निमित्तमात्र...
बहुत किड्यांचा जोजार | किती सांगावा विस्तार |...
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या घरामध्ये वाटणी होऊ घातली आहे. दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही बाजूंच्या भांडणात हिंदुत्त्व मात्र पोरके झाले आहे. विशेष करून एकनाथी भारूडात भाजपाची- संघाची साथ असूनही भारुड काही शिवसेनेवर आणि हिंदुत्वावरही आरुढ झालेले नाही. हिंदुत्त्व हे एक या देशाचे घर आहे, ही कल्पनाच विसरली गेल्याचे गेल्या काही काळामध्ये स्पष्ट होऊ लागले आहे. त्याचमुळे सावरकरांच्या हिंदुपणाचा, हिंदुत्वाचा विसर पडल्याने सध्या हिंदुत्वाच्या घराला सारेच जण माझे म्हणू लागले आहेत, वस्तुत: माझे आणि आपले या दोन शब्दांमधील माया आता काळाच्या पडद्याआड चालली आहे की काय, अशीच भीती वाटू लागली आहे.
या निमित्ताने समर्थ रामदासस्वामींच्या दासबोधामधील दहाव्या समासामधील नरदेहस्तवननिरूपणाची प्रकर्षाने आठवण झाली आणि मनात अधिक खळबळ माजली. रामदासांनी तब्बल ७८०० ओव्यांनी तयार केलेला हा दासबोध असून २० दशकांमध्ये या ओव्यांच्या सहाय्याने वीस प्रमुख विषयांमधून साऱ्या समाजाला उद्देशून काही सांगितले आहे. मात्र त्याचा बोध आजही मराठी राजकारण्यांनाच नव्हे तर हिंदू राजकारण्यांना आणि हिंदुंनाही होऊ शकलेला नाही, याचे वाईट वाटते. सत्ता आणि पैसा यांच्या खेळामध्ये हिंदु समाजाचे पार पोतेरे करण्याचा पराक्रम आता जे काही तथाकथित हिंदु म्हणवणारे राजकीय पक्ष, नेते आणि गट-तट आहेत त्यांनी आता थांबवला पाहिजे. अन्यथा होत्याचे नव्हते होण्यासही वेळ लागणार नाही. हिंदुच्या उलट होणारी दुही रोखण्यासाठी हिंदु समाजाला वेठीस धरण्याचे काम जरी या सर्वांनी थांबवले तरी खूप झाले असे म्हणता येईल.
नरदेहाचे म्हणजे मनुष्यदेहाचा लाभ झाला आहे, तो लाभ किती महत्त्वाचा आहे, त्याचे निरुपण अगदी सर्वबाजूंनी करीत रामदासांनी यातून दिलेला उपदेश पारमार्थिक म्हणावा की, व्यावहारिक म्हणावा की, भाविष्यकालाची सूचना देणारा ठरावा, याचाच प्रत्यय या निरुपणातून येतो.
**
धन्य धन्य हा नरदेहो| येथील अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थलाहो| तो तो पावे सिद्धीतें ।।
**
त्यानंतर चांगला मनुष्यदेह मिळूनही माणूस काय करतो, काय चांगले करतो आणि काय चूक करतो ते सांगताना विविध ओव्यांमधून त्यांनी भाष्य केले आहे. परमार्थ न करता मायेच्या जाळ्यात माणूस कसा अडकतो, ते सांगताना समर्थांनी देह, घर, माती या संकल्पना अतिशय चपखलपणे मांडल्या आहेत...
**
सांग नरदेह जोडलें| आणी परमार्थबुद्धि विसर्ले |
तें मूर्ख कैसें भ्रमलें| मायाजाळीं ।।
मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |
परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ।।
मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |
मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ।।...
**
असे सांगत विविध प्राणी माणसाने बांधलेल्या घराला आपलेच घर असल्याचे म्हणत असतात. आणि अशा स्थितीत मांजरें, कुत्रीं, मुंगुसे, पाद्रे किडे, वाळव्या, पिसवा, ढेकूण, तांबड्या मुंग्या, घुंगर्डी, पिसोळे, गांधील माशा, सोट आणि गोमा हे सर्व किडे तें घर आपलें म्हणतात. या किड्यांची नांवें आणि पीडा- कटकटी यात पुढे आल्यातच जमा होतात आणि मग पशु, दासी घरची माणसे घर आपलें म्हणतातच. शिवाय पाहुणे, मित्र, गांवकरी, चोर व राजाचे अधिकारी तें घर आपलें म्हणतात. फार काय सगळेजण म्हणतात. आणि अशातच हा नरदेह असणारा तो घर बांधणारा माणूसही वा मूर्खही घर माझे म्हणतो. अखेर तें घर जड होतें. त्याचें ओझें वाटूं लागतें. मग तोच गांव सोडून दुसरीकडे जातो. यातून होते काय की, घर, देह आणि ती माती यांचे अपरिमित नुकसान होते. सध्या हिंदुत्वाच्या घराचेही असेच नुकसान होण्यासाठी राजकारणी प्रयत्नांची पराकाष्ठाच करीत आहेत. कोणी हिंदुत्ववादी म्हणून स्वत:ला मोठे म्हणतो तर दुसऱ्यांना गद्दार म्हणतो. आता खुद्दार आणि गद्दार यामध्ये मग ते राज्य असो वा केंद्र असो यांच्या राजकीय वादात, सत्तेच्या लालसेत हिंदुजनांना मात्र द्विधा मानसिकतेतून जावे लागत आहे, त्यामुळे त्यांना होणारा त्रास हा असह्य आहेच. मग तो महागाईचा त्रास असो, बेरोजगारीचा असो, प्रदूषणाचा असो की, आरोग्यविषयक समस्यांचा असो वा राजकीय- सामाजिक - बौद्धिक विचारांच्या संबंधातली असो.
पारमार्थिकतेतूनही व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास समर्थांची दूरदृष्टीही दिसते आणि विद्यमान हिंदु संघटनांची राजकीय लालसेतून निर्माण होणारी वासनाही... त्यांच्या या काही ओव्या पाहिल्या म्हणजे हाच प्रत्यय आल्याविना राहात नाही.
**
ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |
जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ।।
देह म्हणावें आपुलें| तरी हें बहुतांकारणें निर्मिलें |
प्राणीयांच्या माथां घर केलें| वा मस्तकीं भक्षिती ।।
रोमेमुळी किडे भक्षिती| खांडुक जाल्यां किडे पडती |
पोटामध्ये जंत होती| प्रत्यक्ष प्राणियांच्या ।।
कीड लागे दांतासी| कीड लागे डोळ्यांसी |
कीड लागे कर्णासी| आणी गोमाशा भरती ||
गोचिड अशुद्ध सेविती| चामवा मांसांत घुसती |
पिसोळे चाऊन पळती| अकस्मात ||
ऐसें शरीर बहुतांचें| मूर्ख म्हणे आमुचें |
परंतु खाजें जिवांचें| तापत्रैं बोलिलें ||
देह परमार्थीं लाविलें| तरीच याचें सार्थक जालें |
नाहीं तरी हें वेर्थची गेलें| नाना आघातें मृत्यपंथें ||
बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |
समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||
**
घर कोणी सोडून गेले तर ते जसे उद््ध्वस्त धर्मशाळेसारखे होते, तेथे माणसाने लक्ष काढून घेतले की असा विविध प्राण्यांचा वास सुरू होतो आणि त्यातून मातीतून तयार केलेले ते घर पुन्हा मातीत मिळते. पारमार्थिक वा अध्यात्मिक अर्थाबरोबरच व्यवहारिकतेतून या समासाचा बोध घेण्यासारखा आहे. या देशात असलेली हिंदु समाजाची निर्मिती, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे समूह, त्यांची नीती-धोरणे, जीवनशैली, संस्कृती, विद्याधन अशा विविध बाबींनी मातीतूनच आकारलेला हिंदुत्वाचा देह मायेच्या अर्थात सत्तेच्या लालसेपायी जर स्वार्थ आणि लडबडलेल्या राजकारणातून लोकांच्या मनभिन्नतेमध्ये, वादांमध्ये भरडला गेला तर त्या देहातून, मातीतून निर्माण केलेले विश्व ओसाड पडण्यास वेळ लागत नाही. कारण एकदा का कीड लागली की शरीर पोखरण्यासाठी वेळ जात नाही, हे योग्यवेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले हिंदुत्व आजच्या विविध राजकीय संघटनांच्यापेक्षा हिंदुत्वापेक्षा नक्कीच वेगले आणि प्रभावशाली होते. कारण त्यात भूमिनिष्ठ धर्म होता, तो मानवतेला मानणाराच होता, तो क्रांतिकारकच होता त्यात हिंदुपण वा हिंदुनेस होता. त्यात त्यांनी हिंदु कोण हे अतिशय सुस्पष्टपणे सांगितले होते. हिंदुपणाची व्याख्या सांगताना त्यांनी इतिहासातील चुकांचा, अभिमानास्पद अशा कर्मांचा, विद्यांचा, नव्या कालाच्या आगमनाचा पूर्णविचार करीत राष्ट्र संकल्पनेत हिंदुना बसवण्याचा यत्न केला होता. कारण त्यांच्या हिंदुत्वात ‘हिंदुत्त्व’ हा ‘वाद’ नव्हता. जो आज हिंदुत्व नावाचा देह ज्या वादांमध्ये पसरला आहे, ज्या धर्म या जुनाट संकल्पनेला धरून सरकू पाहात आहे, विज्ञानावादी दृष्टीऐवजी, अद्ययावत विचारांऐवजी केवळ सुविधा देणाऱ्या विज्ञानाकडे चंगळवादी पद्धतीने आणि भोंदू तत्वज्ञानाला साकारू पाहात आहे, अशा या तत्त्वविरहीत हिंदु राजकारणाला सावरकरांच्या राष्ट्र या संकल्पनेची व्यावहारिक, मानसिक, बौद्धिक जोड देणे गरजेचे आहे, हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा