असमानतेविरोधातील संघर्ष हवा
‘कालपर्यंतच्या जुन्यातील जे प्रयोगांती हे आजही उत्तम ठरते, विज्ञानाच्या कसोटीत टिकते, ते ज्ञान तर आम्ही टाका म्हणत नाहीच, पण त्या जुन्यातील जे जे आजच्या विज्ञानाच्या कसोटीत अज्ञान ठरते तेही समाजशास्त्र नि मानसिक शास्त्रादृष्ट्या आम्हास टाकावू वाटत नाही! त्या पुरातन सर्व बऱ्यावाईट अनुभवास जमा धरून आजच्या विज्ञानाच्या कसोटीने जे राष्ट्रधारणास जे आज उपयुक्त ठरते, तेच बेधडक आचरावे. उद्या बदलत्या परिस्थितीत वा वाढत्या वैज्ञानिक ज्ञानात जर तेही चुकीचे नि अहितरकारक ठरेल तर तो आमचा आजचा आचार बदलण्यास 'उद्या' ही तसाच स्वतंत्र आहे. केवळ कालच्या पोथीच्या शब्दाने 'आज' बांधलेला नसावा, 'उद्या' तर नसावाच नसावा! या विज्ञाननिष्ठ मतासच आम्ही अद्ययावतपणा म्हणतो. आद्यतनी प्रवृत्ती ती हीच.’
.... स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हेच विचार, अनुयायांनीच नव्हे तर तमाम भारतीयांनी स्वीकारण्याची वा त्याचा अनुनय करण्याची गरज आहे. अद्ययावत विचारांची ही संकल्पना हिंदु समाजाला अद्ययावत करणारी आहे. हीच आद्यतनी प्रवृत्ती आहे. आमच्याकडे काय होते, त्यापेक्षा आमच्याकडे काय आहे आणि जे आमच्याकडे चांगले होते, ते अद्ययावत का, ते सिद्ध करण्याची प्रवृत्ती बळावली तरच विश्वगुरुत्वाचा दावा करणे सयुक्तिक ठरेल अन्यथा हा विश्वगुरू केवळ फुकाचा राजकीय असेल....
स्वातंत्र्यवीर सावरकर आज लाखो हिंदुंचे दैवत झाले आहे. खरे म्हणजे विचारांमुळे आणि बुद्धीनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीमुळे त्यांच्यासंबंधात त्यांना देवत्व देऊन भक्तीची नव्हे तर त्यांच्या विचारांना समजून घेऊन विज्ञाननिष्ठ दृष्टीने अनुनय करण्याची आवश्यकता आहे. तो अनुनयही कितींना जमेल तो देखील तसा अडचणीचा विषय अनेकांना वाटू शकतो, इतकी सावरकरांच्या विचारांची प्रगल्भता प्रखर आहे. किंबहुना म्हणूनच त्यांच्या नावाची असणारी जरब ही हिंदुत्त्वावर अद्ययावतपणे बसलेली आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे सावरकर यांनी सांगितलेले हिंदुत्त्व हे अद्ययावत आहे. सनातन धर्माने नित्य नवीनपणा काळाबरोबर राखण्याचे सत्कर्म दाखवले खरे पण त्यांच्या अनुयायांनी अनेकदा या सनातन धर्माचे हे नित्य नवीन स्वरूप स्वीकारण्यासही नकार दिला. मुळात काळाप्रमाणे धर्मसंस्था ही कशी घडू शकते हे स्पष्ट करणारा विज्ञाननिष्ठ असा निकष स्वीकारा आणि पोथिनिष्ठता सोडा, हे सांगण्याचे असामान्य धैर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दाखवले.
सावरकर यांचे हिंदुत्त्व आस्तिक आहे, नास्तिक आहे, आस्तिक नाही आणि नास्तिकही नाही. वेदप्रामाण्याला मानणारा आस्तिक आणि न मानणारा नास्तिक असतो, ही खरी व्याख्या आहे. आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये विविध आस्तिक दर्शने आणि नास्तिक दर्शने आहेत. काळाच्या निकषावर ती नेहमी घासून पुसून, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेने तावून सुलाखून निघाली, निघात होती. मात्र तो काळ प्राचीन आहे. त्यानंतर मध्ययुगापासून विद्वत्तेकडून भिक्षुकीकडे जाण्याचे स्वरूप घर्मसंस्थांनी स्वीकारले असावे. ब्राह्मण समाज हा धर्माच्या निकषांचे प्रतिनिधीत्त्व करता करता अनावश्यक पद्धतीने नको अनिश्चिततेत गुरफटला गेला. कुठे ना कुठे अहंपणामुळे, स्वत:ला सातत्याने पारखून न घेण्याच्या वर्तनामुळे तर कधी सत्ताकेंद्रीत मानसिकतेमुळे वा प्रवृत्तीमुळे साऱ्या सर्व वर्णांना आणि हिंदु समाजालाच अनेक बेड्यांमध्ये त्याने गुरफटवून टाकले. केवळ ब्राह्मण वर्णच नव्हे तर अन्य सर्व वर्णांनाही यामुळे विचारभ्रमतेच्या स्थितीत जावे लागले होते. यामुळेच जातिभेदासारख्या भेदक क्षेपणास्त्राने भारतीय समाज, धर्मसंस्था, राज्यसत्ता यांना ध्वस्त केले. परंपरा आणि रिती- रिवाज टिकवून आम्ही हिंदु धर्म राखला किंवा हिंदुचे विश्वगुरुत्त्व अबाधित ठेवले असे जर कोणी म्हटले तर ते नक्कीच फसवणूक करणारे ठरेल. हिंदु संघटन करताना समाजाचे घटन, संघटन होण्याऐवजी विघटन मात्र होत राहिले. समाज फुटला गेला, द्वेष, मत्सर, मद, मोह, अहंकार, काम, क्रोध यातच पुरता मिश्रित झाला. ही स्थिती भारतात नाहीच, असा दावा करणे अयोग्य ठरेल. माणूस म्हटला की चुका होतात, अयोग्य वर्तनही होते. त्या सुधारणे महत्त्वाचे आहे.
आज आपण नेमके कुठे आहोत, याचा विचार प्रत्येक हिंदु व्यक्तीने करणे गरजेचे आहे. याचे कारण अद्ययावत होण्यासाठी अनेक घटक आवश्यक आहेत, ते आत्मसात करण्यात कमी पडलो आहोत. हिंदुंचे संघटन म्हणजे केवळ मुस्लीम धर्मियांवर टीकेचे आसूड ओढणे, त्यांचे वैचारिक स्खलन करणे किंवा सतत त्यांना यापूर्वीच्या सरकारांनी विशेष करून काँग्रेस सरकारने दिलेल्या अनेक राजकीय सोयीसवलतींच्या वर्षावामुळे, त्यांचे केले गेलेले लांगूलचालन यामुळे, त्यांच्या धर्मातील विविध अतिपोथिनिष्ठ अशा घटकांच्या अतिरेकातून निर्माण झालेले मागासपण यावर टीका करणे नव्हे. मुसलमानांच्या संबंधात केवळ विरोध म्हणजे हिंदु संघटन नाही, हे ही लक्षात घेतले पाहिजे.
मुळात हिंदु ही सावरकरांची व्याख्या लक्षात घेत हिंदु आणि अहिंदु यातील भेद वा फरक लक्षात घेत हिंदुंमध्ये असणारी धार्मिक वल्गना बाजूला ठेवत धार्मिक स्तरावर सुधारणा अद्ययावत आणि कालाप्रमाणे बदलणाऱ्या पद्धतीने स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. सावरकरांच्या रत्नागिरीमधील स्थानबद्धतेच्या काळात त्यांच्या कामामधून सात बंद्या तोडण्यात आल्या होत्या. हे मोठे बंडच होते, क्रांती होती. स्वातंत्र्यानंतर या व्यतिरिक्तही आणखी बऱ्याच काही कालबाह्य चालीरिती, मानसिकता, हेवेदावे, गैरसमज, नव्याने निर्माण झालेल्या स्वातंत्र्योत्तर काळातील असमान सामाजिक स्तर, असमान आर्थिक स्तर, असमान बौद्धिक स्तर, असमान शैक्षणिक स्तर, असमान जीवनशैली अशा जाचक बंधनांमुळे हिंदु समाज ग्रासला गेला आहे. राजकीय पक्ष, नेतृत्त्व यांच्याकडून या सर्व जाचकतेविरुद्ध लढण्याची क्षमता अपेक्षित नाही, इतके गेल्या काही वर्षांमधील भारतीय राजकारण हे सत्तापिपासू वृत्तीमुळे अन्यायकारकच ठरले आहे. यामुळे हिंदु समाज आजही जो बहुसंख्य आहे, त्याला जीवनशैलीसाठी अतिभयावह संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो केवळ आर्थिकच नव्हे तर बौद्धिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक- रोजगारविषयक स्तरावरही असमानतेच्या जात्यात हिंदु बहुसंख्य असूनही पिचला गेला आहे. या सर्वांवर उतारा धर्मभावनेच्या वा प्रांत-भाषा यांची अस्मिता या गुटिकेने दिला जात आहे. हिंदुंमधील ही असमानता स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षातही कायम आहे. असमानतेची ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदू समाजाला सर्व स्तरावर अद्ययावत करणे आवश्यक आहे. केवळ डिजिटलायझेशन करणे, गुळगुळीत रस्ते करणे, खासगी - परदेशी वैचारिकतेच्या आधारावरील चंगळवादी वस्तुंची निर्मिती वाढवणे, त्यांची विपणनक्षमता व्यापक करणे, मोटारगाड्यांची खासगी संख्या वाढवणे, कमी वेतनात अधिक नोकऱ्या वा कामे देतो हा आभास निर्माण करणे, कामांचे कंत्राटीकरण करणे वा कार्पोरेटक्षेत्रांना मोठे करणे म्हणजे अद्ययावत झालो वा देश अद्ययावत झाला असे होत नाही. बौद्धिक स्तरावर संपूर्ण हिंदु समाज अद्ययावत अर्थात ‘अप टु डेट’ बनला पाहिजे.
‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ आणि ‘अद्ययावत’
आजकाल स्वातंत्र्यवीर सावरकर या विचारप्रणालीबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या राजकीय हेतूसाध्यतेसाठी कशाही प्रकाराने आरोप केले जातात. मुळात आरोप करताना एखादी घटना वा एखादे वाक्य आपल्याला आवश्यक त्या पद्धतीने अर्धवटपणे आणि मागील पुढील पूर्ण संदर्भ न देता देत टीका करण्याचा प्रकार केला जात आहे. तर दुसरीकडे सावरकरांच्या नावाचे लेबल वापरून त्यांच्या हिंदुत्त्वाला मात्र बाजूला सारून स्वत:चे हिंदुत्त्व दामटण्याचाही प्रकार केला जात आहे. अशा प्रकारच्या वृत्तीमुळे सावरकर हा प्रगल्भ आणि प्रखर असा राष्ट्रवादी विज्ञाननिष्ठ असा क्रांतिकारक, समाजसुधारक आणि पर्यायाने स्वातंत्र्यलढ्यातील असामान्य पुरुष आम्ही गमवला. त्यांचे विचार, त्यांची दृष्टी आम्हाला झेपली नाही, असा अर्थ घ्यावा लागतो. कारण त्यामुळेच त्यांना देव मानणारे भक्त अंधपणाने त्यांची पूजा करू लागले आणि त्यांच्यावर वाटेल ती दूषणे देणाऱ्यांनी मूकबधिरपणे मंदबुद्धीनेच टीका केली. एका अद्ययावत विचारप्रणालीलाच यामुळे आम्ही बाजूला सारले. मात्र हेच दोष आता दूर सारून सावरकर परिपूर्ण अर्थाने समजून घेण्याचा हा प्रयत्न करीत आहे.
अद्ययावत या शब्दाबद्दल आणि धर्माला अद्ययावत करण्यासंबंधात सावरकरांनी विज्ञाननिष्ठ निबंधांमधून हिंदु समाजाला सतत बालकडू पाजले पण त्यावेळीही इतक्या वर्षाच्या सनातन धर्माच्या बाळाला ते बालकडू पचविता आले नाही. केवळ तितकेच नव्हे तर आजही चंगळवादी युगात त्यांचे विचार स्वीकारणे आणि अंगी बाणवणे जमलेले नाही. ते वाचले की, पटल्यासारखे वाटते, आवडतेही पण ज्ञानेश्वर समाजात हवा, छत्रपती शिवाजीही हवेत पण दुसऱ्याच्या घरी... अशा प्रकारची वृत्ती आम्ही बाळगून महापुरुषांना आम्ही देवत्त्व बहाल करून बसलो आहोत. सावरकरही त्यामधीलच बनवले आहेत ते आधुनिक महापुरुषच म्हणावे लागतील, कारण ते आजही अनुकरणीय वाटतात. याचे कारण त्यांच्या अद्ययावत विचारसरणीत आहे.
काहींनी सावरकरांनी धर्माची व्याख्या केली नाही. हिंदु धर्माची नेमकी व्याख्या केली नाही. अशी विधाने केलेली आढळतात. त्यांच्या हिंदुत्वात मुस्लीमद्वेष आहे, असे जन्माने हिंदू म्हणून जन्मलेले आणि बुद्धीने सावरकरविरोधक वा अहिंसावादी तत्त्वज्ञानाने भारलेले टीकाकारही बोलू लागतात, तेव्हा मात्र त्यांच्या विसंगत व्यक्तिमत्त्वाची कीव करावीशी वाटते. मुळात सावरकर समजून घेण्यामध्ये ते कमी पडले आहेत. सावरकर म्हणजे स्वतंत्र भारतासाठी बहुसंख्य असणाऱ्या हिंदु समाजाला ‘भूमीचे पेटंट’ मिळवून देणारे आणि जगामध्ये हिंदुंची भूमी नसल्याने त्यांच्यासाठी ही भूमीच हिंदुराष्ट्र आहे, हे साधार बिंबवणारे व्यक्तिमत्त्व. केवळ तितकेच नाही तर मुळात बहुविध संस्थाने, भाषा, प्रांत जाति-जमाती असणाऱ्या हिंदुभूमीला राष्ट्र म्हणून नव्या काळात का ओळखले जावे हे साधार आणि जागतिक परिभाषेत तसेच व्याख्येत बसवणारे राष्ट्रोद्धारक म्हटले पाहिजे. उगाचच धर्मनिरपेक्षतेचा बहुरंगी बुरखा चढवित ‘अनेकता मे एकता’ असे सांगत बहुसंख्य हिंदुना पुचाट बनवणाऱ्या शांतिदुती तत्त्वज्ञांना किंवा तथाकथित डाव्या, काँग्रेसी वा मुस्लीम लांगूलचालन करणाऱ्यांना सावरकरांच्या राष्ट्रवादाने खरे तर कधीचेच वैचारिक पराभूत केले आहे.
‘दोन शब्दांत दोन संस्कृती’ या निबंधामधून सावरकर यांनी अद्ययावत अर्थात अप -टू- डेट या शब्हाचा अर्थ स्पष्ट करीत त्या संबंधातील विचार व संकल्पना मांडली आहे. युरोपातील ऐहिक आणि वैज्ञानिकदृष्टीने प्रगतीपर असलेल्या समाजामध्ये अद्ययावतपणा कसा आहे आणि ते करताना तेथे विज्ञानाने जीवनशैलीमध्ये आणि मानसिकतेत बदल घडवून अद्ययावत हे युरोप अमेरिकन संस्कृतीमधील विशेष नाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याची तुलना भारतातील मानसिकतेबरोबर करताना हिंदुराष्ट्रात ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ या विशेषनामाबरोबर अशी मानसिकता फैलावली आहे की यामुळे एखादी वस्तू चांगली आहे त्यासंबंधात व्यवच्छेदक लक्षण विचारले तर युरोपीय सांगेल ती वस्तू अद्ययावत आहे तर हिंदुस्थानात ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ असल्याचा संदर्भ पाहिला जाईल. वेदात जे सांगितले आहे, त्याच्यापुढे गेल्या दहापाच हजार वर्षांमध्ये सामाजिक, राजकीय, वा धार्मिक विधिनिषेधात वा कौश्ाल्यामध्ये आम्ही रतिभरही पुढे सरकलेलो नाही. काहीही ज्ञान, चाल, सुधारणाही आणि वस्तुही योग्य वा अयोग्य आहे ते ठरविताना वा त्याविषयी योग्यायोग्यता, उपयुक्तता, चांगलेपणा, सरसपणा पाहाताना ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ आहे का नाही, हे पाहातो हे आमच्या संस्कृतीचे अत्यंत लाजीरवाणे भूषण म्हणून आम्ही ब्रीद मिरवतो. वेदाचे दाखले देतो, असे सांगत सावरकरांनी अतिशय मर्मभेदी टीका केली आहे.
आजही त्यात कणभरही सुधारणा हिंदुंच्या मानसिकतेत झाली आहे की नाही, ते ज्याचे त्यांनी प्रामाणिकपणे ठरवावे. ते पटले तरच सावरकरवादी आहोत, सावरकरांचे हिंदुत्त्व स्वीकारले आहे, त्यांचे हिंदुत्त्व या विज्ञाननिष्ठ आणि बुद्धीगम्य भूमिकेवर आधारलेले आहे. हे लक्षात घेऊन दावे करावेत. सावरकरांचे नाव घ्यावे. यात हिंदुधर्मसुधारणेचेच तत्त्वज्ञान अद्ययावत केले आहे, असे म्हणता येईल. सावरकर ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ संस्कृती वा मानसिकतेवर घणाघाती टीका करतात, त्यातून समाजाने बाहेर पडावे यासाठी जुन्या चालीरीती, परंपरा यावर आसूड ओढतात, इतकेहोऊनही त्यांच्या सांगण्याप्रमाणे न जाणाऱ्या वा अनुनय न करणाऱ्यांनाही सावरकर यांचे हिंदुत्त्व आणि आमचे हिंदुत्व एक आहे, असे सांगताना वा दावा करताना वा या अगदी बेगडी हिंदुत्त्व धारण करणाऱ्यांवर टीका करणाऱ्यांनाही सावरकरांना माफीवीर म्हणण्याचाच नव्हे तर सावरकरांची माफी मागण्याचाही अधिकार नाही, इतकी भारतीय विचारसरणी बौद्धिकता रसातळाला गेली आहे. अद्यापही गंगेत बुडी मारणाऱ्यांना पवित्रता भासते. मुळात बुडी मारून पावन होण्याइतके जाऊदे पण स्वच्छ होण्याइतके तरी गंगेत वा अगदी नाशिकच्या कुशावर्तात ज्या ठिकाणी डुबकी मारतात, ते पाणी त्यासाठी किती योग्य आहे, याचा विचार करायला हवा. पण अशा प्रकारची बुडी मारणे योग्य का, तर ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ असे सांगणारे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही आहेत.
परंपरेने चालत आलेल्या रीतीरिवाजांना विज्ञानाच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहावे. तसे झाले नसेल तर त्यासाठी प्रयोगसिद्ध विज्ञानाचा आधार घ्यावा हे गरजेचे आहे. पुरातनी आणि अद्ययावत संस्कृतीचा फरक सावरकरांनी अतिशय परखडपणे समजावून सांगितला. त्यावेळीही त्यांच्यावर सनातनी आणि अर्धसनातन्यांकडून टीका झाली. त्यावरही सावरकरांना त्यांना ठोेसपणे उत्तर दिले. विज्ञानाला व्यावहारिक जीवनशैलीचे, बुद्धीनिष्ठ समाजासाठी आचरणाचे अधिष्ठान बनवले पाहिजे. हे सर्व सांगताना त्यांनी जरी भारतीय जानपदांचा विशेष उल्लेख केला आहे, मात्र अद्ययावतपणा असणए वा पुरातनपणा असणे हा कोणत्याही एका जातीचा अपरिहार्य गुणधर्म नाही तर एका तत्त्वाचा गुण आहे, असे सांगत सावरकरांनी हिंदुसमाजातील ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’पणाचा पोक्तपणा घालवण्याचा अव्याहत प्रयत्न केला. तरीही त्यांनी हिंदु कोण हे सांगताना हिंदु या शब्दाची व्याख्या करताना या भूमीला, त्या भूमीवरील निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानाला, धर्माला, पंथाला, त्याच्या मार्गदर्शक संत, गुरूंना सामावून घेतले. त्या भूमीला महत्त्व देत समाजाला अद्ययावत वा कालाप्रमाणे जाण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळेच युरोप जोपर्यंत बायबलाला अपरिवर्तनीय आणि अपौरुषेय धर्मग्रंथ मानीत होता, तोपर्यंत युरोपही असाच आणि याच ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ वा पुरातन प्रवृत्तीच्या आडातील बेडूक होऊन पडला होता, असे सांगण्याची ताकद सावरकरांमध्ये होती. इतिहासावरून शिकण्याची त्यातून पुढे भविष्याला स्वीकारण्याची वर्तमानात सत्यार्थाने जगण्याची सावरकरांची ही तार्किकता हिंदु समाजच नव्हे तर अहिंदुंनाही लागू पडणारी होती. त्यामुळेच विज्ञाननिष्ठ झालेल्या युरोपने साधलेली प्रगती, त्यातून निर्माण होणारी भविष्यकालीन स्थिती ही सावरकरांना जितकी जाणवली तितकी भारतातील किती राजकीय नेत्यांना, विचारसरणींना कळली हे लक्षात घेऊनच सावरकरांवर आक्षेप घेत, त्यांना माफीवीर म्हणण्याचे वा त्यांचे स्वातंत्र्यासाठी काही योगदान नसल्याचे किंवा काँग्रेसच्या तथाकथित आंदोलनांमध्ये सहभागी न झाल्याने त्यांनी आंदोलनात काहीच केले नसल्याचे मत व्यक्त करण्याचे निर्लज्ज धाडस दाखवावे.
सावरकर म्हणतात की, कोणती गोष्ट शास्त्रसंमत आहे हे ब्रह्मदेवालाही निर्विवादपणे सांगता येत नाही, आम्ही कोणचाही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित मानीत नाही. श्रुतिस्मृती आदी सारे पुरातन ग्रंथ अत्यंत कृज्ञ आगदाराने ममत्वाने सन्मानतो पण ऐते ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ म्हणजे ज्यांचे उल्लंघन करता येत नाहीत असे धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर राष्ट्रधारणेस वा उद्धारणास अवश्य असेल तेच आचरणात आणणार आणि अद्ययावत बनणार, असे त्या काळात सांगण्याची बौद्धिक, मानसिक ताकद सावरकरांमध्ये होती. समाज आणि राष्ट्र यांना त्यांनी कधी वेगळे केले नव्हते. यामुळेच समानता आणि असमानता याचे मर्मही त्यांना अधिक चांगले कळले होते.
खडतर वैचारिक वाटचाल
स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे, त्यातूून नेमके काय साध्य करावयाचे आहे आणि या स्वातंत्र्यामुळे नेमके कोणाचे भले होणार आहे, असे अनेक प्रश्न पूर्वी अनेकांना पडले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी ‘ द माइंड इज विदाऊट फिअर’ असे सांगणारी कविता लिहिली ती देखील स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगणारी होती. खरं म्हणजे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिशांच्या राजवटीतून भारताची मुक्कता करणे इतकेच नव्हते तर भारतीय मनाची वैचारिक स्वातंत्र्यता मिळवणेही तितकेच आवश्यक होते. तशात बहुसंख्य हिंदु असणाऱ्या या समाजामध्ये असणारी रुढीवादी, परंपरावादी जाचक आणि जातिभेद मानणाऱ्या मानसिकतेमधून समाजाला बाहेर काढण्याची गरजही तितकीच महत्त्वाची होती, जितकी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त करण्याची आवश्यकता होती. किंबहुना या वैचारिक आणि सामाजिक स्तरावरील पारतंत्र्यामधून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनाही फार लक्ष द्यावेसे वाटले नाही, कारण जहाल आणि मवाळ या संघर्षातच हे पारतंत्र्य अडकून बसले.
मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही पारतंत्र्याचीही बेडी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात बरोबरीने तोडण्याचा प्रयत्न अधिक प्रखरपणे केला. विशेष करून रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधून सुटल्यानंतर हिंदुमहासभेद्वारे जसे स्वातंत्र्यासाठी राजकारण केले, मुस्लीम लांगूलचालनातील राष्ट्रीय सभेच्या मानसिकतेमधून हिंदुंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच रत्नागिरीतील वास्तव्यामध्ये सुरू केलेली सामाजिक चळवळही तितक्याच प्रखरतेने मांडली आंतरिक तळमळ त्यामागे त्यांनी जितकी दाखवली तितकी ऊर्मी राजकीय स्तरावरील अन्य संघटनांच्या नेत्यांनीही दाखवायला हवी होती. परंतु केवळ भविष्यातील सत्तेच्या नादात आणि ब्रिटिशांशी आम्ही किती जोरदारपणे लढत आहोत, हे सांगण्याच्या नादात राष्ट्रीय काँग्रेस असो वा मुस्लीम लीग असो किंवा साम्यवादीही असोत त्यांच्याकडून बहुसंख्य असलेल्या हिंदु समाजामधील जातिभेद, शिक्षण, सात बेड्या, स्त्रीशिक्षण आदी पारंपरिक दोष दूर करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात झाला नाही. महात्मा फुले, गांधीजी, सुधारक आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा व्यक्तींच्या कार्यामधील दिशा सामाजिक वैचारिक बदलासंबंधात होती. सावरकरांनी मात्र आपले हे कार्य सामाजिक आणि वैयक्तिक स्तरापुरते न ठेवता हिंदुमहासभेसारख्या राजकीय संघटनेद्वारेही जोमाने चालवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी बहुसंख्य हिंदु समाज हा काँग्रेसच्या बरोबर राहिल्याने त्याला हिंदुमहासभेचे हे सामाजिक दिशादर्शक संघटन फारसे पचनी पडले नाही. त्यामुळे सावरकरांच्या सामाजिक कामांमधील गती राजकीय वातावरणात गतिहीन झाली. साहजिकच स्वातंत्र्याच्या आंदोलनामधून राजकीय पक्ष- संघटनांकडून अपेक्षित सामाजिक पुनरुत्थानाची दिशाच भरकटली गेली. त्यानंतर स्वातंत्र्य मिळूनही आजपर्यंत राजकारणाच्या आणि सत्तासंघर्षाच्या आंदोलनातून हे सामाजिक पुनरुत्थान अद्याप निवळलेल्या स्थितीतच आहे.
हिंदुत्व ही संकल्पना त्यामुळेच केवळ राजकीय, धर्म- समाज अशी मर्यादित नव्हती तर ती एकंदर समाजाला वैचारिक उत्कर्षासाठी जागविणारी होती. राजकारण, समाजकारण, धर्म आणि विज्ञानाची आस याद्वारे सावरकरांनी समाजोत्थान करण्याचा प्रयत्न केला, युरोपातील घडामोडींकडे लक्ष ठेवीत त्यांच्या उत्कर्षाच्या मार्गक्रमणेनुसार कालानुसार होत असलेल्या वाटचालीबरोबर भारतीय समाजही असाव, याच दृष्टीने सावरकरांनी काम केलेे. केवळ हिंदुत्व इतकेच त्यांचे काम नव्हते, त्यापलीकडील दृष्टी त्यांनी समाजालाही देण्याचा प्रयत्न केला. म्हणूूनच पोथिनिष्ठता सोडून विज्ञाननिष्ठ होण्याचे आणि अद्ययावत बनण्याची समाजाकडून त्यांनी अपेक्षा केली. प्रत्यक्षात तसे काम करीत त्यांनी योग्यायोग्य बाबींची पारखही केली होती. रत्नागिरीतील त्यांच्या कार्यात यामुळेच वैचारिक आणि व्यावहारिक बाबींचा संगम दिसून येतो.
रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळाचा त्यांनी केलेला उपयोग हा त्यांच्या वैचारिक क्रांतिकारी आणि बुद्धिप्रामाण्यावादी तसेच ऐतिहासिक चुका संपवून अद्ययावत समाज होण्याकडे केल्या जाणाऱ्या वाटचालीतूनच होता. त्यांचे हेच ‘अपडेट’ वा ‘अप टु डेट’ होणे समाजाला दिशादर्शक होते. मात्र इतके त्या ठिकाणी त्यांनी कार्य करूनही राजकीय पटलावरून त्यांना म्हणावे तसे सहाय्य अन्य विचारसरणीच्या संघटनांकडून मिळाले नाही, इतकेच कशाला हिंदु समाजातील वलिविध संघटनांनीही विरोध केला. वास्तविक त्यांची ती दिशा ही नेमस्त विचारांच्या जहाल कार्यकर्त्याप्रमाणे वा जहाल विचारवंताप्रमाणे क्रांतिकारी होती. स्वातंत्र्याच्या नेमक्या अर्थाचा मागोवा घेताना आजही सावरकरी विचारांचा वा वैचारिक क्रांतीचा विज्ञानवादी वा बुद्धिप्रामाण्यावादी मार्ग किती अचूक होता, त्याची जाणीव होते. मात्र ‘पश्चात बुद्धी...’ अशीच स्थिती असल्याचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंतही जाणवत आहे.
विज्ञाननिष्ठेला आपलेसे करण्याचा त्यांचा सल्ला हा केवळ हिंदुंनाच नव्हे तर मुस्लीमांनाही होता. मात्र असे असूनही त्यांना हिंदुत्वनिष्ठ म्हणजे केवळ जातीयतेच्या विखारीपणाचे बिरूद चिकटवून देण्याचा करंटेपणा केला जातो. ब्रिटिशविरोधात लढण्यासाठी मुस्लीम समाजानेही आपल्याबरोबर यावे, असे सांगत आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याविना असे सांगण्याचे स्पष्टवक्तेपण असूनही सावरकरांना मुस्लीमद्वेष्टे म्हणून मानण्याचा ‘तथाकथित धर्मनिरपेक्ष’ आततायीपणा अजूनही अनेक भारतीयांनी दाखवलेला आहे. मानवतावादी असल्याचे स्पष्ट करताना हिंदु - मुस्लीम यांच्यातील नेमके दोष ओळखून सावरकरांनी एकंदरच विज्ञाननिष्ठ पद्धतीने समाजाला पुढे जाण्यास सांगणे म्हणजेच शिक्षणाचे महत्त्वही त्यांना चांगलेच माहिती होते, त्यादृष्टीने त्यांनी समाज अद्ययावत होण्यासाठी केलेली वैचारिक वाटचाल ही व्यापक हिंदुत्ववादाच्याच नव्हे, मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्याला धरून होती. ती जातीय हिंदुत्ववादाच्या तथाकथित चौकटीत बद्ध करणे, हे अपरिपक्व वा वैचारिक शैथिल्याचेच गमक ठरेल.
४ मार्च २०२२ / ५ मार्च २०२२/ १४ मार्च २०२२
छायाचित्र सौजन्य : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई/ आंतरजाल

व्यवस्थित ओपन होत आहे.
उत्तर द्याहटवा