मंगळवार, १० जानेवारी, २०२३

स्वातंत्र्यवीरांबद्दलची स्पर्शानुभूती

स्वातंत्र्यवीरांची स्पर्शानुभूती जेव्हा 'त्यांनी' घेतली आणि त्यांची जाणीव त्यांच्या उद्गारातून दिसली तेव्हा मात्र सावरकरांवरील टीकाकार बुद्धीबधीर वाटले. आणि वाईट वाटले ते ...  अशा बुद्धीबधीरावरही टीका न करता, त्याला न समजावता, त्याला चोख तार्किक चोख प्रतिवाद न करता आपली पोळीही भाजून घेणाऱ्यांचे,  त्याच्या मागे हिंडत फिरणाऱ्या तथाकथित बुद्धीहिनांचे... कारण हे बुद्धीबधीर आणि बुद्धीहीनही भारताचेच नागरिक आहेत... 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संबंधात आपल्या सत्तांध राजकारणासाठी कोणी सकारात्मक तर कोणी नकारात्मक टीका करतात, आरोप करतात, अति भलावणही करून आपले इप्सित साध्य करतात. पण स्वीकारात्मकतेचा दृष्टिकोन स्वीकारण्याचा परिपूर्णपणा दाखवण्याचे धाडस अद्याप तरी कोणा राजकारण्याने दाखवलेले नाही. गेल्या काही काळामध्ये तत्त्वज्ञानाने बहरणारी व्यक्तिमत्त्वेही राजकारणात वा अन्य विविध क्षेत्रात फार उदयास आलेली नाहीत. खरं म्हणजे आधुनिक काळात समाजाला विज्ञाननिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तर्कशुद्ध, अद्ययावततेने आयुष्य जगण्याचा अनुभव घेणारे व्यक्तित्त्व दिसून येत नाही. मार्केटिंग करणारे बहुत झाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, केवळ राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारे नव्हते, धार्मिकतेला बहुआयामी आणि विशेष करून राष्ट्र आणि मानवी दृष्टीने वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त करून देणारे सुधारकी - अद्ययावत राहू पाहाणारे सावरकर हे व्यक्ती नव्हते तर ते तत्त्वज्ञान होते. अशा या सावरकरांना ‘वाटून’ (वाटणी करून) पाहाणे हे जितके चुकीचे तितकेच ते तुमचे आणि हे आमचे असे म्हणणेही तितकेच मूर्खपणाचे तसेच ते आमचेच असे सांगणेही तेवढेच मूर्खपणाचे, स्वार्थीपणाचे आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणे सावरकर हे अनुभवण्याचे तत्त्व आहे. विविधांगी ज्ञानदायी आणि विज्ञानदायी व्यवहारी. राष्ट्रनिष्ठ आणि मानवतेलाही जोपासणारे, धर्माला भूमिनिष्ठ बनवणारे तत्त्व - ज्ञान  आहे. नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांनी रचिललेल्या भावार्थदिपिका अर्थात ज्ञानेश्वरीचा गौरव करताना म्हटले आहे की, त्यातील एक तरी ओवी अनुभवावी, त्यामुळे मानवाच्या आयुष्याचे कल्याणच होईल. ... नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।

 असाच अनुभव आला तो स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात भेट देण्यास आलेल्या एका दिव्यांग मुलाकडून. त्याच्या दिव्यांग सहकारी मित्रांकडून. त्यांनी घेतलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खडतर आयुष्याची माहिती, त्यांनी अनुभवली. सावरकरांनी फिरवलेल्या कोलूच्या प्रात्यक्षिकाची अनुभूती, सावरकरांनी बेड्या घालून अंदमानात भोगलेली यमयातना आणि त्याची स्पर्शानुभूती.. त्या दिव्यांग मुलांना कोणी केवळ सावरकरांचे कार्य तोंडी सांगितले नाही तर प्रत्यक्षानुभव देण्यासाठी प्रतीकात्मक कोलू, बेड्या याचाही स्पर्शानुभव दिला... तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द निघाले .... अरे बापरे....

फक्त वाईट वाटते इतकेच की दिव्यांग नसणाऱ्या पण बुद्धीने बधीर असलेल्यांचे, कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रत्यक्षानुभूती न घेता वीराला माफीवीर संबोधणाऱ्या बुद्धीबधीरांचे, अशा बुद्धीबधीरावरही टीका न करता, त्याला न समजावता, त्याला चोख तार्किक चोख प्रतिवाद न करता आपली पोळीही भाजून घेणाऱ्यांचे,  त्याच्या मागे हिंडत फिरणाऱ्या तथाकथित बुद्धीहिनांचे... कारण हे बुद्धीबधीर आणि बुद्धीहीनही भारताचेच नागरिक आहेत... हीच एक खंत स्वातंत्र्यवीरांची स्पर्शानुभूती घेताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या एका गटाने दिली.  स्थळ कोणते, वेळ कोणती ते महत्त्वाचे नाही महत्त्वाची आहे ती अनुभूती... समज... आणि जाणीव...

- रवींद्र यशवंत बिवलकर
१० जानेवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...