पोथिनिष्ठता नव्हे विज्ञाननिष्ठताच महत्त्वाची
हिंदु धर्माने घातलेल्या सात शृंखला तोडण्याचीही महत्त्वाची कामगिरी याच सावरकरांनी केली आहे. त्यांच्या विज्ञानवादी, व्यावहारिक, उपयुक्ततावादी आणि भविष्याकडे वाटचाल करण्याच्या ध्येयामुळे वेद, गीता उपनिषदादी ग्रंथ हे पूजनीय आहेत, आदरणीय आहेत तितकेच पुरे मात्र ते परमप्रमाण नसावेत, असे स्पष्ट सांगण्याची ताकद त्यांच्यातच होती, यातच सर्व काही आले.
सावरकरांचे लेखन समाजाभिमुख, राष्ट्राभिमुख आणि धर्माचा खऱ्या अर्थाने शोध घेणारे होते. विज्ञानाला स्वीकारणारे आणि विज्ञाननिष्ठा जपणारे सावरकर हे सर्व भारतीयांना समजण्याची गरज आहे. मुसलमानांच्या पोथिनिष्ठतेचे अनुकरण न करता हिंदुंनी विज्ञाननिष्ठतेचेच अनुकरण करावे, असे स्पष्टपणे समाजाला बजावण्याचे त्यांचे विधान हे शंकराचार्यांच्या भाष्याइतकेच महत्त्वाचे आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुमधील जातिभेदाला मोडून काढण्यासाठी कंबर कसली होती. जन्मठेपेच्या शिक्षेमधील १४ वर्षांचा अंदमानातील बनवास भोगल्यानंत १९२४ मध्ये त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले मात्र त्यांनी राजकारणात
कोणताही सहभाग घ्यायचा नाही, अशी प्रमुख अट घालून त्यांना स्थानबद्ध केले गेले. या १९२४ ते १९३७ या कालावधीत त्यामुळे त्यांनी हिंदुना संघटित करण्याचे अतिशय मोलाचे व्रत हाती घेतले आणि त्यातून अस्पृश्यता निवारण, जातिभेदाचे उच्चाटन, शुद्धीकरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी हाती सक्रीयपणे साकारले त्या काळात त्यांनी लिहिलेल्या विविध लेखांना विशेष करून जातिउच्छेदनाच्या ध्येयातून सावरकरांनी लिहिलेले लेख- निबंध हे जात्युच्छेदक निबंध या पुस्तकातून वाचावयास मिळतात. हे सर्व निबंध म्हणजे हिंदु धर्माचे नव्या कालानुसार पुनरुज्जीवन करणारा दिशादर्शक ठरतो. दुर्दैवाने त्यांच्या या जात्युच्छेदक विचारांना स्वातंत्र्यानंतरही साकारण्याचा विडा सर्व देशाने उचलला नाही, हाच मोठा दोष म्हणावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला प्रोत्साहक लेख असो, त्यांच्या विचारांना स्वीकारणारा वा त्यांच्या कार्याला पाठिंबा देणारा निबंध असो सावरकरांनी प्रत्येक निबंधामधून सामाजिक, वैज्ञानिक, मानवी, राष्ट्रविषयक पुनरुत्थानाचा मुद्दा सविस्तरपणे सांगत भाष्य केले आहे.
युरोपातील विज्ञाननिष्ठ जीवनशैली आणि विचारांचा उहापोह करीत सावरकर म्हणतात की, या विज्ञानयुगात समजासंस्थेची जी संघटना करावयाची ती प्रत्यक्ष ऐहिक नि विज्ञाननिष्ठ अशाच तत्त्वांवर केली पाहिजे. ती वाट चोखाळल्यामुळेच इंग्लंड, रशिया, जपान ही राष्ट्रे बलवान झाली तसेच आपले हिंदु राष्ट्रही झाल्यावाचून राहाणार नाही. ... त्यांना हा दृढ विश्वास त्यांना होता. केवळ हिंदु धर्मातील उणिवांचा त्यांनी यात विश्लेषणपूर्वक आढावा मांडलेला नाही तर एकच धर्मग्रंथ हिंदुधर्माचा असावा असे मत मांडणाऱ्याबाबत मुसलमानांच्या पोथिनिष्ठ समाजाचीही तुलना त्यांनी केली.
एकच धर्मग्रंथ असणे ही मुस्लिमांची बळकटी आणणारी बाब असती तर युरोपियनांनी जगात मुसलमानांची जी ससेहोलपट चालविली आहे ती ते कसे चालवून घेऊ शकले असते. युरोपियन लोकांना प्रबळ करणारा एकच धर्मग्रंथ आहे तो म्हणजे विज्ञानग्रंथ. रशियाने तर बायबल फाडूनच टाकले आणि एकच धर्मग्रंथ असणाऱ्या मसुलमानांनावर ते राज्य करू शकले, ते मागासलेले आणि रशिया प्रगत, ते दुबळे तर ते प्रगत ठरले.... हे असे सावरकर सांगतात.
एकंदर धर्म, समाज, पोथिनिष्ठ धर्म, समाजाचा विकास अशा विविधांगी दृष्टिकोनातून हिंदुदर्शनात मात्र कोणत्याही एका धर्मग्रंथाच्या पिंजऱ्यात न अडकणारी तत्त्वज्ञानबुद्धीची जी भरारी आहे ते भूषण मानावे, असे ते सांगतात. अर्थात असे असले तरीही हिंदु धर्माने घातलेल्या सात शृंखला तोडण्याचीही महत्त्वाची कामगिरी याच सावरकरांनी केली आहे. त्यांच्या विज्ञानवादी, व्यावहारिक, उपयुक्ततावादी आणि भविष्याकडे वाटचाल करण्याच्या ध्येयामुळे वेद, गीता उपनिषदादी ग्रंथ हे पूजनीय आहेत, आदरणीय आहेत तितकेच पुरे मात्र ते परमप्रमाण नसावेत, असे स्पष्ट सांगण्याची ताकद त्यांच्यातच होती, यातच सर्व काही आले.
२४ ऑक्टोबर २०२१
छायाचित्र सौजन्य : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई/ आंतरजाल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा