भावनेला आवाहन करणारे क्रांतिशाहीर कवि गोविंद
स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांनी त्यावेळचा काळ भारून गेला होता. स्वातंत्र्यासाठी तरुणांमध्ये चैतन्य आणण्याचे काम त्यांच्या कवितांनी केले होते. आज नवीन पिढीला आणि विशेष करून साहित्यक्षेत्रातील व्यक्ती साहित्याभ्यासक यांनी कवि गोविंद यांच्या कवितांचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत त्यावेळी असणारी स्वातंत्र्यासाठीची ललकारी,वास्तव, समाजस्थितीचे भान आणून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठाने त्यांच्या कविता अभ्यासक्रमात लावायला हव्यात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीमध्ये खरे म्हणजे त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. समाजातील एका तळागाळातील व्यक्तीने काव्यक्षेत्रात दाखवलेली प्रतिभा स्वातंत्र्यानंतरच्या या काळातही पोहोचविण्याची आवश्यकता आहे. ९ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने क्रांतिशाहीर गोविंद यांना ही आदरांजली...
------
स्वातंत्र्यकवि गोविंद यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात येताच एक महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावली. आपल्या काव्यप्रतिभेला त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या काव्यामधून साकारले त्यातून त्यांची काव्यप्रतिभा तर दिसतेच पण त्याबरोबरच त्यांच्या काव्यातील जाज्ज्वल्य देशभक्ती, स्वातंत्र्याची दिलेली ललकारी याचे दर्शन घडते.
स्वातंत्र्यकवि गोविंद या क्रांतिशाहिराचे पूर्ण नाव होते गोविंद त्र्यंबक तथा आबा दरेकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासातील, अभिनव भारत संघटनेचे सदस्य असणारे स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांनी त्यावेळचा काळ भारून गेला होता. स्वातंत्र्यासाठी तरुणांमध्ये चैतन्य आणण्याचे काम त्यांच्या कवितांनी केले होते. आज नवीन पिढीला आणि विशेष करून साहित्यक्षेत्रातील व्यक्ती साहित्याभ्यासक यांनी कवि गोविंद यांच्या कवितांचा अभ्यास करून नवीन पिढीपर्यंत त्यावेळी असमारी स्वातंत्र्यासाठीची ललकारी, वास्तव, समाजस्थितीचे भान आणून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठाने त्यांच्या कविता अभ्यासक्रमात लावायला हव्यात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीमध्ये खरे म्हणजे त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा. समाजातील एका तळागाळातील व्यक्तीने काव्यक्षेत्रात दाखवलेली प्रतिभा स्वातंत्र्यानंतरच्या या काळातही पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
आज कवि गोविंद यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १८७४ तर त्यांचे निधन २८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाले. कवी गोविंद याना बालपणी आलेल्या भयंकर तापामुळे त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले व ते कायमचे पांगळे झाले. सुरुवातीच्या काळात शृंगारिक लावण्यांची रचना करणाऱ्या या कवीस सावरकर बंधूंचा परिसस्पर्श लाभला व ते देशभक्तीपर पोवाडे व राजकीय चळवळीला उपयुक्त अशा कविता करू लागले. त्याकाळी लोकजागृतीसाठी गणेशोत्सव, शिवजयंती इ. उत्सवात मेळ्याचा कार्यक्रम होत असे. या मेळ्याच्या ठिकाणी व अन्य प्रसंगी सावरकर बंधू तसेच गुरुजींसारखे अन्य अभिनव भारताचे सदस्य त्यांना पाठीवर बसवून घेऊन जात. हळूहळू त्यांचे काव्य संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागले. जनतेच्या मनात ब्रिटिश सत्तेविरूध्द रोष निर्माण होऊ लागला. त्यांच्या क्रांतिकारी कविता वाचून तरूणांची मने पेटून उठली. तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या कविता मुखोद््गत होऊ लागल्या. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले.... या त्यांच्या ओळीने त्या काळातील तरुणांच्या अंगी जोश निर्माण केला गेला. ब्रिटिशविरोधात उभे राहाण्याची ताकद या प्रकारच्या कवितांमुळे मिळाली.
लोकमान्य टिळक मंडाले (ब्रह्मदेश- म्यानमार) येथे तर सावरकर बंधू अंदमानच्या कारागृहात शिक्षा भोगत असतांना नासिकच्या 'अभिनव भारत' शाखेचे, शरीराने पंगू असलेल्या कवी गोविंदांनी खंबीरपणे नेतृत्व केले व तुरुंगात खितपत पडलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना धीर देऊन सर्वतोपरी मदत केली.
१९२३ ते १९२६ या तीन वर्षात गोविंदांचे आजारपण वाढत गेले त्यावेळी महाबळ गुरुजी व त्यांचे अन्य काही सहकारी यांनी त्यांचे औषधोपचार व अन्य सर्व प्रकारच्या सेवा केल्या. शारीरिक वेदना वाढत गेल्या. हातांनी लिहिणे अशक्य झाले तेव्हा आपली पत्रे व नवीन काव्य गोविंद कवी महाबळ गुरुजींना सांगत व गुरुजी ते लिहून घेत. अत्यवस्थ स्थिती झाली असता 'माइ काव्य संग्रहाची व्यवस्था तुम्ही करा. माझी जप्त झालेली चार पुस्तके आहेत त्यावरील बंधने दूर झाल्यावर तुम्ही त्या सर्व कविता पुस्तक रुपाने प्रसिध्द करा व त्याचे उत्पन्न यशवंत व्यायाम शाळेला द्या असे व्यवस्थापत्र कवी गोविदांनी करून ठेवले. (१९१७ साली गुरुजींनी नासिकला यशवंत व्यायाम शाळेची स्थापना केली. व्यायाम प्रचार व प्रसार करणारी शतक महोत्सव साजरा करणारी ही संस्था आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व्यायाम संस्था आहे.)
मृत्यू समोर दिसू लागला तरी त्यांची काव्यप्रतिमा किंचितही कमी झाली नव्हती. मृत्यूपूर्वी १५ दिवस आधी 'सुंदर मी होणार, आता मरणाने मी जगणार, हासत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार' हे गोविंदांचे अमरकाव्य महाबळ गुरुजींनी लिहून घेतले. 'गोविंदाचे करुणागान' ही कविता मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी गुरुजींनी लिहून घेतली. मरणापूर्वी आठतास आधी गुरुजींना ते क्षीण स्वरात म्हणाले ‘आता मला जास्त सांगवत नाही. करुणागान कवितेत 'देवा नमने तुज सहस्त्रदा । सहस्त्रदा । सर्वदा' असा शेवटच्या ओळीत बदल कर. २८ फेब्रुवारी १९२६ या दिवशी त्यांची जीवनसमाप्ती झाली. महाबळ गुरुजींनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. स्मशानात 'सुंदर मी होणार' ही कविता म्हणतांना गुरुजींना शोक अनावर झाला. संध्याकाळी गोदावरी काठावरील श्री यशवंतराव महाराज पटांगणावर शोकसभा झाली. त्यांच्या दहाव्या दिवशी अनेक थोर मंडळी जमली होती. त्या सभेत गोविंद कवींचे मोठे स्मारक करावे, पेशवे वाड्यापुढे (सराफ बाजारातील सरकार वाडा) त्यांचा पुतळा उभारावा वगैरे योजना मांडल्या गेल्या. निधीचे आकडे जाहीर झाले. पण नंतरच्या काळात हे सर्व विचार हवेत विसरून गेले.
स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने गोविंदांचे मिळेल ते काव्य एकत्र करून ते छापण्याचे गुरुजींनी ठरवले. त्यासाठी 'गोविंद काव्य प्रकाशन मंडळ' स्थापण्यात आले. त्यात महाबळ गुरुजींबरोबर डॉ. ना. दा. सावरकर, वैद्यभूषण वामनशास्त्री दातार, डॉ. वि. म. भट व श्री. र. वर्तक वकील हे सहकारी होते.
गोविंद कवींच्या तिथीप्रमाणे चतुर्थ स्मृती दिनी दि. १५/३/१९३० रोजी त्यांच्या सरकारने जप्त न केलेल्या कवितांचा काव्यसंग्रह महाबळ गुरुजींनी प्रकाशित केला. कवी गोविंदांना महाराष्ट्र विसरला नाही म्हणून की काय पहिली आवृत्ती संपून १५/२/१९३१ रोजी दुसरी आवृत्ती गुरुजींनी प्रकाशित केली. कवी गोविंदांची 'गोविंद गीते' बनारस विश्वविद्यालयाने (मराठी विभाग) त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती. मुंबई व नागपूर विद्यापीठाने गोविंदांच्या कविता एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या होत्या. त्यांची 'सरस्वतीची भूपाळी' महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा मंडळाने (जुनी ११ वी) मराठीच्या क्रमिक पुस्तकात समाविष्ट केली होती. १९२८ मध्ये लोकनायक मा. श्री. अणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्वाल्हेर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी कवी गोविंदांची 'सरस्वतीची भूपाळी' महाबळ गुरुजींनी गायली होती. १९४२ मधे नासिक येथील आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ही भूपाळी जुन्या पिढीतील प्रसिध्द गायक पंडितराव नगरकर यांनी सादर केली होती.
त्यानंतरच्या काळात अभिनव भारत सदस्यांच्या प्रयत्नांमुळे कवी गोविंदांच्या लघु अभिनव मालेतील ६ वे ७ वे पुस्तक बंधमुक्त झाले. त्यावेळी दुसरे महायुध्द सुरू होते. महागाई व कागद टंचाई या सारख्या अडचणींना गुरुजींना सामोरे जावे लागले. तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनापूर्वी असा विचार झाला की या कवितांचा कालानुक्रम तसेच त्यांचा संदर्भ व कवीची भूमिका काय होती याचा शोध घ्यावा. त्यावेळी बाबाराव सावरकर सांगली येथे खूप आजारी होते. महाबळ गुरुजींनी सांगलीला जाऊन बाबारावांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार २२/८/१९४३ रोजी गुरुजींनी तिसरी आवृत्ती प्रकाशित केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रीमंडळाने गोविंद कवींचे लघु अभिनव मालेतील ३रे, ८ वे व ९ वे पुष्प व अन्य साहित्य यावरील बंदी उठविली. त्यामुळे १९४७ साली विजयादशमीस ४ थी आवृत्ती महाबळ गुरुजींनी प्रकाशित केली. ही आवृत्ती म्हणजे गोविंदांची समग्र कविता होय. त्यात कोणताही बदल न करता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने गतवर्षी २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ५ वी आवृत्ती जशीच्या तशी प्रकाशित केली आहे. त्यामुळे त्यावेळच्या असलेल्या शुध्द लेखनाच्या नियमांप्रमाणे ही आवृत्ती छापली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या आवृत्तीमुळे तब्बल ७५ वर्षांनी ही पाचवी आवृत्ती आणि त्यातील कविता लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
साधारण वयाच्या १९ व्या वर्षानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहवासात कवि गोविंद आले आणि मित्रमेळ्याबरोबर त्यांची प्रतिभा ज्या पद्धतीने फुलली ती लक्षात घेण्यासारखी आणि स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतवणारी ठरली. सावरकर आणि कवि गोविंद यांच्यामध्ये प्रतिभा आणि स्फूर्ती यांच्यात असणारे सारखेपण लक्षात घेता त्यामुळेत काव्यातही ते साम्य दिसून येते. फरक होता तो दृष्टीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दृष्टी संस्कृतीकडे पाहाणारी आणि गोविंदाची दृष्टी भावनेकडे पाहाणारी असल्याने सावरकर यांची कविता सांस्कृतिक अधिक आहे तर गोविंदांची कविता भावनेला हात घालणारी आहे. नागरकाव्याबद्दल पाहाता सावरकर हे त्यांचे जणू गुरुच होते. केवळ इतकेच नव्हे तर पंगुत्वामुळे सावरकर त्यांना आपल्या खांद्यावर घेऊनही जात इतके मित्रप्रेम त्यांच्यावर सावरकर यांचे होते. अशा या कवि गोविंदांच्या काव्याने क्रांतिकारकत्त्व स्वीकारले आणि त्यांनी त्यावेळी लोकांवर आपल्या काव्याची मोहिनीच घातली होती.
कवि गोविंदाच्या कवितांच्या चौथ्या आवृत्तीमध्ये कृ. पां. कुळकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे गोविंदाचे काव्य हे क्रांतिकाव्य आहे. १९०० ते १९१० या दहा वर्षांच्या कालखंडात प्रत्यक्ष क्रांति त्यांनी घडवून आणली. .... त्या संबंधात समकालीन कविंच्या तुलनेत कुळकर्णी लिहितात की, .... क्रांतिकारकत्व प्रतिपादण्याची आकांक्षा प्रत्येक कलावन्ताला असते. त्याची उरि्म केव्हांना केव्हांतरी प्रत्येक कलावन्ताला होत असतेच. सौंदर्यप्रसाधन हे कलावन्ताचे उच्च ध्येय खरें. तेच सौंदर्यप्रसाधन मानवी जीवितप्रसाधनास कारणीभूत झाले तर ते उच्चतरच होइल, तेंच सौंदर्य प्रसाधन पुनः क्रांतीचे माध्यम अथवा वाहन करून मानवी जीवित साफल्यास कारणीभूत झालें तर तेंच सौंदर्यप्रसाधन उच्चतम होईल. अशा उच्चतम सौंदर्यप्रसाधनाच्या प्रतिभेच्या अवस्थेत असतांना कोणी कवि तुतारी फुंकतो, कोणी रणशिंग वाजवितो, कोणी मुरली घुमवितो, कोणी नव्या मनूंतील नवा शिपाई होतो, कोणी रुद्रास आवाहन करतो, तर कोणी क्रांतीचा जयजयकार करतो. ह्या अवस्थेत कोणी रक्तानें काव्य लिहितो तर कोणी अंगारानें काव्यरचना करतो. आमच्या ह्या गोविंद कवीनें त्याच प्रतिभेच्या अवस्थेत 'अफजुलखानाचा पोवाडा' गायिला, ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें' असा रोकडा सवाल केला, 'भारत प्रशस्ति' केली, 'भारतस्तव' केला, 'अंगदशिष्टाई' केली, 'यमाचा दरबार ' दाखविला, कारागृहाचें भय कोणास ' असा प्रश्न केला, ‘ बोधपर पुरातन मौज ' सांगितली, ' स्वतंत्रता देवी'चे स्वरूप वर्णिलें, श्रीरामचंद्राची प्रार्थना ' केली, व ‘श्रीरामदासांची आरती केली. गोविंदांच्या ह्या काव्यांनीं तत्कालीन तरुणांचीं मनें हलवून सोडली. महाराष्ट्रातील दोन पिढ्या जाग्या केल्या. क्रांतीच्या विचारांनीं महा राष्ट्रांतील सर्व वातावरण धुंद करून सोडलें. वाड्.मयाने मर्यादित क्षेत्रांत व कालांत का होईना पण क्रांति होणे शक्य आहे, याचे उदाहरण म्हणून गोविंदांचे काव्याचा निर्देश करणे योग्य होईल. या क्रांतिकारी कविच्या या पुस्तकाला नवीन पिढीलाही भावनेचा स्पर्श नक्कीच होऊ शकेल, त्यासाठी कवि गोविंदाचा हा भावस्पर्श अनुभवण्यासारखा आहे.
- रवींद्र यशवंत बिवलकर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा