सावरकरांना काय वाटले होते त्यावेळी...
भारताच्या स्वातंत्र्याचे जें युद्ध आमच्या पिढीनें सतत लढविले आणि ज्यांमध्यें एक सैनिक म्हणून गेली पन्नास वर्षे मी दिलेली लढत, भोगलेले कष्ट नि केलेला त्याग आमच्या पिढीतील अन्य कोणाही देशभक्तांपेक्षां अुणा नाहीं. तें युद्ध शेवटीं आम्हीं जिंकलें ! मुक्त नि स्वतंत्र भारतीय राज्य जन्माला आले. माझा देश मुक्त झालेला पहाण्यास मी जगलों हे मी माझे मोठें भाग्यच समजतों.
स्वातंत्र्याला आता ७५ वर्षे होतील. परंतु या इतक्या वर्षांमध्ये आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलेले, योगदान दिलेले नेमस्त, वा जहाल-मवाळ, क्रांतिकारक, साम्यवादी विचारसरणी असणारे नेते इतकेच कशाला धर्माधिष्ठित असणाऱ्या संघटना यामधील व्यक्ती यांची आम्ही अशी लक्तरे काढत असू तर ही बाब लांच्छनास्पद आहे. गांधी-सावरकर ही संकल्पना मान्य असो वा नसो ती एक असो वा नसो, ती विचारसरणी भिन्न मार्गावरीलही असो पण त्या विचारांनी भारलेले अनेक होते. देशाची फाळणी होऊनही देशाला मिळालेले स्वातंत्र्य जे काही आहे ते टिकले गेले पाहिजे, त्या देशासाठी या भिन्न विचारसरणींवर टीका करताना शब्दाचा संयत वापर करणे, त्या त्या व्यक्तींना आदरपूर्वकच मान-सन्मान देत देशाला बलवान करणे गरजेचे आहे.
या संबंधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही सत्तेवर आलेल्या भिन्न विचारप्रवाहाच्या पक्षाबाबतही ठेवलेली भूमिका पाहाणे त्यांच्या परिपक्वतेचे उदाहरण आहे. त्या वेळी केंद्र शासनासंबंधात आपले धोरण स्पष्ट करताना ते म्हणतात की, ‘फाळणीविरोधी आंदोलनात आपण आघाडीवर होतो, तरीही अखेरी मातृभूमीचे दोन तुकडे झाले आणि पाकिस्तान अस्तित्त्वात आले तरीही ती हानी भरून निघावी अशी घटना घडली ती म्हणजे परकीय दास्यातून हिंदुस्थानचा मोठा भूभाग मुक्त करण्यात यश मिळाले. भारताच्या स्वातंत्र्याचे जें युद्ध आमच्या पिढीनें सतत लढविले आणि ज्यांमध्यें एक सैनिक म्हणून गेली पन्नास वर्षे मी दिलेली लढत, भोगलेले कष्ट नि केलेला त्याग आमच्या पिढीतील अन्य कोणाही देशभक्तांपेक्षां अुणा नाहीं. तें युद्ध शेवटीं आम्हीं जिंकलें ! मुक्त नि स्वतंत्र भारतीय राज्य जन्माला आले. माझा देश मुक्त झालेला पहाण्यास मी जगलों हे मी माझे मोठें भाग्यच समजतों. आमची मातृभूमि पुन्हां अखंड करण्यांचें ध्येय पूर्ण करण्यासाठींसुद्धां, आम्ही आज जिंकलेले राज्य संघटित नि समर्थ करणे अत्यावश्यक होतें. हाच उद्देश पुढे ठेवून मी जनमतावर असें बिंबविण्याचा प्रयत्न केला की कोणताही पक्ष सत्ताधीश असला तरी आपण केंद्रशासन समर्थ केलें पाहिजे. त्यांत कोणताही पालट आवश्यक असला तरी तो घटनात्मक मार्गानींच घडवून आणला पाहिजे. कारण आपल्या देशांतील कोणताहि अत्याचार किंवा आपल्यांतील नागरी फट ह्या राज्यालाच धोकादायक ठरेल.’ असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विधान त्यांचे देशाविषयीचे मत तर सांगतेच तसेच द्रष्टेपणाचीही उत्कृष्ट साक्ष देेते.
२२ ऑक्टोबर २०२१
छायाचित्र सौजन्य : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई/ आंतरजाल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा