सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून -९
धर्म... लौकिक आणि पारलौकिक
धर्म लौकिक वा पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सूक्ष्मपणे विचार केला आहे. तार्किक आणि तात्त्विक दोन्ही पद्धतीने ते धर्म संकल्पनेचा विचार करतात. मात्र हे सर्व करीत असताना त्यांचा निष्कर्ष ते ज्या पद्धतीने मांडतात, तो बुद्धिवादी आहे, विज्ञानाचिकित्सेला मानणारा आहे आणि तर्कशास्त्रालाही धरून ते संयमितपणे आपले मत व्यक्त करतात. किंबहुना यामुळेच त्यांच्या मनातील धर्माच्या संकल्पनेबद्दल अनेक हिंदुत्ववाद्यांना ते स्वीकारण्याचे धाडस झाले नाही, ते सावरकरांना आपल्याच मानसिकतेतून गृहित धरून पाहातात. त्यांनी सावरकरांना त्याच मानसिकतेमधून स्वीकारले, मानले आणि जाणले. तर हिंदुत्वाला न समजून घेता सावरकरांवर टीका करणाऱ्यांनाही विशेष करून डाव्या वा सावरकर विचारविरोधकांना त्यांचा बुद्धिवाद झेपला नाही. कदाचित त्यांच्या बुद्धीला ते स्वीकारावयाचे नव्हते. याचे कारण हिंदु या शब्दाबद्दल असणारी या विरोधकांची वा डाव्यांची आडमुठी वा पूर्वग्रहदूषित वृत्तीही कारणीभूत ठरली आहे. सावरकर यांच्या हिंदुत्वाबद्दल, हिंदु- अहिंदु व्याख्येबद्दल तसेच अन्य धर्मांच्या संबंधातील टिप्पणींबद्दल काही सांगण्याआधी त्यांच्या बुद्धिवाद, धर्माच्या लौकिक आणि पारलौकिक घटकांचा विचार पाहाण्यासारखा आहे. त्यामुळे सावरकरी हिंदुत्व नेमके कळण्यासही सुलभ होऊ शकेल, असे वाटते.
सावरकरांचा बुद्धिवादी विचार आहे, हे अनेकांना पटत नाही, कारण ते सावरकरांना हिंदु धर्माच्या जातीय गटामध्ये बसवतात. त्यामुळे सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठ, भूमिनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ हिंदुत्व मानणाऱ्या, हिंदुत्व सांगणाऱ्या व्यक्तीने नेमके हिंदुत्व काय सांगितले आहे, हेच अनेकजणांना उमजत नाही तर काही जाणीवपूर्व डोळेझांक करतात. धर्म या संबंधात सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचा लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही अंगाने विचार करता त्यांच्या तार्किक, तात्विक दृष्टिकोनातील सखोल, संयमित विचारधारणेची महत्तता कळून येते. आजही त्यांच्या काळाचा विचार करता ते यामुळेच अद्ययावत वाटतात. फक्त तो अद्ययावतपणा पाहाण्याची आपल्यामध्ये बुद्धी हवी, तशी नजर हवी. तसा तटस्थपणाही हवा.
या अनुषंगाने सावरकरांची विधाने लक्षात घेण्यासारखी आहेत.
।। ईश्वर, जीव, जगत यांच्या स्वरुपाचे नि परस्परसंबंधांचे आस्तिरुप वा नास्तिरुप असे त्रिकालाबाधित नियम असलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे जन्म, मृत्यु, पूर्वजन्म, स्वर्ग, नरक याविषयीही जी कोणती वस्तुस्थिती असेल ती निश्चितपणे सांगणारे ज्ञानही त्रिकालाबाधित म्हणवून घेण्यास पात्र असणारच. यास्तव या पारलौकिक प्रकरणीचे सिद्धांतही सनातन धर्म म्हणजे शाश्वत, अपरिवर्तनीय धर्म होत यात शंका नाही.
।। निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमाप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितीचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाच्या कसोटीस मुळीच उतरत नाहीत. सारी भिस्त बोलून चालून एका शब्दप्रामाण्यावर, आप्तवाक्यावर, विशिष्ट आंतरअनुभूतीवर अवलंबून असते.
।। काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण व आप्तवाक्य हेही एक प्रमाण आहेच आहे.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा