतंतूंचं सेवन करीत मी विश्वाच्या पसाराची कोणी सोडवू का? छे! कदापि नाही! मी प्रथम मज बांधवांना सावरण्याचं, मातेला परदास्यातून सोडवण्याचं काम जे ते! ते ब्रम्हकर्म! ते प्रथम करीन आणि मगच त्या मूळ आदि पुराणपुरुषाला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करीन की बाबा बघ! जे जे करायचे होते , जे जे मज जवळ होते ते ते मी वाहिले या ध्येयाप्रती! आता तरी तुझे हे रुद्ध दार उघड.आता तरी हे अस्तित्वाचं कोडं उलगडू दे. कर्तव्यापुर्णतेचे समाधान पुढचे दरवाजे उघडीत असतं.!
ही कविता १९२६ मध्ये सावरकरांनी रत्नागिरी मध्ये स्थानबद्धतेत लिहिली आहे हा काळ स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. इथे छत्रपतींना सावरकर ज्या गूढाशा पुरविण्यास सांगत आहेत त्या अगदीच काही कर्तव्यपूर्ती नंतरच्या समाधानी मनाने केलेल्या मागण्या नाहीत. इथे थोडा राजकारणाचाही अंश आहे नुकतंच १९१८ साली पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि तात्यारावांसारख्या मुत्सद्दी माणसाला दुसऱ्यामहायुद्धाची बीज पहिल्या महायुद्धात पेरली गेलेली सहाजिकच दिसत होती. या संधीचा उपयोग करून घेऊन इंग्रजांवर दबाव टाकून आपल्या देशास स्वतंत्र करून कसं घेता येईल या विचारात सावरकर होते. त्यासाठी जी बुद्धी लागेल ती शिवरायांकडून घ्यावी. शिकावी हे तात्याराव योजित होते. इंग्लंडशी लढण्यासाठी जपान, अमेरिका या देशांशी वाटाघाटी करणं हे क्रमप्राप्तच होतं. जर्मनीमध्ये नवोदित हिटलर याने उभारलेल्या सेनेची अनुसंधान साधणं इत्यादी प्रयत्न हेही गूढाशेतंच येतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. राजकारणात मदत घेतल्याने मिंधेपणा येत नसतो हे तत्त्वही ते शिकवू पाहत होते. तर अशा अनेक वेगवेगळ्या स्तरावरच्या गूढाशा ते शिवरायांना एकाच वेळी पुरवायला सांगत आहेत. होय! आणि हेही सगळं ठीक. पण आपल्या चरित्रात तात्याराव म्हणतात तसं “पण वर्तमानकाळ! तुझी प्रस्तुतची स्थिती! स्वप्न! स्वप्न! मूर्खा भविष्यकाळचे तुला ते पडत असलेले केवळ स्वप्न होय! एकदम उंच कड्यावरून कोसळून पडले असता जसे शरीरास लागते तसंच एखाद्या उंच विचाराच्या शिखरावरून एकदम एखाद्या विवश प्रतिकूल आणि रुक्ष विचाराच्या गर्तेत ढकलले गेले असता मनासही लागतें.” ह्या विचारानुगमे या गूढ आशांच्या उच्च विचारातून वर्तमानकाळ सावरकरांना एकदम सद्यस्थितीत घेऊन येतो. कसा आहे तो वर्तमान काळ?
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांचीं । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा!
हेच ते किल्ले जे शिवराय तहांत हरले आणि पुन्हा मोठ्या जिद्दीने दोन-तीन वर्षात परत मिळवते झाले.! त्या तळपत्या भवानीच्या जोरावर! क्षणभराची पिछेहाट ही त्यांना थांबवू शकली नाही! अनेक वेळा जरासंधासमोरून पलायन ज्यांनी केले ते यादव! पण त्यांच्यातल्याच महत्तमाने भिमास बरोबर घेऊन शेवटी जरासंध्याचा काटा काढलाच! तद्वत शिवरायांनीही पराक्रम दाखवला. पण आज त्या भवानी तलवारीची धार गंजली आहे. तिचा वापर होणंच बंद झालं आहे. अहिंसेच्या अतिरेकापायी आम्ही शस्त्र वापरणंच मुळी बंद केलं आणि स्वसंरक्षण करण्यासही त्यापाई अयशस्वी ठरलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानत गेले त्यावेळी अहिंसेचे तत्त्वज्ञान व त्याचा विकृत प्रसार हिंदुस्तानात झाला नव्हता. पण अकरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर अचानक हिंदुस्तानची ती सारी संन्यस्थ खड्गं तात्यारावांना पाहवली नाहीत.देव हा अनुकूलता देऊन यश देण्याचं काम करीत असतो. तो स्वतःहून येऊन काम करीत नाही. छत्रपतींनी सुद्धा भवानी तलवारीने चंड पराक्रम केला कोवळ्या वयात! तेव्हा कुठे ती भवानी माता त्यांच्यामागे उभी राहिली. देव हे परोक्षप्रीय असतात हे सावरकर जाणून होते.
“न ऋते श्रांतस्य सख्याय देवा:”
ही वेदकालीन रुचा म्हणते काय तर.. “अहो देव कुणाशी सख्य करतात? तर जो पराक्रम करून कष्ट करून श्रान्त झाला आहे अशांचीच.” अवलंबित्व मग ते त्या देवावर सुद्धा का असेना! उत्क्रांती क्रमात चूकच.! हे योगशास्त्रातलं दिव्य तत्त्वज्ञान तात्याराव किती सहजतेने सांगताना दिसतात . हेच तत्त्वज्ञान सांगताना त्यांना आज मनस्वी दुःखही होत आहे. हे गडकोट जंजिरे आज भंगले आहेत. साऱ्या प्रांताच्या राजधान्या ज्या होत्या त्यांची आज जंगले झाली आहेत. उज्जैन या शहरास राजधानीचे शहर ठरवण्यास स्वातंत्र्यवीरांची संमती होती कारण त्याचा गौरवशाली इतिहास. पण आज अख्खा हिंदुस्तानच दास्यत्वात खितपत पडला आहे आणि ओढून ताणून किती मंगले, शुभ गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न मनाने केला तरी या परदास्यते पाई त्या साऱ्या मंगलांचाच पराभव होताना दिसत आहे आणि महाराज मी तुम्हाला हाक मारतोय खरा पण या परिस्थितीमध्ये जगण्याची सुद्धा लाज वाटते आहे! हीच गोष्ट तात्याराव नारो शंकराचे देवालय आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पोवाड्यातही बोलून दाखवतात. महापुरुषांचे विचार खरोखरच अभेद असतात. ते खरे असतात त्यामुळे ही मनाची दुरुस्ती त्यांना काव्य करताना वेगवेगळ्या कवितांमध्ये करावी लागत नाही. बाजीप्रभूच्या पोवाड्यात सावरकर हाच मार्मिक प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारतात..
“अहो बंधुंनो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी..
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतो वंशज का आजिं?”
किंवा नारो शंकराचे देवालय बघूनही सहज उद्गारतात..
“होते ते तुमचे सुपूर्वज असे यत्कीर्तिते ना लय”
हे तुमचे आपले पूर्वज इतके पराक्रमी आणि आम्ही आज असे तलवार म्यान करून! आणि हाक शिवाजी महाराजांना? कशी मारु ही हाक? त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आम्हास पाहतात तरी येईल का? अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा अयाचित, निर्व्याज, निष्काम योगी सरतेशेवटी छत्रपतींकडे काही मागण्यास निघाला आहे. स्वतःसाठी नव्हे हिंदूंसाठी तुमच्या आमच्यासाठी! काय मागत आहेत विनायकराव सावरकर?
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा!!
शुद्धीची सगळ्यात सर्वोत्तम अशी अभिव्यक्ती म्हणजे यतीवर मान्य संतांची त्यास मिळालेली दाद! शिष्य गुरूंना त्याची शुद्धी कशी? आचरण योग्य होते आहे ना? असे विचारतो तेव्हा त्याची ती पवित्र चर्या पाहून गुरुजन कृतकृत्य होऊन मान डोलावतात. अशी ही शिवरायांच्या आचरणातली शुद्धी ही त्यांच्या हेतूंमध्ये लपली होती. हा हेतू होता ईश्वरी सत्तेचे अधिष्ठान साऱ्या हिंदुस्थानात आणण्याचा. स्वार्थाचा नव्हे परार्थाचा! स्वस्मै स्वल्पं परार्थाय सर्वस्वम् ! छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य रामदासांच्या चरणी वाहिलं होतं आणि हे श्रींच राज्य म्हणून राज्य सांभाळण्याचं काम ते करीत होते. त्यासाठी रक्ताचे पाणी करीत होते. हा हेतू! ही निस्वार्थता सावरकर मागत आहेत! अधिष्ठान म्हणून! योगशास्त्रातली दृढभूमी ती हीच! त्यानंतर ते मागतात ती बुद्धी! ती बुद्धी जिने अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा सर केला! ती बुद्धी जिने वैयक्तिक जीवनात शिवरायांना त्यांच्या मातेचा भोळा शिवबा राहू दिलं आणि राष्ट्रीय पातळीवर, स्वराज्याच्या पातळीवर बादशाहीच्या पाच शाह्या झुलवंत ठेवल्या! अशी विलक्षण बुद्धीमत्ता.! सावरकर म्हणत आहेत की, असे अनेक जण आमच्यापैकी भाबडेच राहिले तरी चूक नाही पण भाबड्या मनाला आधार बुद्धी आणि विवेक देत असतात. तो मात्र आपण छत्रपतींकडून मागून घेऊ. हा विवेक हा, की वैयक्तिक जीवनातल्या अध्यात्माच्या आणि पाप पुण्याच्या कल्पना या राष्ट्रीय पातळीवर बदलत असतात.! राष्ट्रीय पातळीवर कूटनीती!, जी खलास पार बुडवूनटाकते,ती औरंगजेबास शह-काटशह देणारी कूटबुद्धीच सावरकर छत्रपतींकडे मागत आहेत. बल मागत आहेत कष्टाळू लोकांचे जीवनसुसह्य करण्यासाठी.असं छत्रपतींच बळ, अशी शक्ती, जी बलोन्मत्त म्हणून जे झाले त्यांना त्यांच्याहून अधिक बल दाखवून त्यांना वठणीवर आणती झाली. शेवटी मागत आहेत एक मंत्र!
“मननात् त्रायते इति मन्त्रः” मनन केल्याने जो तारतो तो मंत्र ! अशा वेळी “धारणासू योग्यत: मनस:” या तत्त्वानुसार मनाची योग्यता मननाने, त्या धारणेने वाढत असते. ते अधिक बलिष्ठ आणि अधिक तेजस्वी होत असतं. पण मंत्र मात्र योग्य हवा. तोच समर्थांनी त्यांच्या अख्ख्या चरित्रातून उलगडूनदाखवलेला समर्थतेचा मंत्र! एकाकी लढण्याचा मंत्र! कष्ट सोसण्याचा मंत्र! निरपेक्षतेचा मंत्र!वैयक्तिक आयुष्यात अभिलाषशून्यता आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आयुष्यात समृद्धीचा मंत्र! बलवत्तर बनण्याचा मंत्र! त्या सर्वोदयी विवेकाचा मंत्र!
सामान्य मनुष्य अग्निस भितो. अन्न रांधायला, शेकोटी करायला व उदबत्ती लावण्यासाठीच काय तो अग्नीस आवाहन जे करावयाचे ते करतो. पण सावरकरांनी मात्र तो कठोपनिषदातला “लोकदिमग्निम्” ओळखला. तो शिवरायांमध्ये शोधला. त्याचं त्यांनी आवाहन केलं. त्यांना तो प्राप्त झाला. त्या अग्नितच ते विलीन झाले. तेजाची सांगता ही त्याच्यातच व्हायची. आपण मात्र किती वेळ “अग्निवत् आश्रयेत्” हे पालुपद बाळगायचं हेमात्र आपणच ठरवायला हवं.
- आदित्य विवेक शेंडे
(तरुण भारत, मुंबईच्या सौजन्याने)

