शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

निमित्तमात्र...

चोल वंशावरून पेटलेली दुहिं


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली हिंदु संकल्पनेची व्याख्या लक्षात घेता हिंदु शब्दाचा, संकल्पनेचा आणि विशेष करून सध्या मानल्या जात असलेल्या हिंदु धर्म या एकांगी वा मर्यादित गट-पंथासंबंधातील निर्देशाचा आणि त्यामुळे उठवण्यात येणाऱ्या वादवादंगाचा फोलपणा आणि तसा वाद घालणाऱ्यांची अपरिपक्क्वताच दिसून येत आहे.

सावरकरांचे हिंदुत्व ही संकल्पना भूमिनिष्ठ आहे. भूमीशी ती संबंधित आहे. इतकेच नव्हे तर त्या संकल्पनेला ऐतिहासिक, बौद्धिक, धार्मिक आणि तार्किक पार्श्वभूमीही लाभली असून त्यामुळेच शैव, वैष्णव, बौद्ध, जैन, सनातन, वैदिक, आर्य, शीख अशा विविध धर्म-पंथ, तत्त्वज्ञान जे एका विशिष्ट भूमीमध्ये तयार झाले आहे. म्हणजेच त्यांची पुण्यभूमी आहे, असे हे सारे हिंदूच आहेत, हे सावरकरांचे सांगणे किती महत्त्वाचे होते हे लक्षात येईल. हिंदु-मुस्लीम या भेदांपेक्षाही आर्य-द्रविड, शैव- वैष्णव, श्वेतांबर- दिगंबर अशा याच भूमितील धर्म-पंथातील भेद हाच मोठा अडसर राष्ट्रभावनेत असू शकतो, यासाठीच भेदाभेद नष्ट व्हावेत म्हणून सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या ही नीटपणे लक्षात घेण्याची गरज आहे. हे सांगण्याचे निमित्त म्हणजे PS:1 अर्थात ‘पोन्नियन सेल्वन हा ऐतिहासिक चित्रपट. चौल राजवंशावर आधारित असणारा हा चित्रपट असून राजराजा चोल हा हिंदु राजा नव्हता असे मत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेते तामिळ दिग्दर्शक वैत्रिमारन यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या म्हणण्याला अभिनेते कमल हासन यांनी समर्थन दिले आहे. तर वेत्रियन यांच्या मतावर भाजपा नेते एच. राजा यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुळात इतिहासावर या तिघांचा अभ्यास असला तरी त्या अभ्यासाचा वापर मात्र त्यांनी स्वमतप्रदर्शनासाठी करताना सारासारपणे केलेला नाही. सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या


आसिंधु- सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।

पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।


अशी आहे. ही लक्षात घेता  सावरकर यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केली, ती भूमीनिष्ठ अशी व्याख्या आहे. या भूमीशी एकत्व सांगणारी आहे. हे एकत्व कसे तर ते तार्किक, तात्विक आणि विज्ञाननिष्ठ आहे. यामुळेच या व्याख्येनुसार हिंदु या शब्दाचा खरा अर्थ लक्षात घेऊन विचार केला गेला पाहिजे. मात्र आज सत्तेच्या राजकारणामध्ये प्रत्येकजण विरोधाचे राजकारणही करीत हिंदुत्वाच्या व्याख्येलाच हरताळ फसत आहे. असे झाले तर ते हिंदुत्वालाच नव्हे तर साऱ्या राष्ट्रालाही धक्कादायक असू शकते. सत्तेच्या राजकीय खेळामध्ये भूमिनिष्ठ राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी हिंदु समाजातील विविध धर्म-पंथ गट, तत्त्वज्ञाने यांच्या भूमिसंलग्नतेला महत्त्व देणारे सावरकरांचा विचार न स्वीकारल्याचा हा परिणाम नाही ना ?  केवळ मतलबासाठी वा मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या खेळासाठी हिंदुत्व स्वीकारलेले नाही ना ?  तसेच केवळ भाजपाला डिवचण्यासाठी वा स्वत:चे अस्तित्त्व किती महत्त्वाचे आहे यासाठी कमल हासन यांच्यासारखे मान्यवर अशी हास्यास्पद आणि मूर्खपणाची घातक कृती करीत नाहीत ना? एकंदर हिंदुंचे ध्रुवीकरण होणे गरजेचे आहे. ते भूमिनिष्ठच असावे आणि असले पाहिजे, ही या ब्रिटिशांच्या हुकुमशाही गुलामगिरीतून भारतभूमीच्या सुटकेसाठी तयार व्हावी अशी मानसिकता अतिशय गरजेची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.  त्याचप्रमाणे गेल्या काही काळापासून विद्यमान काळातील चष्म्यातून इतिहासाकडे विद्यमान मानसिकतेतून पाहाण्याची अहमहमिकाच लागली आहे. मुळात या सर्व प्रकारात सर्वसामान्यांची भांडणे मात्र अधिक होऊ लागतात आणि सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे नटनट्यांच्या विधानांवरून लोकांमध्ये मात्र दशावतारी खेळेच सुरू होतात.

हिंदु समाजाच्या संघटनासाठी, एकजुटीसाठी, त्यांच्यावरील अन्याय मग तो इतिहासातील असो वा वर्तमानातील असो तो दूर करण्यासाठी झगडणारे स्पष्ट, पारदर्शी नेतृत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. केवळ इतकेच नव्हे तर हिंदू या संकल्पनेला खरा अर्थ देत, राष्ट्रीयत्त्वाच्या व्याख्येत वा निकषांमध्ये बसवून हिंदू समाजाला जागतिक स्तरावर हक्काचा देश देण्याचा प्रयत्न करून त्या समाजातील उणेपणा दूर करणे, जातिपातींची संवेदनशून्य कल्पना संपुष्टात आणून, सर्वांना एकाच पातळीवर आणून, विज्ञाननिष्ठ समाज घडविण्यासाठी एक तर्कपूर्ण आणि विज्ञानाधारित तत्त्वज्ञान मांडण्याचा मोठा यज्ञच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला होता. पण, त्या यज्ञाचा फायदा हिंदुंना खरोखरच झाला नाही, अहिंसा न करताही हिंदुंचाच बळी काँग्रेसच्या कथित अहिंसावादी विचारसरणीने दिला गेला, असे आजही प्रत्ययास येत आहे. कमल हासन यांच्यासारख्या नामवंतांचे विधान हे देखील मानसिक आणि बौद्धिक हिंसा करण्याच्या  क्षुल्लक कृतीचे साधन ठरू शकते. तर त्या संबंधात भाजपा नेते एच. राजा यांनीही संताप व्यक्त करण्यापूर्वी हिंदुत्वाची नेमकी व्याख्या काय ते स्पष्ट करावे म्हणजे वेत्रिमारन आणि हासन यांच्या वक्तव्याला तोड देता येऊ शकेल. अन्यथा भाजपाच्या हिंदुत्त्वावर आणि विचारांवर जाणीवपूर्वक होऊ घातलेले मतभेद, मतभिन्नता ही मानसिक- बौद्धिक फाळणीकडे जाणाऱ्या सत्तालालची गटांची असेल आणि भाजपाही त्यात वेगळा ठरणार नाही. यासाठीच राजकीय दृष्टीनेही हिंदुसमाजाच्या बौद्धिक, तार्किक, तात्त्विक मंथनाची आजही गरज आहे, हेच सिद्ध होते. कारण मंथन यापूर्वीच झाले असते, तर हासन वा वेत्रिमारन यांच्यासारख्या हिंदुभूमीसंलग्न व्यक्तींनी असली विधानेच केली नसती. हासन यांची कन्या हिने तर बौद्ध धम्म स्वीकारला आहे. पण मुळात हे सर्व धर्म याच भूमीत जन्माला आले असल्याने, निर्माण झाले असल्याने त्यांचा हिंदुत्वात वा हिंदुपणात समावेश करण्यास काहीच हरकत नसावी. एखाद्याच्या विधानाचा अर्धामुर्धा वापरही टीआरपी नामक गल्लाभरू प्रमाणकासाठी करणारे प्रसारमाध्यमांमधील महाभाग कमी नाहीत, हे ही लक्षात घ्यावयास हवे. पण...

कमल हासन हे जसे अभिनेते आहेत, तसेच राजकारणातही सहभाग असलेल्या अभिनेत्यांमधील एक आहेत. त्यामुळे पोन्नियिन सेल्वन-१ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या विधानांना खरे म्हणजे किती मनावर घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. अलीकडे चित्रपटादी मनोरंजन क्षेत्रातून राजकारणात डोकावणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढलेली आहे. कोणी काँग्रेसवादी, राष्ट्रवादी तर कोणी भाजपवादी, शिवसेनावादी तर कोणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असतो, कोणी अन्य एखाद्या पक्षाचा कोणी अपक्षही असतो. महाराष्ट्राबाहेरही असलेल्या विविध राज्यामधील स्थानिक पक्षांमध्येही असे अनेक राजकीय कलाकार आहेतच. फक्त एकंदर वादांमध्ये सर्वसामान्यांनी अशा प्रकारच्या राजकीय विधानांमध्ये असणारे तथ्य पाहाताना स्वत:चे मत बनवताना वा सामाजिक माध्यमांमध्ये व्यक्त होताना तार्किकता, तात्विकता, विवेक पाळावेत. इतिहासाचाही नीट मागोवा घ्यावा. अन्यथा कोणी ‘चाची वा चाचा ४२०’ होऊ शकतो.!


- रवींद्र यशवंत बिवलकर

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...