पुनरुत्थान
विश्वगुरुत्वाकर्षण नको विज्ञाननिष्ठा हवी
हिंदु ही एक राष्ट्रवाचक भौगोलिक संकल्पना आहे आणि ही संकल्पना केवळ सनातनी वैदिक नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कथन केलेली हिंदु या शब्दाची व्याख्या बारकाईने पाहिली तर आजच्या या भारताला त्यांनी पुण्यभू म्हणजे होलीलँड असेच मानून या भारतात जन्मलेल्या व्यक्ती, त्या व्यक्तीसमुहांची तत्त्वज्ञाने, त्यांचे संत, त्यांचे धर्म-पंथ गट-तट यांचाही जन्म याच भूमीत असल्याचे सांगत मातृभूमीचा खरा अर्थ या देशातील हिंदुंसाठी सुस्पष्ट केला आहे. हिंदु संघटना संघटित करण्यासाठी, हिंदु व्यक्तींना संघटित करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन लोकांनी स्वीकारावा यावर भर दिला यातच खरी सावरकरी हिंदु संकल्पनेची तार्किक चौकट आहे. भारतातील हिंदुंचा विचार करून त्यांच्या रक्षणासाठी, अन्याय निवारणासाठी त्यांनी केवळ वैदिक धर्माला मानणाऱ्या गटालाच नव्हे तर या भूमीमध्ये जन्मलेल्या, निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानाशी संबंधित धर्म, पंथ आणि विचारसरणीला मानणाऱ्यांना हिंदु असल्याचे त्यांनी प्रतिपादले. इतकेच नव्हे तर अहिंदु असणाऱ्यांनाही विज्ञाननिष्ठतेचे महत्त्व सांगत पोथिनिष्ठतेमधून बाहेर पडण्यास सांगितले.
एका रात्रीत वैदिक धर्म, त्यातील वर्णव्यवस्था, जाति, उपजातींचा पसारा आवरता येणार नाही, याची त्यांनाही कल्पना होतीच पण त्याबद्दल समाजाला जाण करून देण्याचा आणि प्रामुख्याने समाजातील जातपात आधारित दुहीजन्य व्यवस्था संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विश्वगुरूसारखी ‘अतिउन्नत’ कल्पनेची वल्गना करण्यापूर्वी समाजसुधारक म्हणूनच त्यांनी आपली बुद्धी आणि विज्ञानवादी वृत्ती व्यावहारिकतेने पणासच लावली होती. त्यामुळेच त्यांचे हिंदुत्व हे खऱ्या अर्थाने व्यावहारिक, राजकीय आणि बौद्धिक होते. समाजात असलेल्या अंधपणाने स्वीकारलेल्या जुनाट चालीरितींबाबत, धर्माने घालून दिलेल्या बेड्यांबाबत त्यांनी केलेले पुनरुत्थान हे अतिशय गरजेचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपला धर्म, आपले राष्ट्र मोठे आहे हे जाणूनही त्यातील महत्त्वाचा इतिहास समजून घेऊन, प्रथम समाजातील कुप्रथांना दूर करून समाजातील व्यक्ती व्यक्तींनाही विज्ञानवादी होण्यासाठी हे पुनरुत्थान केले. त्यासाठी अंदमानातील कारागृहातून सुटका व्हावी यासाठी जे जे प्रयत्न केले ते करण्यामागे त्यांना आपल्या हाती असलेल्या आयुष्यातील काळाचे पक्के भान होते. ५० वर्षांची सजा दिल्यानंतर आपण बाहेर येऊ तेव्हा तुरुंगात राहून आपण राजकारण सोडा पण समाजासाठी आणि देशासाठीही काम करता येणार नाही. तुरुंगात राहाणे म्हणजे तुजविण जनन ते मरण असेच त्यांना वाटत होते. यासाठीच स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना उमगला. त्यामुळेच तुरुंगातून बाहेर येत राजकारण बंदी स्वीकारून, स्थानबद्धता स्वीकारून ते स्वस्थ बसले नाहीत. हिंदुत्व हा ग्रंथ लिहिण्यामागे त्यांची धारणा ही समाजोत्थानाची वा समाजोद्धारणा करण्याची होती. समाजाला विशेष करून जातिप्रथेत, अनावश्यक बेड्यांमध्ये अडकलेल्यांना आधी बाहेर काढण्याचे पुनरुत्थान महत्त्वाचे होते. एकप्रकारे सर्व हिंदुना बौद्धिक बळकट करणेही गरजेचे होते. त्यांनी आपल्याच समाजाला डोळसपणाने जगण्यासाठी आणि काळानुसार विज्ञानवादी होण्यासाठी प्रवृत्त करावयाचे ठरवले. ही तळमळ आणि काम हे किंबहुना स्वातंत्र्याच्या चळवळीइतकेच मोलाचे आणि महत्त्वाचेच होते. हिंदुत्व हा ग्रंथ कोणा एका वैदिक, सनातनी हिंदुंसाठी लिहिला नाही, तर तो राष्ट्रासाठीच लिहिला आहे. त्यामुळेच तो ग्रंथ लिहितानाही मुळात त्यांनी राष्ट्रभक्तीच स्पष्ट केली. यामुळेच त्यांना जातीय म्हणणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते. या देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदुंचे संख्याबळ लक्षात घेता, त्यांच्या हितासाठी काम करणारे हे व्यक्तिमत्त्व राष्ट्रोद्धारकच म्हटले पाहिजे. अहिंसावादावर भर देणाऱ्या कितींनी या देशाचे सर्वसमावेशक असे राष्ट्रीय भौगोलिक आणि सांस्कृतिक रूप देत राष्ट्रधर्माला सर्व धर्मांना समान वागणूक देण्याचे काम केले आहे? मुस्लिमांना अहिंदु म्हणवूनही त्यांनी पोथिनिष्ठा सोडून विज्ञाननिष्ठा बाणवावी, असे सांगण्याचे काम सावरकरांनी केल मात्र ते काम किती मौलानांनी वा किती अहिंसावाद्यांनी केले होते, त्याचा इतिहासही तपासण्याची आवश्यकता आहे.
सावरकरांचे हिंदुत्त्व, राष्ट्रीयत्त्व आणि स्वत्त्व
भारतात हिंदु या धर्माची वा संकल्पनेची व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केली, ती भूमीनिष्ठ अशी व्याख्या आहे. या भूमीशी एकत्व सांगणारी आहे. हे एकत्व कसे तर ते तार्किक, तात्विक आणि विज्ञाननिष्ठ आहे. त्यामुळे ते स्पष्ट सांगत की,
आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।
ही व्याख्या प्रत्येक हिंदुला तोंडपाठ झाली पाहिजे.
पुन्हा हे सांगण्याचे कारण म्हणजे आजही हिंदु या शब्दाबाबत मतभिन्नता आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या संकल्पनेत प्रश्न उपस्थित होऊ लागतात आणि त्यामुळे सारवासारव करण्यातच वेळ मारून न्यावी लागते. मुळात हिंदु या शब्दाला सुयोग्य अधिष्ठान सावरकरांनी दिलेले आहे. श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रमाण म्हणजे निकष जे मानतात ते सानातनी, केवळ श्रुति हा निकष मानतात ते वैदिक तर आपल्या धर्माला वैदिक धर्माची शाखा वा विकासात्मक स्थिती आहे असे मानत नाहीत ते (म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारे) स्वतंत्र धर्म असेच सांगणारे जैन, शीख, बौद्ध ( भारतीय बौद्ध) हे याच भूमीतील आहेत. त्यामुळे ते हिंदुच आहेत. तर मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू, पारशी हे अहिंदु आहेत. सावरकरांनी या संबंधात केलेली व्याख्या ही अधिक संयुक्तिक आहे. स्पष्ट आहे. घोळात गोळ न घालणारी आहे. मात्र आरक्षणे आणि अन्य फायदे मिळवण्याच्या मोहात आज हिंदु विलग होत आहे, हीच देशाची शोकांतिका आहे.
सनातनी वा वैदिक प्रमाण मानणाऱ्या वर्णव्यवस्था, जाति व्यवस्था सांगणाऱ्या हिंदु धर्मालाही वळण लावण्याची आणि अद्ययावत करण्याची तळमळ सावरकरांनी दाखवली. खरे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषानेही ते काम केले मात्र या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची ताकद एकत्र आली असती, तर भारताची स्थिती सामाजिक, राजकीय बळकटीने विश्वगुरुचीच झाली असती. हिंदु धर्मामधील जे कोणी पारंपरिक आणि प्राचीन परंपरेचे पाईक मानतात त्यांनाही त्यामुळे जगाला शिकवण देण्यासाठी वक्तव्य करण्याची गरज भासली नसती, कारण जगाने स्वतःहूनच जे चांगले ते स्वीकारले असतेच.
मुळात मुसलमानी आक्रमणानंतर हिंदुनी हरवलेले स्वत्त्व सावरकरांच्या हिंदुत्वाने नक्कीच सुरक्षित स्वराज्य देणारे होते. याचे कारण तेव्हाही आणि आजही पॅन इस्लामच्या नावाखाली इस्लाम किती शांतता असणारा धर्म आहे, हे जाणीवपूर्वक सांगण्याची वेळ ज्या भारतीय मोहम्मदपंंथीयांना स्वीकारावी लागत आहे, त्यांनी यापूर्वीचा इतिहास नीट पाहिला, तर फाळणीनंतरही त्यांच्याइतके सुरक्षित असणारे मोहम्मदपंथी मुस्लीमबहुल देशांपेक्षाही भारतात अधिक आहेत. भारतावरील मुस्लीम आक्रमक राज्यकर्त्यांची आक्रमणे, केली गेलेली धर्मांतरे आणि तरीही मुळचे हिंदु असूनही धर्मांतराने अहिंदु झालेल्या मोहम्मदपंथीना हिंदुस्थानचा एक भाग दिला गेला आणि उर्वरित स्वतंत्र भारतात राहात आहेत. मुक्त अशा भारतात राहूनही ७५ वर्षांनंतरही इस्लाम खतरेमे वाटत असल्याच्या काहींच्या आरोळ्यांना मुस्लीम भारतीयांनीच खरे म्हणजे उत्तर देणे अपेक्षित आहे. हिंदू- मुस्लीम यांचे ऐक्य या स्वतंत्र भारतात हवे असेल तर ते असल्या काँग्रेसी मतांच्या राजकारणातून तयार झालेल्या तथाकथित सेक्युलर - धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानाने ते नक्कीच मिळणार नाही.
सावरकरांचे निस्पृह हिंदुत्त्व आणि समानतेचे तत्त्व
देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढण्याच्या कामात मुसलमानांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट सांगितले होते की, ... ।।याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून विरोधाल तर तुम्हांस विरोधून हिंदु- राष्ट्र आपले भवितव्य बनेल तसे घडवील... ।।सावरकरांच्या त्या विधानाचा अर्थ आजच्या घडीला विचारात घेण्यासारखा आहे. स्वातंत्र्यानंतर मुस्लीम अनुनयातून काँग्रेसने आणि मुस्लीम मौलानांनी समाजाला अद्ययावत केले नाही. अहिंदु अशा या मुस्लीम समाजाने पोथिनिष्ठ राहाण्याच्या अतिरेकातून वास्तविक स्वतःला वेगळे पाडले आणि त्यातून अनावश्यक, अयोग्य कल्पना उराशी बाळगत नवीन काळाला आपलेसे केले नाही. औद्योगिकीकरणामुळे उभारी घेतलेल्या जगाचे आकलन न झाल्याने तळागाळातील मुस्लीम लोक मदरशातील धार्मिक बुरख्यात अडकले गेले. धार्मिक बुरसटलेल्या विचारांमधून हिंदु समाज जसा बाहेर येऊ पाहातो, तसे प्रयत्न आजही होत आहेत. मात्र तसे प्रमाण त्यांच्यामध्ये खूप कमी असल्याने केवळ धार्मिक शिक्षणातून काही घडत नाही, हे देखील त्यांच्या अजून लक्षात आलेले नाही. किंबहुना यामुळेच त्यावेळीही हिंदु समाजाला जात-वर्ण आदी कुप्रथातून तसेच सात बेड्यांमधून बाहेर काढण्याच्या तळमळीने केलेल्या कामाच्यावेळीही मुसलमानांच्या पोथिनिष्ठतेला विज्ञाननिष्ठ होण्याचेही आवाहन सावरकरांनी केले होते. मुस्लीम लीगच्या आणि त्यांच्या स्वार्थी नेत्यांच्या अट्टाहासाला बहुधा सावरकरांनी जितके जाणले तितके अन्य कोणी जाणले नाही, असेच म्हणावे लागते. मुस्लीम समाजातील तळागाळातील स्थिती जाणून घेऊनही कोलकाता येथील हिंदुमहासभेच्या १९३९ मधील त्यांचे अध्यक्षीय भाषण मुसलमानांनीही लक्षात घेण्यासारखे आहे.
ते म्हणतात ...।। हिंदुस्थान हे नाव आपल्या भूमीला हवे आणि ते हवे त्यामागे अहिंदु देशबंधुंवर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण वा मानहानी करण्याचा आमचा उद्देश नाही. पारशी आणि ख्रिश्चन देशबंधू सांस्कृतिकदृष्ट्या समानशील आहेत असे सांगतानाच जगामध्ये विविध देशांमध्ये मुसलमान आहेत आणि त्यांनी त्या देशांची नावे विकृत केलेली नाहीत. पोलिश मुसलमान, चिनी मुसलमान, ग्रीक मुसलमान अशा नावांनी संबोधले जाण्यातही ते धन्यता मानतात. यामुळेच हिंदुस्थानी मुसलमान या नावात येथील मुसलमानांनी समाधान मानावे. त्यामुळे त्यांच्या धार्मिक नि सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्त्वाला मुळीच बाधा येत नाही. ।।
सावरकरांचे हे भाषण जितके परखड आणि स्पष्ट आहे की, ते कोणतेही लांगुलचालन करणारे नाही. हिंदुस्थानची राजकीय घटना कशी असेल त्यावर त्यांनी सांगितले होते की, ... ।। ही राज्य घटना व्यापक तत्त्वावर आधारण्यात येईल. सर्व नागरिकांना समान अधिकार नि कर्तव्ये राहातील मग त्यांची जात. धर्म कोणतेही असोत. मात्र त्यांनी या देशाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहाण्याची, एकमेव निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे....।।
।।... भाषण, विचार, धर्म आणि संघ याबद्दलचे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना सारखेच उपभोगता येतील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय आवश्यकता यासाठी नागरिकांच्या अधिकारांवर बंधने घातली जातील तेव्हा ती जातीय आणि धार्मिक आधारावर नसून केवळ सर्वसामान्य राष्ट्रीय कारणासाठीच असतील. .....।।
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुमहासभेच्या या अधिवेशनातील हे भाषण पाहाता ते राष्ट्रनिष्ठ, राष्ट्रधर्म पाळणारे आणि सर्व धर्मांना घटनेत समानतेने आणि सलगतेने एकत्रित करणारे आहे. मात्र असे असूनही सावरकरांना अवमानीत करण्याचा कृतघ्न पणा भारतात केला जातो, यासारखे करंटेपण कोणते?
स्थानबद्धतेतूनही साधला प्रेरणादायी अभ्युदय
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यात खरोखरच विविध टप्पे निर्माण झाले होते आणि हे प्रत्येक टप्पे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सत्त्वपरीक्षा घेत, त्यांचा राष्ट्राभिमान, राष्ट्रविषयक जाणीवा या अधिकाधिक उन्नत करीत पार पडले. त्यातून जे काही घडले ते विलक्षण होते, दाहक अनुभव त्यांना देणारे होते, पण तरीही त्या कष्टप्रद स्थितीत त्यांचे वर्तन हे देशवासींना, हिंदुना प्रेरणादायीच ठरले होते. त्यांच्या कामांमुळे समाजाचे पुनरुत्थान होण्यासाठी सतत प्रेरणाच मिळत राहिली. क्रांतिकारकांचे मार्गदर्शक ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमध्ये १३ मार्च १९१० या दिवशी अटक करण्यात आली, त्यानतर चौकशीच्या नावाखाली जे काही दोषारोप ठेवले गेले त्यानंतर २० जून १९१० त्यांना भारतात पाठवण्याचा निर्णय झाला आणि १ जुलै १९१० या दिवशी बोटीमध्ये चढवले त्यानंतर फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरानजीक सावरकरांनी ७ जुलैला सागरात झेप घेऊन फ्रान्सचा किनारा गाठवला पण फ्रान्समधील पोलिसांना हाताशी धरून त्यांना पुन्हा अटक केली गेली. त्यानंतर २२ जुलै १९१० रोजी मुंबईत बोटीने आणले आणि त्यानंतर चालवलेल्या खटल्यानंतर २४ डिसेंबर १९१० या दिवशी आणि नंतर पुन्हा दुसऱ्या खटल्यात ३० जानेवारी १९११ या दिवशी मिळून दोन जन्मठेपांची सश्रम कारावासाची सजा ठोठावली, एकूण ५० वर्षांची ही शिक्षा भोगण्यासाठी २६ जून १९११ या दिवशी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांची रवानगी केली गेली.
त्यानंतर ६ जानेवारी १९२४ या दिवशी सुटका केली पण त्यासंबंधातील आदेशावर दिनांक होता ६ जानेवारी १९२३. ही सुटकाही सशर्त होती. येरवड्याच्या कारागृहात त्यांनाठेवले गेले आणि तेथून राजकीय कार्यांवर निर्बंध घालीत, अन्य अटी लावीत त्यांना रत्नागिरीमध्ये अखेर स्थानबद्ध करण्यात आले. जानेवारी १९२४ मध्ये रत्नागिरीतील त्यांच्या स्थानबद्धतेला सुरुवात झाली ती मे १९३७ पर्यंत; त्यांची ही स्थानबद्धता रत्नागिरीमध्ये आणखी एका कर्मभूमीसारखी पुनरुत्थान करणारीच ठरली. या काळात हिंदुत्व या संकल्पनेला विशद करणारे पुस्तकही लिहिले गेले, याच काळात हिंदुसभेच्या नावाने वा अन्य संस्था, संघटनांद्वारे त्यांनी अस्पृश्यता निवारण, जाति आणि वर्ण व्यवस्थेविरोधात लढा दिला. सहभोजने, व्यायामशाळांची स्थापना, भाषाशुद्धी, परधर्मात गेलेल्यांचे शुद्धीकरण, सशस्त्र क्रांतिकारकांचा गोपनीयपणे पाठपुरावाही त्यांनी केला. रत्नागिरीतील त्यांच्या आयुष्याचा टप्पा हा सामाजिक, धार्मिक, पुनरुत्थानाचाच महत्त्वपूर्ण भाग होता. या सुमारे १३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीत सशस्त्र क्रांतिच्या मार्गदर्शकाने केलेल्या सामाजिक, धार्मिक, मानसिक क्रांतिचा अभ्युदय केला होता. किंबहुना गांधीवादी अहिंसात्मक चळवळीपेक्षा ही वैचारिक, समाजोद्धारक आणि विज्ञानवादाला प्रोत्साहन देणारी अभ्युदय साधणारीच क्रांती होती, जी त्यांच्या हिंदुहृदयसम्राट या पदवीला नेण्याची खरे म्हणजे नांदीच ठरली. धर्माच्या जोखडाखाली गेलेल्या भारतातील हिंदु समाजाला नवकालाचे, वैज्ञानिक बुद्धीने विचार करायला लावण्याचे आणि भावी देशाची जडणघडण करण्यासाठी टाकलेले ते ठोस पाऊल होते. ज्या काळात त्यांनी हे कार्य केले ते त्यावेळच्या चष्म्यातूनच नव्हे तर आजच्या चंगळवादी तसेच विज्ञानाने निर्माण केलेल्या सुविधांच्या काळातील चष्म्यातून पाहिले तरी ते किती मोठे धाडस होते, याची प्रचिती येऊ शकेल. समाज आणि व्यक्तिविकासाला संघटित हिंदुत्वाच्या दिशेने नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न वास्तविक राजकीय म्हणावा, वैचारिक म्हणावा, बौद्धिक अभ्युदयाचा म्हणावा की द्रष्ट्या धर्मक्रांतिकारकाचा म्हणावा, हे त्यांच्या कार्यासंबंधात तटस्थ आणि सध्याच्या राजकीय भ्रष्टाचारविरहीत नजरेने पाहिले- वाचले तरच कळू शकेल. यानंतर कालखंडातील मात्र सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची वाटचाल ही खरी राजकीय विचारवंताची, स्वातंत्र्यासाठी तळमळीने केलेल्या सामाजिक- राजकीय अभिसरणाची, दिशादर्शक गुरुसारखी आणि राष्ट्र- अखंडता यांचा ध्यास घेणाऱ्या कर्मयोग्याचीच म्हणता येईल.
- रवींद्र यशवंत बिवलकर
छायाचित्र सौजन्य : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई/ आंतरजाल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा