शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

स्वातंत्र्यवीरांवरील 'अ' सत्याचे प्रयोग

सप्रमाण प्रत्युत्तर

स्वातंत्र्यवीरांवरील 'अ' सत्याचे प्रयोग

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्ष, वामपंथी आणि काँग्रेसी- वामपंथी मनोवृत्तीकडून बेलगाम पद्धतीने आरोप केले गेले, केले जात आहेत. या सर्व राजकीय सत्तासलोलूप अशा काँग्रेसी वृत्तीच्या बेफाम आणि अतार्किक, तसेच केवळ स्वातंत्र्यवीरांची बदनामीच करावयाची या हेतूने हे सारे विवेकहीन कृत्य केले गेले, केलेजात आहे. याला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सप्रमाण प्रत्युत्तर देणारी एक स्वातंत्र्यवीरांवरील 'अ'सत्याचे प्रयोग ही  पुस्तिका प्रसिद्ध केली होती. प्रज्वलंतच्या वाचकांसाठी ही खास देत आहे. सावरकरांची बदनामी करणाऱ्यांना उत्तर तर यात आहेच पण आता नव्या पिढीलाही सावरकर नेमके काय व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी सुस्पष्ट वुद्धिवादी विचार मांडून देशाला दिशा कशी दिली ते ही यातून दिसेल आणि प्रज्वलंत डॉट कॉमवरूनही आपल्याला अन्य लेखांद्वारे समजू शकेल. - रवींद्र यशवंत बिवलकर

---


का होत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप ? 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची १९३७ मध्ये पूर्णपणे मुक्तता झाल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. त्याच वर्षी त्यांची हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि हिंदुमहासभेच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. १९३७ पासून १९४२ पर्यंत सलग सहा वर्ष त्यांनी हिंदुमहासभेचं अध्यक्षपद भूषवलं. अखंड भारताच्या प्रसारासाठी सारा देश पिंजून काढला. काँग्रेसला प्रतिस्पर्धी म्हणून हिंदुमहासभा हा प्रमुख राजकीय पक्ष मानला जाऊ लागला. 

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रीय राजकारणातून १९४६ पासून बाजूला झाले होते. परंतु त्यांचा करिष्मा जनमानसावर अजूनही होता. त्यामुळेच जाणीवपूर्वक गांधीहत्येचा आरोप ठेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय हत्या करण्यात आली आणि एका राजकीय पक्षाचे, हिंदुमहासभेचे अस्तित्वच संपविण्यात आले. हे सर्व सत्तेच्या राजकारणासाठी झाले. 

नेहरूंच्या नंतर शास्त्री आणि त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. या वेळेपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर हे संपूर्णरीत्या दुर्लक्षित झाले होते. हिंदुमहासभेचे अस्तित्वही नाममात्र उरले होते. त्यामुळे सावरकरांकडे बघण्याची काँग्रेसची दृष्टी बदलली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी या अनेक बाबतीत सावरकरांच्या विचारसरणी नुसार वागू लागल्या होत्या. यांत्रिकीकरण, सैन्यसज्जता, अण्वस्त्र निर्मिती, पाकिस्तानचा युद्धात दारूण पराभव करून केलेली बांगलादेश निर्मिती या आणि अशा अनेक गोष्टी सावरकर विचारानुसारच झाल्या होत्या - होत होत्या. गांधी-नेहरू यांचे जुनाट विचार पूर्णपणे बाजूला पडले होते. अशा स्थितीत अनेक निमित्तानं शासन दरबारी सावरकरांचा गौरव होऊ लागला होता. 

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २८ मे १९७० या दिवशी सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढलं होतं. 

१९८० मध्ये सावरकरांच्या जयंतीनिमित्त, मुंबईतील दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात इंदिराजी लिहितात, “ब्रिटिशसत्तेचा निर्भयपणे सामना करणार्‍या वीर सावरकरांचं भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. भारतमातेच्या या अद्वितीय सुपुत्राच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभाला माझ्या अनेक शुभेच्छा!” तसंच त्यांनी वैयक्तिकरित्या स्मारकाला दहा हजार रुपयांचा धनादेशही दिला होता. 

२८ मे १९७९ ला उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा शिलान्यास केला. २८ मे १९८९ ला उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. 

मग आज सावरकरांविरुध्द सतत गरळ ओकणार्‍या काँग्रेसला, इंदिराजींच्या नातवाला इंदिराजी चुकल्या, त्यांचे इतर नेते चुकले असं म्हणायचं आहे का? 

देशात जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांची अवहेलना झाली नाही. अटलजींचं हिंदुत्वनिष्ठ सरकार आलं आणि मुस्लिमांचं लांगुलचालन करणार्‍या काँग्रेसचं धाबं दणाणलं. या नंतरच सावरकरांच्या बदनामीची मोहीम सुरु झाली. हिंदुत्ववाद्यांचा आदर्श असलेल्या सावरकरांना बदनाम केलं तरच परत सत्तेवर येता येईल असा काहीसा मूर्ख विचार त्यामागे असावा. 

२०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली परत हिंदुत्ववादी सत्तेवर आले तेव्हा सावरकर विरोधाची धार अधिकच वाढली आणि आता २०१९ नंतर खरा इतिहास पुढे आणलाच पाहिजे हा विचार जसा पुढे येऊ लागला आणि नव-नवीन पुरावे समोर येऊ लागले तसा स्वत:च्या सोयीचा इतिहास लिहिणार्‍या काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली. आपली सगळी देशविरोधी कृत्य आता बाहेर येणार या भीतीनं काँग्रेस गळपटली. 

त्यामुळेच आपल्या अस्तित्वाचीच लढाई लढणार्‍या काँग्रेसनं सगळ्या सीमारेषा ओलांडत, अत्यंत हीन पातळीवर जाऊन, ज्यात एक कणभरही तथ्य नाही अशा कथा रचत, सावरकरांची वैयक्तिक बदनामी पुन्हा जोमानं सुरू केली आहे. 

त्या आरोपांबाबतची खरी वस्तुस्थिती साधार मांडत आहोत. यातील प्रत्येक उत्तराला ऐतिहासिक आधार आहेच! पण नुसतीच उत्तरे देणार नाही, पण आता काही प्रश्न पण विचारणार आहोत. आजपर्यंत सभ्यतेच्या मर्यादेमुळे नाही विचारले! पण आता जेव्हा तुम्ही विकृतीच्या सीमारेखा पार करत आहात तेव्हा, आम्हाला सद्गुण विकृती सोडून, ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित काही प्रश्न विचारणे भाग आहे! असेल हिम्मत तर द्या उत्तरं!!

जय हिंद! वंदेमातरम्!!

२६ फेब्रुवारी २०२०

रणजित सावरकर 

मंजिरी मराठे 



प्रकरण एक


तथाकथित माफीनामे आणि ऐतिहासिक तथ्य


आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये गेल्यानंतर मानसिकरित्या खचले होते आणि त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रं पाठविली, ही बाब सगळ्यांपासून लपवून ठेवली; तसेच त्यांना कोलू आदी कुठल्याही कठोर शिक्षा झाल्या नव्हत्या. 


वस्तुस्थिती 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी युरोप आणि रशियात झालेल्या अनेक क्रांत्यांचा अभ्यास करत भारतात काय आणि कसं कार्य झालं पाहिजे याची आखणी केली होती. गनिमी काव्यानं कसं लढावं याचं संपूर्ण मार्गदर्शन युवकांना व्हावं या हेतूनं इटलीच्या क्रांतीचे उद्गाते जोसेफ मॅझिनी यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद १९०६ मध्ये लंडनमध्ये पोहोचताच सावरकरांनी केला. त्या पुस्तकाला सावरकरांनी लिहिलेली प्रस्तावना क्रांतिकारकांची गीता ठरली. 

जोसेफ मॅझिनींनादेखील अटक करून तुरुंगात डांबलं होतं आणि सावरकरांच्याप्रमाणेच त्यांनी काही अटींचा स्वीकार करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. परंतु तरीही जोसेफ मॅझिनी आज इटलीचे श्रेष्ठ क्रांतिकारक मानले जातात आणि त्याच इटलीहून इथं आलेली एक बाई आणि तिची मुलं मात्र सावरकरांना माफीवीर म्हणत त्यांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी इटलीत जाऊन जोसेफ मॅझिनींना माफीवीर म्हणण्याची हिंमत दाखवावी! 

सावरकरांचा माफीनामा हा एक मुद्दा घेऊन सावरकरांना सतत बदनाम केलं जातं. 

आपल्या कुठल्याही मागण्यांसाठी आवेदन किंवा याचिका दाखल करण्याचा अधिकार हा प्रत्येक कैद्याला असतो आणि त्या आवेदनांनाच दयेची याचिकाअसं संबोधलं जातं. मुळात असे आवेदन (Mercy Petition) करणं ही एक नैर्बंधिक प्रक्रिया आणि अधिकार आहे. मात्र फाशीची शिक्षा झालेले कैदी असे आवेदन करण्यास अपात्र होते. त्यामुळे फाशीची शिक्षा झालेल्या एकाही कैद्यानं असे आवेदन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

सावरकर अंदमानात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल, सुविधा मिळण्याबद्दल आणि सर्वच क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी अनेक आवेदने केली. ही सर्व माहिती त्यांनी लपविलेली नाही तर स्वत:च ‘माझी जन्मठेप’ या आत्मवृत्तात लिहिली आहे. परंतु या आवेदनपत्रांत कुठेही सावरकरांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली नाही आणि पश्चातापही व्यक्त केला नाही. 

सावरकर बॅरिस्टर होते. त्यामुळे त्यांनी वकिलीबाण्यानं आपल्या सुटकेसाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न केला. यात गैर ते काय होते? का सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांनी अंदमानातच मरून जावे अशी या विकृत कॉग्रेसी मंडळींची इच्छा होती?

कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणं आणि पुन्हा लढा उभारणं, हे प्रत्येक क्रांतिकारकाचं कर्तव्य आहे, हे सावरकरांचं मत होतं. सावरकर आपलं हे मत अंदमानात असलेल्या क्रांतिकारकांपुढे वारंवार मांडत. याला पुरावा म्हणजे थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ संन्याल यांचे कथन. लाहोर कटाच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुटले. नंतर त्यांनी पुन्हा जोमानं क्रांतिकार्य सुरू केलं आणि प्रसिद्ध काकोरी कटाचे सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेपही झाली. आपल्या बंदी जीवन या आत्मचरित्राच्या पान २२६ वर ते म्हणतात, “सावरकरांनी केलेल्या आवेदनांत माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते, परंतु माझी सुटका झाली पण त्यांची का नाही?... कारण सरकारला अशी भीती होती की, सावरकरांची सुटका झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल.” 

सावरकरांनी अनेक आवेदने केली.  परंतु त्यात कुठेही पश्चाताप अथवा माफी नाही. १९१३ चे आवेदन तर आपल्याला अणि इतर क्रांतिकारकाना इतर सामान्य बंदिवानांना मिळणाऱ्या सुविधाही देत नाहीत याबद्दल होती.  सामान्य बंद्यांना केवळ सहा महिने सेल्युलर कारागृहात ठेऊन नंतर बेटावर बाहेर खुल्या कारागृहात ठेवत असत. अन्य क्रांतीकारकांना एक-दीड वर्षानंतर बाहेर पाठवले गेले. परंतु एकट्या सावरकरांना मात्र अखेर पर्यंत कोठडीत बंद करून ठेवले होते. कारागृहात सहा महिने ठेवावे असा नियम असताना सावरकरांना पहिले सहा महिने एकांतवासात ठेवेले होते. एकांतवास हा किती भयंक मानसिक छळवाद असतो हे वेगळे सांगायला नको. आपल्या १९१३ च्या आवेदनात आम्हाला एकतर राजकीय बंदी हा दर्जा द्या, नाहीतर सामान्य बंदिवानांप्रमाणे सवलती द्या आणि हे शक्य नसेल तर भारतात अथवा ब्रह्मदेशातील तुरुंगात पाठवा ही मुख्य मागणी आहे. या आवेदनात सावरकरांनी ब्रिटिशांवर ते क्रांतिकारकांना अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे. असे आरोप कोणीतरी माफीपत्रात करेल का?

ऑक्टोबर १९१४ मध्ये महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आवेदनात शेवटी ते लिहितात, मी जे लिहिलं आहे त्याबाबत सरकारच्या मनात शंका असेल तर मला अजिबात मुक्त करू नये. पण इतर सर्वांना मात्र सोडावे. 

५ ऑगस्ट १९१७ च्या आवेदनाच्या शेवटी सावरकर लिहितात, ‘जर सरकारला हे सर्व मी माझ्या मुक्ततेसाठी लिहित आहे असं वाटत असेल किंवा सर्वांच्या सुटकेत माझं नाव असणं हाच मुख्य अडथळा असेल तर माझं नाव गाळावं. मला माझ्या सुटकेनं जितकं समाधान मिळेल तितकंच समाधान मला इतरांच्या सुटकेनं मिळेल. या राजबंद्यांबरोबरच भूमिगत असलेल्या, स्वत:च्या मातृभूमीपासून दुरावलेल्या क्रांतिकारकांनाही परत येण्याची संधी मिळावी.’ 

ब्रिटिश दस्तावेजात या आवेदनांना स्पष्टपणे “Petition for General Amnesty for all the political prisoners” असं संबोधलं आहे. म्हणजे हे आवेदन केवळ सावरकरांनी स्वत:च्या सुटकेकरता केले नव्हते.

स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात खचले होते की नाही आणि सावरकरांनी सुटकेच्या आवेदनात लिहिलेला मजकूर हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग होता की नाही, हे बघायचे असेल तर त्यासाठी जेलमध्ये त्यांच्याबरोबर शिक्षा भोगत असलेले क्रांतिकारक आणि तुरुंगाच्या नोंदी तपासणं आवश्यक आहे. सावरकरांबरोबर तुरुंगात असलेले क्रांतिकारक उल्लासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंह आझाद आणि रामचरणलाल शर्मा या प्रसिद्ध क्रांतिकारकांनी आपल्या आत्मचरित्रात केलेले सावरकरांचे उल्लेख वस्तुस्थिती स्पष्ट करणारे आहेत. 

उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झटका आला होता. त्या आधी त्यांना जेव्हा हातकडीत टांगून ठेवलं होतं. तेव्हा तापाच्या भरात त्यांना भास झाला. त्यात जेलर बारीने त्यांना द्वंद्व युद्धाचे आव्हान दिल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने लढतात आणि बारीचा पराभव करतात. (12 years in prisonlife – पृष्ठ ६४-६५) आता अगदी भ्रमात असतानादेखील सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आहेत, या उल्लासकर दत्त यांच्या विश्वासातून सावरकरांचं मनोबल १९१२ मध्ये कसं होतं, हे सिद्ध होतं. 

१९१३ मध्ये सुराज्य पत्राचे संपादक रामचरणलाल शर्मा यांना संपात भाग घेतल्याबद्दल जेव्हा शिक्षा वाढविण्याची धमकी जेलरनं दिली तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “यदि विनायक सावरकर ५० वर्ष काट सकते हैं, तो मैं भी काट लूंगा।” (काला पानी का ऐतिहासिक दस्तऐवज - पृष्ठ ५३) म्हणजेच १९१३ मध्ये सुद्धा क्रांतिकारक, सावरकरांकडे एक आदर्श म्हणूनच बघत होते. 

१९१९ मधल्या संपाबद्दल अंदमानमध्ये सजा भोगत असलेले महान क्रांतिकारक भाई परमानंद आपल्या ‘आपबीती’ या चरित्रात म्हणतात की, जेलमध्ये झालेल्या कुठल्याही संघर्षासाठी जेलर बारी आणि पर्यवेक्षक, सावरकर बंधुंनाच जबाबदार धरत असत. (आपबीती - पृष्ठ १०२) 

१४ नोव्हेंबर १९१३ चे आवेदन देताना सावरकरांनी ब्रिटिश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी व्यक्तिगत चर्चा केली होती. हे आवेदन सरकारकडे पाठविताना आपल्या २३ नोव्हेंबर १९१३ च्या अहवालात ब्रिटिश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांबद्दल काढलेले निष्कर्ष अत्यंत महत्वाचे आहेत. ते म्हणतात, 

“......सावरकरांचे आवेदन हे दयेचे असले तरी त्यात त्यांनी कुठेही खेद अथवा खंत व्यक्त केलेली नाही. पण त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला असल्याचा दावा केला आहे. १९०६-१९०७ मध्ये असलेल्या परिस्थितीमुळे आपण कट रचला असे त्यांचे म्हणणे आहे. पण आता सरकारने विधिमंडळ, शिक्षण इत्यादी अनेक बाबतीत  सुधारणा करण्याचा सलोख्याचा दृष्टीकोन अवलंबला असल्याने क्रांतिकारी मार्ग अनुसरण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे.” 

“....सावरकरांच्या बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही आणि माझ्या मते ते कुठल्याही भारतीय तुरुंगातून पळून जातील. ते इतके महत्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतीय अराजकतावादी त्यांना सोडविण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अमलातही आणतील. त्यांना जर सेल्युलर जेल बाहेर, अंदमानात धाडले तर त्यांची सुटका निश्चित आहे. त्यांचे मित्र सहजतेने एखादे भाडयाचे जहाज जवळपास लपवू शकतील आणि थोडे पैसे चारून त्यांच्या सुटकेसाठी उर्वरित बाबी सहज शक्य करतील.”

“.....सावरकरांसारख्या माणसाला अगणित काळ कठोर परिश्रमाचे काम देता येणार नाही. त्यांच्या लागोपाठ भोगावयाच्या शिक्षेचा पन्नास वर्षाचा कालावधी त्यांना आयुष्यभर तुरुंगात ठेवण्यासाठी पुरेसा आहे. काही वर्षांचे कठोर परिश्रम त्यांच्या अपराधासाठी दंड म्हणून पुरेसे होतील आणि ते बाह्य समाजाला धोकादायक असल्याने उर्वरित काळात त्यांना तुरुंगातच बंदिवास भोगावा लागेल.” 

ब्रिटीश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी हे निष्कर्ष काढण्याला आधार होता तो ऑगस्ट १९१३ च्या ब्रिटिश गुप्तचर विभागानं दिलेल्या अहवालाचा. B-August १९१३ no. ६१ या अहवालात, मादाम कामा, अंदमानात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अमेरिका, जर्मनीतील क्रांतिकारकांच्या सतत संपर्कात असल्याचं स्पष्ट नमूद केलं आहे. 

२३ नोव्हेंबर १९१३ ला क्रांतिकारक आणि जर्मन सरकार यांच्यातला दुवा म्हणून कार्य करणार्‍या एका व्यक्तीला ब्रिटिशांनी अटक केली. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात सेल्यूलर जेलवर हल्ला करून तेथील क्रांतिकारकांना सोडवून त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेशांत उठाव करण्याच्या योजनेचा संपूर्ण तपशील होता. त्यानुसार शेकडो क्रांतिकारक ब्रह्मदेशात जमा झाले होते. या कागदपत्रांमध्ये अंदमानद्वीप तसंच सेल्युलर जेलचे नकाशे, तिथं काम करणार्‍या अधिकार्‍यांची नावं, पहारेकर्‍यांच्या चौक्या आदि सविस्तर माहिती होती. सेल्युलर जेलमधून ज्यांना सोडवायचं होतं त्या क्रांतिकारकांच्या यादीत पहिलं नाव होतं ते सावरकर बंधुंचं. 

क्रांतिकारकांना सोडविण्यासाठी सर्वप्रथम १९१४ मध्ये जर्मनीच्या एम्डेन या युद्धनौकेनं अंदमानची नाकेबंदी केली. परंतु त्यावेळी एच एम एस सिडनी या अधिक प्रगत ब्रिटिश युद्धनौकेनं एम्डेन वर हल्ला करून ती कोको बेटानजीक बुडविली. 

रासबिहारी बोस यांचे निकटचे सहकारी सच्चिंद्रनाथ संन्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रासबिहारी बोस यांनी आणखी एक नौका डिसेंबर १९१५ मध्ये अंदमानाच्या दिशेनं पाठविली होती. यावेळी हिंदुस्थानी क्रांतिकारकांना निकोबार  बेटावर उतरवून रात्रीच्या वेळी अंदमानवर हल्ला करण्याची योजना होती. त्याशिवाय दोन नौका युद्धसामग्रीसह भारताच्या दिशेनेदेखील रवाना झाल्या होत्या. परंतु ब्रिटिश गुप्तचर खात्याला या संपूर्ण कटाची माहिती मिळाली असल्यामुळे शस्त्रं घेऊन जाणारी एक नौका जप्त करण्यात आली. दुसर्‍या नौकेचे काय झाले याची माहिती उपलब्ध नाही. परंतु अंदमानच्या दिशेने जाणारी नौका, एचएमएस कॉर्नवेल या ब्रिटिश युद्धनौकेने डिसेंबर १९१५ च्या शेवटच्या आठवड्यात बुडविली. याचवेळी शस्त्रास्त्रं घेण्यासाठी निघालेले बंगालचे क्रांतिकारक जतींद्रनाथ मुखोपाध्याय (बाघा जतीन) यांना सप्टेंबर १९१५ मध्ये बालासोर इथं त्यांच्या दोन साथीदारांसोबत चकमकीत मारण्यात आलं. 

याच दरम्यान भारतीय सैन्यात उठाव करण्याची योजनादेखील उघडकीस आली. विष्णू गणेश पिंगळे यांनी रासबिहारी बोस, सच्चिंद्रनाथ संन्याल, कर्तार सिंग सराबा यांच्या साथीनं उठाव करण्याची मोठी योजना आखली होती. ब्रिटिशांनी इंडियन डिफेन्स अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करून पिंगळे आणि कर्तार सिंग या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली. इतर क्रांतिकारकांना दीर्घ मुदतीच्या शिक्षेवर अंदमानला पाठवण्यात आलं. 

ब्रह्मदेशात कार्यरत असलेल्या सात क्रांतीकारकांना फाशी देण्यात आलं तर आठ जणांना अंदमानला जन्मठेपेवर धाडण्यात आलं. 

भारतात अंतर्गत उठाव करून त्याच वेळी ब्रह्मदेशातून भारतावर आक्रमण करण्याची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना होती. भारतातील आणि परदेशातील सर्व क्रांतिकारी संघटनांनी एकत्र येऊन हाती घेतलेली ही सर्वात मोठी मोहीम होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांना अंदमानातून सोडवून सयाम (थायलंड) येथे न्यायचं आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली आधी सयाम आणि मग ब्रह्मदेश ताब्यात घेऊन तिथून भारतावर उघड आक्रमण करायचं अशी ही महत्वाकांक्षी योजना होती. 

दुर्दैवानं अपयश आलं असलं तरीही या योजनेचं महत्व वादातीत आहे. यासाठी अविरत कार्यरत असलेले असंख्य अनाम क्रांतिकारक देशोधडीला लागले, हुतात्मा झाले. त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे काय झाले याची साधी वार्ताही नव्हती. त्यांच्या हजारो वीर माता, वीर पत्नी आपला मुलगा, आपला पती कधी परत येईल या प्रतीक्षेत जगत राहिल्या. पण दरवाज्यावर होणारी प्रत्येक थाप त्यांचा अपेक्षाभंग करत राहिली!  परंतु आज मात्र इतक्या महत्वाकांक्षी योजनेची, या क्रांतिकारकांच्या बलिदानाची आणि या वीर माता, वीर पत्नींच्या असामान्य त्यागाची साधी माहिती देखील कोणाला नसावी हे दुर्दैवी आहे. आज गोडवे गायले जातात ते केवळ राजप्रासादात सुखाने भोगलेल्या बंदिवासांचे! पत्नी आजारी असतानाही, आपल्या दुराग्रहापोटी- तिच्यावर आधुनिक उपचार न करू देता- तिला मृत्युमुखी धाडणाऱ्या तथाकथित महात्म्यांचे आणि त्यांच्या विकृत सत्याच्या प्रयोगांचे!!


सगळे ब्रिटीश अहवाल हेच सिद्ध करतात की स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानात अमानुष यातना भोगत असतानादेखील युरोप, अमेरिका येथील भारतीय क्रांतिकारकांच्या मदतीनं क्रांतीच्या योजना आखत होते. 

सावरकर हे बॅरिस्टर होते त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुटकेसाठी वकिली आयुधांचा वापर केला. तसंच प्रत्येक आवेदनात त्या वेळच्या देशातल्या, जगातल्या परिस्थितीचा आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी उपयोग केला. 

सावरकरांनी आणि त्यांचे बंधू नारायणराव यांनी केलेल्या आवेदनांमुळेच, सावरकर बंधु सोडून इतर क्रांतिकारकांना काही सुविधा मिळाल्या, शेकडो क्रांतिकारकांची सुटका झाली पण सावरकर बंधुंची  सुटका व्हायला मात्र १९२१ हे वर्ष उजाडावं लागलं.  तोपर्यंत वीर सावरकरांना कुठलीही सवलत ब्रिटिशांनी दिली नाही की त्यांची कोठडीबंदी चुकली नाही. 

अंदमानातून सुटलेला प्रत्येक क्रांतिकारक हा राजकारणात भाग न घेण्याची अट मान्य करूनच सुटला आहे. तसेच १९३१ ला काँग्रेस नेत्यांवरील खटले मागे घ्यावेत यासाठी संपूर्ण सविनय कायदेभंग आंदोलनच गांधी- नेहरूंनी मागे घेतलं होतं आणि १९३५ साली तुरुंगातून सुटताना अशीच अट नेहरूंनी स्वीकारली होती. 

आता इतकं असतानाही केवळ राजकारणात भाग न घेण्याची अट मान्य करून सुटका करून घेतली म्हणून सावरकरांना माफीवीर म्हणणार का? 

सावरकरांनी जेलमध्ये कुठलेही कष्ट भोगले नाहीत, असा एक बिनबुडाचा आरोप काही जण करतात. परंतु अंदमानमध्ये १९१६ ते १९२१ मध्ये शिक्षा भोगत असलेले महान क्रांतिकारक पृथ्वीसिंह आझाद यांचा अनुभव काही वेगळंच सांगतो. 

“वीर सावरकर ने आधुनिक भारत के युवकों को क्रांती का पाठ पढाया था। क्रांतिकारी वृत्तीवाले नवयुवकों के वे तेजस्वी नेता थे। ऐसे सामर्थ्यशाली व्यक्ती से अंग्रेज अधिकारियों ने वह काम लिया जो बैलोंसे लिया जाता था। तेल के कोल्हू पर प्रतिदिन तीस पौंड तेल निकालने के लिए सावरकर को मजबूर किया गया।” (क्रांति के पथिक - पृष्ठ १०८) 

पृथ्वीसिंह आझाद भारतात परत आल्यानंतर, ब्रिटिशांच्या कैदेतून निसटल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव सावरकर यांनीच त्यांना आसरा दिला होता. (क्रांति के पथिक- पृष्ठ १५३) त्यानंतर भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा सूड म्हणून पृथ्वीसिंह आझाद आणि सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारी दुर्गाभाभी व्होरा यांनी जेव्हा १९३० मध्ये लॅमिंग्टन पोलिस ठाण्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विश्वासू सहकारी आणि क्रांतिकारक गणेश रघुनाथ वैशंपायन होते. (क्रांति के पथिक - पृष्ठ १९०)

म्हणजे पृथ्वीसिंह आझाद, उल्लासकर दत्त, भाई परमानंद, रामचरणलाल शर्मा आणि सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांचा प्रत्यक्ष अनुभव खोटा आहे, असं सावरकर विरोधकांना म्हणावयाचं आहे का? 

सध्या उपलब्ध असलेल्या सावरकरांच्या कारागृहातील नोंदीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठोठावण्यात आलेल्या अमानवीय शिक्षा आणि सावरकरांचे वागणं याची माहिती होईल. पण यात कोलू ओढल्याची नोंद नाही म्हणून सावरकरांनी कोलू ओढलाच नाही असा बिनबुडाचा आरोप काही भाडोत्री लेखक करतात. पण कोलू ओढणे हे नियमित काम होते, शिक्षा नव्हे; त्यामुळे हा उल्लेख त्यात नसणे स्वाभाविक आहे. ब्रिटिश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक हेच सांगतात. आता काय काय शिक्षा सावरकरांना झाल्या आणि त्यांची काय वर्तणूक होती ते पहा!

१. तुरुंगात पोहोचल्यानंतर ११ व्या दिवशी म्हणजे १५ जुलै १९११ ला त्यांना सहा महिने कोठडी बंद करण्यात आले. 

२. १५ जानेवारी १९१२ या दिवशी त्यांची कोठडी बंदी संपली. 

३. ११ जून १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ कागद सापडल्याबद्दल १ महिना एकांतवास. 

४. १९ सप्टेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ दुसर्‍याला लिहिलेले पत्र सापडल्याबद्दल सात दिवसांची खडी हातबेडी 

५. २३ नोव्हेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ दुसर्‍याला लिहिलेलं पत्र सापडल्याबद्दल एक महिन्याची एकांतवासाची शिक्षा. 

६. ३० डिसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग. 

७. १६ नोव्हेंबर १९१३ या दिवशी ब्रिटिश गृहमंत्री रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी भेट झाल्यानंतर ही काम करण्याचे नाकारल्याबद्दल एक महिन्याची एकांतवासाची शिक्षा. 

८. ८ जून १९१४ या दिवशी काम करण्यास नकार दिल्यामुळे सात दिवस हातबेड्या घालून उभे राहण्याची शिक्षा. 

९. १६ जून १९१४ या दिवशी काम करण्यास नकार दिल्यामुळे चार महिने साखळदंडाची शिक्षा. 

१०. १८ जून १९१४ काम करण्यास संपूर्ण नकार दिल्यामुळे दहा दिवस खोडा बेडीची शिक्षा. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देण्यात आलेल्या अनेक शिक्षा या बेकायदेशीर असल्यामुळे त्याची नोंद झाली नाही असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात स्पष्टपणे म्हटलं आहे आणि इतर क्रांतिकारकांच्या आत्मचरित्रातही हे स्पष्ट केलं गेलं आहे. वरील अपूर्ण दस्तऐवज बघतानाही सावरकरांना किती कठोर शिक्षा झाल्या होत्या, याची झलक मिळते. सावरकरांना अंदमान मध्ये पोहोचल्यावर लगेचच ६ महिने एकांतवासात ठेवले होते. ही शिक्षा किती भीषण आणि अमानवीय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातील वागणूक कशी होती याबद्दल १९१९ मधील एक अहवाल म्हणतो “त्यांची वागणूक नम्र असली तरीही त्यांनी स्वत:हून सरकारला सहकार्य करण्याची प्रवृत्ती कुठेही दाखविली नाही. त्यांचे खरे राजकीय विचार काय आहेत, हे यावेळी सांगता येणे कठीण आहे.” सावरकर हे अजूनही धोकादायक कैदी असल्याने सावरकरांना सार्वत्रिक माफीचा लाभ देऊ नये, असा निर्णय मुंबई प्रांतिक सरकारनं या अहवालाच्या आधारे घेतला होता. 

ब्रिटिश गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्यापुढे तथाकथित विनंती आवेदन सादर केल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे लगेच संप पुकारतात आणि त्याबद्दल त्यांना एक महिन्याची एकांतवासाची शिक्षा होते आणि त्यानंतरही अनेकदा ते काम नाकारून खडाबेडी, दंडाबेडी, एकांतवासाची शिक्षा भोगतात, हे त्यांच्या कणखर स्वभावाचं निर्विवाद निदर्शक आहे. 

यानंतरही सावरकरांच्या मनोधैर्याबद्दल कुणाच्या मनात काही शंका असल्यास त्याचं निराकरण करणारा अस्सल पुरावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळाला आहे. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हस्तलिखित प्रकाशात आलं असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेल्या तीन देशभक्तीपर रचना आहेत. १९२१ मधल्या या हस्तलिखितातील रचना युवकांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचं आवाहन करतात. यातील एक गीत सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्याद्वारे काकोरी कटातील आरोपींपर्यंत पोहोचलं असावं. तुरुंगात जी देशभक्तीपर गीतं हे क्रांतिकारक गात, त्यात सावरकरांची “यही पाओगे...” ही गझल समाविष्ट होती. (काकोरी के दिलजले, पृष्ठ ११२) सावरकरांनी उर्दूत लिहिलेल्या एका रचनेत ते म्हणतात, 

“हंता रावणका हैं अपना राम वीरवर सेनानी,

कर्मयोग का देव हैं स्वयं कृष्ण साऱथी अभिमानी।

भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली हैं,

फिर देर क्यूं, उठो भाई हम ही हमारे वाली हैं॥”


१९१० मध्ये अंदमानला जाण्याआधी लिहिलेल्या “पहिल्या हप्ता” या कवितेत हेच भाव व्यक्त झाले होते आणि १० वर्षांच्या कठोर कारावासानंतरही सावरकरांचे विचार तीळमात्र बदलले नव्हते, हेच सावरकरांच्या हस्तलिखितावरून निर्विवाद सिद्ध होतं. 


स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटकेबद्दल स्पष्ट भूमिका 

आपल्या सुटकेचे आवेदन करण्यामागची भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वत: आपल्या भावाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. सावरकरांनी लिहिलेली पत्रं तुरुंगाधिकारी तपासात मगच पाठवत असत त्यामुळे सावरकरांची भूमिका सरकारला माहित होती. त्याच प्रमाणे या पत्रातील मजकूर लगेचच वर्तमानपत्रात छापून आला आणि त्याची नोंदही पोलिसांनी घेतली. त्या पत्रातला काही भाग देत आहोत. 


पोर्ट ब्लेअर, 

दिनांक ६-७-१९२० 

प्रियतम बाळ, 

...अखेर राजक्षमेची आज्ञा आली. शेकडो बंदी कारागृहातून मुक्त होत आहेत. मुख्यत: ज्यांनी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या आवेदनाची योजना केली, त्याला पाठिंबा दिला, त्याच्यावर संमत्या घातल्या त्या आपल्या पुढाऱ्यांच्या आणि देशबांधवांच्या, त्यातही मुख्यत: बाँबे नॅशनल युनियनच्या अनवरत परिश्रमांचे हे फळ आहे. इतक्या थोडया अवकाशात चांगल्या पाऊण लाख लोकांच्या नावाने पाठवलेल्या प्रचंड आवेदनाचा सरकारच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असलाच पाहिजे मग ते कितीही नाकारीनात. निदान त्या आवेदनाने राजकीय बंद्यांची आणि त्यामुळे ज्या कार्यासाठी ते लढले व हरले त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढवली यात शंका नाही. आता खरोखर आमची सुटका व्हावयाचीच असेल तर तिच्यात काही तरी अर्थ वाटेल. कारण आम्ही त्यांच्यात परत यावे अशी इच्छा आमच्या देशबांधवांनी प्रदर्शित केली आहे. त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणि सहानुभूती दाखविली त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी थोडे आहेत. त्यांच्या जितक्या आत्मीयतेला आम्ही पात्र आहो असे आम्हाला प्रामाणिकपणाने वाटते त्यापेक्षा त्यांनी आमच्याविषयी अधिक आत्मीयता आणि आदर दाखविला आहे आणि त्यांचे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेले नाहीत. कारण जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हांला या कोठडीत खितपत पडावे लागते आहे, तरी आपल्या सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणार्‍या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हांला वाटतात; आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्रे, आवेदन यांच्या द्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली तिचे आम्हांला फळ मिळाल्याचे समाधान वाटते. 

... ता. २-४-१९२० ला मी राज्यकर्त्यांनी नुकत्याच दिलेल्या या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी नवीन आवेदन सरकारकडे पाठविला आहे. त्या आवेदनात सरकारने हे जे शेकडो राजकीय बंदी सोडले आणि अशा रीतीने माझे १९१८ चे आवेदन अंशत: मान्य केले त्यासाठी पहिल्याने आभार मानले आहेत आणि मग अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याप्रमाणेच राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल अशा रीतीने या क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे अशी विनंती केली आहे. 

... सरकारने आपला दृष्टिकोन पालटला आहे आणि भारतवर्षाला स्वातंत्र्य, सामर्थ्य अणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य करण्याची त्याची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. माझा विश्वास आहे की, खरोखर अशी परिस्थिती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरही पुष्कळ क्रांतिकारक आपले पाऊल जेथल्या तेथे थांबवतील, या मिळालेल्या सुधारणानंतरच्या विधिमंडळाच्या मोडक्यातोडक्या वाटेवरच्या धर्मशाळेत मानप्रद अशा संधीसाठी इंग्लंडशी हात मिळवावयास सिद्ध होतील आणि पुन: प्रगतीच्या रस्त्यावर पुढे पाऊल टाकावयाची आज्ञा उच्चारली जाईपर्यंत तेथे कामही करतील.

... तेव्हा आम्ही जे क्रांतिकारक झालो ते निरुपाय म्हणून झालो, उल्हासाने नाही. हिंदुस्थानच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीने आणि इंग्लंडच्याही हिताच्या दृष्टीने त्यांनी परस्परांच्या साहाय्याने आणि सहकार्याने आपली ध्येये शांततेने आणि क्रमश: प्रगती होऊन गाठणे अवश्य आहे असे आम्हाला तेव्हा वाटे, आणि अद्यापिही जर ते अवश्य असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली पहिली संधी मी साधीन आणि प्रत्यक्ष क्रांतीने किंवा अन्य मार्गाने पाडलेल्या घटनानुसार प्रगतीच्या भगदाडात घुसेन आणि उत्क्रांतीच्या सेनेला त्यातून एकसारखे, अडथळा न होता, जाता येईल अशा रीतीने ते भगदाड रुंद करण्याचा प्रयत्न करीन. 

सरकारने जर राज्यघटनेत मन:पूर्वक सुधारणा केल्या नि त्या उपयोगात आणल्या आणि त्या सुधारणांमुळे ही असली घटनेची खिंड निर्माण झाली तर मग राज्यक्रांती तेथेच संपेल आणि तिच्या जागी उत्क्रांती हा आम्हांला सर्वांना एकत्र आणणारा शब्द होऊन बसेल. अणि मातृभूमीच्या सेनेतील एक क्षुद्र सैनिक म्हणून मी त्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी मन:पूर्वक झटेन; म्हणजे त्या सुधारणांचा उपयोग भारताला पुन: स्वतंत्र वैभवशाली आणि थोर बनवून, इतर राष्ट्रांच्या हातात हात घालून किंवा त्यांना मार्ग दाखवून मनुष्यजातीच्या नियत भवितव्याकडे घेऊन जाण्यासाठी करीन. 

... या आवेदनापासून आमच्या सुटकेच्यासंबंधात विशेष काही होईल अशी आशा करू नकोस. आम्ही आमची आशा कधीच बळावू दिली नाही आणि त्यामुळे सुटका न झाल्यास आम्हाला त्याविषयी विशेष निराशाही वाटणार नाही. काहीही निर्णय झाला तरी तो स्वीकारावयाला आम्ही सिद्ध आहो. तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केला आहेस आणि मुख्यत: तुझ्या संतत उद्योगाचेच हे फळ आहे की राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाला इतके तीव्र स्वरूप आले नि आम्हांला दोघांना वगळले तरी उर्वरित शेकडो राजकीय बंद्यांना आपले स्वातंत्र्य परत मिळाले. 

तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणि स्नेह्यांना आणि नातलगांना नमस्कार लिहून हे पत्र पुरे करतो. 

प्रिय बाळ, 

तुझाच प्रिय तात्या 


हे पत्र  अन्य वृत्तपत्रांबरोबरच ‘दै. मराठा’मध्ये २५ जानेवारी १९२०ला छापून आल्याची पोलीस नोंद आहे. या बातमीच्या आधारे विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आले होते.


प्रकरण दोन


निर्दोष ठरूनही सावरकर गांधीहत्येत दोषी?


आरोप

कपूर कमिशननी सावरकरांना गांधीहत्येत दोषी ठरवले!


वस्तुस्थिती 

गांधीहत्येच्या कटाची माहिती सरकारी अधिकारी/ मंत्र्यांना आधी होती का या प्रश्नाचा तपास करण्यासाठी कपूर कमिशनची स्थापना करण्यात आली होती. गांधीहत्येप्रकरणी न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची आधीच निर्दोष मुक्तता केली होती आणि नेहरू सरकारने त्या विरुद्ध अपील पण केले नव्हते. त्यामुळे सावरकर यात दोषी होते का नाही हा प्रश्नच मुळात कपूर कमिशन पुढे नव्हता.

पण कपूर कमिशनच्या पूर्ण अहवालात गोडसे आणि इतर आरोपींचा सावरकरवादी असा हेतूत: उल्लेख सतत करण्यात आला आहे. गोडसे आणि इतर हे हिंदुमहासभेचे अनुयायी होते आणि सावरकर अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या संपर्कात होते. गांधीहत्येच्या सुमारे दोन वर्षे आधी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर सावरकरांचा गोडसे यांच्याशी संपर्क नव्हता. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविल्याबद्दल आणि मतभेद बाजूला ठेऊन केंद्र शासनाला सहकार्य करण्याच्या धोरणाबद्दल सावरकरांवर आपल्या अग्रलेखात तीव्र टिका केली होती. त्यामुळे नथुराम गोडसे हे सावरकरांचे अनुयायी नसून स्वतःचे वेगळे विचार असणारी व्यक्ती असल्याचं स्पष्ट होत असताना केवळ द्वेषामुळे या अहवालात आरोपींचा उल्लेख सतत सावरकरवादी म्हणून करण्यात आला आहे. 

पुढे जाऊन कपूर कमिशनने २५ व्या प्रकरणात मुंबईमधील तपासाचा उहापोह करताना नगरवाला यांना मिळालेला उपलब्ध पुरावा हा हत्येच्या कटाकडे निर्देश करत असल्याचे म्हणत नगरवाला यांनी कसा तपास करायला हवा होता या विषयी चर्चा करताना, सावरकरांविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना, कपूर यांनी  ‘All these facts taken together were disruptive of any theory other than the conspiracy to Murder by Savarkar and his Group” असा उल्लेख बेजबाबदारपणे केला आहे. परंतु प्रकरण २५ च्या निष्कर्षात याबद्दल काहीच नाही. तसेच अहवालाच्या अंतिम निष्कर्षात देखील असा एकही शब्द नाही. तेव्हा द्वेषबुद्धीनं अहवालात मध्येच कुठेतरी घुसडलेलं, शेंडाबुडखा नसलेलं वाक्य हा कपूर कमिशनचा निष्कर्ष आहे, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे.  

कपूर कमिशनपुढे सावरकरांचे सचिव गजानन दामले आणि अंगरक्षक आप्पा कासार यांनी सावरकर हे गांधीहत्येत सहभागी असल्याची आम्हाला माहिती होती, अशी साक्ष दिल्याचं निखालस खोटं विधान काही भाडोत्री संशोधक नेहमी करतात. परंतु या दोघांनी कपूर कमिशनपुढे कधीही साक्ष दिली नव्हती. गांधीहत्येच्या खटल्यातही या दोघांना साक्षीदार करण्यात आलं नव्हतं. कपूर कमिशनपुढे तपासलेल्या १०१ साक्षीदारांच्या यादीत त्यांचं नाव नाही. 

गांधीह्त्येबाबत श्री पंकज फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर २०१८ मध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सावरकरांना निर्दोष ठरवलं आणि त्यांचा गांधीहत्येशी कोणताही संबंध नव्हता असं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता गांधीहत्येत जर कोणी सावरकरांना दोष देण्याचा प्रयत्न केला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. 

आता सर्वोच्च न्यायालयानेच कपूर कमिशनने सावरकरांना गांधीहत्येत दोषी मानले नसल्याचा निर्णय दिला असल्याने हा प्रश्न मुळातूनच संपला आहे.

पण यावर आणखी काही तथ्ये पुढे आणली गेलीच पाहिजेत. गांधीहत्येच्या खोट्या आरोपामुळे  खरंतर सावरकरांची राजकीय हत्या झाली, देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या हिंदुमहासभेचे अस्तित्वच संपलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कित्येक वर्ष मागे गेला !

पण कुठल्याही हत्येमागे काहीतरी अंतस्थ हेतू असतो. गांधी हत्येसाठी सावरकरांना जबाबदार धरण्यापेक्षा, गांधीहत्येमुळे कोणाचा फायदा झाला, कोणी ती हत्या घडू दिली हे पहाणं जास्त महत्वाचं ठरेल. 

‘मेन हु किल्ड गांधी’ या पुस्तकाचे लेखक मनोहर माळगावकर यांनी माफीचा साक्षीदार बडगे याची मुलाखत घेतली तेव्हा सावरकरांना आम्ही भेटलोच नव्हतो आणि मला त्यांच्या विरुद्ध खोटी साक्ष द्यायला भाग पाडलं अशी कबुली बडगे यानं दिली होती. 

