साहित्यामधील विविध प्रकार हाताळणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी समाजासाठी, सुधारकी भूमिकेतून आणि विज्ञानवादी, बुद्धिवादी दृष्टीने निबंध, लेख यांचे भरपूर लिखाण केले. सावरकर म्हणजेच हिंदुत्त्व असे समीकरण बनले इतके ते प्रखर हिंदुत्त्ववादी होते. अर्थात त्यांचे हिंदुत्त्व हे धार्मिक नव्हे तर भूमीनिष्ठ, संस्कृतीनिष्ठ असूनही ते विज्ञानवादी दृष्टीने लोकांना बुद्धिवंत करण्याचा प्रयत्न करणारे होते. त्यामुळेच त्यांची दृष्टी नेहमीच प्रयत्नवादी होती, राहिली. साहजिकच समाजाकडे पाहाताना उपहासगर्भ पद्धतीपेक्षा ते सुधारकी भूमिकेतील शिक्षकी आणि सकारात्मक पद्धतीने हिंदुत्वाकडे पाहात होते. त्यामुळेच समाजसुधारणेसंबंधात त्यांची असणारी मते प्रखर, ध्येयनिष्ठ, विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध आणि नवकालनिर्मितीला अनुसरून होती. भविष्याला सामोरे नेणारी होती. विशेष करून ही वैशिष्ट्ये त्यांच्या निबंध, लेख, स्फुट लेख यामधून प्रत्ययास येतात. भाषणासारखे प्रवाहीपणच त्यांच्या या प्रकारच्या साहित्याला मिळालेले दिसते. सावरकरांच्या लिखाणाच्या तुलनेत आगरकरांची रचना सुलभ वाटते, अर्थात याचे कारण त्यांचा मूलभूत शिक्षकी पिंड असावा तर सावरकरांचा पिंड हा प्रवाही, क्रांतिकारी विचारांच्या, नेतृत्त्वगुणाचा आणि ज्वलंतराष्ट्रनिष्ठा असणाऱ्या कृतीशील व्यक्तीचा होता. विविध प्रकारचे वाचन, परदेशातील निवासातून मिळालेले अनुभव आणि प्रत्ययकारी क्रांतिकारक नेतृत्वाने भारलेले व्यक्तिमत्त्व असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या या लिखाणातून दिसतोच.
साहित्यात खरे म्हणजे ते कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, कवि आहेत, लेख लिहिणारे प्रभावी पत्रकार आहेत, इतिहासाबद्दल संवेदनशील असणारे इतिहासकार आहेत आणि निबंध- लेख यातून विविधांगी उद्दिष्टाने आणि विषय मांडणीतून भारलेले निबंधकारही आहेत. समाजकारण, धर्म, राजकारण, इतिहास, तत्कालीन आणि भूतकालातील घटना- घडामोडी , जागतिक घटना- घडामोडी यावर लक्ष असल्याने त्याबद्दल स्वमत घडवणारे सावरकर केवळ इतपर्यंतच थांबत नाहीत. सत्य-अहिंसेचे तत्त्वज्ञानही ते सांगतात, त्याचा वापर कसा कितपत योग्यायोग्य आहे त्याचेही विश्लेषण करतात, हिंदु धर्मातीलच नव्हे तर अन्य धर्मातीलही गुणदोषांचे विवेचन करीत जातिभेद, चातुर्वर्ण्य सामाजिक कालबह्य वंधने उलथून टाकण्याचे तत्त्वज्ञानही मांडतात आणि हिंदु - मुस्लिमांच्या समस्या मांडत त्यांच्या त्यांच्या पोथिनिष्ठतेमधून समाजाने बाहेर पडावे यासाठी विज्ञानवादी ध्वजही फडकावतात.. क्रांतिचे त्तत्वज्ञान सांगताना त्यांचा क्रांतिकारक, इतिहास, तत्त्वज्ञान, चाली-रिती, परमेश्वराचे अस्तित्त्व, धर्मभोळेपणा, भोळसट श्रद्धा, लोकशाही, तिची तत्त्वे, विभिन्न संस्कृती आणि त्या त्या संस्कृतीचे उत्कर्ष आणि अपकर्ष , भाषाशुद्धी आदी विविधांगी अथांग विषयांनी त्यांचे निबंध आणि लेख प्रभावी होत गेलेले आहेत. मुळात त्यांचे व्यक्तिमत्त्वच या निबंधांमधून पारदर्शीपणे आणि प्रवाहीपणे दिसून येते. त्यामुळे प्रचारकी वा हिंदुत्त्ववादी वा राष्ट्रवादी वाटणारे सावरकर लोकहित जपणारे सुधारक पंथातीलच एक. भारताबरोबरच पाश्चात्य देशातील वास्तव्य, तुरुंगवासातील अनुभव यांचा सखोल परिणामही त्यांच्या विचारांवर झाला आहे. त्यातून निबंध वाड्.मयातून सावरकर ही व्यक्ती एक बहुआयामी आणि हिंदुत्त्ववादापेक्षाही अधिक प्रखर विज्ञानवादी, तर्क आणि तत्त्वनिष्ठ समाजसुधारणावादी असल्याचे जाणवते. बुद्धिने आणि विचाराने प्रगल्भ झालेले हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या विविध निबंध आणि लेखांमधून कसे दिसते ते पाहाणे, मांडणे हा देखील एक आव्हानाचाच प्रकार आहे.
००००००००००००००००००००००००००००००००००
सावरकर: तर्कनिष्ठ, बुद्धि-विज्ञाननिष्ठ तत्त्ववेत्ते - १०
००००००००००००००००००००००००००००००००००
निबंधाच्या अखेरीस म्हणतात की, ....ती विश्वाची आद्यशक्ती ज्याकाही ठरावीक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्यात्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी नीति-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य 'आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!
सावरकर आणि हिंदुत्त्व हे एक अविभाज्य समीकरण आहे हे खरेच. पण त्यांचे हे हिंदुत्त्व नेमके काय आहे, ते रितीरिवाजात अडकलेले नाही, ते नव्या काळाकडे भारतीयांना नेऊ पाहाणारे, अद्ययावत करू पाहाणारे आहे. उगाचच कर्मकांडामध्ये अडकावे, असे त्यांना वाटत नाही पण त्याचबरोबर आपल्या प्राचीन परंपरा आणि इतिहास याचेही भान ठेवून त्यांनी हिंदुत्वाची केलेली व्याख्या ही आधुनिक विज्ञानयुगाला पारमार्थिकदृष्टीने नव्हे तर ऐहिक, व्यावहारिक आणि उपयुक्ततावादी अंगाने पाहाणारी आहे. त्यामुळे अगदी सर्वसाधारण वैदिक वा सनातनी हिंदुंनाही अध्यात्माच्या, देव, इश्वर आदी संकल्पना सांगताना एका नास्तिकवाद्याची भूमिका ते बजावताना वाटू शकतात. किंबहुना त्यांचा दृष्टिकोन हा नास्तिकवादाचा नसून मानवतावादी, बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ आणि क्रांतिवादी आहे. त्यांचे जगणे हे उपयुक्ततावाद, वास्तव, विज्ञान याची सांगड घालून जाणाऱ्या कृतीशील क्रांतिकारी व्यक्तीचे आहे. त्याचा प्रत्यय देणारे लेख- निबंध यादृष्टीनेच लक्षात घेतले पाहिजेत. खरे म्हणजे त्यांचा दृष्टिकोन समजायला कदाचित सोपा असला तरी प्रत्यक्ष स्वीकारायला मात्र हिंदु तयार नाही, हेच दुर्दैव वाटते. त्यामुळेच अद्याप श्रद्धा, अंधश्रद्धा, रिवाज, प्राचीन काळातील अर्धमाहितीचा अहंपणा यांनी माणसावर मात केली आहे. त्यामुळेच त्यांचे बुद्धिप्रामाण्य वा विज्ञानवाद पारंपरिक विचारधारेतील धर्ममार्तंडांना दाहक वाटणेही स्वाभाविक आहे. ते समजून घेऊन नव्हे तर काही अंशी स्वीकारले तरी अद्ययावत होण्याच्या दिशेने आपण मार्गक्रमण करू शकू.
सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध विषयांमध्ये सावरकरांच्या लेख-निबंधांनी दिशा स्पष्ट केली आहे. `मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ यात ते सांगतात.... सुरूप आणि कुरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदुल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्चयावत विश्वाचा, वस्तुजाताचा, केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच, अकस्मात उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दु: खद तो दुसरा. पहिला चांगला, दुसरा वाईट.....
त्यांच्या या विधानातून त्यांचे तर्कविश्व किती सुस्पष्ट होते तेच दिसते. चांगले काय आणि वाईट काय या संबंधात वा या प्रकारच्या दोन मानलेल्या बाजूंमधून कशी मीमांसा करायची तेच त्यांनी तर्कशुद्दपणे स्पष्ट केले आहे. मनुष्य या सजीव प्राण्याचे खरे आकलन त्यांनी केले. त्यासमाजप्रिय, गट, समूह अशा पद्धतीच्या संकल्पनेत राहाणारा हा मनुष्य काय आणि कोणत्या स्थानी आहे आणि विश्वाच्या तुलनेत त्याचे स्थान नेमके कुठे आहे, ते ओळखण्याचा वा स्पष्ट करण्याचा सावरकरांचा हा दृष्टीकोन केवळ ऐहिक नाही तर पारमार्थिक विचारानेही स्पष्ट झालेला दिसतो. विश्वरूपही या निमित्ताने ते जाणून घेत मनुष्याच्या आयुष्याशी तुलना करीत त्यांनी हा अतिशय जटील विषय खरे म्हणजे सोपा करूनच उलडण्यास सुरूवात केलेली दिसते. यामुळेच उपयुक्तता या संबंधात विचार करताना त्यांनी यात म्हटले आहे की,.... विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हे अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादी सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकणार....
अशाच पद्धतीने सावरकरांनी या निबंधातून तर्कशुद्ध अशा विचारांमधून देव शोधला आहे. विश्वाची उपयुक्तताच नव्हे तर त्या विश्वाचे मानवाच्या वा सजीवाच्या दृष्टीने असणारे स्वरूपही त्यांनी हुडकण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले आहे. त्यामुळे त्यात अनेक उदाहरणे, प्रमेये, सूत्रे, मांडत हा ‘देव’ शोधला आहे. फळे, भाज्या यांची निर्मिती, त्यांचे विशेषत्व याचाही बारकाईने दाखला देत ते म्हणतात... त्या जगास निर्मिण्यासच देवाने मनुष्यावर जी अमर्याद दया केली आहे, तीविषयी मनुष्य त्याचा उतराई होणार तरी कसा!! .... तशीच मनुष्य देहाची रचना. पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत या शिरराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना हे मनुष्याच्या देवा, तू जी केसानुकेसागणिक काळजी घेत आला आहेस, ती कुठवर सांगावी!
सावरकरांची ही भाषा तत्त्वज्ञान्याची, संशोधक अशा संवादी व्यक्तीमनाची आहे. पण तरीही विविधांगी विचार करीत अध्यात्मिकतेच्या एका वेगळ्या स्तरापर्यंत जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळेच ते या निबंधाच्या अखेरीस म्हणतात की, ....ती विश्वाची आद्यशक्ती ज्याकाही ठरावीक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्यात्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी नीति-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य 'आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा दृष्टिकोन अध्यात्म- तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांना सामावून घेणारा किंवा त्या अंगाने जाणारा आणि खरी माणुसकी शोधणारा दिसतो. यात ऋषीमुनींची तात्विकता आहे. संताचा संवेदीपणा आहे आणि नवकालातही विज्ञानाला मानणाऱ्या माणुसकीचा आत्मा आहे. इतकी प्रगल्भता असूनही त्यांच्यावर केवळ आजकालच्या विचारातील कर्मकांडात गुंतलेल्या हिंदुचा शिक्का मारणे ही अपरिपक्व बुद्धिची लक्षणे म्हणायला हवीत.
००००००००००
अधिष्ठान हवे अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्याचे ! - ११
०००००००००००
रामास हराम समजणारेही ऐहिक सामर्थ्यास संपादून वैज्ञानिक बळाने जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धान्त ! !
बिंदू बिंदू एका सरळ रेषेत जुळले की रेषा बनते. प्रत्येक बिंदू हा स्वतंत्र असतो. त्याच्यावर झालेले संस्कार, प्रक्रिया या त्या त्या बिंदूला माहिती झाल्यानंतर एक रेषा तयार करण्यासाठीच्या प्रकल्पात तो बिंदू स्वत:ला असा सामावून टाकतो की, बिंदू म्हणजे रेषा की रेषा म्हणजे बिंदू असाही प्रश्न पडू शकतो. त्यातील एखादा बिंदू निखळत असला तर त्याला दुसरा बिंदू सावरून घेतो, रेषा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण मुळात हे सर्व बिंदू स्वतंत्र असतात, त्यांच्यावर एकाच ठिकाणाहून होणारे संस्कार ते स्वतंत्र असल्याचे भान ठेवून झाले; म्हणजेच ‘मास प्रॉडक्शन’ म्हणून न पाहाता केले गेले तरी त्या बिंदूंचे अस्तित्त्वही राहाते, आणि बिंदूंना अन्य बिंदूंचे भानही राहाते. व्यक्तीस्वातंत्र्यासारखे हे बिंदू स्वतंत्र राहिले तरी सामुहीक असतात, त्यासाठी त्यांना तशी सामुहीक एकत्रित वा गटनिहाय वा सांघिक अशा प्रकारची शिकवण देऊन ‘रोबो’ सदृश्य तयार न करता प्रत्येक बिंदूला जागृत करण्याचे महत्त्वही लक्षात येते त्यामुळेच त्यांचे प्रत्येकाचे अस्तित्त्व त्यांच्या त्यांच्या विचारविनिमयातून विकसितही होत असते. अशाच संकल्पनेतून सावरकरांनी आपले तत्त्वज्ञान, तर्क, विचार समाजातील लोकांपुढे, हिंदुंपुढे मांडले त्यांना विचारप्रवर्तक बनवण्यासाठी प्रेरणा देणारी शिकवण दिली यामुळेच खरे म्हणजे सावरकरांचे हिंदुत्त्व हे अधिक राष्ट्रीय होते, भूमिनिष्ठ होते, विज्ञाननिष्ठ होते. अशातूनच ‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?’ हे समजावताना त्यांचा निबंध केवळ धर्म, ईश्वर, निरीश्वर, या चर्चेत न अडकता तो व्यक्तीला समूहाचा अर्थ सांगणारा, विवेकवादाने जगायला शिकवणारा, राष्ट्राचा इतिहास जागवून झोपलेल्या हिंदुना जागे करणारा तार्किक, तात्विक, सामाजिक आणि बुद्धिवादी बनला. अर्थात हे ज्याने त्याने वाचनाने अनुभवीत पुढे जात आपली ‘रेषा’ वाढवावी, हेच अपेक्षित आहे.
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे ।। या समर्थ रामदासस्वामींच्या ओवीने ‘ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?’ हा निबंध सावरकर सुरू करतात आणि भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय, यासंबंधात अतिशय बारकाईने विविध तार्किक उदाहरणे देत, इतिहासातील घटना नमूद करीत हा निबंध अधिक प्रगल्भ करतात. सावरकरांचा हा निबंध वाचताना इश्वर आणि निरीश्वरवादाचे विवेचनही यात विश्लेषित होते आणि सामाजिक, राजकीय, सामूहीक, धार्मिक अशा घटकांचेही महत्त्व कळत, त्यांची उकल होते.
सावरकर या निबंधात अनेक पद्धतीने तार्किकता मांडताना सांगतात की, .... जर भगवंताच्या अधिष्ठानाचा इतकाच अर्थ असेल की, ऐहिक आणि मानवी उपायांच्या हातीच यशाची किल्ली नसून मनुष्याच्या जानाच्या नि शक्तीच्या पलीकडे ज्या अनेक अज्ञात, अजेय, प्रचंड अशा अमानुष विश्वशक्ती आहेत, त्यांच्या आघाताप्रत्याघाताच्या टकरीतही त्या यशाचा वा अपयशाचा संभव असतो, तर तो अर्थ बरोबरच आहे ! ...
... ओवीचा अर्थ असाच घेण्यात येतो की, मनुष्य ज्याच्या त्याच्यापरी नीती-अनीती म्हणतो, न्याय व अन्याय म्हणतो, दैवी संपत वा आसुरी संपत म्हणतो, धर्म व अधर्म म्हणतो, त्यापैकी पहिले ते सत्य नि दुसरे ते असत्य असून जी चळवळ त्या मानवी सत्याच्या पायावर उभारलेली असते, त्या मानवी न्यायाची पोषक असते, त्या मानवी धमचि बीद मिरविते; तोच काय तो यशस्वी होते ! ईश्वर तिच्यावरच कृपा करतो अशा अर्थी ईश्वराचे अधिष्ठान जिला लाभत नाही, ती चळवळ कितीही प्रबळ असली तरी ती यशस्वी होत नाही. यास्तव चळवळ करणाऱ्यांनी प्रथम ते भगवंताचे अधिष्ठान संपादिले पाहिजे, ईश्वराची कृपा असली पाहिजे. आणि ही ईश्वरराची कृपा संपादिण्याचा मार्ग कोणता ? तर अर्थातच पंचाग्निसाधन, पाण्यात उभे राहून द्वादशवाधिक नामजप, योग साधन, उपासतापास, एकशेआठ सत्यनारायण, एक कोटी रामनाम जप, संतत धारेची अनुष्ठाने, रेडे वा बोकड मारणारे नवस, हजार वत्ती लावणे, दुर्वा वाहणे, स्तानसंख्या, जपजाप्य, नामसप्ताह, पुरश्चरणे-पारायणे मोपास, ब्राह्मणभोजने, यज्ञयाग, दक्षिणादाने प्रभूति जे शतावधी उपाय तोपासून अनिमाहात्म्यापर्यंत देवास संतोषविण्यास्तव वर्णिलेले आहेत त्यास आचरणे हा होय. याअर्थी जिला तपस्या म्हणतात ती आधी, मग .मानवी चळवळ.. वरील मत खरे की खोटे हे पाहण्यापूर्वी इतके स्पष्ट सांगून टाकतो की, वर उल्लेखिलेल्या जपतपादी साधनांची आत्मशुद्धी वा पारलौकिक मोक्ष प्रभृति जी फळे आहेत त्यांचा उह या लेखात आम्ही करीत नसून जी त्यांची फळे प्रत्यक्ष अनुभवात केव्हाही निश्चितपणे मिळालेली नाहीत ती त्यांची फळे नव्हेत इतकेच येथे विशदावयाचे आहे. ..... परंतु तशा अर्थाच्या ईश्वरी अधिष्ठानावर, वरील ओळीत ज्या राष्ट्रीय उत्पादनादिक भौतिक चळवळींच्या ऐहिक यशाचा उल्लेख केलेला आहे, ते • यश वा अपयश बहुधा मुळीच अवलंबून नसते; तर मुख्यतः तिच्या मौलिकसामर्थ्यावर अधिष्ठित असते, इतकेच येथे दाखवावयाचे आहे.
याच निबंधात ते मुसलमानांची आक्रमणे, त्यांनी मिळवेले विजय साधुसंतांचाही झालेला नामघोष आदी विविध उदाहरणे, घटना नमूद करीत ते सांगतात की... सहस्रावधी पुण्यपुरुष जी जपतप अनुष्ठानव्रतवैकल्यादी प्रकारांनी ईश्वरी कृपा संपादिण्यास्तव जी तपस्या करीत होते तीमुळे भगवंत प्रसन्न झाले. ते तशा अर्थाचे ईश्वरी अधिष्ठान मिळाले यास्तव ती चळवळ समय आणि यशस्वी ठरलो. अशा कोटिक्रमाने हिंदुपदपादशाहीस्तव आम्ही हि वीरांनी झुंजून तो जो जय मिळविला त्या जयाचाच नि त्या भुजीचाच पुरावा ज्या अर्थी हा ईश्वरी अधिष्ठानाच्या सिद्धान्तास देण्यात येतो त्या अर्थी त्याच कालच्या इतिहासाची छाननी करून आम्ही तो पुरावा किती लंगडा आहे हे दाखवू इच्छितो. .... यामुळेच ते अतिशय ठोसपणे सांगतात की, .... ती हिंदुपदपादशाही त्या साधनांती किंवा तथा ईश्वरी अधिष्ठानाने जिंकली गेली नसून, तो भौतिक विजय, अशा स्वातंत्र्ययुद्धास जी भौतिक साधने संपादू शकतात तशा भौतिक साधनांनीच आम्हीही संपादू शकतो हे सिद्ध करण्यास त्या काळासारखे दुसरे समर्पक उदाहरण सापडणे दुर्मिळ ... असे सांगत ते ज्ञानेश्वर, रामदेवराव, मुस्लीम आक्रमणे, ख्रिश्चनांची आक्रमणे, आदी अनेक प्रकारे त्यां त्या काळातील पद्धती, घटना, मुस्लीम वा ख्रिश्चन यांच्या धर्मातील तत्त्वे, उदाहणे सांगत धार्मिक कर्मकांडावर जोरदार प्रहार करतात. इतके सारे सांगितल्यानंतर तर्क- विज्ञाननिष्ठ विचार मांडत सावरकर निबंधाचा समारोप करीत जे सांगतात तेच नवकालाला अनुसरून मांडलेले सत्य...
ते म्हणतात. ... दुर्बल पुण्याईही पंगू होय, हे विसरू नये. नुसत्या एकशेआठ तर काय पण अकराशेआठ सत्यनारा यणांच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही. कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच काय ते अवलंबते ! असत्यनारायणाचे पूजकही ह्या जगात वारंवार यशस्वी होतात. फार काय, सारे जग निर्देव करू निघालेला रशिया आज ऐहिक दृष्ट्या परम बलिष्ठ म्हणूनच यशस्वी झालेला आहे की नाही ? 'निर्देव' म्हणून त्याचे वैभव टिकणार नाही म्हणाल तर ते ‘सदेव' अशाही कोणाचे टिकले नाही ! ! श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली; प्रत्यक्ष मदिनेतील मशीद घोडशाळा बनली; 'जेहोवा 'चे सुवर्ण मंदिर तडकले; जीजसला रोमने फाशी दिले— क्रुसिफाय केले ! अस्पृश्यता काढता म्हणून बिहारचा भूकंप झाला ' म्हणणारा सनातनी समज आणि 'अस्पृश्यता ठेवता म्हणून तो भूकंप झाला' असे बजाविणारा सुधारकी ढोंगीपणा हा जितका खुळचट आहे तितकाच कोटी रामनाम जपाने वा निमाजपढाईने राष्ट्रावरील भौतिक सर्वारिष्ट शांत करू निघालेला भाबडेपणाही खुळचट आहे ! रामास हराम समजणारेही ऐहिक सामर्थ्यास संपादून वैज्ञानिक बळाने जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धान्त ! !
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार पाहाता, त्यानी दिलेले हे समाजशिक्षण व्यक्ती व्यक्ती लक्षात घेऊन व्यक्ती व्यक्तीला डोळस करण्याचा त्यांचा महायज्ञ होता. आता तो किती यशस्वी झाला, किती शिल्लक राहिला ते मात्र प्रत्येकाने आपापल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या अनुभवानेच ठरवावे किंबहुना इतका सुस्पष्ट संदेश मिळाल्यानंतर सावरकरांच्या या प्रक्रियेमुळे ‘ सर्व बिंदूंची मिळून बनलेलेी रेष केवळ लांबच नव्हे तर ठळकही तितकीच होऊ शकेल.’ त्यात असणारे मंथन व्यक्ती व्यक्तीला कसे पचते, कसे पटते ते झपाट्याने पुढे जाणाऱ्या कालानेच लक्षात येईल, अशी अपेक्षा आहे. धर्म, संस्कृती, यासंबंधातील सावरकरी विचारांचे बीज त्यांच्या याच सामाजिक, बौद्धिक, विज्ञाननिष्ठ आणि तार्किकतेतून उगवलेले आहे, हे लक्षात घेतले तरी खूप काही गवसले असे म्हणता येईल.
०००००००००००००००००००
विज्ञानऋषी सावरकर - १२
०००००००००००००००००००
खरा सनातन धर्म कोणता? या निबंधातून सावरकरांनी केलेला उहापोह आणि खरा सनातन धर्म कोणता याची केलेली उकल ही आजही प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे. भोंदूपणा, आंधळी वा भाबडी श्रद्धा आणि यांचा फोलपणा त्यांनी उघड केला आहे. केवळ सनातन या शब्दाशी आज सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या हिंदू धर्माचाच नव्हे तर ख्रिश्चन, मुस्लीम या धर्मातीलही सनातनपणा नेमका काय आहे, ते सांगत सनातन धर्माचा बोध त्यांनी समाजाला करून दिला आहे. किंबहुना यामुळेच सुधारणेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन क्रांतिकारक, सुधारणावादी, तर्कनिष्ठ आणि विशेष म्हणजे विज्ञाननिष्ठ असा आजही होऊ शकतो, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पन्नास वर्षांपूर्वीच स्वीकारला होता, अंगीकारला होता, समजवला होता. मात्र दुर्दैवाने आजही भारतातील हिंदुंसह अनेक धर्मीय; हे सावरकरांनी सांगितलेला ‘खरा सनातन धर्म’ स्वीकारण्यास नव्हे तर समजण्याच्याही निकषावर उतरलेले नाहीत. भले त्यांनी सावरकरांचा ‘हिंदुत्त्व’ हा शब्द जरी उच्चारला असला तरी त्याची लय मात्र पुरती घालवलेली आहे.
धर्माबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकी व्याख्या केलेली नाही. हिंदु धर्माची व्याख्या केलेली नाही असे काही कथित जाणत्यांकडून अनेकदा दावे केले जातात. हिंदुत्व सांगितले पण हिंदु धर्माची काही त्यांनी व्याख्या केलेली नसल्याचे हे तथाकथित जाणत्यांचे वा टीकाकारकांचे मत म्हणजे अल्पबुद्धीच. आपल्या निबंधांमधून सावरकरांनी सांगितलेली ईश्वराबद्दलची मते वा विश्लेषण असो की देव या संकल्पनेचे विवेचन असो. अध्यात्म, धर्म आणि विज्ञान या संबंधातील त्यांची मीमांसा ही आधुनिक विज्ञानऋषीची होती. हे विज्ञानऋषी ज्या काळात झाले त्या काळातील हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन समाजाची स्थितीही त्यांना अचूक कळलेली होती. इतकेच नव्हे तर काळाप्रमाणे अद्ययावत व्हा, असे स्पष्ट सांगण्याची त्यांची शैली ही देखील विवेचक, विश्लेषक आणि ठाम प्रतिपादन करणारी होती. धर्म आणि समाज यामधील सुधारणा किती महत्त्वाची आहे, हे मर्म त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच राजकीय नेतृत्त्व करणाऱ्या या विज्ञानऋषी सावरकरांनी मांडलेली सूत्रे, प्रमेये ही ज्या काळात लिहिली गेली त्यानंतरच्या अनेक वर्षामध्येही ती तंतोतंत लागू पडू शकतील इतकेच नव्हे तर ऐहिक विकासाची गतीही त्या त्या काळात पकडू शकतील अशी त्यांची चौथी मितीही परिपूर्ण आहे. याचे कारण ती काळाप्रमाणे बदरलणारी, उत्क्रांत होणारी आहे.
खरा सनातन धर्म कोणता? या निबंधातून सावरकरांनी केलेला उहापोह आणि खरा सनातन धर्म कोणता याची केलेली उकल ही आजही प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे. भोंदूपणा, आंधळी वा भाबडी श्रद्धा आणि यांचा फोलपणा त्यांनी उघड केला आहे. केवळ सनातन या शब्दाशी आज सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या हिंदू धर्माचाच नव्हे तर ख्रिश्चन, मुस्लीम या धर्मातीलही सनातनपणा नेमका काय आहे, ते सांगत सनातन धर्माचा बोध त्यांनी समाजाला करून दिला आहे. किंबहुना यामुळेच सुधारणेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन क्रांतिकारक, सुधारणावादी, तर्कनिष्ठ आणि विशेष म्हणजे विज्ञाननिष्ठ असा आजही होऊ शकतो, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पन्नास वर्षांपूर्वीच स्वीकारला होता, अंगीकारला होता, समजवला होता. मात्र दुर्दैवाने आजही भारतातील हिंदुंसह अनेक धर्मीय; हे सावरकरांनी सांगितलेला ‘खरा सनातन धर्म’ स्वीकारण्यास नव्हे तर समजण्याच्याही निकषावर उतरलेले नाहीत. भले त्यांनी सावरकरांचा ‘हिंदुत्त्व’ हा शब्द जरी उच्चारला असला तरी त्याची लय मात्र पुरती घालवलेली आहे.
या निबंधात सनातनी आणि सुधारक याची व्य़ाख्याच प्रथम त्यांनी विश्लेषणाने सांगितली आहे. ते म्हणतात.... ज्या अर्थी आज ते शब्द योजले जातात ते अर्थ इतके विविध, विसंगत व परस्परविरुद्धही असतात की, ते आहेत तसेच स्वीकारणे अगदी अयुक्त व्हावे. श्रुति-स्मृतीपासून तो शनिमाहात्म्यापर्यंतच्या साऱ्या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषेयत्वापासून तो वांग्याच्या अभक्ष्यत्वापर्यंतचे सारे सिद्धान्त सनातन धर्म या एकाच पदवीस पोचलेले आहेत. उपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेक नये, कोवळ्या उन्हात बसू नये, लोखंडाचा विक्रय करणाऱ्यांचे अन्न कदापि खाऊ नये, रोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमाणे असून सावकारी करणाऱ्या, व्याजबट्टा घेणाऱ्या गृहस्थाचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेवू नये (मनु. ४- २२०); गोरसाचा खरवस, तांदुळाची खीर, वडे, घारगे खाणे निषिद्ध असून लसूण, कांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेद्द्विजः । मनु ५ - १९); परंतु श्राद्धानिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी एकवीस जन्म पशुयोनी पावतो. (मनु ५-३५) नियुक्तस्तु यथान्यायं यो मांस नात्ति मानवः । स प्रेत्य पशुतां याति संभवानेकविंशतिम! !' हे सारे सनातन धर्मच...
अशी माहिती देत सावरकर यामधील विविध विसंगती विरोधाभासही कसा आहे ते सांगतात. ते म्हणतात.... ह्या अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणाऱ्या विधिनिषेधांस आणि सिद्धान्तांस सनातन धर्म हाच शब्द लुंगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या साया स्मृतिपुराणांतील सनातन धर्मग्रंथांतूनच ही परंपरा पाडलेली आहे. वरील प्रकारच्या सान्या मोठ्या, धाकटया, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते की, 'एष धर्मस्सनातनः ! '
केवळ भारतातील या सनातनी धर्माचाच नव्हे तर अन्य जगभरातील स्थितीबद्दल ते भाष्य करतात. ते म्हणतात की.... आपल्या धर्मग्रंथांतच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून साऱ्या अपौरुषेय म्हणविणाऱ्या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांची तीच स्थिती आहे. हजारो वर्षापूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोर्मन पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्या बसण्यापासून, दाढी-मिश्या शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या साऱ्या विधानांवर ‘एष धर्मस्सनातनः' हीच राजमुद्रा आणि तीही देवांच्या नावाने ठोकलेली आहे! हे सारे विधिनिषेध देवाने साऱ्या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत ! सर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि वैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच ! लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरश: ह्या साऱ्या अपौरुषेय, ईश्वरी धर्मग्रंथांत एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहे ! आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच ! सकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्य मात्राचा सनातन धर्मच ! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली नि महंमदाला ही दुसरी दिली ! देवाची अगाध लीला; दुसरे काय !
सनातन धर्माबाबत अर्थ शोधाच्या संबंधात ते म्हणतात की... प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियम. कोणत्याही वस्तूच्या अस्ति त्वाचे नि व्यवहाराचे जो धारण, नियमन करतो तो त्या वस्तूचा धर्म. सृष्टीचे धर्म, पाण्याचे धर्म, अग्नीचे धर्म प्रभृती त्यांचे उपयोग ह्या व्यापक अर्थाच होतात. ... ह्याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थाच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागले. मग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत! स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, जीव, जगत यांचे परस्परसंबंध ह्या साऱ्यांचा समावेश धर्म या शब्दातच केला गेला. इतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागाच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झाला. आज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतो, की या अर्थी धर्म म्हणजे रिलिजन' मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास उपकारक ठरतीलसे वाटले, त्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासले, तेही धर्मच मानण्यात आले. इंग्लिशमध्ये मोसेस, अब्राहाम, महंमद प्रभृती पैगंबराच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या साऱ्या कर्मकांडास ‘लॉ’ असेच म्हटले आहे. या अर्थी धर्म म्हणजे आचार....
सनातन धर्म ह्याचा आम्ही निश्चित केलेला अर्थ म्हणजे शाश्वत नियम, अपरिवर्तनीय, जे बदलू नयेत इतकेच नव्हे तर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतील, नियम असतील, त्यांसच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईल. हे लक्षण धर्माचा जो पहिला विभाग पाडलेला आहे त्या सृष्टिनियमांस तंतोतंत लागू पडते. प्रत्यक्ष अनुमान आणि त्यांना सर्वस्वी विरुद्ध न जाणारे आप्त वाक्य या प्रमाणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणारे आणि ज्याविषयी कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या त्या कार्यकारणभावाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरू शकतात असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यास त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो,.... असे स्पष्टपणे सावरकर सांगतात इतकेच नव्हे तर या सदर्भात जगातील विविध धर्म, त्यांचे धर्मग्रंथ यातील उदाहरणे देत, त्यामधील संगती आणि विसंगतीही स्पष्ट करीत इतिहासात भारतात झालेली विविध आक्रमणे स्पष्ट करीत त्यात हिंदुंना मिळालेले यशापयश यांचाही ताळमेल ते घेतात. त्यानंतर या सनातन धर्मासंबंधा जे तात्पर्य सांगतात ते अतिशय महत्त्वाचे आहे. या तात्पर्यात ते म्हणतात की.... जे सृष्टिनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होत. .... पारलौकिक वस्तुस्थितीचे असे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणांस मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोगावस्थेत आहेसे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. त्या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ती सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत. त्यांच्या क्लृप्ती प्रमाणहीन असल्याने त्यांस सनातन धर्म, शाश्वत सत्य असे म्हणता येत नाही. ..... मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रीती, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत. 'परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणेच शक्य नाही, इष्ट नाही. महाभारता मध्ये म्हटले आहे तेच ठीक की, 'अतः प्रत्यक्षमार्गेण व्यवहारविधिं नयेत ।'
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे सारे दृष्टिकोन लक्षात घेतले, त्यातील परखडपणा लक्षात घेतला,. त्यातील त्यांची विज्ञाननिष्ठता पाहिली तर रत्नागिरीतील त्यांचे एकंदर हिंदुधर्मसुधारणेमधील कार्य केवळ धर्म सुधारणेचे नव्हे तर समाजसुधारणेचे, समाजातील व्यक्ती व्यक्तीमधील बुद्धि जागृत करून त्यांना विचारप्रवण करण्याचे होते, हेच सुस्पष्टपणे लक्षात येते. ते विचाराने विज्ञानऋषीच होते. त्यांच्या मनात हिंदु धर्मातील जातिभेद नष्ट करण्याचा, चातुर्वर्ण्य व्यवस्थेला संपवण्याचा असणारा विचार हा कोणत्याही धार्मिक श्रेष्ठत्त्वाला वा वर्णव्यवस्थेमधील ब्राह्मणांना वा उच्चवर्णीयांना स्थैर्य प्राप्त करून देण्याचा नव्हताच नव्हता. मात्र त्या संबंधात ज्या कोणी त्यांच्यावर दोष लावले होते, त्यांचे ते अज्ञान वा गैरसमज म्हणावे लागतील. केवळ हिंदूच नव्हे तर अन्य धर्मांसबंधातही त्यांनी सनातन धर्माची व्याख्या स्पष्ट करीत लोकांनी तारतम्याने विचार करीत, विज्ञाननिष्ठ होत, अद्ययावत म्हणजे कालानुसार मार्गक्रमण करावे, हेच त्यांचे सांगणे होते. त्यांच्या विचारांचे हे बीज लक्षात घेतले तरच त्यांच्या कार्याची महती समजू शकेल, मात्र त्यासाठी डोळ्यावर बांधलेली विविध स्वार्थी, राजकारणी, गटातटाची झापडे दूर करायला हवीत.
०००००००००००००००००००००००००००००००
गायीचे भाबडेपण हिंदु कधी सोडणार? - १३
०००००००००००००००००००००००००००००००
गोमूत्र पिणे नि शेण खाणे हे पुण्य कसे ठरेल? आत्मशुद्धीचा संस्कार म्हणून, पवित्र म्हणून, जे पंचगव्य प्यायले जाते त्याचे समर्थन कसे होईल ! खरी गोष्ट मुळातच ही आहे की, ज्या भाबड्या प्रवृत्तीमुळे गायीसारख्या एका धादांत पशूंची एक देवता बनविली त्याच धर्मभोळ्या भाबडेपणाने तिचे गोखूर दाराशी काढणे शुभ मानणे, तिची शेपटी डोळ्यांवरून फिरविणे कल्याणकारक मानणे, तिला पूजणे धर्म मानणे आणि शेवटी वेडेचाराचा कळस होऊन तिचे शेण नि गोमूत्रही पवित्र ठरविणे, ते खाल्ल्याने नि प्याल्याने आत्मशुद्धी होते, पापक्षालन होते, अिहपरलोकी पुण्य लागते, इतका भाबडेपणा अतिरेकास गेला! आपल्या थोर हिंदू संस्कृतीचे विडंबन जर कोणी करीत असेल तर ह्या आपल्या असल्या पुण्य म्हणून शेण खाणाऱ्या नि गोमूत्र पिणाऱ्या भाबड्या चाली होत.
धर्म, देव, ईश्वर या संबंधातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दृष्टिकोन त्यांची भूमिका लक्षात आली की, त्यांचे प्रखर सुधारकी व्यक्तिमत्त्व लक्षात येते. धर्म, देव, ईश्वर या तीन घटकांबद्दल त्यांनी जे काही सांगितले आहे, त्यामागे समाज, माणूस हा अद्ययावत व्हावा, नवकालाला सामोरे जाताना त्याला अडचणी येऊ नयेत. त्यातही हिंदु समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी सनातन्यांवर केलेली टीका, वेदादी ग्रंथाबद्दल आदर बाळगा पण तपोथिनिष्ठ न राहाता विज्ञाननिष्ठ व्हा हेच त्यांचे सतत सांगणे हिंदु समाजाला होते. केवळ हिंदुच नव्हेत तर भारतातील मुसलमानांबद्दलही जोरदार टीका करताना त्यांच्या धर्मवेडेवर त्यांनी गांभीर्याने प्रखर टीका केली. त्यांच्या पोथिनिष्ठतेबद्दलही त्यांना प्रचंड राग होता, तो याचसाठी कारण त्यामुळेच मुस्लीम समाजातील लोक त्यातील रुढी रिवाजांच्या आहारी गेले आणि साहजिकच हिंदुंवर अत्याचार करताना त्यांना त्या धार्मिक पोथीवादानेच अधिक आक्रमक करीत वेडे बनवले. या अनुषंगाने सावरकरांनी साततत्याने सप्रमाण ती बाब दाखवून दिली. हिंदु कोण हे स्पष्ट करताना आणि हिंदुत्त्व काय ते सांगतानाही त्यांची भूमिका ही याच प्रखर विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ अशीच होती. पण त्यांची भूमिका हिंदुंना समजून घेता आली नाही, तेथे अन्य समाजाची काय कथा?
राजकारण आणि मुस्लिमांसंबंधातील त्यांच्या लेखांचा- निबंधाचा आढावा घेण्यापूर्वी त्यांच्या सुधारकी सामाजिक दृष्टीवर प्रथम नजर टाकू. खरे म्हणजे त्यातूनही सावरकर बऱ्याच अंशी समजण्यास मदत होऊ शकेल. सैनिकीकरण, विज्ञान, यंतत्रयुग, औद्योगिकीकरण, जातिभेद, हिंदुंमधील सात बंद्या, गाय उपयुक्त पशू, संस्कृतीरक्षणाचा अर्थ, यज्ञसंस्था अशा विविध विषयांसंबंधात त्यांनी लिहिलेल्या विचारांमुळे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि व्यवहाराला, अद्ययावत होण्यासाठी सामोरे जाणारे व्यक्तिमत्त्व स्पष्ट होत जाते. खरे त्यांच्या या संबंधातील भूमिका या आजही किती भेदक आहेत, ते दिसून येते.
गायीवर त्यांनी लिहिलेला ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे’ हा निबंध आजही हिंदु समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा आहे. अर्थात त्यांच्या मताच्या आधारावर दुर्दैवाने काही लोक राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळा अर्थही काढत आहेत, यातच आजच्या राजकीय व्यक्ती, संघटना आणि विचार यांची पात्रता समजू शकते. त्यांचे हिंदु समाजासंबंधातील तथाकथित प्रेम आणि राजकारणही कळू शकते. त्यामुळेच त्या निबंधामधील काही विचार लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातून आजच्या राजकीय व्यक्तींची, पक्षांची दिशा आणि दशा लक्षात येऊ शकेल.
सावरकर म्हणतात... गाय हा पशू हिंदूस्थानसारख्या कृषिप्रधान देशाला अत्यंत अपयुक्त असल्यामुळे अगदी वैदिक काळापासून आपणा हिंदू लोकांस तो आवडता असावा हे साहजिकच आहे. गायीसारखा वत्सल, माणसाळू, बापडा, सुरेख, दुधाळ पशू कोणास आवडणार नाही? आईच्या दुधाखालोखाल जिचे दूध आपल्या देशात तरी मुलास मानवते. मृगयाशील युग ओलांडण्याअितका सुधारताच त्या प्राचीन काळापासून मनुष्याची जी गाय आज युगानुयुगे अत्यंत प्रामाणिक सोबतीण झालेली आहे आणि शेतीचे खालोखाल जिच्या दूधदहीलोणीतुपावर मनुष्याचा पिंड आजही पोसला जात आहे, त्या अत्युपयुक्त पशूचे आम्हा मनुष्यास एखाद्या कुटुंबीयाइतके ममत्व वाटावे हे अगदी माणुसकीस घरूनच आहे. अशा त्या गाईचे रक्षण करणे, पालन करणे, हे आपले वैयक्तिक नि कौटुंबिकच नव्हे, तर आपल्या हिंदुस्थानपुरते तरी एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे. ....
.... इतकेच नव्हे, तर जो प्राणी आपणांस इतका उपयुक्त आहे त्याविषयी मनात एक प्रकारची कृतज्ञ भावनाही उपजणे विशेषतः आपणा हिंदूंच्या भूतदयाशील स्वभावास, अगदी साजेसे आहे. आपणांस गाय ही अपयुक्त आहे म्हणून प्रिय वाटते ही गोष्ट इतकी निर्विवाद आहे की, जे गोभक्त तिला कृतज्ञतेच्या भरात देवी मानून तिला पूजतात, त्यास देखील ती पूजा योग्य आहे का, असे विचारताच, ते त्या पूजेच्या समर्थनार्थ गाय ही देवता ते आहे. इतकेच कारण सांगण्याच्या आधी चटकन ती गाय आपणास किती उपयुक्त आहे, हे सांगू लागतात. तिच्या दुधापासून तो शेणापर्यंतच्या सर्व पदार्थांचे मनुष्यास किती भिन्न भिन्न प्रकारचे ऐहिक अपयोग होतात, याचाच यथाप्रमाण वा अतिप्रमाण पाढा वाचू लागतात. अर्थातच, जे त्या गायीला देवता मानतात, ते देखील ती गाय मनुष्यास इहलोकी सुद्धा अपयुक्त आहे म्हणूनच देवता होय. मनुष्यास ती गाय सिंहासारखी जर या जगात खाधू लागती, दूध देऊन पोषणाच्या ठायी सापासारखेच विष दंशून ठार मारती, तर ती गाय आम्ही अशी देवता म्हणून मानली पूजलीच असती तरी कृतज्ञतेने नव्हे, मरीआओस पूजतो तशा त्रासिक भीतीने; हे सत्य ते गोपूजक गोभक्तदेखील कळत वा नकळत पण अपरिहार्यपणे मानून जातात. ....
स्वच्छता, तर्क आणि सर्वसामान्य नजरेतूनही ज्या अनेक बाबी दिसतात, ते लक्षात आणून देत सावरकरांनी गायीबद्दल अतिशय स्पष्ट सांगितले. इतकेच नव्हे तर त्याच अनुषंगाने माणसामाणसातील जातिभेदांची दाहकताही त्यांनी दाखवून दिली. त्यासाठी त्यांनी सांगितले की, .... गोठ्यात उभ्या उभ्या गवत कडबा खात असलेल्या, एकीकडे खाता खाताच उभ्या उभ्या दुसरीकडे मलमूत्रोत्सर्ग निःसंकोचपणे करणाऱ्या थकवा येताच रवंथ करीत त्याच मलमूत्रोत्सर्गात स्वेच्छ्या बैठक मारून बसणाऱ्या शेपटीच्या फटकाऱ्याने स्वतःच्या शेणमूत्राचा तो चिखल अंगभर अडवून घेणाऱ्या, दाते सुटून थोडा फेरफटका करण्याची संधी मिळताच अनेक समयी कोठेतरी जासून घाणीत तोंड घालणाऱ्या नि तसेच ओठ चाटीत गोठ्यात आणून बांधल्या जाणान्या त्या गायीस, शुद्ध नि निर्मळ वसने नेसलेल्या सोज्ज्वळ ब्राह्मणाने वा महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पूजावयास जावे नि तिच्या शेपटीस स्पर्शन आपले सोवळे न विटाळता अल अधिक सोज्वळले आणि तिचे ते शेण नि ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पिताना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे ते सोवळे की जे आंबेडकर महाशयांसारख्या महनीय स्वधर्म बंधूच्या श्रेष्ठ मनुष्याची सावली पडताच विटाळावे, ते ब्राह्मक्षात्र जीवन को जे तुकारामासारख्या संताच्या नुसत्या पंक्तीस बसून सत्त्वस्थ दहीभात खाल्ला असताही भ्रष्टावे! ते सोवळे नि ते ब्रह्मक्षात्र जीवन त्या गोठ्यातल्या अमंगळखाऊ गायीच्या मलमूत्रात लडबडलेल्या शेपटीस शिवता सोज्वळावे, गोमयगोमूत्र पिता निर्मळावे, पवित्रारखे!! पशु तो देव, देवासारखा माणूस तो पशू या दोन्ही रूढी धर्म निः सदाचार म्हणून अंकसमयीच अकच गौरविणाऱ्या वस्तुस्थितीतून धर्माचा छाप पडताच केवळ विसंगत मूर्खपणा, सुसंगत शहाणपणा, सच्छील पवित्रपणा वादू लागतो, मनुष्याची कशी बुद्धिहत्या होते, याचे आणखी दुसरे समर्पक उदाहरण ते कोणते द्यावे?...
इतिहासातील आक्रमणांचेही दाखले देत सावरकर सांगतात की,.... पशूला देवता मानल्याने माणुसकीसच हा जो असा कमीपणा येतो. तो नुसता तात्विक किंवा लाक्षणिकच असता तरीही या अतिरेकाचा अितका अनुष्टुप ओव्यांतून सांगत असताना स्वराष्ट्रहत्या हे त्याहूनही सहस्र पटीने महत्तर पाप आहे. प्रत्यक्ष या लोकीच त्या पापी मनुष्यास पंचवीत राहणारा महानरक आहे, हे विधान मात्र चुकूनही फारसे करीत नाहीत!! गाईला देवता मानण्याच्या यःकश्चितत एका देवलसी प्रवृत्तीचे परिणाम अितके भेसूर निः राष्ट्रहितघातक होतात हे केवळ अतिशयोक्त वर्णन आहे, असे सहजगत्या वाटणाऱ्या वाचकांनो, तुम्हाला हे ऐंकून आश्चर्य वाटेल की, गाय ही मनुष्यासाठी नसून मनुष्य हा गाईसाठी आहे ही भाबडी भावना गोपूजनाचा, गायीचे देवीकरण करून सोडण्याचा, अवश्यंभावी परिणाम आहे, हे नुसते तर्कट नसून आपल्या इतिहासात अनेक समयी तसे परिणाम प्रत्यक्षपणे पडलेले आहेत. गायीपायी हिंदू राष्ट्राच्याच पायात पारतंत्र्याची बेडी ठोकण्यासही हातभार लावण्यास ही भाबडी भावना नकळत मूर्खपणाने कचरली नाही. मुसलमानांच्या इतिहासातही हिंदूंच्या या भाबडेपणाचा उल्लेख आहे. आपल्याही इतिहासकारांनी त्या घटना उल्लेखिलेल्या आहेत.
गाय ही उपयुक्त पशू आहे, हे सांगितले तरीही उपयुक्ततेच्या दृष्टीनेही गायीचे इतके स्तोम माजवणे चुकीचे असल्याचे सावरकर सांगतात. इतकेच नव्हे तर त्यादृष्टीनेही विविध उहादरणे प्राण्यांच्या संबंधातही देतात आणि राष्ट्राच्यादृष्टीने उपयुक्त असलेल्या, संरक्षणासाठी उपयुक्त असलेल्या प्राण्यांचेही महत्त्व कथन करतात. ते सांगतात की, .... उपयुक्त पशू आहे, यास्तव त्याची देवता कल्पून आपण हे सारे वेडेचार जे गायीच्या प्रकरणी करतो तेही निव्वळ बाष्कळपणाच, मूर्खपणाच म्हणावयास नको काय? घोडा, कुत्रा, गाढव ह्या उपयुक्त पशूंत गायीत आहेत ते वांच्छनीय गुण नसले, तर त्यांच्यात जे मनुष्यास अत्यंत आवश्यक गुण आहेत ते गायीत नाहीत. देवता कल्पून त्यांस पूजले नाही म्हणून काय त्यांची जोपासना कमी होते?
ते उपयुक्त पशू आहेत, ह्यामुळेच म्हैस, घोडा, कुत्रा यांची योग्य ती जोपासना जशी होतेच आहे, तशीच गायीचीही, तिला न मानले तरीही, तिच्या अपयुक्ततेच्या बळावरच होईल हे नक्की. इतकंच नव्हे, तर तिला देवता केल्यापेक्षा अधिक उपयुक्त प्रकारे आणि पशूस आवडेल अशा पशूच्या प्रमाणातच होऊन गोपूजनामुळे होणाऱ्या राष्ट्राच्या बुद्धिहत्येचे पापही टळेल. परंतु गोपालनाच्या इतके कर्तव्य नसून गोपूजन हा हिंदूंचा ‘धर्म’ आहे, ते ऐहिकच नसून पारलौकिक ‘पुण्य' आहे, ते अशा भाबड्या भावनेपायी आम्ही गायीस देखील नकोसे व्हावे असे तिचे कोण स्तोम माजवून ठेवले आहे पहा!....
गायीच्या पालनाबद्दलही जोरदार वाभाडेच सावरकरांनी काढले आहेत त्यामुळे गोपालनाच्या महत्त्वाबद्दल त्यांनी नवा दृष्टिकोनही ठेवला आहे. ते म्हणतात की.... गंगेस महापुरात साड्याचोळ्या आम्ही वहातोच की नाही! पण पोथीत तेवढे गळल्यामुळे देवब्राह्मणांसारखे ते वाढलेले केळीचे पान आम्ही गोमातेस पण गोठ्यातच नेअन नैवेद्य अर्पितो! पण तिला काही त्याची जाणीव? छट्, तिच्या पशुधर्माचा तो अक अपमानच वाटून की काय न जाणो-ती गाय प्रथम खीर, मग हळूच तूप ओतून वरणभात कालवून पान हलून न देता देवतेसारखी अनुक्रमे जेवायच्या ठायी, जिकडून लग्गा लागेल तिकडून जी जिभेचा लफ्फा मारते ती मीठ, खीर, भेंड्याची भाजी, वडा, कोशिंबीर, लाडू, वरण, सारे लपालप सापडेल तसे मचमचीत त्या साऱ्या सोज्वळ पदार्थांचे तिला हवे ते ओखटवाणी करून सोडते. केव्हा केव्हा तर भाताची मूद फोडून कालविण्याच्या आधीच ते हिरवेगार केळीचे पान पाहूनच तिच्या तोंडास अधिक लाळ सुटल्यामुळे पानच जिभेने अलटून ओरबाडून खाऊ लागते. पक्वान्न, आमटी, तूप सारे भुअीवर तिच्यापुढच्या शेणसड्यात सांडते! ... यापेक्षा सुग्रास मनुष्ययोग्य अन्न मनुष्यास तेवढे देअन पशूस प्रिय नि पशुयोग्य ते पंगतीतील अष्टे खरकटे, शिळेपाके तेवढेच ओखटवाणी घमेल्यात गायीपुढे ठेवून तिला जिभेचे लपके यथेच्छ मारू देण्यात तिलाही बरे, नि व्यर्थ जाणारे अष्टे कारणी लागल्याने मनुष्यासही बरे होईल, नव्हे काय? पशूइतकीच नि पशूसारखीच जोपासना केल्याने गोपालन अधिक चांगले कसे होते त्याचे हे एक उदाहरण पुरे आहे.
अमेरिकेत गोपालनासाठी घेण्यात येणाऱ्या दक्षतेचे आणि वैज्ञानिक प्रयोगांचेही ते उदाहरण देतात. तेथील राने, गोचीड अंगावर नसणाऱ्या गायी आदींचेही ते योग्यवर्णन करीत महत्त्व पटवून देतात. यामुळेच गोसंरक्षक संस्थांना त्यावेळीही त्यांनी कानमंत्र दिला होता, हे दिसते. त्यांची एकूणच गायी संबंधातील ही दृष्टी किती विज्ञाननिष्ठ आणि दूरगामी परिणाम पाहाणी होती, तेच यावरून दिसते. समाजाने डोळस व्हावे हे महत्त्वाचे हेच त्यांना सांगायचे होते. जे धर्मातील पोथ्यांनी नीट सांगितलेले नाही, असे ते तत्कालीन व्यवहारातील संगतीतून दाखवून देतात. ते म्हणतात... गायीस एक वेळ गोमाता म्हणा, लाक्षणिक अर्थी ते क्षणभर चालेल; पण ते अक्षरशः खरे मानणे, नव्हे; त्याहीपुढे जाऊन गायीचे देखील जे पदार्थ असेव्य मानायचे ते देखील गायीचे सेव्य मानून, पावन मानून, तिचे शेण नि गोमूत्र समारंभपूर्वक प्यायचे हा का आचार की अत्याचार !
गोमूत्र पिणे नि शेण खाणे हे पुण्य कसे ठरेल? आत्मशुद्धीचा संस्कार म्हणून, पवित्र म्हणून, जे पंचगव्य प्यायले जाते त्याचे समर्थन कसे होईल ! खरी गोष्ट मुळातच ही आहे की, ज्या भाबड्या प्रवृत्तीमुळे गायीसारख्या एका धादांत पशूंची एक देवता बनविली त्याच धर्मभोळ्या भाबडेपणाने तिचे गोखूर दाराशी काढणे शुभ मानणे, तिची शेपटी डोळ्यांवरून फिरविणे कल्याणकारक मानणे, तिला पूजणे धर्म मानणे आणि शेवटी वेडेचाराचा कळस होऊन तिचे शेण नि गोमूत्रही पवित्र ठरविणे, ते खाल्ल्याने नि प्याल्याने आत्मशुद्धी होते, पापक्षालन होते, अिहपरलोकी पुण्य लागते, इतका भाबडेपणा अतिरेकास गेला! आपल्या थोर हिंदू संस्कृतीचे विडंबन जर कोणी करीत असेल तर ह्या आपल्या असल्या पुण्य म्हणून शेण खाणाऱ्या नि गोमूत्र पिणाऱ्या भाबड्या चाली होत. ह्या पोथीनिष्ठा, मूर्खपणाचा निषेध आमच्या सनातनी बंधूंनी ते विडंबन नको असल्यास करावा; तो मूर्खपणा आहे असे आपल्या लोकांस समजून सांगणाऱ्या आमच्या लेखाचा नव्हे! सावरकरांना हा लेख- निबंध लिहिताने हे सांगावे लागले इतका त्यावेळचा हिंदु समाज हा पोथिनिष्ठ होता असे म्हणूून आज टीका करून विषय सोडून देण्यासारखा नक्कीच नाही, याचे कारण आजही सावरकरांच्या या दृष्टिकोनाला बाजूला सारून उजव्या पोथिनिष्ठांनी धर्मावडंबर माजवलेच आहे. त्यांच्या या धर्मावडंबरावर डावे पोथिनिष्ठ मात्र गोमूत्राचा- शेणाचा मारा हिंदु समाजावर करीत राजकारण साध्य करीत आहेत. ही स्थिती सुधारून सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेला विज्ञानवादी दृष्टिकोन हिंदु समाज आणि उजवे-डावे विचारसरणीचे हिंदूही स्वीकारतील तेव्हाच खर्या अर्थाने आजच्या नववर्षाचे स्वागत केल्यासारखे ठरेल इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
००००००००००००००००००००००००००००००००
आपण सनातनी, अर्धसनातनी की अद्यतनी? - १४
००००००००००००००००००००००००००००००००
सुधारणांविषयी विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी भूमिकेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निंबंध, लेख, भाषणे यामधून मांडलेली भूमिका ही मुद्देसूद पद्धतीने मांडली होती. त्यामधील एखादा विशिष्ट भाग सारांश पद्धतीने मांडायचा तरीही ते सोपे काम नाही, साखळीबद्ध अशी त्यांची ती मांडणी असल्यामुळे अनेकदा त्यांचे लेख, निबंध हे आकाराने मोठे असतात. किंबहुना यामुळेच ते संपूर्ण वाचणे उपयुक्त ठरते. तरीही प्रयत्नपूर्वक काही बाबी छोट्या छोट्या वाक्यांमध्ये देण्याचा प्रयत्न आता करणार आहे. याचे कारण त्यांनी मांडलेल्या विविध बाजू, विशिष्ट मुद्दे, घटक यांचे विश्लेषण करणे विचारी वाचकांनाही सोपे जाईल. सावरकरांच्या त्या त्या वाक्यामधून नेमके त्यांना काय सांगावयाचे आहे, त्याचा विचार आता लोकांनीही गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
आजच्या सामाजिक क्रांतीचे सूत्र या निबंधामधून कट्टर सनातनी, अर्ध सनातनी, पंडित सातवळेकरांचे आक्षेप आणि त्याला दिलेले उत्तर इत्यादी मुद्दे मांडत त्यांनी हा निबंध अतिशय आशयपूर्ण आणि परखड विचाराने सादर केला आहे. त्यांनी केलेल्या मीमांसेत ते म्हणतात .... कट्टर सनातनी वर्ग आहे तो कोणतीही गोष्ट उपयुक्त आहे की नाही, त्यापेक्षा ती श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे की नाही, हा विचारणारा आहे. त्यांच्या मते श्रुतिस्मृति पुराणोक्त असेल तर तो धर्म आणि नसेल तो अधर्म. त्याचप्रमाणे दुसरे गृहितक असे की आज ज्य रुढी धर्म म्हणून बहुत काळ मांडलेल्या आहेत, त्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त असल्याच पाहिजेत. कारण जे श्रुतीत तेच स्मृतिपुराणा शिष्टाचारात असणार कारण श्रुतिस्मृति पुराणे नि शिष्टाचार यात संपूर्णत: एकवाक्यताच आहे. प्रत्यक्ष अनुभवत या रुढी अत्यंत हानिकारक ठरत आहेत, हे सिद्ध करणाऱ्यास ते चक्क सांगतात की, तरीही शास्त्रात तसे आहे म्हणून ती रुढी आचरली पाहिजे, ...
अशा प्रकारे सावरकरांनी या कट्टर सनातनी वर्गाची स्थिती- मानसिकता स्पष्ट करीत त्यांच्या विचारांचे, वर्तनाचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. त्यामुळेच सनातनींबद्दल व त्यांच्या रुढींबद्दल सनातनी काय म्हणतात, कसा विचार करतात, ते सांगताना सावरकर म्हणतात की.... आज आहे त्या श्रुतित न सापडली तर आज नाहीत त्या श्रृतित त्या असल्याच पाहिजेत. श्रुतित आहे म्हणून आजही रुढी धर्म्य आहे. इतकेच म्हणून हा धर्म थांबत नाही तर याही पुढे जाऊन तो म्हणतो- आज बहुत काळ ती धर्म्य म्हणून ज्या अर्थी आचरली जात आहेस रुढ आहे त्या अर्थी ती श्रुतीत असलीच पाहिजे... बालविवाह, पुनर्विवाहनिषेध, जन्मजात जातिभेद, जातिभेदातील पोटभेद, अस्पृश्यता, रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी, परदेशगमन निषेध आदी आज हानिकारक ठरत असणाऱ्या रुढींपासून तो बाळंतपूजेतील कातरीच्या पूजेपर्यंत नि प्रेतयात्रेतील तिरडीपासून ते भाड्याने आणलेल्या माणसांच्या उर पिटून रडण्यापर्यंत धर्म म्हमून आज मानल्या जाणाऱ्या सर्व संस्कारांचे नि रुढींचे हा वर्ग समर्थन करतो. आणि ते उपयुक्त वा अनुपयुक्त आहे हा मुख्य प्रश्न न विचारू देता ते संस्कार श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहेत, म्हणून धर्म्य असलेच पाहिजेत, या मुख्य नि एकमेव आधाराने! यालाच ते शास्त्राधार म्हणतात आणि यालाच आम्ही आमच्या राष्ट्राची श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्ती म्हणतो....
सावरकरांनी केलेली ही मीमांसा वाचून त्यांचा दृष्टिकोन तर स्पष्ट होतोच. पण हे इथेच थांबत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आजही प्रत्येकाने यावर आजच्याच सामाजिक, राजकीय, धार्मिक वर्तनांबद्दल आणि विचारप्रणालींबद्दल गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना यावरून समाजानेही आपण आता नेमके कोणत्या स्तरात आहोत, कोणत्या स्तरात असायला हवे, कसे वागायला हवे, काय वर्तन करायला हवे, विविध नेत्यांकडून काय अपेक्षा हव्यात याबदद्ल प्रश्न विचारले पाहिजेत. यातून विद्यमान समाजाने आपण सावरकरांच्या व्याख्येतील समाजात जगत आहोत का, याचाही विचार करून अद्ययावत व्हावयाचे असल्यास आपण पात्र आहोत की अपात्र ते ठरवायला हवे.
अर्धसनातनी वर्गावरही सावरकर टीकेचे फटकारे मारतात. ते म्हणतात की, प्रत्यक्षनिष्ठ, विज्ञानवादी नि अद्ययावत सुधारकांवरील आक्षेपकांपैकी दुसरा वर्ग अर्धसनातन्यांचा होय. आजच्या प्रगत जगाशी टक्कर देशून आपल्या हिन्दुराष्ट्रास असेल, तर धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या वरील अनेक हानिकारक केल्याच पाहिजेत हे या वर्गास पटलेले असते. आजच्या जगाच्या प्रगतीचे त्याला बरेच ज्ञानही असते आणि आजच्या नव्यातील नव्या आपले राष्ट्रसज्ज असावे अशी त्यास अिच्छाही असते, पण ती श्रेष्ठ त्या शब्दनिष्ठ श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्तीचा सर्वस्वी त्याग केल्यावाचून, अवलंब केल्यावाचून, अद्ययावत 'अप-टू-डेट' अशा वैज्ञानिक प्रवृत्तीचा अवलंब केल्यावाचून अशक्य आहे हे मानण्याचे धाडस वा समजण्याचा विवेक त्यांच्यात पूर्णपणे बाणलेला नसतो. बुद्धी निः श्रद्धा, रूढिप्रियता आणि सुधारणा, जुने संस्कार नि नवे संस्कार यांचा सुसंगत समन्वय त्यांच्या मनात ठसलेला नसल्यामुळे ते धड अद्ययावत प्रवृतीचेही नसतात नि धड श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्तीचेही नसतात. श्रुतीपासून शनिमाहात्म्यापर्यंतचे सारे ग्रंथ एकवाक्यतेने एकच धर्म सांगतात, सारखेच प्रमाण आहेत, हे निव्वळ थोतांड आहे हे कळवण्याइतकी त्यांची बुद्धी जागलेली असते. या कोणत्यातरी ग्रंथास अनुल्लंघ्य प्रमाण धर्मग्रंथ, शास्त्र म्हणून मानल्यावाचून कोणतातरी शास्त्राधार घेतल्यावाचून, त्यांच्या बुद्धीत केवळ स्वतःच्या बळावर त्या रूढीच्या वाटेस जावयाची धमक नसते.
अर्थात या दुसऱ्या प्रकारच्या अर्धसनातनींबद्दल सावरकरांना थोडीफार तरी अपेक्षा आहे. एकंदर सावरकरांनी आपल्या मूळ निबंधासंबंधातील आक्षेपांना दिलेली उत्तरे ही अतिशय चोख असून पंडित सातवळेकरांना ते अर्धसनातनींमध्ये मांडतात. त्यावरून त्यांनी त्यांच्या विविध आक्षेपांसबंधात दिलेली उत्तरे, तर्क हे वाचनीय आणि विचारनीय आहेत.
त्यांची अन्य काही उदाहरणेही तितकीच प्रभावी ठरतात. यज्ञसंस्थेवरही त्यांनी त्यावेळी केलेली खणखणीत टीका आजही अनेकदा लक्षात घेण्यासारखी आहे. ते म्हणतात... ज्या हिंदुस्थानात सहस्रावधी वर्षे शतावधी यज्ञांतून नि अग्निहोत्रातून प्रत्यही खंडोगणती तूप जाळले जात आले आहे ती नि काही प्रमाणात तरी आजही जळत आहे ती 'यज्ञीय' आर्यभूमी हिवताप, महामारी, प्लेग, देवीप्रभृती झाडून साऱ्या रोगांच्या प्रात्यक्षिक अभ्यासासाठी राखून ठेवलेले जगातील पहिल्या प्रतीचे संग्रहालय बनलेली आहे आणि यज्ञात पळीभरदेखील तूप गेल्या हजारो वर्षांत न जाळणाऱ्या त्या यज्ञद्वेष्ट्या अनार्य युरोप-अमेरिकादि राष्ट्रांत आरोग्य नि आयुर्मान अतुलनीय उत्कर्ष पावत आहे हे काय यज्ञात तूप जाळणे हे आरोग्याचे अत्युत्कृष्ट अपरिहार्य नि दिव्य साधन आहे असे सिद्ध करते? बहिरोबापुढे बोकड मारले असता प्लेग हटतो, 'बाया' नाचविल्याने देवी हटतात, भडाभडा भाताचे बळी, मातंगीची पूजा करून तिला नाचवीत मिरवीत अर्पिले असता महामारी हटते आणि या जटिल कर्मकांडाच्या यज्ञीय भारुडात तूप ओतल्याने राष्ट्र निरोगी होते; मुक्त होते हे म्हणणे वैदिक असले तरी वैज्ञानिक दृष्टीने आज सारखेच हास्यास्पद ठरणारे आहे! ....
यज्ञसंस्थेवर टीका करताना प्राचीन काळाला हसण्याचे तितके कारण नाही, त्यावेळी असलेल्या मानवी ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मानाने या यज्ञासारख्या साधनांनी मोक्ष मिळतो, देवता ऐकतात हे वितचार तेव्हा पटत होते. त्या काळात या यज्ञसंस्थांनी राष्ट्राच्या एकीकरणाला हातभारच लावला होता, असे सावरकर सांगतात. म्हणजेच काळाच्यादृष्टीने विचार करण्यासाठी समाजाला जागृत करण्याचे आणि पर्यायाने धर्माधिष्ठित समाजाला जागे करण्याचे काम त्यांनी केले हे देशासाठी केलेले अतिशय मोलाचे कामच म्हणावे लागते. कारण विचारमंथन समाजाने करावे ही त्यांची असणारी यामागची धारणा सर्वात महत्त्वाची होती. यामुळेच सावरकरांचे द्रष्टेपण हे तात्कालिकही नसून ते विज्ञानवादी आणि बुद्धिवादी होते, बदल स्वीकारणारे होते हेच स्पष्ट होते. यावरून आजच्या काळात लोकांनी काय स्वीकारावे हे लोकांनाच ठरवायचे आहे. सावरकरांचा हा हिंदुधर्म भूमिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी आणि कालातीतच ठरू शकतो तो यामुळेच. अर्थात त्यांच्या मार्गावरून चालण्यासाठी भावनिक नव्हे तर मनाची आणि बुद्धीचीही तयारी हवी. तूर्तास इतकेच!
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
स्वातंत्र्यवीर सावरकर .... भारतातील आधुनिक बुद्धिवादाचे जनक - १५
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
बुद्धिवाद समाजामध्ये रुजविणे सोपे काम नाही. अतिशय कडवट अशा अंधश्रद्धेपासून सुरुवात केल्यानंतर बुद्धिवादाप्रत समाजाला नेणे हे सोपे नाही, ते दीर्घ आणि क्लीष्ट काम आहे. हे समाज सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच ठावूक असते. अशा ध्येयाप्रत समाजाला नेण्यासाठी सावरकरांनी मांडलेली सूत्रे, धोरणे, केलेली घणाघाती टीका, धर्ममार्तंडांकडून होत असलेली मानहानी, अशा सर्व बाबी सोसून सावरकरांनी चक्क हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्यालाही आव्हान दिले. हिंदुत्त्व हे पुस्तक लिहीत त्यांनी हिंदुत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. हिंदुत्वाला एक नवे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तो कितींना उमजला, कितींनी स्वीकारला ते त्या काळातील समाजबुद्धीनुसार पाहिले तरी चांगला परिणाम त्यांनी साध्य केला होता, असे विद्यमान काळाच्या तुलनेतही म्हणता येईल. मात्र आजच्या विद्यमान काळात त्यांच्या हिंदुत्त्वाचा अर्थच काहींनी बदलून बुद्धिहीन, तत्त्वहीन आणि तर्कहीन हिंदुत्त्व स्वीकारले आहे.
अनेकांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नेमक्या व्यक्तिमत्त्वाविषयीच शंका येते. विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी अशा तीन दृष्टिकोनातून सावरकरांकडे पाहिले जाते. वास्तविक या तीनही घटकांचा एक समन्वय साधून त्यांचे राष्ट्रसुधारकाचे, मानवी समाज सुधारणेचे आणि हिंदु समाजाला स्वभूमिनिष्ठ करण्याचे तंत्र सांगणारे व्यक्तिमत्त्व घडले आहे, हे व्यक्तिमत्त्व विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी असे समन्वय साधलेले भविष्यसूचक, क्रांतिकारक आहे. खरे म्हणजे त्यांच्या या व्यक्तिमत्त्वासारखे व्यक्तिमत्त्व युरोपातील एखाद्या देशात निर्माण झाले असते, तर तेथील लोकांनी सावरकर हे नाव डोक्यावर धरले असते. मात्र सावरकर यांच्या द्रष्टेपणाची, समाजसुधारक बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाची किंमत भारतातील ना धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना समजली ना तथाकथित हिंदुत्त्ववाद्यांना समजली ना अल्पसंख्य असूनही मनमानी पद्धतीने राजकीय फायदे उठवीत मुस्लीमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणाऱ्या आणि ती मान्य करणाऱ्यांनाही समजली नाही, हे खरे म्हणजे अखंड भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल.
भारतामध्ये बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली, त्यांची संख्या तशी पाहावयास गेले तर कमी नाहीत. मात्र धर्म, विज्ञान, उपयुक्तता आणि मानवी समाजरचना यांची सांगड घालून संपूर्ण समाजाला अद्ययावत करू पाहाणारा नेता मात्र केवळ सावरकर व्हावेत, हे लक्षात न घेण्यासारखा करंटेपणा नाही. आजही सावरकरांवर अघटित आरोप ठेवणारे, त्यांच्या नावाचा वापर करून आपल्या धोरणाचे घोडे दामटणारे महाभाग निपजू शकतात, हे पाहाता आता सावरकरांच्या या विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्वाची किमान ओळख तरी करून घेणे गरजेचे आहे. सावरकरांपूर्वी गोपाळ गणेश आगरकरांसारख्या बुद्धिवादी व्यक्तीने आपल्या वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला मात्र तोपर्यंत त्यांनी समाजाची मानसिकता सुधारम्यासाठी केलेली धडपड, केलेले लिखाण आजही तितकेच गरजेचे आहे. हर्बर्ट स्पेन्सरसारख्या पाश्चात्य बुद्धिवादी आणि समाजशास्त्रज्ञाचा प्रभाव आगरकर आणि सावरकर या दोहोंवर असलेला दिसून येतो. त्यामुळेच विज्ञानवादी, बुद्धिवादी, हिंदुत्ववादी असलेल्या सावरकरांनी धर्मसंस्थेचा परिपूर्ण विचार करूनच आपले विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी विचार मांडून समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला. मात्र मानवी मनातून धर्मसंस्था संपणे सोपे नाही हे जसे स्पेन्सरना कळून चुकले होते, तसेच सावरकरांनाही पुरते उमजलेले होते. यामुळेच वस्तुस्थितीची जाण ठेवूनच मनात आणि व्यवहारात असणारी धर्मशक्ती सावरकरांनी अचूक ओळखली होती. बुद्धिवादाने या धर्मशक्तीला जाणले असले तरी सावरकरांनी मात्र या धर्मशक्तीला विज्ञानवादी निकष लावण्याचे आव्हान ठेवत, समाजाला नवीन कालाला सामोरे जाण्यासाठी प्रयत्शील करण्यास उद्युक्त केले. अर्थात त्यांनी त्यासाठी हिंदु धर्माच्या, संप्रदायांच्या तसेच या भारतभूमिवर जन्माला आलेल्या धर्म, तत्त्वज्ञान, गुरू, तत्त्ववेत्ते यांचाही मागोवा घेत विज्ञानवादी दृष्टीने धर्माची बैठक पक्की करण्यासाठी प्रयत्न केले गेले. इतकेच नव्हे तर हे करताना मुस्लीम धर्माचा भारतातील एकंदर वाटचालीचा आढावा घेत, त्या धर्मातील रचना, त्यांचे परधर्मासंबंधात असणारे मत, त्यांच्याकडून हिंदूधर्मीयांवर झालेले अत्याचार हे लक्षात घेत, ते स्पष्ट करीत ते दाखवून देत मुस्लीम समाजालाही पोथिनिष्ठता सोडून देण्याचा इशारा दिला.
हे सांगण्याचे कारण म्हणजे बुद्धिवाद समाजामध्ये रुजविणे सोपे काम नाही. अतिशय कडवट अशा अंधश्रद्धेपासून सुरुवात केल्यानंतर बुद्धिवादाप्रत समाजाला नेणे हे सोपे नाही, ते दीर्घ आणि क्लीष्ट काम आहे. हे समाज सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच ठावूक असते. अशा ध्येाप्रत समाजाला नेण्यासाठी सावरकरांनी मांडलेली सूत्रे, धोरणे, केलेली घणाघाती टीका, धर्ममार्तंडांकडून होत असलेली मानहानी, अशा सर्व बाबी सोसून सावरकरांनी चक्क हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्यालाही आव्हान दिले. अस्पृश्यतेच्या निवारणासाठी त्यांनी रत्नागिरीसारख्या ठिकाणाहूनही केलेली कामगिरी साऱ्या देशातही बऱ्यापैकी पोहोचली होती. पण त्याही पेक्षा कोणत्याही राजकीय पाठिंब्याविना आणि तत्कालीन समाजाच्या अतिधर्मिष्ठ रिवाजांना बाजूला करण्याचे मोठे कामही त्यांनी केले होते. ते करताना हिंदुत्त्व हे पुस्तक लिहीत त्यांनी हिंदुत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट केल्या. हिंदुत्वाला एक नवे परिमाण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तो कितींना उमजला, कितींनी स्वीकारला ते त्या काळातील समाजबुद्धीनुसार पाहिले तरी चांगला परिणाम त्यांनी साध्य केला होता, असे विद्यमान काळाच्या तुलनेतही म्हणता येईल. मात्र आजच्या विद्यमान काळात त्यांच्या हिंदुत्त्वाचा अर्थच काहींनी बदलून बुद्धिहीन, तत्त्वहीन आणि तर्कहीन हिंदुत्त्व स्वीकारले आहे. हे विद्यमान बुद्धिहीन, तत्त्वहीन आणि तर्कहीन हिंदुत्त्व ज्यावेळी बाजूला सारून हजारो वर्षांपूर्वीच्या हिंदु धर्माच्या सनातनी वा वैदिक धर्माची पोथिनिष्ठता दूर केली जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सावरकरांची बुद्विवादी, विज्ञानवादी हिंदुत्त्वाची बैठक पक्की होण्यास सुरुवात होऊ शकेल. भविष्यातील हिंदुराष्ट्र म्हणजे या विज्ञानवादी समाजाचाच पाया असेल हे जेव्हा स्पष्टपणे लोकांना कळेल तेव्हा कदाचित अहिंदुंनाही त्याच मार्गाने जावेसे वाटू शकेल. अन्यथा केवळ साक्षरांचे राज्य इतकेच भारतीय बुद्धिवादी वाटचालीचे फलित असेल.
०००००००००००००००००००००००००००००
बुद्विवाद, व्यक्तिस्वातंत्र्य आणि हिंदुत्त्व - १६
०००००००००००००००००००००००००००००
केवळ हिंदुंनीच नव्हे तर मुस्लीम समाजाचा आक्रमकतेचा इतिहास लक्षात घेऊनही त्यांनी पोथिनिष्ठता बाजूला सारून विज्ञानवादाला जवळ करून विचार करावा, असे स्वातंत्र्यवीरांनी सांगूनही भारतातील या दोन्ही समाजांनी फाळणीची बीजे स्वीकारली. त्यामुळे देश, भूमी, मन, तत्त्वज्ञान यांच्या फाळणीलाही स्वीकारावे लागले. इतकेच नव्हे तर मानवी बौद्धिक, लौकिक आणि सामाजिक विकासालाही मुकावे लागले.
बुद्धीनेच सत्यज्ञान प्राप्त होते, बुद्धी हाच ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे, असा सिद्धान्त मांडणारी विचारसरणी म्हणजे 'बुद्धिवाद' होय. जे तत्त्ववेत्ते बुद्धिवाद स्वीकारतात ते बुद्धिवादी (Rationalist) मैनले जातात. बुद्धिवाद वा पर्यायी शब्द म्हणजे विवेकवाद असा घेता येऊ शकेल. बुद्धीला 'प्रज्ञा' असा अधिक प्रौढ शब्द वापरला जातो, त्यानुसार 'प्रज्ञा' हा ज्ञानाचा मार्ग आहे, असे समजणारी विचारसरणी म्हणजे 'प्रज्ञावाद' (Rationalism), अर्थात विवेकवाद असा म्हणता येईल. साधारणपणे बुद्धिवादाच्या या व्याख्येचा विचार केला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुत्वाला नव्या युगातील तात्विकताच प्राप्त करून दिली, मात्र ती दुर्दैवाने काही काही लोकांनी, गटांनी आपल्या सोयीप्रमाणे वापरली किंवा त्यांना सावरकरांच्या या तात्विकतेचे आकलनच झाले नाही. त्यामुळेच भारतातील हिंदु आणि हिंदुत्व या संकल्पनेबद्दल आजही अनेक बाजू मांडल्या गेल्या.
हत्ती म्हणजे काय, हे जन्मांधांनी कसे सांगितले, त्याचा दृष्टांत चक्रधर स्वामींनी कथन केला. ती गोष्ट त्यांच्या शिष्याने लिहिली आहे. त्यानुसार एका गावात आलेल्या हत्तीला पाहाण्यासाठी लोक जमले. त्यावेळी तेथे जन्मापासून अंध असलेल्या व्यक्ती तेथे गेल्या असताना प्रत्येकाने हत्तीला केलेल्या स्पर्शानुसार हत्ती कसा असेल ते सांगितले. त्यामध्ये त्या जन्मांधानी स्पर्शाने हत्तीचा पाय अनुभवला त्यांना हत्ती खांबासारखा वाटला, ज्यांनी सोंडेला स्पर्श केला त्यांना मुसळासारखा वाटला हत्तीच्या कानाला स्पर्श केल्यानंतर सुपासारखा प्राणी असणारा तो हत्ती, असे एका जन्मांधाने सांगितले. तर हत्तीची पाठ ज्याच्या हाताला लागली त्याला भिंतीसारखा प्राणी वाटला तर शूपट ज्याच्या हाताने धरली त्याला तो हत्ती खराट्यासारखा लागला.... एकंदर या सर्व जन्मांध व्यक्तींमध्ये या हत्तीच्या असण्यावरून - अस्तित्त्वावरून वाद सुरू झाले तेव्हा एका डोळस व्यक्तीने समजूत काढणी आणि तुम्ही जो भाग म्हणजे हत्तीचा एक एक अवयव सांगत आहात तो हत्ती नसून ते सर्व अवयव मिळून असणारा प्राणी म्हणजे हत्ती आहे, असे सांगितले. यामध्ये डोळस असणारी व्यक्ती केवळ डोळे असणारी नाही, बुद्धी असणारीही आहे, तसेच सावरकर आहेत. त्यांनी हिंदु या शब्दाचा, संकल्पनेचा सांगितलेला अर्थ भरतखंडातील जन्मलेल्या सर्व हिंदु अवयवांना म्हणजेच विविध पंथ. गट, तत्त्ववादी, धर्म यांचे अस्तित्व आसिंधु सिंधुपर्यंत आहे. अशा या हिंदुत्वाचे स्वरूप राष्ट्रीयत्त्वाच्या निकषाने स्पष्ट केले. हे सर्व करताना पूर्वीच्या सर्व पोथिनिष्ठ विचारसरणीला बाजूला सारून विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्याने रितीरिवाज, परंपरा स्वीकारण्याचे लोकांना आवाहन केले. हे करीत असताना, प्रत्येकाने बुद्धीवादाने विचार करण्यास तयार होण्यासाठी सावरकरांनी इतिहासालाही वास्तवतेने मांडून विद्यमान हिंदुंना त्यांचे हिंदुत्त्व म्हणजे काय ते समजून घेण्यास सांगितले. ऐहिक वा व्यावहारिक, उपयुक्ततावादी जीवनशैली स्वीकारणाऱ्या समाजाला गतकालातील अंधत्वाने स्वीकारलेल्या पोथिनिष्ठतेमधून बाहेर येण्यासाठी विज्ञानवादी होण्यास ते सांगतात.
इतिहासावरील सहा सोनेरी पाने या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासाचीही समीक्षा करतात. त्यात सद्गुणविकृति असे प्रकरण लिहिले आहे. त्यात त्यांनी सद्गुणाचा वापर करताना जर त्यावेळी देशकालादीबाबींचा विचार केला गेला नाही तर तो सद्गुण नव्हे तर दुर्गुण कसा ठरतो, आपल्याच अध:पतनास कारण कसा होतो ते सांगितले आहे. माणसाच्या ठायी असलेल्या गुणावगुणाची मीमांसाच त्यांनी त्यात केलेली आहे. त्यांचा त्या सांगण्यामधील चोखपणा इतका परखड आहे तरीही आज हिंदुंनी खऱ्या हिंदुत्वाचा मागही घेतलेला नाही, असे म्हणावे लागते. मुळात सावरकरांचा हा दृष्टीकोन बुद्धिवादाच्या मुशीतूनच निर्माण झाला आहे आणि त्यासाठी विज्ञानवाद, उपयुक्ततावाद, याचाही आधार घेत ते अशा बुद्धिहीन सद्गुणाचे तुकडे करतात. त्यांची ही दृष्टी ही त्यावेळीही क्रांतिकारक होती आणि आजही ती स्वीकारली तरी क्रांतिकारक आहे, अशी स्थिती सध्याच्या हिंदुत्वाच्या आणि एकंदर विविध धर्मांच्या पोथिनिष्ठेच्या अतिरेकामुळे मानवी समाजालाच जिवंतपणे भाजणारी ठरत आहे. केवळ बाबा वाक्यंप्रमाणम वा श्रुतिस्मृतिपुराणोक्त किंवा आमचे धर्मगुरू - नेते सांगतात म्हणून ते योग्य असे मानणारे महाभाग आजही असल्यानेच स्वातंत्र्याचे ७५ वर्ष असूनही सामाजिक स्थिती तीच आहे. मग तो भारत असो वा फाळणी होऊन तुटलेला भारताचाच भाग असलेला पाकिस्तान असो. कालानुसार बदलण्याची, वागण्याची भाषा करीत अद्ययावत राहा असे सांगणे सावरकरांसारखा महापुरुषच सांगू शकतो.
स्वातंत्र्यवीरांनी हिंदुंच्या पोथिवादी आणि पारंपरिकतेने उदात्त मानलेल्या मूल्यांवर आघात केला आहे, ते स्वीकारण्यास किती हिंदुंचे मन तयार होते आणि आहे आणि राहील हाच खरा कूट प्रश्न आहे. याचे कारण बुद्धिवादामुळे प्रत्येक मनुष्याला विचार करून एखादी गोष्ट का वाईट आणि का चांगली हे ठरवावी लागते तेव्हा त्याला त्यात वेळ घालवण्यासारखे वाटते. त्यामुळे त्याच्यावर स्वनिर्णय स्वीकारल्यानंतर येणारी जबाबदारी पत्करण्यासाठी आधार लागत असतो, तो सुखासुखी त्याला हवा असतो, त्यावेळी पोथिनिष्ठ राहात, रितीरिवाज पाळत असल्याचे सांगणे त्याला सोयीचे व सोपे असते. मात्र धर्मातील ही पोथिनिष्ठा ज्या बाबींचे उदात्तीकरण करून स्पष्ट केलेली असते, किंवा ती उदात्तमूल्यावरील पोथिनिष्ठा कशी वाईट आहे, म्हणून मी ती नाकारतो, असे सांगण्यासाठी त्या त्या व्यक्तीला बुद्धिवादाला स्वीकारावे लागते, सामोरे जावे लागते. अशावेळी त्यात त्याला तसे करणे त्रासदायी होत असते. त्यासाठीच समाजाच्या या पोथिवादी भूमिकेला पुढे करणे अधिक सोपे वाटत असते. अर्थात असे असले तरीही स्वातंत्र्याचे फायदे हवे असतात. यामुळेच होते काय की सावरकरांसारख्या बुद्धिवादी वृत्तीला जोपासण्याऐवजी शॉर्टकट वा सोयीचा मार्ग सोपा असे म्हणत व्यक्तिस्वातंत्र्याला प्रगल्भ करणाऱ्या बुद्धिवादालाच समाज बाजूला करतो. याचे परिणाम ना त्याच्या धर्माची एकजूट होत, ना त्याचा व्यक्तीवाद वा व्यक्तिस्वातंत्र्य किंवा बुद्धिवाद प्रगल्भ बनत. मात्र यामुळे स्वविचारांऐवजी दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहाण्याची मानसिकता बळावते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु समाजाची हीच मानसिकता बदलण्यासाठी आणि हिंदुंना स्वविचाराने प्रगल्भ होण्यासाठी व्यक्तिवादी बुद्धिवादी बनवण्याची धडपड केली, दिशा दिली. पण लोकप्रियतेची कसलीही पर्वा न करता सुयोग्य दिग्दर्शन करणाऱ्या सावरकरांना हिंदुंनी मात्र समजून न घेता स्वत:च्या अस्तित्त्वावर, सांघिकपणाच्या अतिरेकाने तर कधी आत्यंतिक अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर भाळून तर कधी सत्ताधार्जीण्या वा सत्तापिपासूंवर अवलंबून राहण्याचा करंटेपणा केला. केवळ हिंदुंनीच नव्हे तर मुस्लीम समाजाचा आक्रमकतेचा इतिहास लक्षात घेऊनही त्यांनी पोथिनिष्ठता बाजूला सारून विज्ञानवादाला जवळ करून विचार करावा, असे स्वातंत्र्यवीरांनी सांगूनही भारतातील या दोन्ही समाजांनी फाळणीची बीजे स्वीकारली. त्यामुळे देश, भूमी, मन, तत्त्वज्ञान यांच्या फाळणीलाही स्वीकारावे लागले. इतकेच नव्हे तर मानवी बौद्धिक, लौकिक आणि सामाजिक विकासालाही मुकावे लागले. आज जो केवळ दिसत आहे तो विकत घेतलेल्या सुविधांचा विकास. पण या व्यक्तिकेंद्रीत आणि बुद्धिवाद विरहीत विकासामुळे भारतीय वंश मात्र पणालाच लागलेला आहे.
०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ००
ईषप्रणीत ग्रंथ-धर्म आणि त्यातील विसंगती दर्शवणारे दार्शनिक सावरकर! - १७ ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ०००००००००० ००
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विवेचक अशा परिच्छेदातूनच त्यांनी धर्मग्रंथ यांचे व्यवच्छेदक विश्लेषण केले आहे. किंबहुना या विषयावरील त्यांच्या निबंधांमधून, विचारांमधून सावरकर यांना अपेक्षित असणारा हिंदू हा नव्या युगाचा डोळस आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहे. केवळ हिंदूंनाच नव्हे तर मुसलमानांचे आणि विशेष करून भारतीय मुसलमानांचेही डोळे उघडावेत यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म, त्यातील पंथ, त्यातील मतमतांतरे आणि त्यातील अतार्किकता या सर्व बाबी सांगताना त्यांनी तुर्कस्तानातील मुसलमानी राजवटीने केमाल पाशाने केलेल्या बदलाची माहिती देत भारतीय मुस्लीमांनीही तो मार्ग अनुसरावा आणि नव्या काळाला सामोरे जावे, त्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी असे सविस्तरपणे आणि विवेचक पद्धतीने सांगितले आहे.
भारताला राष्ट्र हा दर्जा खऱ्या अर्थाने मिळावा, भारतीयांना राष्ट्र या संकल्पनेचा योग्य आणि अचूक अर्थ समजून नवीन काळानुसार विज्ञानिष्ठपणे भारतीयांनी वाटचाल केली पाहिजे, यावर स्वातंत्र्यवीर सावरकर अधिक संवेदनशीलपणे तसेच वास्तववादी पद्धतीने विचार करीत होते. हिंदुस्थान म्हणण्यामागे त्यांचा असणारा हिंदुराष्ट्र या संकल्पनेचा अर्थ फार वेगळा आणि सामर्थ्यशाली आहे. केवळ हिंदुंसाठी हिंदुराष्ट्र ितकाच त्याचा अर्थ नाही. यामुळेच सावरकरांनी हिंदु या शब्दाला आणि अहिंदु या संकल्पनेला दिलेला अर्थ नीटपणे समजून घ्यायची गरज आहे. भारतातील हिंदु समाजाला जागृत करायचे आहे, तो हिंदु समाज वा तो हिंदु जो स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत होता, तो एका दिवसात बदलणारा नाही, एका दिवसात तो काही विज्ञाननिष्ठ होणार नाही, याची त्यांनाही पुरेपूर कल्पना होती. मात्र एखाद्या शिक्षकाप्रमाणे, मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी हिंदुंना शिकवीत, संघटित ठेवीत आणि हिंदुंसाठी असलेल्या तार्किक आणि तात्विक हिंदुभूमीला कायम जपले आणि जपण्यास प्रवृत्त करीत त्यांनी लोकांनाही उद्युक्त केले.
धर्म या शब्दाचा अर्थ त्यांनी अतिशय अचूकपणे ओळखला होता, त्यामुळेच नव्या युगाला साजेसे जगण्यासाठी आणि त्यादृष्टीने येत असलेल्या आव्हानांनाही तोंड देण्यासाठी ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’पणा सोडण्याचा कायम आग्रह धरला. यातून त्यांनी केलेला धर्म या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. मुस्लीम धर्म, त्यातील कल्पना, नियम- रितीरिवाज, कुराण, त्यातील विविध भाग तसेच मुस्लीमांचे विविध पंथ इतकेच नव्हे तर ख्रिश्चन धर्म आणि जगातील अन्य धर्म - पंथ यांचीही माहिती देत त्यांनी चिकित्सा केली. हे सर्व करीत असताना विशेष म्हणजे सर्व धर्मांबद्दल एकाच तराजूने मापदंड करीत न्याय केला. प्रत्येक धर्म आणि त्यांचे धर्मग्रंथ याबद्दल केलेली मीमांसा, विश्लेषण हे परखडपणे करीत विज्ञानबळावर त्यांनी भर दिला. जात्युच्छेदक निबंधामध्ये त्यांनी ‘ मुसलमानांमधील पंथोपंथांचा परिचय’ या निबंधात त्यांनी म्हटले आहे की,... वेद, अवेस्ता, कुराण, बायबल हे ईश्वरप्रणीत ग्रंथ आहेत असे मानले तरी आक्षेपांची आपत्ती काही टळत नाही, हीच तर खरी अडचण आहे. कारण ईश्वरनिर्मित औपौरुषेय, ईषप्रेषित म्हणून कमीतकमी पन्नासपाऊणशे ग्रंथ आज देखील भिन्न संघातील मनुष्यांनी मानलेले आहेत, ते अत्यंत परस्परविरुद्ध विधानांनी भरलेले आहेत. फार काय प्रत्येक ग्रंथ जर काही निर्विवादपणे एकस्वर सांगत असेल तर हेच की, तो स्वत: तेवढा ईशप्रेषित परमप्रमाण असून बाकी सारे ‘पाखंड’ आहेत!...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विवेचक अशा परिच्छेदातूनच त्यांनी धर्मग्रंथ यांचे व्यवच्छेदक विश्लेषण केले आहे. किंबहुना या विषयावरील त्यांच्या निबंधांमधून, विचारांमधून सावरकर यांना अपेक्षित असणारा हिंदू हा नव्या युगाचा डोळस आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहे. केवळ हिंदूंनाच नव्हे तर मुसलमानांचे आणि विशेष करून भारतीय मुसलमानांचेही डोळे उघडावेत यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म, त्यातील पंथ, त्यातील मतमतांतरे आणि त्यातील अतार्किकता या सर्व बाबी सांगताना त्यांनी तुर्कस्तानातील मुसलमानी राजवटीने केमाल पाशाने केलेल्या बदलाची माहिती देत भारतीय मुस्लीमांनीही तो मार्ग अनुसरावा आणि नव्या काळाला सामोरे जावे, त्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी असे सविस्तरपणे आणि विवेचक पद्धतीने सांगितले आहे. इतके सांगत त्यांनी केवळ मुस्लीम धर्मातील धर्मवेडेपणावर टीका केलेली नाही तर निबंधाच्या अखेरीस अनेक बुद्धिवादी विचार मांडत मानवी हिताचा विचार मांडला आहे. हे धर्मग्रंथ हे ईश्वरप्रणीत नाहीत, तसेच त्या धर्मग्रंथांचा अर्थ वेगवेगळा काढत मांडत आपल्याला हवा तो विचार मांडला आहे. यामुळेच ते यामध्ये लिहितात की, .... हे कुराण, पुराण, वेद, अवेस्ता, बायबल टालमद प्रभृती सारे ग्रंथ मनुष्यकृत आहेत. त्या त्या परिस्थितीतील ज्ञान नि अज्ञान यांही संपृक्त पण लोकहितबुद्धीने प्रचलविलेले नि म्हणूनच आदरार्ह मानून आपण साऱ्यांनी ते अभ्यासावे; प्रत्यक्ष प्रयोगांती जे त्यांत आज अतथ्य ठरते, अहितकारक ठरते, तें त्यागावे. तथ्य नि हित ते साऱ्यांनी समाईक मानवी संपत्ती समजून स्वीकारावे हेच इष्टतर, तथ्यतर, हिततर होय. नव्हे काय?...
सावरकरांनी याद्वारे प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथांबद्दल मांडलेले हे विदारक पण तितकेच व्यवहार्य, अचूक असे मत आज तरी किती लोकांनी स्वीकारले आहे ? अजूनही धर्माबद्दलची जुनी पोथिनिष्ठ मते आम्ही उराशी बाळगून आहोत, राजकीय, सामाजिक नेते जे सांगतात, जी मते मांडतात त्याबद्दल मनात कोणतीही योग्यायोग्यता विचारात तार्किकपणे, तात्विकपणे न घेता पोटार्थी वृत्तीने आम्ही ती स्वीकारतो, हाच सावरकरी विचारांना धुडकाविण्याचा प्रकार ठरत नाही का? मुळात ज्या सावरकरांनी जी हिंदूभूमीची मर्यादा भौगोलिक स्वरूपात मांडली त्या मर्यादेतही निर्माण झालेल्या संत, पंत, तंत आणि पंथ यांच्या समूहाला हिंदू म्हणण्याचा व्यवहारी व्याख्येला सामावून घेण्याचा कितीसा प्रयत्न स्वातंत्र्यापासून आजतागायत केला गेला आहे, ते विचारात घ्यावे लागेल. केवळ आस्तिक-नास्तिक वादात जाऊन वा पोथिनिष्ठेतून काही पठण करून वा सामूहीक भोंगे वाजवून वा काढून अद्यतनी सुसंस्कृतता येणार नाही. नवनागरी समाजाला घडवण्यासाठी रस्ते रुंदीकरणातून व्यापकता येणार नाही त्यासाठी बुद्धिविस्तार होणे गरजेचे आहे. बुद्धिविस्तारासाठी स्मार्टसिटीपेक्षा, चौपदरीकरणापेक्षा वाचन, चिंतन अवलोकन आणि अध्ययनाची पक्की बैठक हवी आणि ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा विकासाचा मार्ग हा बुद्धिवादातून, विज्ञाननिष्ठेतून जाणारा आहे. त्यासाठी धर्ममतापेक्षा हिताला उपयुक्त असेल ते जगातील कोणत्याही धर्मात सापडो ते स्वीकारले पाहिजे, असे धर्मांच्या भेदांना संपवणारा परखड उपयुक्ततावादही त्यांनी मांडला आहे. सावरकरांची धर्मातीतपणाची ही वृत्ती ही किती हिंदुंना कळली, उमगली किती पुरोगामी म्हणविणाऱ्या धर्मनिरेपक्षतावाद्यांना कळली, किती अहिंदु असणाऱ्यांनी जाणली असा सवाल स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही पडत आहे, अशी ही सध्याची स्थिती पाहाता बुद्धिवाद आणि व्यक्तीवाद तसेच विज्ञाननिष्ठता ही विद्यमान राजकीय पटलावर सत्ता, स्वार्थ, धर्मांधता आणि आर्थिक दलदलीच्या गाळात अडकलेली आहे, असेच म्हणावे लागते.
००००००००००
सावरकरांच्या हिंदुत्त्वाला पेलणारे ‘कर’ आवश्यक !- १८
००००००००००
सावरकर प्रखर बुद्धिवादी असूनही धर्म ही एक वस्तुस्थिती आहे, असे मानत असत. यामुळेच सावरकर आगरकरांप्रमाणे समाजाला बुद्धिवाद विविध मार्गाने शिकवू पाहात होते. त्यांच्यावेळच्या देशकाल परिस्थितीनुसार त्यांना हिंदूंना स्पष्ट करावयाचे होते, त्यांचे अस्तित्त्व, त्यांचे महत्त्व समजावून देतानाच पोथिनिष्ठतेमधून बाहेर या सांगतानाच त्यांच्या श्रद्धांनाही जपून ते प्रयत्नशील होते. अर्थात तरीही सनातन्यांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी हिंदूंना राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी त्यांना मुसलमानी आणि अन्य विविध अत्याचारी राजवटींचे दाखले देत, धर्मांतरांनी केलेल्या अत्याचारांची तपशीलवार मीमांसा करीत, धर्मशुद्धीसारखे कामही त्यांनी ज्या पद्धतीने केले ते करताना हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडताना आणि हिंदुत्त्व स्पष्ट करताना मुस्लीम हे देखील स्वतंत्र राष्ट्र आहे हे अपरिहार्यपणे मान्य करताना त्यांनी त्यांच्या हिंदुराष्ट्रातील सर्व धर्मियांना नागरिक म्हणून समान अधिकार कसे असतील हे ही स्पष्ट केले होते. त्यांचा बुद्धिवाद हा हिंदुंसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी होता. त्यामुळेच मुसलमानांच्या पारंपरिक आणि कुराणाच्या धर्मप्रसारार्थ राष्ट्र तयार करण्याच्या शिकवणीलाही ओळखून त्यांनी मुस्लिमांनाही नव्या युगात येण्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी, असे सांगितले.
