शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

 निमित्तमात्र  

... तर स्वातंत्र्य हे (स्व) तंत्रशून्यच 

महेश्वर येथील राजराजेश्वर मंदिर

ओंकारेश्वर या बारा ज्योतिर्लिंगामध्ये तेथे असणारे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन प्रमुख देवस्थाने. या ठिकाणी ओंकारेश्वर देवळात जाण्यासाठी असणारी लोकांची गर्दी अतार्किक आणि अगम्य आहे. भावना व विशेष करून धार्मिक भावना आहेत या नवाखाली बेशिस्त असण्याची, आरडाओरड करण्याची, रेटारेटी करण्याची खरे म्हणजे काहीच आवश्यकता नसते. रांग शिस्तबद्ध असण्यासाठी मंदिराचे कार्यकर्ते, स्वयंसेवक वा कर्मचारी किंवा पोलीस असले पाहिजेत ही आवश्यकता भारतीयांच्या धर्मभावनेच्या बेभानपणाचे लक्षण समजावे की, बेशिस्त वर्तणुकीचा कळस मानावा. 

स्वातंत्र्य मिळाले खरे, ७५ वर्षेही झाली असतील १०० वर्षेही होती ल पण आपण स्वातंत्र्याला पात्र आहोत का, असा विचार करायला हवा, अशी स्थिती येण्यामागे भारतीय नागरिक या नात्याने आपण या भारत- हिंदुस्तान - इंडिया नामक भूभागाचा... जो काही फाळणीनंतरही मिळालेला देश नावाचा भाग आहे त्या भूमीचा आपण मान राखला आहे का, याचा भारतीय मतदारांनीही विचार करायला हवा, भारताच्या सरकारी, खासगी, कामगार वर्गानेही विचार करायला हवा, इतकेच नव्हे तर सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांनीही विचार करायला हवा. थोडक्यात आपण स्वातंत्र्याला पात्र आहोत का, लायक आहोत का याचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, वैयक्तिक असा सर्व बाजूंनी शोध घेऊन, त्यातील दोष सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तसे सुधारण्याचा आणि कालाबरोबर जाण्याचा वैचारिक, वर्तनात्मक आणि भावनात्मकही प्रयत्न केला गेला नाही तर तो असंस्कृत आणि बेताल जीवनपद्धतीचा स्वीकार केला गेला, असेच म्हणावे लागेल. 

पहिले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थान
अलीकडेच पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थानाला जाण्याचा योग आला. तसेच ओंकारेश्वर, महेश्वर या मध्य प्रदेशातील धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणी जाण्याचा योग आला. अशा ठिकाणी जाताना कल्पना आणि वास्तव या दोन्ही घटकांचा विचार करताना आणि तुलनात्मक दृष्टीने आपल्या जीवनपद्धतीकडे पाहाताना भारतीय असण्याचा बेशिस्तीचा अनुभव अनेक ठिकाणी आला, जसा माणुसकीचा मदतीचा अनुभव आला तसा गल्लाभरू धंदेवाईक माणसाचाही अनुभव घेता आला. तुलनात्मक दृष्टीने विचार करता स्वातंत्र्याच्यानंतर आपण काय कमावले आणि काय गमावले याचाही गांभीर्याने विचार करून बदलण्याची वेळ आली आहे असे नक्की वाटू लागते. केवळ मुद्दे देत मी  अनुभव मांडतो. 

 मुंबई पासून मध्य प्रदेशात जाण्याच्या आग्रा रोड- राष्ट्रीय महामार्गाची स्थिती बरीच चांगली आहे मात्र मुंबईकडे येताना महाराष्ट्रात इगतपुरी, घोटी, कसारा घाट उतरल्यानंतर कल्याणपर्यंतचा रस्ता खराब, खड्डेमय आहे आणि नंतर मुंबईकडे येतानाचा रस्ता अनेक बाबतीत आनंदी आनंद आहे. 

  • बाजीराव पेशव्यांसारख्या व्यक्तिमत्वाचा हा अवमानच
    मध्य प्रदेशात खालखुर्दनंतर बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थान असलेल्या रावेर खेडीकडे जातानाचा रस्ता नॅशनल खर्मल पॉवर प्रकल्पामुळे ट्रक जाऊन येऊन अतिशय खराब झाला आहे. तो थेट जवळपास ओंकारेश्वरपर्यंत खराब येतो.. रावेरखेडी फाट्यापासून मात्र रस्ता बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानापर्यंत नवा आहे. हे सुदैव
  • बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानाचा भाग सुशोभित करण्याची आवश्यकता आहेच आहे. नर्मदा इतकी जवळ असून तिच्या पाण्याचा वापर करून तेथे छानसे उद्यान, तयार होऊ शकेल. पण लक्षात कोण घेतो...
  • नर्मदा पाणी देईल पण बाग फुलवावी असे वाटले तर पाहिजे ना

    पाणी मिण्याची सुविधाही नर्मदेच्या या तीरावरील स्थानात नाही. ना शौचालयाची बांधणीही केली आहे. तरीही ते पर्यटन स्थळ आहे म्हणे.
  • एक दुजे के लिये चित्रपटातील ‘वासू सपना’ प्रमाणे प्रेमी युगूल वा अन्य कोणी भारतीय नागरिक यांना बाजीराव पेशवे यांचे महत्त्व वाचताही येत नसल्याने या स्थानात आनेक ठिकाणी नावे भिंतीवर कोरण्याचा व लिहिण्याच मोह काहींना आवरत नाही, हे भारतीयत्त्वाचे प्रमुख लक्षण येथेही दिसून येते.
  • समाधीस्थानावर थेट प्रत्यक्ष जाणे, तेथे उभे राहाणे, त्या ठिकाणी वर जाऊन बसणे, वा तेथे फोटो काढून घेणे आणि सेल्फी काढणे ही वैचारिक बेशिस्त भारतातील जनमानसात रुळलेली आहे. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी जाऊन उभे राहातो आहोत, तेथे त्या पद्धतीत जाणे, फोटो काढून आपण आल्याचा पुरावा निर्माण करण्याच्या हेतून का होईना पण फोटो काढणे हे कृत्य अतिशय गंभीर आहे. समाधीस्थानाचा हा अपमान म्हणजे त्या थोर व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान करण्यासारखे आहे. आपल्याच इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाला आपण लाथ मारण्याच हा प्रकार आहे. दुर्दैव आहे हे...

बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थानाबाहेर असणारी ही मोकळी जागा बाग फुलण्यासाठी प्रतीक्षा करीत आहे
  • ज्या मराठा सेनापतीने मुघल शासकांना घडा शिकवला, आपल्या प्रभुत्वाखाली आणले, एकही युद्ध न हरलेल्या या पेशव्याने हिंदुपदपादशाहीची मान उंचावली... 
  • अशा व्यक्तीच्या समाधीस्थानाच्या परिसरात नर्मदा नदी जवळ असतानाही साधी बाग फुलवू शकत नाही, हा करंटेपणाच नव्हे का...
  • ओंकारेश्वर या बारा ज्योतिर्लिंगामध्ये तेथे असणारे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही दोन प्रमुख देवस्थाने. या
    भक्तांची ही भावनिक रेटारेटी 

    ठिकाणी ओंकारेश्वर देवळात जाण्यासाठी असणारी लोकांची गर्दी अतार्किक आणि अगम्य आहे. भावना व विशेष करून धार्मिक भावना आहेत या नवाखाली बेशिस्त असण्याची, आरडाओरड करण्याची, रेटारेटी करण्याची खरे म्हणजे काहीच आवश्यकता नसते. रांग शिस्तबद्ध असण्यासाठी मंदिराचे कार्यकर्ते, स्वयंसेवक वा कर्मचारी किंवा पोलीस असले पाहिजेत ही आवश्यकता भारतीयांच्या धर्मभावनेच्या बेभानपणाचे लक्षण समजावे की, बेशिस्त वर्तणुकीचा कळस मानावा. ओमकारेश्वर प्रमुख आणि ममलेश्वर त्यापेक्षा कमी मह्त्त्वाचे असे मानण्याचा अट्टाहासही धार्मिक निरक्षरतेचा भाग म्हणावा का, ममलेश्वरमध्ये ओमकारेश्वरच्या तुलनेत नगण्य गर्दी असल्याचा अनुभव येतो तर दोन्ही शिवलिंगांचे दर्शन हे महत्त्वाचे आहे, असे सांगणारे महाभागही भेटतात. म्हणजेच सारे कसे मनाला हवे तसे वळवावेत तशा धार्मिक भावनांचे शिवभक्त असतात का, असाच प्रश्न पडावा. पोथिनिष्ठता वा तथाकथित रितीरिवाजांमधून भारतीय हिंदुत्व अजूनही बाहेर पडलेले दिसत नाही.
  • ओंकारेश्वर येथील नर्मदेकाठचा घाट हा तसा गेल्या काही वर्षांपूर्वीच बांधला आहे. त्याचा दर्जा काय वर्णावा... महेश्वरमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी बांधून घेतलेले नदीकिनाऱ्यावरील घाट अजूनही खूप चांगल्या स्थितीत 
    ओंकारेश्वरचा हा घाट अहिल्यादेवींनी बांधला असता तर...
    आहेत तर ओंकारेश्वरमधील घाट, तेथील फुटलेल्या पायऱ्या, तेथील अस्वच्छता, फेरीवाले, धार्मिक कार्यांची संलग्न स्थिती याबाबतीत, नीटनेटकेपणा याची वानवा म्हणजेच ओंकारेश्वर असे वर्णन करावेसे वाटते. 
  • ओंकारेश्वर या ठिकाणी खासगी वाहन पार्किंग, लॉज-हॉटेल्स, टपऱ्या, भिक्षुकांची वा भटजींची रेलचेल मात्र भरपूर आहे. या ओंकारेश्वरमध्ये एका प्रवेशद्वारी वाहनांकडून ३० रुपये नगरपरिषद घेते. इतकी वाहने येतात पण मग अशी गलथान स्थिती तेथे असते, त्यासाठी प्रवेशाद्वारे मिळणारा पैसा भाविक, पर्यटक यांच्यासाठी किती खर्च केला जातो हाच मोठा प्रश्न तेथे पडतो. पण कोणीही त्याकडे फारसा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
  • ओंकारेश्वर येथून महेश्वर येथे जाण्याचा मार्ग सुमारे ७० किलोमीटर इतका आहे. मात्र त्यासाठी वेळ लागतो तो सुमारे ३ तास. लहान रस्ते, निमशहरातील वेशिस्त वाहतूक, सिंगल रस्ता असला तरी तो समजून वाहने न चालवण्याची लोकांची मानसिकता, मधल्या काही गाव व निमशहरी भागातील खराब रस्ते, रस्त्यांवर मार्गदर्शक पाट्या नीट पद्धतीने न लावणे अशा विविध त्रासांमधून मध्य प्रदेशचा पर्यटन विकास येथे दिसून येतो.
  • महेश्वर येथील मंदिरे मात्र खूप चांगल्या स्थिती, स्वच्छ आणि छान ठेवली आहेत. तर जुन्या राजवाड्याची स्थिती, घाट यांची रचना आजही खूप चांगल्या स्थिती आहे. वास्तुरचना, त्यासाठी केलेले काम हे प्रामाणिकपणे, श्रद्धाभावनेने केले असल्याने आजही ते टिकून आहे. अर्थात काही ठिकाणी त्याची देखभाल म्हणावी तशी नाही. जुने बांधकाम राखणे हे सोपे नाही, हे ही खरे पण किमान बऱ्याच अंशी महेश्वर खूप सुसह्य शहर वाटते. 
  • महेश्वरमधील जुन्या भागात रस्ते लहान असून ही वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध वाटावी अशी आहे, हे ही नसे थोडके. 
  • महेश्वरमधील हा घाट... अहिल्यादेवींच्या कार्यामुळे आजही सुस्थितीत
    राजवाडा, गड येथील भाग, अहिल्यादेवींची माहिती देणारा त्यांच्या वाड्या परिसर हा त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असून तो खूप चांगला ठेवण्याचा प्रयत्न  केला गेला आहे. मात्र तेथे सूचना लिहून ठेवलेल्या असतानाही त्याचे गांभीर्य पर्यटकांना नाही कारण ते स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिक आहेत. त्यामुळेच फोटो काढण्याबद्दल, शांतता राखण्याबद्दल, अगदी चप्पल काढण्याच्या शिस्तीबद्दल किंवा रांगेत शांतपणे जात स्थानाचे अवलोकन करीत आपण एखाद्या कुटुंबाच्या मालकीच्या वास्तुत वावरत आहोत, हे भानही स्वतंत्र भारताच्या या नागरिकांना नसते. 

अर्थात ही स्थिती केवळ मध्य प्रदेशात असेल असे नाही, अन्य भारतीय राज्यांमधील अनेक भागांमध्ये ही अनुभूती येऊ शकते. यामुळेच भारतीय स्वातंत्र्यासाठी इतक्या वर्षांनीही आपण स्वातंत्र्य उपभोगण्यास वा स्वतंत्र वर्तनाचा आनंद घेण्यासाठी पात्र वा सक्षम झालो आहोत का, याचा प्रत्येकाने गंभीरपणे विचार करायला हवा. काळ बदलला, राजा बदलला तरी वृत्ती गंभीरपणे विचार करणारी, त्यानुसार वर्तन करणारी नसेल, तर राष्ट्राच्या संबंधात मिळणारे स्वातंत्र्य हे (स्व)तंत्रशून्यच म्हणावे लागेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...