पण कपूर कमिशनने सावरकरांना दोषी ठरवले होते असा सतत डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसनेच हा अहवाल का स्वीकारला नाही या प्रश्नाचे उत्तर आता कॉंग्रेसने दिले पाहिजे. हा अहवाल जर जनतेपुढे आला तर सावरकरांचे निर्दोषत्व सिद्ध तर होईलच, पण त्यावेळी जे घडले ते सत्य जनतेपुढे येईल.

आता गांधीहत्येमागील खरी वस्तुस्थिती काय? कपूर कमिशन म्हणते तरी काय?

नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळीने गांधीजींचा मृत्यू झाला हे खरे. परंतु दि. २० जानेवारीला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या कटात सामील असलेल्या गोडसे, करकरे आणि आपटे यांची ओळख पोलिसांना पटलेली असूनही आणि काही ज्येष्ठ मंत्र्यांना आधीच गोडसे गांधींना मारणार असल्याचे कळूनही, गांधीजींच्या रक्षणाबाबत काहीच करण्यात आले नाही.

‘द लाइफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी’ या त्यांच्या चरित्र ग्रंथात अमेरिकन लेखक रॉबर्ट पेन याने या हत्येचे वर्णन ‘अनुमतीने झालेली हत्या’ असे केले आहे. संबंधीत सर्व तथ्ये आता उपलब्ध झाली असून त्यांचा एकत्रित विचार करता, गांधीचा काटा मार्गातून दूर करण्यासाठी एक सुपर-कॉन्स्पिरसी तर कार्यान्वित नव्हती ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या खूनामागची ही विलक्षण परिस्थिती, त्याचा कट, त्याची पार्श्वभूमी, प्रसंग जाणून घेणे उद्बोधक ठरेल.

अहमदनगर (महाराष्ट्र) येथे २४ नोव्हेंबर आणि २६ डिसेंबर १९४७ या दिवशी २ हातबॉम्ब फेकण्यात आले. १ जानेवारी १९४८ ला अन्य कुठल्याशा खूनप्रकरणाच्या शोधात पोलिसांनी विष्णुपंत करकरे यांचे व्यवस्थापक एस. व्ही. केतकर यांच्या घरावर छापा घालून झडती घेतली. यात हाती लागलेल्या लोखंडी पेटीमध्ये अनेक हातबॉम्ब, रिव्हॉल्व्हर, जंबिये, स्फोटके, फ्यूज आणि पिस्तुलाच्या गोळ्या होत्या. एस. व्ही. केतकर यांनी आपल्या कबुलीजबाबात म्हटले की, त्यांचे धनी करकरे यांनी ती पेटी त्यांच्याकडे ठेवली होती. त्यानंतर ९ जानेवारी १९४८ रोजी करकरे नि मदनलाल पहावा यांच्या अटकेचे आदेश काढले गेले. परंतु त्याच दिवशी दुपारीच या दोघांनी नगर सोडले होते.

२० जानेवारीला गांधीजींच्या सभेत बॉम्बस्फोट झाल्यावर मदनलाल पहावाला अटक झाली आणि त्याने नगरचे एक करकरा सेठ आणि पुण्याचे हिंदुराष्ट्र या पत्राचे संपादक अशी दोन नावे घेतली तसेच आपटे आणि बडगे यांचे सविस्तर वर्णन केले. 

परंतु ही घटना कळल्यावर देखील अहमदनगर पोलिसांनी याबद्दल दिल्ली पोलिसांना अथवा महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाला काहीच माहिती दिली नाही आणि दिल्ली/मुंबई पोलिसांनीदेखील याबद्दल अहमदनगर पोलिसांकडे काहीच चौकशी केली नाही.

मदनलाल पहावाच्या अटकेनंतर लगेच प्रो. जगदीशचंद्र जैन नामक व्यक्तीने महाराष्ट्राचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेऊन त्यांना सांगितले, “मदनलाल पहावाने मला सांगितले आहे की, त्याने नि नथुरामने (नथुराम गोडसे ‘अग्रणी’ या पत्राचे संपादक. अग्रणीचे पूर्वीचे नाव हिंदूराष्ट्र असे होते) गांधीजींना मारण्याची योजना आखली आहे.”

मोरारजीभाईंनी याबाबतीत मुंबईचे पोलीस प्रमुख कामते यांना अंधारात ठेऊन एक कनिष्ठ अधिकारी डीसीपी नगरवाला यांना तपास करण्यास सांगितले. परंतु नगरवाला यांनी यादृष्टीने काहीही पाऊल उचलले नाही. गांधीजींच्या मृत्युनंतर तब्बल एक महिन्याने जैन यांना त्यांचे निवेदन देण्यासाठी पोलिसांनी बोलावले.

२१ जानेवारी १९४८ च्या दुपारी दिल्लीचे डेप्युटी सुपरिटेंडंट जसवंतसिंग आणि इन्स्पेक्टर बालकिशन हे दोघे पोलीस अधिकारी विमानाने मुंबईस येण्यास निघाले. त्यांना असा आदेश होता की, त्यांनी मुंबईत डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस श्री. जे. डी. नगरवाला यांना भेटून सर्व वस्तुस्थिती सांगावी. तसेच त्यानंतर पुण्यास जावून डेप्युटी असिस्टंट इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस रावसाहेब गुर्टू यांची भेट घ्यावी. 

२२ जानेवारी १९४८ च्या सकाळीच हे दोघे अधिकारी मदनलालची उर्दूमधील जबानीची प्रत आणि त्याचा इंग्लिश भाषेतील सारांश घेऊन नगरवालांना भेटले. तोंडीही त्यांनी आपल्यास असलेली सर्व माहिती विशेषतः मदनलालने केलेला हिंदुराष्ट्र आणि अग्रणीच्या संपादकांचा उल्लेख वधाचा कट रचणा-यांपैकी एक असल्याची माहिती नगरवालांस दिली.

दि. २३ जानेवारीला दिल्लीचे हे दोघे अधिकारी पुनश्च नगरवालांना भेटले. ते पुण्यास जावू इच्छित असतानाही नगरवालांनी स्पष्ट शब्दांत त्यांना दिल्लीस परत जाण्याचा आदेश दिला. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले, “आम्ही एक प्रकारच्या नजरकैदेतच होतो.”

तेव्हा डीवायएसपी देऊळकर, पुणे सीआयडीत कार्यरत होते. हिंदुराष्ट्र पत्राच्या संपादकीय विभागात काम करणारे बी. डी. खेर हे देऊळकरांच्या शेजारच्या सदनिकेत राहात असत. त्यांच्या घरातील कॉमन भिंतीवर हवेसाठी ठेवलेल्या गजाच्या खिडकीमुळे, त्या घरातील सारे बोलणे सहज ऐकू होत असे. गोडसे-आपटे-करकरे ही त्रयी खेरांकडे नेहमीच येत असे. खेरांना करकरेंनी आणि त्यांच्या मित्रांनी दिलेल्या एका भोजन समारंभात देऊळकर जेवूनही आले होते. आपटे आणि नथुराम गोडसे यांच्यावर आधीपासूनच गुप्त पोलिसांची दृष्टी रोखलेली होती. त्यामुळे देऊळकरांना या त्रयीची पूर्ण माहिती होती. या देऊळकरांची पार्श्वभूमी पाहता, त्यांना हे दिल्लीचे अधिकारी भेटले असते तर त्यांनी नक्कीच गोडसे-आपटे-करकरेंना आधीच अटक केली असती. मुंबई पोलिसांनी त्यांना मिळालेली माहिती लगेच देऊळकरांना का कळवली नाही, हा एक प्रश्नच आहे. 

२४ जानेवारी १९४८ ला मुंबईहून जे. डी. नगरवालांनी बॉम्ब पुरवणारा संशयित म्हणून दिगंबर बडगे याच्या अटकेचा आदेश काढला होता. यावेळी बडगे पुण्यास परतला होता आणि गांधीहत्येनंतर अटक होईस्तोवर स्वतःच्या घरीच होता. ३१ जानेवारी १९४८ला पहाटे ५.३० ला बडगेला त्याच्या घरी अटक होताच त्याने सर्व माहिती उघड केली. बडगेला जर आधीच अटक झाली असती तर गांधी हत्या नक्कीच टळली असती. 

२५ जानेवारी १९४८ ला श्री. यू. जी. राणा हे महाराष्ट्राचे डीआयजी दिल्लीत होते. त्यांना मदनलालच्या जबानीची मूळ प्रत तसेच त्याचा इंग्लिश भाषेतील गोषवारा देऊन संशयितांना पकडण्याची विनंती करण्यात आली. नवल म्हणजे लगेच विमानाने मुंबईला न येता ते रेल्वेने अलाहाबाद मार्गे २७ जानेवारीला मुंबईला पोहोचले. स्थानकावरून ते थेट नगरवालांना भेटण्यास गेले आणि त्यांना मदनलालचे निवेदन, हिंदुराष्ट्रच्या संपादकांचा उल्लेख इ. सर्व काही सांगितले. परंतु यानंतरही काहीच कारवाही झाली नाही.

गांधीहत्येनंतर ३५-४० हजार लोकांना, केवळ ते हिंदुमहासभेचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत म्हणून पकडून त्यांचा अपरिमित छळ करण्यात आला. परंतु गांधींचा जीव वाचविण्यासाठी गोडसे, आपटे आणि करकरे यांना पकडले नाही हे कसे? बरे पकडता आले नाही तर किमान त्यांना ओळखणारे पोलीस अथवा त्यांची छायाचित्रे दिल्लीला का पाठविली नाहीत? ३१ तारखेला त्यांना ओळखणारे पोलीस तातडीने दिल्लीला पोहोचले, पण आधी नाही!

गांधीचा विरोध असल्याने सुरक्षा देता आली नाही हे सर्वथैव खोटे आहे. २० तारखेनंतर तेथे हत्यारी पोलीस आणि लष्करी तुकडीदेखील तैनात करण्यात आली होती.  परंतु या सुरक्षेची जबाबदारी साहाय्यक उप-निरीक्षक या अत्यंत कनिष्ठ अधिकाऱ्याकडे होती. तेथे एखादा वरिष्ठ अधिकारी का नेमला नाही? ब्रिटीश काळात गांधींभोवती मानवी सुरक्षा साखळी असे, ती तेव्हा का नव्हती?

एका पोलीस अधिका-याने चूक केली तर ते समजू शकते. पण यात गुंतलेले सर्वच अधिकारी १० दिवस चुकाच करत होते हे कसे पटेल? 

दिल्ली ते अहमदनगरपर्यंत अनेक ज्येष्ठ अधिका-यांनी, तसेच मोरारजी देसाईंसारख्या मंत्र्याने संशयितांची नावे कळूनही कृती करू नये, स्वस्थ रहावे, याला केवळ चूक म्हणता येणार नाही. स्वच्छ विवेकबुद्धी असणारा कोणीही मनुष्य याला योगायोगही म्हणणार नाही. 

या सर्व प्रकरणी नंतर साधी चौकशीही झाली नाही. एकाही अधिकाऱ्याला निलंबन तर सोडाच, परंतु साधी कारणे दाखवा नोटीसही दिली नाही. सर्व संबंधित अधिकारी पुढे योग्य वेळी सन्मानाने निवृत्त झाले. नगरवालांसारख्या ज्या व्यक्तीला या दुर्लक्षासाठी ताबडतोब चाकरीवरून हटवले जायला पाहिजे होते,  त्याला गांधीहत्या अभियोगाच्या तपासासाठी देशपातळीवरचा प्रमुख नेमण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वोच्च पदावरून, आयजीपी म्हणून पुढे ते सन्मानाने निवृत्त झाले. मोरारजीभाई देसाईंची काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याऐवजी ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर पंतप्रधान.

या सर्व जबाबदार व्यक्तींनी दाखवलेल्या दुष्ट बेफिकिरीला आणि योग्य कृती न करण्याला “चुका” म्हणता येणार नाही आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई न होता गांधीहत्येनंतर बढत्या मिळण्याला “योगायोग” निश्चितच म्हणता येत नाही.


आता गांधी हत्येचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मोठ्यात मोठा लाभ कुणाला?

१. १९४७ ला राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी अजून आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नसल्याने काँग्रेस पक्ष विसर्जित करून त्याचे रुपांतर हिंदुस्थानी जनतेच्या दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी `लोक सेवक संघ’ या स्वयंसेवी संस्थेत करावे अशी गांधींची इच्छा होती. काँग्रेसमधील ज्या कोणाला सत्ता संपादनाची आस असेल अशांनी एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन करून तो खेळ खेळावा, असे नमूद करून गांधीनी मृत्यूपूर्वी एक दिवस आधी लिहिलेल्या या घटना दुरुस्तीचे प्रारूप १५ फेब्रुवारी १९४८ ला `हरिजन’ च्या अंकात छापण्यात आले. परंतु गांधीजींच्या हत्येनंतर नेहरूंनी काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याची गांधीजींची इच्छा कधीच पूर्ण केली नाही. 

२. १९४८ मध्ये बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचा वल्लभभाई पटेल यांना पाठींबा होता. परंतु गांधी हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेत नेहरूंनी स्वत:ला गांधींचा राजकीय वारस म्हणून प्रस्थापित केले. १९५२ साली कॉंग्रेस प्रचंड बहुमताने निवडून आली आणि नेहरू घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. अगदी आजही काँग्रेस पक्षावर या घराण्याचेच वर्चस्व आहे. 

३. गांधीहत्येचा फायदा घेत काँग्रेस सरकारने सावरकरांना यात गोवून त्यांचे राजकीय अस्तिवच संपविले. हिंदुसभेचे आणि संघाचे पस्तीस ते चाळीस हजार कार्यकर्ते पकडले गेले. यातील कित्येक छळाने मेले. नंतर या सर्वांना पुरावा नसल्याने कुठलीही कारवाई न करता सोडण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना न्यायालयाने निर्दोष ठरवून निष्कलंक मुक्त केले. परंतु जी हानी व्हायची ती झालीच. हिंदुमहासभा या मुख्य विरोधी पक्षाला संपवण्यात नेहरू यशस्वी झाले. सावरकरांना संपवण्याचाही तो प्रयत्न होता. असली सैतानी योजना प्रत्यक्ष ब्रिटीशांनाही सुचली नसती.


प्रकरण ३


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रवाद आणि नेहरूंचा द्विराष्ट्रवाद


आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द्वि-राष्ट्रवादाचा पुरस्कार केला याबद्दल पुरावा म्हणून सावरकरांनी १५ ऑगस्ट १९४३ ला नागपूर इथं केलेलं एक कथित वक्तव्य नेहमीच पुढे केलं जातं.


वस्तुस्थिती 

काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं “ I have no quarrel with Mr. Jinnah’s two nation theory. We Hindus, are a nation by ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two nations” हे विकृत करून छापलेले वक्तव्य वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं असल्याचं स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लगेचच स्पष्ट केलं होतं. 

१९ ऑगस्ट १९४३ या दिवशी ‘दै. काळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेली विस्तृत मतं जागेअभावी अथवा हेतुत: विपर्यस्त स्वरुपात मांडून स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्विराष्ट्रवादाचे प्रणेते आहेत हे खोटे वृत्त प्रकाशित झाले आहे. मूळातच जगभरातील मुसलमान स्वत:ला खलिफाच्या नेतृत्वाखालील धार्मिक राष्ट्र मानत आले आहेत आणि यादृष्टीने मुसलमान स्वत:ला वेगळे राष्ट्र मानतात. परंतु वस्तुस्थितीनुसार, राजकीय लोकशाहीच्या दृष्टीने हिंदू हेच राष्ट्र आहे, कारण अनादिकालापासून तेच इथे बहुसंख्येने आहेत आणि मुस्लीम एक अल्पसंख्यांक व आक्रमक जमात आहे. मुस्लिमांच्या या धोरणामुळे भारतापुढे फाळणीचा धोका निर्माण झाल्यामुळे सावरकरांनी हिंदुसभेच्या कार्यकर्त्यांना फाळणी विरुद्ध लढण्याचे आदेश दिले होते. 

द्वि-राष्ट्रवादाचा सिद्धांत हा मुळातच १८८५ मध्ये सर सय्यद अहमद यांनी मांडला होता. त्यानंतर उर्दू कवी इक्बाल याने त्याचा पुरस्कार केला आणि शेवटी जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने ही मागणी उचलून धरली. यात सावरकरांचा काहीही संबंध नाही. हे त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून स्पष्ट होते. पुन्हा हे अधोरेखित करणं आवश्यक आहे की, उद्धृत केलेलं वक्तव्य विपर्यास करणारं असल्याचं सावरकरांनी लगेचच स्पष्ट केलं होतं. 


आता खरोखर फाळणीला कोण जबाबदार होतं? 

थोडक्यात सांगायचे तर नेहरूंनी स्वत:च आपण फाळणीला कारणीभूत असल्याचे बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं! पण या विषयी अधिक माहितीही जाणून घेतली पाहिजे.

लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना तयार केली होती. ती योजना काँग्रेस मान्य करणार नाही याची त्यांना खात्री होती. पण नेहरूंना ती योजना मान्य झाली तर ते काँग्रेसकडून ती मान्य करून घेतील याचीही त्यांना पक्की खात्री होती. मग लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपली योजना मान्य करून घेण्यासाठी, ते नेहमी उपयोगात आणत असलेली एक कल्पना वापरली. सिमल्याचं व्हॉईस रिगल लॉज महनीय व्यक्तींच्या रहाण्यासाठी सज्ज करण्यात यावं असा आदेश लॉर्ड माउंटबॅटन यांनी दिला. त्यासाठी केवळ ३३३ जणांचा अधिकारी, कर्मचारी वर्ग सिमल्याला तयारीसाठी पाठवण्यात आला. आठ दिवसांनंतर लॉर्ड माउंटबॅटन आणि लेडी माउंटबॅटन, पंडित  नेहरूंना तिथं रहायला घेऊन गेले. त्या रात्री नेहरूंना फाळणीची योजना वाचायला देण्यात आली. सकाळी नेहरूंनी सांगितलं की, काँग्रेस ही योजना कदापि मंजूर करणार नाही. पण दिवस संपायच्या आतच नेहरूंनी काही अटी बदलून ती योजना मान्य केली. 

दिवसभरात असं काय घडलं की नेहरूंनी ती योजना मान्य केली? या मागे नक्की कोणतं कारण होतं? 

आम्हाला माहित नाही! पण ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या पुस्तकात लॉर्ड माउंटबॅटन यांच्या ध्वनिमुद्रित मुलाखतीवर आधारित स्पष्टीकरण दिले आहे.

His wife's friendship with the Indian prime minister had grown too. Women like Edwina Mountbatten were rare in the world and rarer still in the India of 1947. No one had been better able to draw Nehru from his shell when moments of doubt and depression gripped him than the attractive aristocrat who radiated so much compassion, intelligence and warmth. Often, over tea, a stroll in the Mogul Gardens, or a swim in the viceregal pool, she had been able to charm Nehru out of his gloom, redress a situation and subtly encourage her husband's efforts.

“मधल्या काळात भारतीय पंतप्रधान व त्यांच्या (माउंटबॅटन यांच्या) पत्नी एड्विना यांचा स्नेह चांगलाच जमून आला. एड्विना माउंटबॅटनसारख्या स्त्रिया साऱ्या जगात व त्यातल्या त्यात १९४७ च्या भारतात तर अधिकच दुर्मिळ होत्या. शंका आणि औदासिन्यतेच्या कोशातून नेहरूंना बाहेर काढण्यात ही आकर्षक, बुद्धिवान आणि प्रेमळ महिला सर्वात योग्य होती! कधी चहापानाच्या वेळी, कधी मोगल उद्यानात फिरताना तर कधी व्हॉइसरॉय निवासाच्या तलावात पोहताना नेहरूंच्या मनावरील खिन्नतेचे पटल आपल्या आकर्षक, मोहक वागण्याने दूर करत प्रसंगातून मार्ग काढत त्या सहजपणे आपल्या पतीच्या प्रयत्नांना साथ देत.”


आता नेहरूंनी काही अटी बदलल्या, त्या कुठल्या? 

बदललेली एक अट म्हणजे सत्तांतराचा दिवस खूप आधीचा निवडण्यात आला. जी सर्वात मोठी चूक असल्याचं पुढे सिद्धच झालं. आधी फाळणी होऊन सत्तांतर झालं असतं तर दोन्ही राष्ट्रांची सरकारं नीट स्थापन झाली असती, सैन्य दलं, पोलीस दलं व्यवस्थित कार्यरत झाली असती आणि फाळणीनंतर झालेला हिंदुचा संहार, दंगली आटोक्यात आणता आल्या असत्या. दंगली, नरसंहार होत असताना आपलं सरकार पार गोंधळून गेलं होतं, अशी घटना घडली तर ती आटोक्यात आणण्याची कोणतीही योजना सरकारकडे नव्हती. सत्तास्थापनेची घाई झाल्यामुळे नेहरूंनी, लॉर्ड माउंटबॅटन यांची फाळणीची योजना काँग्रेसकडून मंजूर करून घेतली आणि केवळ दहा आठवडयात सत्तांतर घडवलं गेलं. 

नेहरू, पटेल, लियाकतअली आणि जीना यांची सत्तेची भूक या सगळ्याला कारणीभूत होती, असं ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या पुस्तकात स्पष्ट म्हटलं आहे. मग द्विराष्ट्रवादाचं जनकत्व कोणाकडे जातं? 

सत्तेची लालसा, मुस्लीम लीगची स्वप्नं आणि काँग्रेसनं केलेलं त्यांचं लांगूलचालन, का लेडी माउंटबॅटन यांचा नेहरूंवरचा प्रभाव?? थोडक्यात काय, सावरकरांचा द्विराष्ट्रवादाशी सुतराम संबंध नाही. उलटपक्षी त्यांनी अखंड हिंदुस्थानसाठी दिलेल्या लढ्याकडे मात्र आपण जाणूनबुजून दुर्लक्ष करतो आहोत. 


प्रकरण ४


सावरकरांचा हिंदुत्ववाद नक्की काय होता?


आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कट्टर धर्मांध हिंदुत्ववादी आणि कट्टर जातीयवादी ब्राह्मण आहेत. 


वस्तुस्थिती

जातीयवादी ब्राह्मण ?

सावरकरांनी जातींचं उच्छेदन व्हावं यासाठी कार्य केलं त्या सावरकरांनाच आज जातीयवादी ठरवलं जात आहे. ते केवळ ब्राह्मण होते म्हणून वाट्टेल ती गरळ ओकली जात आहे. पण या तथाकथित बामणानं रत्नागिरीच्या १३ वर्षांच्या स्थानबद्धतेत अस्पृश्यता निर्मूलनाचं जे कार्य केलं त्याला तोड नाही. 

अंदमानातून सुटका झाल्यावर रत्नागिरी, येरवड्याच्या तुरुंगात तीन वर्ष काढल्यावर, राजकारणात भाग घेणार नाही या अटीवर त्यांना १९२४ पासून पाच वर्षांसाठी रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. कारावासात राहून ना देश स्वतंत्र होणार आहे, ना समाजकारण साधणार आहे या विचारानं त्यांनी स्थानबद्धता स्विकारली. त्याबाबतही त्यांच्यावर आगपाखड होत असते. उघडउघड राजकारण नाही साधलं तरी समाजकारण करेन आणि त्याआडून राजकारण साधेन, ही रणनीती ठरवूनच सावरकरांनी स्थानबद्धता स्विकारली. 

त्याकाळी पारतंत्र्याच्या बेडयांबरोबरच हिंदू समाजाला सिंधुंबंदी, स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शुद्धीबंदी, वेदोक्तबंदी या सात बेडयांनी जखडले होते. हिंदुंच्या प्रगतीलाच खीळ घालणार्‍या या बेड्या तोडण्याचा निश्चय सावरकरांनी केला. पण त्यासाठी त्यांनी स्वत:च्या पायात मात्र ठोकून घेतली स्थानबद्धतेची बेडी. 

सावरकरांच्या स्थानबद्धतेला केवळ सात वर्षच झाली असताना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी रत्नागिरीला भेट दिली होती. सावरकरांचं कार्य पाहून ते म्हणाले होते, “अस्पृश्यता निर्मूलनाचं कठीण, किचकट काम मी आयुष्यभर करत आलो. पण थोड्याच काळात या वीरानं अस्पृश्यता निर्मूलनाचं जे अफाट कार्य केलं आहे त्याचा किती गौरव करू असं मला झालं आहे. देवानं माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.” 

ज्यावेळी गांधी चातुर्वर्ण्याची महती गात होते आणि त्याविरुद्ध काही करणे पाप मानत होते तेव्हा सावरकर वर्णभेदाच्या, जातीभेदाच्या उच्छेदनाचा प्रयत्न करत होते. “प्रत्येक जातीचं एक वैशिष्ठ्य असतं, तेवढ्यापुरत्याच जाती ओळखल्या जाव्यात. परंतु कुठल्याही जातीने इतरांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानणे ही घोडचूकच आहे. अस्पृश्यतेच्या विषवृक्षाची मुळं म्हणजे हा जातीभेद. जोपर्यंत जातीभेदाच्या मुळांवर घाव घालणार नाही तोपर्यंत अस्पृश्यता नष्ट होणार नाही.” हे सांगणारे सावरकर हे केवळ ब्राह्मण म्हणून त्यांचा तिरस्कार केला जात असेल, द्वेष केला जात असेल तर तसा द्वेष करणारेच जातीयवादी ठरतात. ‘मनुष्य ही एकच जात’ मानणारे सावरकर निश्चितच नाहीत. 

अस्पृश्यांना हरिजनही म्हणू नये कारण आपण सगळेच हरिजनच आहोत. त्यांना पतीत म्हणू नये कारण आपण सगळेच पतीत आहोत. या विचारानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भागोजीशेठ कीर यांच्या सहयोगानं रत्नागिरीत पतितपावन मंदिर उभारलं, जे सर्वांसाठी खुलं झालं. केवळ देवळाच्या पायरीपर्यंतच जाऊ शकणार्‍या पूर्वास्पृश्यांना मंदिर प्रवेशच नाही तर गाभार्‍यात जाऊन पूजा करण्याचा मान सावरकरांनी मिळवून दिला. 

रत्नागिरीत, सोवळ्याच्या बालेकिल्ल्यात ही क्रांती सहज शक्य नव्हती. तसंच जातीभेद हा केवळ उच्चवर्णीयात नव्हता तर संपूर्ण हिंदू समाजच या जातीभेदाने ग्रस्त होता आणि आजही आहे.

त्यामुळे सावरकरांसह या कार्यात सहभागी झालेल्यांना भरपूर विरोध झाला, त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला पण बहुतेक सर्व तरूण पिढी सावरकरांबरोबर उभी राहिली. त्यामुळेच सावरकरांची सुटका झाल्यावर, जेव्हा त्यांनी रत्नागिरी सोडली त्यावेळी तिथल्या नव्वद टक्के घरातून अस्पृश्यता नामशेष झाली होती. 

सावरकरांनी पुर्वास्पृश्यांच्या उद्धाराचंही कार्य केलं. त्यांच्या वाड्यावस्त्यात जाऊन त्यांना शिक्षणाचं, स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. गादीचे कारखाने, बांगडया भरणं, वाजंत्री पथकं असे व्यवसाय त्यांच्यासाठी सुरु करून दिले. त्यांच्यासाठी उपाहारगृह सुरु केली. सावरकर स्वत: तिथे जाऊन बसत असत आणि सर्वांनी त्या उपाहारगृहांचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करत. 

पुर्वास्पृश्यांची सावलीही टाळली जात होती त्या काळात त्यांनी सहभोजनं सुरु केली. त्या भोजनाला उपस्थित असणार्‍यांची स्वाक्षरी घेतली जात असे. त्यांची नावं वर्तमानपत्रात छापली जात असत. सावरकरांनी, पत्नी यमुनाबाईंच्या सहकार्यानं, स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केले. 

वेद ही कोणा विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही तर जो वेद शिकेल तो वेद सांगण्याचा अधिकारी या विचारानं त्यांनी पूर्वास्पृश्य मुलांना वेदपठण शिकवलं, त्यांना वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धातून भाग घ्यायला लावला आणि त्या मुलांनी या स्पर्धा जिंकल्याही. 


आणि कट्टर धर्मांध हिदुत्ववादी ?

अशा या जातीपातीविरुद्ध लढणाऱ्या सावरकरांवर कट्टर धर्मांध हिंदुत्ववादी असल्याचा आरोपही होतो!

मुळात हिंदू हे कट्टर, धर्मवेडे नसतातच. तसं असतं तर आज पाकिस्तान, बांगलादेश येथून धर्मांध मुस्लिमांच्या अत्याचाराला बळी पडून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या तेथील अल्पसंख्य समाजातील व्यक्तींसोबत असे अत्याचार करणाऱ्या मुस्लीम घुसखोरांनाही भारताचे नागरिकत्व मिळायला हवं म्हणून हिंदूच भांडले नसते. 

हिंदू कट्टर असते तर आज अशी राष्ट्रद्रोही आंदोलने करण्याची आणि १५ कोटी मुस्लीम १०० कोटी हिंदुंना संपवून टाकतील अशी भाषा करण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. 

सावरकर हिंदुत्ववादी जरूर होते पण त्याच वेळी ते त्याकाळचे एकमेव धर्मनिरपेक्ष नेते होते आणि आहेत. सावरकरांना कुठल्याच धर्माचं अवडंबर मान्य नव्हतं. इतकचं नव्हे तर ‘वसुधैव कुटुंबकम’ हे समस्त मानवजातीचं अंतिम ध्येय हवे अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांचे हे विचार पचवण्याची आपलीच कुवत नाही हे सत्य आहे. 


हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष? ही काय भानगड?

यासाठी मुळातूनच जाणून घ्यावं लागेल सावरकरांचं हिंदुत्व! 

त्यांनी हिंदू या शब्दाची अगदी साधी, सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, “आसिंधू सिंधुपर्यँता यस्य भारतभूमीका पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत:।” 

म्हणजे सिंधूनदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. 

पितृभू म्हणजे ज्यांची ही वडिलोपार्जित भूमी आहे आणि पुण्यभू म्हणजे ज्या ज्या धर्मपंथांचा  जन्म या भारतभूमीत झाला आहे त्या पंथाचे अनुयायी म्हणजेच वैदिक, सनातनी, आर्यसमाजी, जैन, बौद्ध, शीख, लिंगायत, अगदी नास्तिकसुद्धा हिंदूच. 

सावरकरांचा इतिहासाचा अभ्यास होता. आपण हिंदू म्हणून एकत्र येऊन कधी लढलो नाही त्यामुळे आपण पराभूत होत होतो हे जाणून सावरकरांनी विचारपूर्वक हिंदू या शब्दाची व्याख्या केली. सावरकरांचं हे सर्वसमावेशक हिंदुत्व मानलं तर समाजातली तेढचं नाहीशी होऊन राजकारण्यांना आपली पोळी भाजता येणार नाही आणि त्यामुळेच त्यांच्या हिंदुत्वाच्या या भूमिकेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं. अजूनही दुर्लक्षच तर केलं जात आहेच पण त्यांनाच कट्टरपंथीय ठरवण्यात येत आहे. 

सावरकरांच्या या व्याख्येतून ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू आणि पारशी यांना हिंदू म्हणून वगळण्यात आलं हा आक्षेप नेहमी घेण्यात येतो! पण मग मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची तयारी होती का स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायची? आणि आजही आहे का? ज्यू आणि पारशी मंडळी आपल्यात पूर्णपणे मिसळून गेली आहेत. त्यामुळे त्यांना वेगळं मानण्याची आवश्यकता नाही. त्या समाजाचा आपल्याला काहीच त्रास नाही उलट पारशी समाजाचा आपल्या देशाच्या जडणघडणीत अतिशय मोलाचा वाटा आहे. 

पण ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची पुण्यभू हिंदुस्थान नाही, त्यामुळे ते सावरकरी व्याख्येनुसार  हिंदू नाहीत. मुस्लिम समाजाच्या निष्ठा या मक्केशी असतात तर ख्रिश्चन मंडळींच्या निष्ठा या व्हॅटिकनशी असतात. तरीसुद्धा सावरकरांनी हे स्पष्ट केलं की जर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी आपापल्या धर्माचा आग्रह सोडला तर मीही हिंदू धर्माचा आग्रह धरणार नाही. 

पण आजही त्यांनी भारतभूमीला आपण सर्वश्रेष्ठ मानतो असे सांगितले आणि सावरकरी व्याख्येनुसार आम्हालाही हिंदू माना अशी मागणी केली तर आम्हीही त्यांना हिंदू मानण्यास तयार आहोत! पण असे हे सांगतील का? पण तरीही आम्ही यांना भारताचे नागरिक मानतो, समान अधिकार देतो. पण विरोध आहे तो धर्माच्या आधारावर भेदभाव करून गैर-हिंदुंना अधिक अधिकार देण्यास!  

सावरकर म्हणतात, ‘श्रुतिस्मृतिपुराण- कुराण- बायबल’ आदी सर्व धर्मग्रंथ कपाटात ठेवावेत आणि केवळ इतिहास ग्रंथ म्हणून त्यांचा अभ्यास करावा. आजच्या घडीला काय योग्य ते ठरवण्याचा अधिकार समाजाचा आहे, धर्मग्रंथांचा नाही. धर्म हा घरात पाळावा, रस्त्यावर आणू नये. संसदेत प्रवेश करताना प्रत्येक लोक प्रतिनिधीनं आपापला धर्म, पंथ, जातपात बाजूला ठेवून भारतीय नागरिक म्हणून प्रवेश करावा हे सांगणारे सावरकर धर्मनिरपेक्षच ठरतात. 


प्रकरण ५


सैन्यभरती मागील सावरकरांची दूरदृष्टी


आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना सहकार्य केलं, नेताजी बोस यांना विरोध केला. 


वस्तुस्थिती 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. त्यामागची भूमिका समजून न घेता त्यांना रिक्रुटवीर, ब्रिटिशांचे एजंट म्हणून हिणवलं गेलं आणि आजही तेच आरोप त्यांच्यावर होत आहेत. 

ब्रिटिशांच्या सैन्यात शिरून सैनिकी शिक्षण घेतल्यावर त्या नियोजनबद्ध शिक्षणाचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठीही होईल पण वेळ येताच बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची ते आपल्या हाती असेल हा त्यामागचा धोरणी विचार होता. 

ब्रिटिश राजवटीत, ब्रिटिश सैन्यात हिंदुंचं प्रमाण सुमारे पस्तीस टक्के होतं. सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे ब्रिटिश सैन्यातील हिंदू सैनिकांची संख्या वाढून पासष्ट टक्क्यांवर पोहोचली. भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली ही वस्तुस्थिती असल्याने सगळ्या मुस्लीम पलटणी पाकिस्तानात सामील झाल्या. 

जर सावरकरांनी हिंदुंनी सैन्यात भरती व्हावे ही मोहीम राबवली नसती तर तेव्हा मुस्लीम सैन्य बहुसंख्य असतं आणि त्यामुळे पाकिस्ताननं दुसर्‍याच दिवशी आक्रमण करून, संपूर्ण भारतावरच कब्जा मिळवला असता. 

१९४८ मध्ये पाकिस्ताननं काश्मीरवर आक्रमण केलं पण आपण सैन्यबळात जराही कमी पडलो नाही. खरंतर केवळ या एका दूरगामी विचारासाठी सुद्धा सार्‍या देशानं त्यांचं ऋणी रहायला हवं. पण आपण त्यांच्यावरच दोषारोप करत आहोत. 

स्वातंत्र्यवीर सावरकर काही जपानी बुद्धभिक्षूंच्या द्वारे जपानमध्ये असलेले थोर भारतीय क्रांतिकारक आणि आझाद हिंदसेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांच्या संपर्कात होते. जग पुन्हा महायुद्धाच्या उंबरठयावर उभ असल्यानं महायुद्धात योग्यवेळी सैनिकी उठाव घडविण्याची त्यांची योजना होती. असे प्रयत्न पहिल्या महायुद्धात पण झाले होते आणि त्यात सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेच्या सदस्यांचा सहभाग होता. अशा कटांचे स्पष्ट पुरावे कधीच नसतात, पण परिस्थितीजन्य पुराव्यांनी ते सिद्ध करता येते. 

२१ मार्च १९४२ यादिवशी रासबिहारी बोस रेडिओवरून बोलताना सावरकरांना उद्देशून म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकारी योद्ध्याला प्रणाम करणे, हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो. भारतीय राजनीती ही कधीही परकीय देशाच्या नीतीवर अवलंबून नसावी आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असावा, या धोरणाचा पुरस्कार करून आपण आपली थोरवी पुन्हा सिद्ध केली आहे.” 

२५ जून १९४४ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद रेडिओवरून बोलताना म्हणाले, “लहरी आणि भ्रामक राजकीय विचार आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे आज बहुतांश काँग्रेस नेते भारतीय सेनेच्या सैनिकांना भाडोत्री म्हणून हिणवत असताना वीर सावरकर निर्भयतेने भारतीय युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. याच सैनिकांमधून आपल्या भारतीय राष्ट्रीय सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळत आहेत”. 

त्याचप्रमाणे या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर जपानमधील क्रांतिकारक आणि आझाद हिंदसेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांच्या संपर्कात असल्याचे निर्विवाद पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार, सावरकरांनी सुरु केलेल्या सैन्यभरतीला रासबिहारी बोस यांचे समर्थन असल्याचे सिद्ध होते. रासबिहारी बोस यांनी मार्च आणि एप्रिल १९३९ मध्ये ‘दाई आजिया शुगी’ या जपानी मासिकात सावरकरांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्राचे शीर्षक आहे, ‘सावरकर - नव्या भारताचा उगवता नेता - कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व.’ या लेखात सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाची आणि हिंदुत्ववादाची ओळख जपानी जनतेला करून देताना त्यांनी लेखाच्या शेवटी काढलेला निष्कर्ष महत्वाचा आहे. लेखाचा शेवट करताना ते म्हणतात, “तुम्ही सावरकरांच्या विचारांशी सहमत झालात तरच तुम्ही राजकीय दृष्टीने सामर्थ्यशाली बनाल. सावरकरांचे हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्थान अढळ आहे.” 

नुकतच दिल्ली येथील इंदिरा गांधी विश्वविद्यालयाचे प्रो. कपिलकुमार यांना आझाद हिंद सेनेतील काही सैनिकांचे जबाब आणि पत्रं मिळाली असून, त्यानुसार ते सर्व, सावरकरांच्या सांगण्यानुसार सैन्यात भरती होऊन नंतर आझाद हिंद सेनेला मिळाले हे स्पष्ट होते. 


प्रकरण ६


“भारत छोडोचे रुपांतर भारत तोडो मध्ये होईल”- स्वातंत्र्यवीर सावरकर


आरोप

ब्रिटिशांना मदत करत असल्यानेच सावरकर चलेजाव चळवळीत सहभागी झाले नाहीत.


वस्तुस्थिती

मुळातच केवळ सावरकरच नव्हेत तर डॉ. आंबेडकर आणि इतर अनेक राष्ट्रवादी नेते या आंदोलनात सामील झाले नव्हते. मग तेही ब्रिटिशांना सामील होते असे कॉंग्रेसच्या लोकांना म्हणायचे आहे का?

‘भारत छोडो’ आंदोलन ‘भारत तोडो’ मध्ये परिवर्तित होईल हा सावरकरांचा ठाम विचार होता. काँग्रेसच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी सावरकरांनी काही अटी घातल्या होत्या. २ ऑगस्ट १९४२ ला पुण्यात झालेल्या भाषणात सावरकरांनी आपली या चळवळीबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. काँग्रेसच्या संकल्पित स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची हिंदुमहासभेची सिद्धता आहे. पण त्यासाठी आमच्या तीन मागण्या आहेत. 

यातील पहिली मागणी आहे - ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडावा, पण त्यांचे सैन्य मात्र मागे ठेवावे असा ठराव काँग्रेसनं केला आहे. आता सैन्य ब्रिटीश असेल असेल तर आपण स्वतंत्र कसे होऊ हे काँग्रेसनं समजून सांगावे!

दुसरी मागणी – स्वातंत्र्य मिळाले तर त्यामध्ये हिंदुस्थानच्या अखंडत्वाला बाधा येणार नाही असे वचन काँग्रेसनं द्यावे. 

तिसरी मागणी - काहीही झाले तरी हिंदुस्थानच्या राज्यघटनेत मुसलमानांना अधिक अधिकार देण्यात येऊ नयेत. धर्म कुठलाही असेल, परंतु प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असावेत!

या तीन मागण्या काँग्रेसनं मान्य केल्या तर मागील सर्व गोष्टी विसरून, हिंदुसभा काँग्रेसच्या हातात हात घालून लढयात सहभागी होईल असेही ते म्हणाले होते, पण कॉंग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले! 

यावेळी काँग्रेसची घ्येयधोरणं युद्ध सुरु झाल्यापासून कशी बदलत गेली आणि हिंदुसभेचं धोरण सुरुवातीपासून कसं राष्ट्रहिताचं आणि सुसंगत आहे हे सावरकरांनी सांगितलं. 

काँग्रेस बंधुंना उद्देशून सावरकर म्हणाले, “या ‘चले जाव’ चळवळीपासून देशाला कोणताही लाभ होणार नाही. त्यापेक्षा सैनिकीकरण आणि देशाचं औद्योगिकीकरण यावर भर द्यायला हवा. काँग्रेसच्या चळवळीनं स्वराज्य मिळालं तर ते आम्हाला हवंच आहे. स्वराज्य आणणार्‍यास आम्ही गुरु मानू. पण त्यामध्ये अल्पसंख्याकांना विशेष अधिकार असता कामा नयेत आणि देशाचं विभाजनही होता कामा नये. हे आश्वासन काँग्रेस तिच्या ठरावात देत असेल तर आम्हीही त्या स्वातंत्र्यलढयात पडेल तो त्याग करण्यास सिद्ध आहोत.” 

याच भाषणात सावरकर म्हणाले, “नागरी लिपी असलेली हिंदी ही राष्ट्रभाषा काँग्रेसनं मान्य केली पाहिजे. माझ्याकडे असलेल्या निर्णयात्मक पुराव्यावरून मी असे सांगू शकतो की गांधींचे धोरण सदैव चंचल राहिले आहे आणि माझी अशी निश्चिती होऊन चुकली आहे की एकच काय पण अनेक पाकिस्ताने निर्माण करण्यास गांधी आपली संमती दिल्याखेरीज रहाणार नाहीत.” 

या भाषणात पुढे ते म्हणाले की, “उपोषण करून आपल्या मागण्या मान्य करून घेता येतील ही गांधींची कल्पनाही चुकीचीच ठरणार आहे. कारण युद्धाच्या तोफा धडाडत असताना गांधींच्या उपोषणाकडे ब्रिटिश ढुंकूनही पाहणार नाहीत.” 

सावरकरांनी घातलेल्या अटी देशहिताच्या असूनही काँग्रेसनं त्या मानल्या नाहीत. त्याउलट ७ ऑगस्ट १९४२ ला मुंबईत झालेल्या काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात मुसलमानांसाठी पूर्वीपेक्षाही अधिक अधिकार मिळतील हे घोषित केलं आणि केंद्रीय राज्यातून फुटून निघण्याचा प्रांतिक स्वयंनिर्णयाचा अधिकारही काँग्रेसनं मान्य केला.

गांधींनी जिनांना पाठवलेल्या पत्रानं काँग्रेस मुस्लिमांचं किती लांगुलचालन करत होती हे स्पष्ट होतं. गांधी जीनांना लिहितात, पूर्ण प्रामाणिकपणे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की, ब्रिटिश सरकारने सर्व हिंदुस्थानचा आपला कारभार मुस्लीम लीगच्या हाती दिला तरी काँग्रेस त्याला मुळीच आक्षेप घेणार नाही. भारतीय संस्थानांसकट सर्व हिंदुस्थानचा कारभार मुस्लीम लीगच्या स्वाधीन करण्यास काँग्रेस आडकाठी करणार नाही. लीग जे सरकार स्थापन करेल त्यात काँग्रेस अडथळा तर आणणार नाहीच पण अशा सरकारमध्ये काँग्रेस सहभागी होईल. 

८ ऑगस्ट १९४२ ला काँग्रेस महासमितीच्या संमतीनंतर गांधीजी आपला अहिंसक लढा चालू करणार होते. पण त्याच रात्री गांधीजींसकट सर्वच काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली. त्यामुळे जनता प्रक्षुब्ध झाली आणि दंगली उसळल्या. त्या शमवण्यासाठी ब्रिटिशांनी दडपशाही सुरू केली. आंदोलकांनी टपाल कार्यालयं, रेल्वे स्थानकं उध्वस्त केली. पूल उडवले, रेल्वे रूळ उखडले. 

कुठल्याही नेत्याविना झालेलं हे अहिंसावाद्यांचे आंदोलन हिंसकच झालं. मुसलमानांनी या लढयापासून दूर रहावं असा आदेश जीनांनी दिल्यामुळे या आंदोलनात केवळ हिंदूच सहभागी झाले ही वस्तुस्थिती आहे. 

तरीसुद्धा १० ऑगस्ट १९४२ ला सावरकरांनी काढलेल्या पत्रात गांधी, नेहरू यांच्यासारख्या नेत्यांच्या अटकेचा आणि ब्रिटिशांनी दंगली दडपण्यासाठी केलेल्या कठोर उपाय योजनांचा तीव्र शब्दात निषेध केला. 

सावरकरांचे भाकीत अक्षरश: खरे ठरले भारत छोडोचे रुपांतर पुढे भारत तोडोतच झाले. सावरकर या आंदोलनात सहभागी झाले नाहीत म्हणून आगपाखड करणारी काँग्रेस आणि गांधीजी, हिंदू संघटनांच्या राष्ट्रहिताच्या भागानगर आणि भागलपूर इथल्या आंदोलनात का सहभागी झाले नाहीत याचे उत्तर कोण देणार? 


प्रकरण ७


“संभाजी महाराज – एक हुतात्मा छत्रपती” - स्वातंत्र्यवीर सावरकर


आरोप

सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांना दुराचारी म्हटले. 


वस्तुस्थिती

सावरकरांच्या काळात संभाजी राजांवर फारसं संशोधन झालेलं नव्हतं. ते दुराचारी होते अशीच वर्णने तत्कालीन सर्व इतिहास ग्रंथात होती. त्यामुळे तसा काही उल्लेख सावरकरांनी केला असेल तर सावरकरांना दोषी ठरवता येणार नाही. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांवर एक लेख लिहिला आहे-  ‘हुतात्मा छत्रपती’. या लेखात सावरकर लिहितात: ‘मराठी सिंहाला आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे असे पाहून औरंगजेबाने ‘काफरा’चा वध करण्याची आज्ञा दिली. पण या धमकावणीचा शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता! तापवून लाल केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी त्यांचे डोळे भोसकून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या जिभेचे क्रमश... तुकडे तुकडे करण्यात आले. पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही. अंती त्याचा शिरच्छेद करण्यात आला. मुसलमानांच्या धर्मवेडाला ते बळी पडले पण त्यांनी हिंदूजातीला अक्षय्य उज्वल्लता आणून दिली! ह्या एका आत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजी महाराजांनी महाराष्ट्रधर्माचे - हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे - आत्मस्वरूप जसे विशद करून दाखविले तसे दुसरे कशानेही दाखविणे शक्य नव्हते. संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही, पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि अध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्वलतर आणि बलशाली केली. हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले. 

सावरकरांचे कृतिशील अनुयायी श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखले, यांच्या पत्नी डॉ. कमल गोखले यांनी डॉक्टरेटच्या पदवीच्या प्रबंधासाठी ‘छत्रपती संभाजी’ हा विषय निवडला होता. संभाजीराजांविषयी ठराविक पुस्तकी माहितीच्या पलीकडे कोणाचेच विचार जात नव्हते. इतिहास हा सावरकरांचा आवडीचा विषय असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी गोखले पतीपत्नी सावरकरांना भेटायला गेले. सावरकरांनी आस्थेनं त्यांची चौकशी केली आणि कमलताईंना विचारले, दारूच्या व्यसनाने आणि कलुशा कब्जीच्या फितुरीने, संगतीने संभाजीने आपला घात करून घेतला हे खरे आहे का? तेव्हा कमलताई म्हणाल्या की, अजून माझा अभ्यास चालू आहे. तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले, संभाजीराजांनी जे धैर्य नि शौर्य दाखविले ते काही एखादया गोमागणेशाचे काम नाही, हे विसरू नको. संभाजी जर दारुडा असता आणि इतिहासात आपण वाचतो तितका स्त्रीलंपट असता तर हे धैर्य त्याने दाखवले असते असे वाटत नाही. बाई आणि बाटली बाळगणार्‍या माणसाच्या हातून हिंदूंच्या इतिहासात चिरंतन स्थान मिळावे असे दिव्य होणारच नाही. उघडया डोळयांनी हौतात्म्याचा स्वीकार करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. तू त्याविषयी सखोल अभ्यास कर आणि सत्य शोधून काढ. 


प्रकरण ८


स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या दैवताचा, शिवरायांचा अपमान करतील?


आरोप

सावरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि बलात्काराचं समर्थन केलं.

 

वस्तुस्थिती

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि बलात्काराचं समर्थन केलं हा आरोप अत्यंत मूर्खपणाचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानलं होतं. शिवाजी महाराजांची पहिली आरती त्यांनीच लिहिली होती. ज्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रकरणावरून सावरकरांवर टीका केली जाते, ती गोष्टच मुळी एक दंतकथा आहे. सावरकरांचा प्रश्न असा आहे की, आपण महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे, पण अशा दंतकथा रचून आपण आपल्या शत्रूला आमच्या बायकांवर अत्याचार केलेत तरी चालेल, तुमच्या बायका नेहमीच सुरक्षित राहतील असे खुले आश्वासन का द्यावे? स्वत: शिवाजी महाराजांच्या काकूला नासिक मध्ये गोदावरी नदीवरून पळवून नेले आहे. 

‘सदगुण विकृती’ या लेखातील आधीच्या प्रकरणात हिंदू महिलांवर होणार्‍या मुसलमानी अत्याचारांची सविस्तर चर्चा करताना टिपू सुलतानाचा पराजय केल्यानंतर त्यांच्याकडे अपेक्षेनं बघणार्‍या हजारो पिडीत हिंदू महिलांना मुक्त करण्याकडे मराठा सैन्यानं दुर्लक्ष केल्याबद्दल सावरकरांनी टीका केली आहे. 

हिंदुंच्या बायका पळवून नेणं, त्यांचं धर्मांतरण करणं, छळ करणं यात मुस्लीम स्त्रिया नेहमीच आघाडीवर होत्या याचे अनेक दाखले देऊन ते विचारतात की अशा दोषी बायकांना शासन व्हायला नको का? बायकांचे सगळे गुन्हे माफ करण्याच्या सद्गुण विकृतीला विरोध करताना त्यांनी शूर्पणखा आणि त्राटिका यांचे रामायणातील दाखले दिले आहेत. याचा अर्थ सावरकरांनी बलात्काराला प्रोत्साहन असा होत नाही. आता यांचे असे म्हणणे आहे का की शूर्पणखा आणि त्राटिका यांच्यावर बलात्कार झाले होते? 

बलात्कार झालेली स्त्री ही कधीच भ्रष्ट किंवा पतीत नसते तर तिचा स्वीकार करण्यास नकार देणारे तिचे कुटुंबीयचं खरे पतीत आहेत असे त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे. हिंदू सैन्य सूड घेत नाही हे माहित असल्यामुळे शत्रुसैन्याला त्यांच्या स्त्रिया सुरक्षित राहतील याची खात्री असे. त्यातच आपण पळवून नेलेल्या बलात्कारी स्त्रियांना सन्मानाने परत घेत नव्हतो त्यामुळे शत्रूंची संख्या वाढत जात असे. सावरकरांनी संगीत उत्तरक्रिया या नाटकामध्ये असे म्हटले आहे, की बलात्कारी स्त्रिया भ्रष्ट नसून त्यांना नाकारणारा हिंदू समाजच भ्रष्ट झाला आहे. त्या नाटकात सावरकरांनी सुनीती हे पात्र रंगवले आहे आणि तिला शुद्ध करून परत स्वीकारायला हवं हे ही सांगितले आहे. त्याच दृष्टिकोनातून सहा सोनेरी पाने मध्ये या परधर्मात बळजबरीने ओढून नेल्या गेलेल्या स्त्रियांची आठवण, टिपू सुलतानावर विजय मिळवून परत येणाऱ्या पेशव्यांच्या सैन्यानं ठेवायला हवी होती असा मुद्दा सावरकरांनी मांडला आहे. यावरून त्यांचा स्त्रियांसंबंधीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.  या प्रश्नावर “महिलांनी बलात्काराची वेळ आली तर प्रतिकार न करता दातात जीभ चावून आणि श्वास रोखून आत्महत्या करावी असा गांधीचा सल्ला किती विकृत आहे किंवा हिंद स्वराज्य या आपल्या चोपडीत अनेक ठिकाणी वांझ आणि वेश्या या शब्दांचा वापर शिवी म्हणून करणारी व्यक्ती, महात्मा कशी ठरते याबद्दल सावरकरांना नाहक बदनाम करणारे तथाकथित बुद्धिवादी सांगू शकतील का?” 

सावरकरांच्या हजारो पानांच्या साहित्यातून कुठलं तरी एक संदर्भहीन वाक्य शोधून त्यांच्यावर टीका करणारे, नेहरूंनी केलेला शिवरायांचा अपमान कसा विसरतात? आपल्या ‘Glimplsess of World History” या ग्रंथात नेहरू लिहितात “विजापूरच्या सरदाराची (अफझलखानची) दगलबाजीने केलेली हत्या इत्यादी शिवाजीच्या कृत्यांमुळे आमच्या दृष्टीने त्याची किंमत कमी ठरते.” 

नेहरूंचे एक बरे आहे; आधीच वाचन कमी आणि वाचले त्याची जाणीव त्याहून कमी! ज्या पापी अफजलखानाच्या केलेल्या वधाबद्दल नेहरू अधिकारवाणीनं शिवरायांना दगाबाज ठरवतात त्याच अफजलखानानं शिवरायांवर केलेल्या स्वारीच्या आधी जनानखान्यात डांबलेल्या शेकडो स्त्रियांची केलेली हत्या सोयीस्कररित्या विसरतात! क्रूरकर्मा अफजलखानाला मारणे मानवी अधिकारांचा भंग! आणि जनानखान्यात बलात्काराने भरलेल्या शेकडो स्त्रियांची क्रूर हत्या? त्याकडे ह्या पंडितजींचं सोईस्कर दुर्लक्ष? आणि आज त्यांचे वंशज परक्या रोहिंग्या मुसलमानांबद्दल गळा काढून रडतात पण १९९० मध्ये स्वकीय काश्मिरी हिंदुंच्या हत्याकांडाबद्दल, त्यांच्या बायकांच्या सामुहिक बलात्काराबद्दल, ५ लाखांहून अधिक काश्मिरी हिंदू निर्वासितांबद्दल का मौन पाळतात हे कळेल का? 

हजारो हिंदूंची कत्तल करणार्‍या आणि शेकडो राजपूत राजकन्यांना आपल्या जनानखान्यात कोंडणार्‍या अकबराला ‘द ग्रेट’ आणि ज्यांच्यामुळे आज हिंदू जिवंत आहेत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना दगलबाज म्हणणारे नेहरू, ज्यांचं दैवत आहे अशीच विकृत माणसे सावरकरांवर आरोप करणार! 


प्रकरण ९


भारताचा पहिला तिरंगा ध्वज सावरकरांचा


आरोप

सावरकरांचा राष्ट्रध्वजाला विरोध होता. 


वस्तुस्थिती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतून तयार झालेला भारताचा पहिला तिरंगा, मादाम कामा यांनी जर्मनीतल्या स्टुटगार्ड इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत २१ ऑगस्ट १९०७ यादिवशी फडकावला होता. 

घटना समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद हे ध्वज समितीचेही अध्यक्ष होते. त्यांना तार पाठवून सावरकरांनी विनंती केली होती की राष्ट्राच्या ध्वजावर केशरी पट्टा असावा आणि चरख्याऐवजी शौर्याचे प्रतिक असलेलं चक्र असावं. सावरकरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, अभिमानानं स्वतंत्र भारताचा धर्मचक्रांकित तिरंगा आणि हिंदुमहासभेचा भगवा ध्वज असे दोन्ही ध्वज आपल्या घरावर उभारून स्वातंत्र्यदिन साजरा केला. 

पण असे असतानाही बदनामी कोणाची होते? सावरकरांची! आणि स्तुतीपात्र कोण आहेत? तर आपल्या राष्ट्रध्वजाला उघडउघड कवडीमोलाचे समजणारे गांधी!  

राष्ट्रध्वजावरून चरख्याचं उच्चाटन झाल्यामुळे आणि खादीऐवजी रेशमी कापडाची योजना केल्यामुळे महात्मा गांधी या ध्वजावर नाराज झाले. ३ ऑगस्ट १९४७ च्या हरिजनच्या अंकात महात्मा गांधीं लिहितात, काँग्रेसचा खादीचा तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला गेला नाही याबद्दल मला अत्यंत खेद होतो. संघराज्याच्या नव्या ध्वजामध्ये चरखा आणि खादी यांना स्थान नसेल तर माझ्या मते तो ध्वज कवडीमोलाचा आहे. 

प्रकरण १०


आता हे नवीन नाटक- भगतसिंग विरुद्ध सावरकर !

आरोप

भगतसिंगांनी फाशी स्वीकारली पण सावरकरांनी माफी मागितली. 


वस्तुस्थिती

मुळात फाशीची शिक्षा झालेल्यांना सुटकेसाठी आवेदन करण्याची परवानगीच नव्हती. त्यामुळे हुतात्मा भगतसिंगच काय पण अशा कोणाचेच आवेदन नाहीत. परंतु आज हे विकृत काँग्रेसी, क्रांतिकारकांमध्ये पण भेद करत आहेत. 


सावरकर विरुद्ध भगतसिंग! 

सर्व क्रांतिकारकांना एकमेकांच्या कार्याची जाण होती. एकमेकांविषयी प्रचंड आस्था होती. ‘विश्वप्रेम’ हा बलवंतसिंह या टोपणनावानं प्रसिध्द झालेला भगतसिंग यांचा लेख ‘मतवाला’च्या दोन अंकांमध्ये १५ नोव्हेंबर १९२४ आणि २२ नोव्हेंबर १९२४ छापला गेला होता. त्यात ते सावरकरांबद्दल लिहितात, “विश्वप्रेमी तो वीर आहे, ज्याला भीषण क्रांतिकारक, कट्टर अराज्यवादी म्हणायला आम्ही लोक जरादेखील लाजत नाही - तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन चालता चालता कोवळे गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना, म्हणून ते थांबत.” 

७ सप्टेंर १९३० ला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २३ मार्च १९३१ या त्या तिघांच्या फाशीच्या दिवसापर्यंत त्यांची फाशीची शिक्षा कमी व्हावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जेष्ठ बंधू गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर धडपड करत होते. १९३० ची चळवळ थांबविण्यासाठी गांधी आयर्विन करार होणार होता. त्यापूर्वी बाबारावांनी गांधींजींची भेट घेतली. बाबाराव गांधीजींना म्हणाले, “सविनय कायदेभंगाची चळवळ थांबविण्यासाठी आपल्यात आणि व्हॉईसरॉय यांच्यात जो करार होईल त्यात राजबंद्यांच्या मुक्ततेची पहिली मागणी असावी. त्यात अत्याचारी आणि अनात्याचारी असा भेद केला जाऊ नये.” यावर गांधीजी म्हणाले, ‘अत्याचारी लोकांना सोडा म्हणणे हीनपणाचे आहे, ते मी करणार नाही. माझ्या अहिंसेच्या ब्रीदाविरुद्ध कसा जाऊ? यावर बाबारावांनी गांधीजींना प्रतिप्रश्न केला, “अत्याचारी राजबंद्यांना सोडणं आपल्याला हीनपणाचं वाटतं, मग स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणाऱ्या ‘भाई अब्दुल रशीदला माफ करा असं आपण हिंदुसमाजाला आणि स्वामीजींच्या मुलाला म्हणालात तो हीनपणा नव्हता का??’ यावर उत्तर न देता गांधीजी निघून गेले. 

बाबांनी त्यांना रजिस्टर्ड पत्र पाठवलं त्यालाही गांधींनी ‘अत्याचारी राजबंद्यांच्या सुटकेची मागणी करणे मी हीनपणाचे समजतो’ असंच उत्तर दिलं.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांना फाशी झाली आणि मगच गांधी आयर्विन करार झाला, सविनय कायदेभंगातल्या सगळ्यांची सुटका झाली. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांची सुटका झाली नाही. 

लोकांच्या दबावामुळे गांधींनी त्या तिघांच्या सुटकेची मागणी केली पण ती मान्य झाली नाही. पण त्यांचे प्रयत्न किती मनापासून असतील ते सांगायला गांधींजींची वाक्य पुरेशी आहेत. गांधीजी म्हणतात “गेल्या वर्षात कैद झालेले सत्याग्रह-कैदी सुटतील त्यावेळी माझे दुसरे मित्र शस्त्राचारी राजबंदी तुरुंगातच खितपत राहतील. तुरुंगवास ही शिक्षा आहे असे मला मुळीच वाटत नाही. अत्याचारी लोकांना सुद्धा ती शिक्षा नाही. परंतु मला त्यांच्या (शस्त्राचारी राजबंद्यांच्या) मुक्ततेचे न्याय्य समर्थन करता आले नाही. त्यांनी आपल्या अत्याचारी चळवळीपासून परावृत्त व्हावे असे मी त्यांना पुन्हा सांगतो.” 

थोडक्यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना गांधीजींनी फाशी जाऊ दिले.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिलं तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. त्या बातमीनं सावरकर अतिशय अस्वस्थ झाले. त्यांच्या फाशीच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस जागे होण्याआधीच तिथल्या तरुणांनी सावरकरांनी लिहिलेलं गीत गात गावातून प्रभातफेरीही काढली. भगतसिंग आणि स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार करत रत्नागिरी दणाणून सोडली. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘१८५७चं स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकानं भगतसिंग अतिशय प्रभावित झाले होते. १९२८ मध्ये निधी संकलनासाठी भगतसिंगांनी या ग्रंथाची भूमिगत आवृत्ती काढली होती. तो ग्रंथ त्याकाळी तीनशे रुपयांना विकला जात होता. ते या ग्रंथाला ‘क्रांतिकारकांची गीता’ म्हणत. 


प्रकरण ११


सगळे आरोप खोटे, मग उरला विकृत प्रचार!

आरोप

समलैंगिक संबंधांचा


वस्तुस्थिती 

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या पुस्तकात हा खोटा आरोप करण्यात आला होता. पण त्यानंतर सावरकर अनुयायांनी तत्काळ न्यायालयीन कारवाई सुरू केल्यानंतर या पुस्तकातून हा बिनबुडाचा आरोप वगळला गेला. 

परंतु याच पुस्तकात नेहरूंच्या वैयक्तिक चारित्र्यहिनतेबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. (ज्यांचा इथं उच्चारही करणं शक्य नाही, ज्यांना इच्छा असेल त्यांनी स्वत: हे पुस्तक वाचावे, प्रस्तावना वाचली तरी पुरेशी आहे.) काँग्रेसनं याबद्दल नेहमीच मौन पाळलं आहे आणि या पुस्तकाच्या निर्मितीत स्वत: श्रीमती इंदिरा गांधी यांची अमूल्य मदत झाली असल्याचं लेखकांनी म्हटलं आहे हे विशेष उल्लेखनीय आहे. 

नेहरू आपलं व्यक्तीगत आयुष्य कसे जगले याबद्दल कोणी काहीच आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु जर व्यक्तीगत संबध देशहिताच्या विरुद्ध जात असतील तर मात्र प्रश्न विचारलेच पाहिजेत. 

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या पुस्तकात नेहरूंसंबंधी असं लिहिलं आहे की लॉर्ड माउंटबॅटन यांनी  अशी स्वैच्छिक कबुली दिली की भारतीय नेत्यांसोबत चाललेल्या वाटाघाटीतील गुप्त गोष्टींची चर्चा ते आपल्या पत्नीबरोबर जरुर करत असत; शिवाय, ज्या बाबी नेहरूंना ते अधिकृतपणे सांगू शकत नव्हते त्यांची वाच्यता नेहरुंकडे करण्यासाठी लेडी माउंटबॅटन यांचा वेळोवेळी वापर करत. 

याच पुस्तकातून अनेक तथ्ये पुढे आली. माउंटबॅटन यांच्या ध्वनिमुद्रित संभाषणाच्या आधारे लेखक म्हणतात, “मधल्या काळात भारतीय पंतप्रधान व त्यांच्या (माउंटबॅटन यांच्या) पत्नी एडविना यांचा स्नेह चांगलाच जमून आला. एडविना माउंटबॅटनसारख्या स्त्रिया सार्‍या जगात व त्यातल्या त्यात १९४७ च्या भारतात तर अधिकच दुर्मिळ होत्या. शंका आणि औदासिन्यतेच्या कोशातून नेहरूंना बाहेर काढण्यात ही आकर्षक, बुद्धिवान आणि प्रेमळ महिला सर्वात योग्य होती! कधी चहापानाच्या वेळी, कधी मोगल उद्यानात फिरताना तर कधी व्हॉइसरॉय निवासाच्या तलावात पोहताना नेहरूंच्या मनावरील खिन्नतेचं पटल आपल्या आकर्षक, मोहक वागण्यानं दूर करत प्रसंगातून मार्ग काढत त्या सहजपणे आपल्या पतीच्या प्रयत्नांना साथ देत.” 

यावर कोण बोलणार? याचं स्पष्टीकरण आज जनतेला कोण देणार?. 


प्रकरण १२


सावरकरांना ब्रिटीश शासनाकडून पेन्शन?


आरोप 

सावरकर ब्रिटीश सरकारकडून पेन्शन घेत होते. 


वस्तुस्थिती

ब्रिटीश सरकारनं १९२८ या वर्षापासून स्थानबद्धतेत असलेल्यांसाठी जेवणासाठी दरडोई दीड रुपया, कपड्यालत्त्यासाठी चौतीस रुपये, इतर खर्चासाठी वर्षाचे शंभर रुपये असे निर्वाह भत्ते मंजूर केले होते. तसेच बंगालमधल्या बंदीवानांच्या कुटुंबीयांना वीस ते चाळीस रुपये वेगळे दिले जात असत.

सावरकरांना १९१० मध्ये अटक झाली तेव्हाच त्यांचं घरदार, संपत्ती जप्त करण्यात आली होती. १९२४ मध्ये त्यांना रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. तेव्हा चरितार्थासाठी त्यांनी मला वकिली किंवा काही काम करू द्यावे अशी सरकारकडे मागणी केली. पण ती मान्य झाली नाही तेव्हा सावरकरांनी निर्वाह भत्त्याची मागणी केली. अर्थात ती मागणी कायद्याला धरूनच होती.

या मागणीवर गृहखात्याचे सचिव हेन्री नाईट यांनी नमूद केलं, “सावरकरांनी कारागृहात परत जाऊन उरलेली शिक्षा भोगावी. त्यांनी स्वखुशीनं अटी स्वीकारल्या आहेत त्यामुळे त्यांना भत्ता मंजूर करणं योग्य नाही. सरकारनं भत्ता मंजूर केला तर मात्र सावरकर हे सामान्य गुन्हेगार नसून राजबंदी आहेत हे मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे त्यांची भत्त्याची मागणी धुडकावून लावावी.” 

परंतु तत्कालिन गव्हर्नर सर फ्रेडरिक साईक्स यांनी मात्र सावरकरांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. त्यांनी नमूद केलं की, “सचिवांचं म्हणणं जरी खरं धरलं तरी अनोळखी भागात रहायला पाठवून आपण त्यांच्या चरितार्थाच्या वाटा बंद केल्या आहेत हेही तितकंच खरं आहे.”

त्यानंतर रत्नागिरीचे प्रभारी जिल्हाधिकारी व्ही.बी. मर्डेकर, मुंबईचे पोलिस आयुक्त पी.ए. केली आणि नाशिकचे जिल्हाधिकारी मिलार्ड यांच्याकडून सावरकरांच्या आर्थिक स्थिती विषयी माहिती मागवण्यात आली.  संदर्भ : - शोध सावरकरांचा - य. दि फडके ) अखेर १ ऑगस्ट १९२९ पासून सावरकरांना महिना ६० रुपये भत्ता मिळू लागला. इतर क्रांतिकारकांना सगळे भत्ते मिळून ( दर डोई दीड रुपयाप्रमाणे महिन्याचे ४५ + कापडचोपडाचे ३४ + इतर खर्चाचे १०० याप्रमाणे) ८७ रुपये मिळत असताना सावरकरांना फक्त ६० रुपये मिळत होते हे लक्षात घेणं आवश्यक होतं.


प्रकरण १३


सावरकरांची हत्या रोजचीच...

गांधी हत्या झाली. गांधी हत्येचा आरोप ठेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची राजकीय हत्या करण्यात आली. आता तर गलिच्छ, घाणेरड्या, उबग आणणार्‍या राजकारणासाठी सावरकरांची रोजच हत्या केली जात आहे. 

गांधीहत्येत गोवलं जाऊन स्वतंत्र भारतात, लाल किल्ल्यात सावरकरांना बंदिस्त करण्यात आलं तेव्हा आणि त्यांच्या अंतापर्यंत, त्याच कारणासाठी होत राहिलेली मानहानी सावरकरांना अंदमानातल्या यातनांपेक्षाहि क्लेशकारक वाटली असेल. खरंच स्वर्ग अस्तित्वात असेल तर त्यांच्यावर सध्या घातले जाणारे निर्दयी घाव, त्यांना लाल किल्ल्यातल्या कैदेपेक्षाही अधिकच दु:सह वाटत असतील. 

देश हाच देव आणि देश हाच धर्म मानणार्‍या, केवळ राष्ट्रहिताचा विचार करणार्‍या सावरकरांचे दोन प्रकारचे हत्यारे आहेत. एक आहेत ते म्हणजे ज्यांना देशाशी, समाजाशी काहीही देणंघेणं नाही आणि ज्यांना केवळ सत्ता मिळवायची आहे, स्वत:च्या तुंबड्या भरायच्या आहेत. दुसरे हत्यारे आहेत ते म्हणजे स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे जातीयवादी. 

ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी घरदार, तारुण्य पणाला लावलं त्याच देशातल्या नागरिकांनी मृत्युनंतरही त्यांची अवहेलना करावी हा कृतघ्नपणा आहे. ब्रिटीश सावरकरांना घाबरून होते त्यांची योग्यता ओळखून होते पण आपण सावरकरांना ओळखू शकलो नाही हे आपलं दुर्भाग्य आहे. सावरकरांचे सगळे विचार, सगळ्यांना पटणारे नाहीत, झेपणारेही नाहीत. त्यांचे विचार पटत नसतील तर ते स्वीकारण्याची कोणी जबरदस्ती केलेली नाही. पण किळसवाण्या राजकारणासाठी त्यांचे मृत्युनंतरही पदोपदी लचके तोडण्याचा अधिकारही आपल्याला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमीच उपयुक्ततावादाचा पुरस्कार केला. त्यानुसार त्यांचे राष्ट्रहिताचे आणि समाजहिताचे विचार स्विकारता येतीलच की पण मग सावरकरांची दूरदृष्टी मान्य करावी लागेल, ही विरोधकांची खरी अडचण आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजब रसायन होतं. त्यांनी म्हटलं होतं, माझे विचार तुम्हाला पन्नास वर्षांनी पटतील. सावरकरांच्या आत्मार्पणाला पंचावन्न वर्षाहून अधिक काळ लोटला आहे पण सावरकरांना समजून घेण्यात आपणच कमी पडतो आहोत. सावरकरांवर केल्या जाणार्‍या आरोपांबाबत वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न. अर्थात झोपी गेलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्यांचं काय करणार?? 

- रणजित सावरकर (कार्याध्यक्ष)

 मंजिरी मराठे (कोषाध्यक्ष)

 स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. 


संदर्भ : 

१. स्वातंत्र्यवीर सावरकर, लेखक- धनंजय कीर, 

२. स्वातंत्र्यवीर सावरकर, अखंड हिंदुस्थान पर्व- आचार्य बाळाराव सावरकर, 

3. सावरकरांशी सुखसंवाद, लेखक - श्री. पु. गोखले, 

४. क्रांतिवीर बाबाराव सावरकर, लेखक - द.न. गोखले 

५. Freedom at Midnight by Dominique Lapierre and Larry Collins 

६. Political Trouble in India from 1907 to 1917 by James Kerr 

७. Penal Settlement in Andaman by R.C.Mujumdar 

८. Indian Revolutionaries Abroad - Select Documents by A C Bose 

९. Reflections on the Transfer of Power and Jawaharlal Nehru, speech by The Earl Mountbatten of Burma at Trinity College, University of Cambridge -14th November 1968. 

१०. बंदी जीवन, लेखक - सच्चिंद्रनाथ संन्याल 

११. 12 years in prisonlife by Ullaskar Dutt 

१३. काला पानी का ऐतिहासिक दस्तऐवज, लेखक – रामचरणलाल शर्मा 

१४. आपबिती, लेखक - भाई परमानंद 

१५. क्रांति के पथिक, लेखक - पृथ्वीसिंह आझाद 

१६. Savarkar -Echoes from forgotten past by Vikram Sampat 

१७.. Letters from Andaman by V.D. Savarkar 

१८. माझी जन्मठेप, लेखक - वि.दा. सावरकर 

१९. काकोरी के दिलजले, लेखक – पं. रामदुलारे त्रिवेदी 

२०. Report of commission of enquiry into conspiracy to murder Mahatma Gandhi by Jivanlal Kapur. 

२१. Men who killed Gandhi by Manohar Malgaonkar  

२२. शोध सावरकरांचा,  लेखक - य. दि. फडके

----

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई यांच्या सौजन्याने

http://www.prajwalant.com/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...