हिंदु या समूहासाठी एका ठोस संकल्पनेला मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर मुस्लीम समाजाचा द्वेष करणारे म्हणून किंवा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला म्हणून टीका करणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणारे आणि जन्माने हिंदू असणारे महाभागही आज कमी नाहीत. मुळात त्यांना सावरकर समजलेले नाहीत किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाहीत किंवा त्यांना आपल्या राजकारणासाठी काहींना आपले तेच खरे करण्याच्या दुराग्रहापोटी सावरकरप्रणीत हिंदुत्त्वाला आपल्या हितरक्षणासाठी कसेही करून बरबटवायचे आहे. मुळात या सर्व तथाकथित सावरकरद्वेषींना सावरकरांचे हिंदुत्त्वच नीटपणे मांडता न आल्यामुळे सावरकरांच्या विचारधारणेला बदनाम करण्याचा खेळ मात्र सुरू झाला. राजकारण्यांच्या द्वेषापायी ाणि हव्यासापायीही सावरकरांवर विविधांगांनी टीका करण्याचा चंगच काहींनी मांडला आणि अजूनही ते सारे चालू आहे. यामुळेच सावरकर यांचाै हिंदुत्त्ववाद ना काँग्रेसला पटला, मान्य झाला, वा कळला नाही आणि रा. स्व. संघाने वा त्यांच्याशी संलग्न राजकीय पक्षांनीही सावरकर यांच्या विचारांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्नही केला नाही मात्र त्यांनी त्यांच्या हिंदुत्त्व या शब्दाचे मार्केटिंग अतिशय प्रभावीपणे साध्य केले.
या लेखमालेमध्ये प्रामुख्याने उल्लेख केला गेला तो गोपाळ गणेश आगरकर यांचा. महाराष्ट्रातील सुधारणाावादी विचारपरंपरेतील ते एक बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होते. ज्या पिढीमध्ये काँग्रेसच्या मवाळ गटात असल्याचे मानले गेले. पण त्यांची भाषा पाहून त्यांच्या बुद्धिवादी विचारांचा परिपाक पाहून ते मवाळ होते की वैचारिक क्रांतीकारी होते, असा प्रश्न पडावा. त्यांचे निबंध हे त्या काळातील जहालच म्हणावे लागतील. सावरकर यांची या बुद्धिवादी विचारसरणीमधील तसे पाहायला गेले तर दुसरी पिढी. ज्या आगरकरांच्या पिढीवर सावरकरांसारखे व्यक्तित्त्व पोसले गेले ती पिढी मुस्लीमांबद्दल त्यावेळीही विश्वास ठेवत नव्हती. धर्मकल्पना आली कुठून या निबंधात ते म्हणतात की, मनुष्याच्या ज्या अनेक मनोवृत्ति आहेत, त्यापैकी त्याची धर्मकल्पना एक आहे. ज्याप्रमाणे इतर वृत्ती किंवा त्याची बीजे त्यांच्या प्रकृतीशी खिळलेली आहेत, त्याप्रमाणेच धर्मकल्पनाहीत्याचे मनात फार प्राचीन काळापासून वास करीत आहे. ... बुद्धिवादी असे आगरकर धर्माचे सामर्थ्य मान्य करतात, हे लक्षात घेतले पाहिजे. गुलामांचे राष्ट्र या निबंधात आगरकर यांची भूमिकाही समाजाला बुद्धिवाद कसा सांगावा, शिकवावा हे समजवणारी आहे. मार्क्सवादीही धर्म ही अफुची गोळी आहे असे मार्क्सचे वचन अयोग्य असल्याचे सांगू लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही धर्म ही न चुकणारी गोष्ट आहे, हे मान्य केले आहे. प्रा. नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या अलीकडच्या काळातील बुद्धीवादाचे पुरस्कर्ते आणि मार्क्सवादाकडे झुकणारे व्यक्तिमत्त्व. ते म्हणलतात या देशातील कोट्यवधी जनतेचा धर्मावर विश्वास आहे आणि जग कितीही सुधारले, आधुनिक झाले तरी अजून काही शतके समाजात धर्म ही शक्ती प्रबळ राहाणार आहे. जे देश सुधारलेले आणि आधुनिक मानले जातात तेथे तर धर्माचा दृढ प्रभाव अजून आहेच. ....
या सर्व पार्श्वभूमीवर सावरकर प्रखर बुद्धिवादी असूनही धर्म ही एक वस्तुस्थिती आहे, असे मानत असत. यामुळेच सावरकर आगरकरांप्रमाणे समाजाला बुद्धिवाद विविध मार्गाने शिकवू पाहात होते. त्यांच्यावेळच्या देशकाल परिस्थितीनुसार त्यांना हिंदूंना स्पष्ट करावयाचे होते, त्यांचे अस्तित्त्व, त्यांचे महत्त्व समजावून देतानाच पोथिनिष्ठतेमधून बाहेर या सांगतानाच त्यांच्या श्रद्धांनाही जपून ते प्रयत्नशील होते. अर्थात तरीही सनातन्यांकडून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी हिंदूंना राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी त्यांना मुसलमानी आणि अन्य विविध अत्याचारी राजवटींचे दाखले देत, धर्मांतरांनी केलेल्या अत्याचारांची तपशीलवार मीमांसा करीत, धर्मशुद्धीसारखे कामही त्यांनी ज्या पद्धतीने केले ते करताना हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडताना आणि हिंदुत्त्व स्पष्ट करताना मुस्लीम हे देखील स्वतंत्र राष्ट्र आहे हे अपरिहार्यपणे मान्य करताना त्यांनी त्यांच्या हिंदुराष्ट्रातील सर्व धर्मियांना नागरिक म्हणून समान अधिकार कसे असतील हे ही स्पष्ट केले होते. त्यांचा बुद्धिवाद हा हिंदुंसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी होता. त्यामुळेच मुसलमानांच्या पारंपरिक आणि कुराणाच्या धर्मप्रसारार्थ राष्ट्र तयार करण्याच्या शिकवणीलाही ओळखून त्यांनी मुस्लिमांनाही नव्या युगात येण्यासाठी पोथिनिष्ठा सोडावी, असे सांगितले. इतकेच नव्हे तर १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील मुस्लीमही त्यांना ब्रिटिशांविरोधात लढताना राष्ट्रप्रेमी वाटले आणि त्यानंतर मुस्लिमांच्या स्वतंत्र्य राष्ट्राच्या मागणीसाठी अलीबंधू, अलीगड विद्यापीठ, खिलाफत आंदोलन, मोपला बंड, दंगली या सर्व स्थितीमध्ये मुस्लीम समाजाने, मुस्लीम लीगने केलेल्या स्वतंत्र राज्याच्या मागणीमुळे तयार झालेली मुस्लीम प्रवृत्ती ही लक्षात घेऊनही त्यांनी मुस्लीमांना ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याशिवाय आणि विरोधाल तर तुम्हालाही विरोधून ब्रिटिशांशी संघर्ष करण्याचे सुस्पष्ट केले होते.
मुळात सावरकरांची धर्मश्रद्धा कशी आहे, ते पाहाण्यासारखे आहे. ती बाब लक्षात घेतली तर सावरकर ही विचारसरणी किती व्यापक आहे, आणि व्यापक होती, ते लक्षात येईल. कम्युनिस्टांचे राज्य आल्यावर हिंदुत्त्वाचे काय होणार या संबंधात ते सांगतात की, ते आल्याने धर्माचे प्राबल्य कमी होईल हे खरे पण साम्यवादी आले तर मंदिराबरोबरच मशिदी आणि चर्चेसचा नाश करतील ना ? ही क्रांतिसुद्धा देशाला पोषक होईल आणि पुन्हा हिंंदुत्व तरून जाील. ... मुसलमान त्यांचे मुसलमानत्व, ख्रिश्चन त्यांचे ख्रिश्चनत्व सोडायला तयार असतील तर मी माझे हिंदुत्व सोडायला एका पायावर तयार आहे, असे सांगणाऱ्या सावरकरी विचारांना न कळण्यासारखे काय आहे. पण राजकारण आणि स्वार्थ यासाठी अर्थाचा अनर्थ केल्यासारखे आहे सावरकर विरोधकांचे वा सावरकरद्वेषींचे इतकेच कशाला तथाकथित हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्यांचेही वर्तन आहे.
आगरकरांच्या जमान्यात मुस्लीम लीगचे फार प्राबल्य वा हेकेखोरपणा तसा सुरू झालेला नव्हता. मात्र तरीही आगरकरांनी मुसलमानांविषयी आपली मते, भूमिका परखडपणे स्पष्ट केली , मुसलमान हे राष्ट्रसभेविषयी विग्नसंतोशीपणा करतात त्यावर ते म्हणाले होते की, हिंदुंचा द्वेष करून तुमचा कसा निभाव लागेल, तुम्ही उभयतांनी सख्या भावाप्रमामए वागले पाहिजे... जेव्हा आम्ही हिंदु लोक ब्रिटिश पलटणीची पर्वा न करता ब्रिटिश लोकांच्या हातून राज्य हिसकावून घेण्यास यशस्वी होवू, तेव्हा त्या बरोबर त्यांना (म्हणजे ब्रिटिशांना) टेकू देणाऱ्या मुसलमान लोकांचाही समाचार आम्हास सहज घेता येणार आहे. हे विधान आगरकरांचे आहे आणि सावरकरांनी मुसलमानांबद्दल जे धोरण ठेवले होते, त्याच प्रकारचे आहे. धर्मवेडाला उत्तर देण्यासाठी थोडासा धर्माभिमान ठेवावाच लागतो असे आगरकर म्हणतात.
बुद्धिवादी आगरकरांचे मुसलमानांबद्दल असणारे हे मत हिंदुत्ववादी विचारांसारखे कसे असा प्रश्न पडू शकतो, पण मुस्लीम समाजाने पोथिनिष्ठा सोडावी, असे सांगण्याची धमक मात्र आगरकरांसारखे बुद्धिवादी म्हणून धर्मनिरपेक्षतेची तथाकथित झूल पांघरणाऱ्यांमध्ये नाही, ही विद्यमान काळातील वस्तुस्थिती आहे. हे लक्षात घेतले तर सावरकरांना जातीय ठरवणाऱ्यांच्या मेंदूमध्येच काही ना काही बिघाड झाला आहे आणि त्यामुळे समाजाचेही नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेणे गरजेचे राहील.
हिंदुत्ववाद्यांवर कठोर टीका करणाऱ्या नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या समीक्षकाचने मांडलेली मतेही या निमित्ताने महत्त्वाची वाटतात. ते वेगळ्या भाषेत मुसलमानांना बजावतात, हे महत्त्वाचे ते म्हणतात की, मुस्लीम विचारवंतांची अशी समजूत आहे की, मुसलमानांच्या दृढ, बळकट संघटना करून ते संविधानाची दिशा बदलू शकतील. मुसलमानांचा दृढ व बळकट संघटना करम्याचा उद्योग फक्त हिंदुसमाजातील उदारमतवाद कमकुवत करतो आणिस त्याचे परिणाम मुसलमानांना भोगावे लागतात. ही परिस्थिती बदलावी अशी माझी इच्छा आहे. मुसलमानांनी माझ्याबरोबर या देशाचे नागरिक म्हणून नांदावे अशी माझी भावना आहे.... सावरकरांच्या विचाराला उत्तर वा विचारणा म्हणून मुसलमानांना कुरुंदकर विचारतात, मुसलमानांना समान नागरिकत्व नको आहे काय ? स्वतंत्र देशात अल्पसंख्येला समान नागरिकत्व नसले तर कनिष्ठ नागरिकत्व मिळत असते. हे दुय्यम दर्जाचे नागरिकत्व मुसलमानाना हवे आहे का? त्यांना हिंदुस्थानात वरिष्ठ नागरिकत्व मिळेल असे वाटते ?
प्रा. कुरूंदकर म्हणतात की, समान नागरिकत्व ही कल्पनाच मुसलमानांना आवडत नव्हती. १८८९ पासून ही समान वाटपाची कल्पना पुन:पुन्हा सांगितली जाते... ७० टक्के हिंदूना ४० टक्के जागा, २२ टक्के मुसलमानांना ४० टक्के जागा, इतर सर्व मिळून ८ टक्के असंख्यांकांना १० टक्के जागा, यावर फार तर उदारमतवादी मुसलमान तयार होता. कर्मठांना सबंध भारत इस्लामसाठी हवा होता. सुशिक्षित मुस्लीम लीगला मुसलमानांना वेगळा तुकडा हवा होता. हिंदू हे एक राष्ट्र, मुसलमान हे दुसरे राष्ट्र; दोघात सत्तेत समान वाटा, म्हणजे दोघांनाही सत्तेत ५०-५० टक्के भाग ही खरी आदर्श समता आहे, असे मुसलमानांना वाटते.
कुरुंदकरांसारख्या बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाला सावरकरांची अनेक मते वा विचार पटत नसले तरी त्यांच्या मुसलमान नसण्याचा हक्क या संबंधातील विचारही पाहाण्यासारखे आहेत. हे लक्षात घेतले तर सावरकरांचे विचार हे किंबहुना तसे मुस्लीमांच्यादृष्टीने स्पष्ट आणि सौम्य आहेत. कारण लोकशाही तत्त्वाप्रमाणे मुसलमानांशी देशबंधू म्हणून वागावे, असा त्यांचा पर्याय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही मुसलमांनांसंबंधात असणारे मत, फाळणीसंबंधातील मत लक्षात घेण्यासारखे आहे. कारण लोकसंख्येची अदलाबदल करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सूचना विचारात घेतली तर आजची परिस्थिती पाहाता मुसलमांनाचा प्रश्न फाळणीनंतरही संपलेला नाही. मुळात सावरकर यांचे हिंदुत्त्व आणि हिंदुराष्ट्र ही संकल्पना आणि अन्य मंडळींचे हिंदुत्त्व आणि हिंदुराष्ट्र वा हिंदू या संकल्पना वा विचारपवेगवेगळे आहेत, हे समजून घेऊन सावरकरांचा बुद्धिवाद आणि त्यांना अपेक्षित असणारा धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववाद समजून घेण्याची आज मोठी गरज आहे. फक्त हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आगरकर, सावरकर, कुरुंदकर, आंबेडकर यांच्यासारख्या बुद्धिवादी सक्षम ‘करां’ची ताकद हवी!
- रवींद्र यशवंत बिवलकर
***