मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

निसर्गातून हरवलेला माणूस

पिल्लाच्या पंखात शक्ती आली, ताकद आली याची जाणीव झाली की पिल्लांना घरट्यातून ढकलून देतात. हाच निसर्गनियम असतो आणि तो कोणालाही चुकत नाही. वास्तविक ही घटना निसर्गाच्या स्वातंत्र्यबद्दलच्या जाणीवेला खूप मोठी करणारी आहे. 

खरे म्हणजे स्वातंत्र्य हे निसर्गानेच प्रत्येक प्राणीमात्राला दिलेले आहे. ते उपभोगायचे कसे, ते वापरावयाचे कसे हे  मात्र माणसाने शिकावयास हवे होते. ते न शिकल्याने आणि माणसाच्या स्वार्थी व सत्ता, अधिकार यांच्या मोहापायी स्वातंत्र्य म्हणजे काय? ते कशाशी खातात? हेच माणसाला उमगले नाही. साम्राज्यविस्तारापायी, धर्मविस्तारापायी माणसाने माणुसकीच गमावली आणि स्वातंत्र्यालाच गुलाम करण्याच्या नादाला माणूस लागला. ही खरी म्हणजे शोकांतिकाच आहे. कोणी कसे जगावे, कसे राहावे हे त्याच्या त्याच्या अंगभूत गुणांना व अवगुणांनाही अनुसरून ते स्वातंत्र्य उपभोगले जाते. निसर्गाने ते स्वातंत्र्य प्राणीमात्रांना देताना खरे म्हणजे काही भेदभाव केला नाही. स्त्री-पुरुष, नर- मादी वा अनैसर्गिक काही घडले गेले तर निर्माण होणारी संतती यांचाही काहीसा विचार निसर्गाने केला असेल. पण माणसाने मात्र त्या निसर्गावर मात करण्याच्या नादात निसर्गानेच सर्वांना दिलेल्या स्वातंत्र्याला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हा प्रश्न खरे म्हणजे पक्ष्यांना पडला नाही, प्राणीमात्रांनाही पडला नाही. मात्र तो प्रशन माणसाला पडला. याचे कारण सत्ताधीश बनण्याच्या माणसातील वृत्तीला त्या माणसाने सामाजिकतेचा मुलामा देत सामूहीक बनविले. त्यामुळे प्रत्येक वर्तनामागे कार्यकारण तयार करण्याच्या कृतीला त्याने समाज, धर्म, नीति, रिती, रिवाज अशी नावे दिली. खरे म्हणजे त्यातून आजही काहीच साध्य झालेले नाही. संघर्ष चालूच आहे, तो संघर्ष आहे. दोन विचारांमधील, दोन पिढींमधील, दोन लिंगांमधील आणि अशा विभिन्न विभिन्न गट- बाजूंमधील. वास्तविक यातून स्वातंत्र्य मात्र गमावले गेले. त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ मात्र गमावला गेला.
माझे वडील सांगत की, चिमणी पाखरं ही त्यांचे आयुष्य जगताना त्यांच्या पिल्लाच्या पंखात शक्ती आली, ताकद आली याची जाणीव झाली की पिल्लांना घरट्यातून ढकलून देतात. हाच निसर्गनियम असतो आणि तो कोणालाही चुकत नाही. वास्तविक ही घटना निसर्गाच्या स्वातंत्र्यबद्दलच्या जाणीवेला खूप मोठी करणारी आहे. हे वर्तन केवळ पिल्लाला स्वातंत्र्य बहाल करू पाहाणारे नाही, तर त्याच्या आईवडिलांनीही स्वतःला समजून स्वतःला स्वतंत्र करू पाहू इच्छिणारे आहे. त्यांनी निसर्गाचे एक प्रजननाचे काम केले आहे ती जाणीव ठेवीत त्यांनी त्यानंतर स्वतःचे स्वातंत्र्यही स्वीकारले आहे. आपण पिल्लांवर अवलंबून राहावयाचे नाही, ही देखील त्या पिल्लांच्या आईबाबांना जाणीव आहे. त्यांनीही त्यांचे स्वतःचे तंत्र शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कारण प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे हे तत्त्व त्यांनी स्वीकारलेले आहे. त्यामुळेच एका विशिष्ट काळानंतर आपल्या मुलाबाळांना स्वातंत्र्य देणे हे देखील त्यांनी स्वीकारलेले आहे. भविष्याचा विचार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांनी करावयाचा आहे. पिल्लांनी आपले भविष्य कसे घडवावे हे त्यांनी ठरवावे व आपले भविष्य पिल्लाविना असेल हे लक्षात घेऊनही आपल्या भविष्यावर नजर ठेवीत त्या पिल्लांच्या आईबापांनी मार्गक्रमण करावयाचे आहे. निसर्गाचा हा नियम इतका सुस्पष्ट आहे तरीही माणसाला काही तो गावला नाही. किंबहुना यामुळेच निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याऐवजी तो निसर्गापासून दूर जात निसर्गावरही मात करण्याचा प्रयत्न करू लागला आहे. माणूस आणि त्याची पिल्ले या संबंधातील संबंध खरे म्हणजे प्रत्येकाने तपासून पाहिला तर तेच कटू सत्य आढळून येते. पण दुर्दैवाने माणूस काही निसर्गाला आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आजही सामावून घेऊ शकलेला नाही, हेच खरे.

- रवींद्र यशवंत बिवलकर


३ टिप्पण्या:

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...