सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून -८
![]() | |
|
‘प्रकाश, उष्णता, गती, गणित, गणितज्योतिष, ध्वनी, विद्युत चुंबक, रेडियम, भूगर्भ, शरीर, वैद्यक, यंत्र, शिल्प, वानस्पत्य जैव, आणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे (सायन्सेस) आहेत त्याचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. ते नियम आर्यांसाठी, मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी, इस्रायलींसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते स र्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेत. हा खरा सनातन धर्म आहे. इतकेच नव्हे, तर हा खरोखर मानवधर्म आहे. हा केवळ 'कृते तु मानवो धर्मः’ नाही, तर त्रिकालाबाधित मानवधर्म आहे; म्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते.’
सावरकरांची धर्मासंबंधातील चिकित्सा अतिशय वास्तववादी आहे. किंबहुना नव्या कालाच्या दिशेने जगात होणाऱ्या बदलाची चाहुलच त्यांना लागलेली होती. त्यामुळे नजीकच्या काळात नागरी संस्कृतीचा होणारा कायापालट त्यांना स्वातंत्र्यापूर्वी बराच काळ आधी बौद्धिक स्तरावर पाहाता आला. मात्र आजही त्यांच्या त्या स्तरापर्यंत आम्ही जाऊ शकलो नाहीत. त्यामुळेच भारतात फाळणीनंतरही ना मुस्लीम बदलू शकले ना हिंदूना स्थैर्य मिळू शकले. प्रत्येकाची झुंड धर्मांच्या झुंजीतच लुप्त होत असल्याचे अतिशय विदारक सत्य आज पाहावे लागत आहे.
सनातन आणि धर्म याचे अतिशय सूक्ष्म विवेचन सावरकरांनी केले आहे. त्यामुळे सनातन धर्म ही एकच पदवी सरसकट पद्धतीने देताना मानवी बुद्धीच चुकली असल्याचे ते सांगतात. त्यामुळे रुढ अर्थच या संबंधातील विसंवादाला कारण आहे.
सावरकर म्हणतात त्यानुसार ‘सनातन शब्दाचा मुख्य अर्थ शाश्वत, अबाधित, अखंडनीय, अपरिवर्तनीय धर्म. हा शब्द, इंग्रजी ‘लॉ’ या शब्दाप्रमाणेच आणि तसाच मानसिक प्रक्रियेमुळे पुष्कळ अर्थांतरे घेत आला आहे.
प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियम. कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे नि व्यवहाराचे जो धारण, नियमन करतो तो त्या वस्तूचा धर्म. सृष्टीचे धर्म. पाण्याचे धर्म, अग्नीचे धर्म प्रभृती त्यांचे अपयोग या व्यापक अर्थीच होतात. याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थाच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागले. मग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत!
स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, इश्वर, जीव, जगत यांचे परस्परसंबंध, या साऱ्यांचा समावेश धर्म या शब्दातच केला गेला. इतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागार्थीच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झाला. आज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतो, की, या अर्थी धर्म म्हणजे 'रिलिजन.'
यावर सावरकर थांबत नाहीत, ते त्यापुढे जाऊन धर्म या शब्दाचे अधिक विश्लेषण करतात. त्यामुळे ते सांगतात की, ‘मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास अपकारक ठरतीलसे वाटले, त्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासले, तेही धर्मच मानण्यात आले. इंग्लीशमध्ये मोसेस, अब्राहाम, महंमद प्रभृती पैगंबरांच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या साऱ्या कर्मकांडास 'लॉ'च म्हटले आहे. या अर्थी धर्म म्हणजे आचार. शेवटी वरील आचार वगळून मनुष्यामनुष्यांतील जे केवळ ओहिक प्रकरणीचे व्यवहार असतात त्या व्यक्तीच्या वा राष्ट्राच्या वर्तननियमांसही पूर्वी धर्मच म्हणत. स्मृतीत युद्धनीती, राजधर्म, व्यवहारधर्म प्रभृती प्रकरणांतून हे गोवलेले असतात. पण आज यांपैकी पुष्कळसा भाग स्मृतिनिष्ठ अपरिवर्तनीय धर्मसत्तेतून निघून आपल्या इकडेही परिवर्तनीय मनुष्यकृत नियमांच्या कक्षेत शास्त्रीपंडितांनाही निषिद्ध न वाटावा इतक्या निर्विवादपणे समाविष्ट झालेला आहे. जसे गाडी हाकण्याचे निर्बंध, शिवीगाळ, चोरी, इत्यादिकांचे दंडविधान तो निर्बंधशासनाचा ( कायदेशासनाचा) प्रदेश होय. आपल्या अलीकडे धर्म शब्द आज जसा 'रिलिजन' या विशेषार्थी राखीव झाला आहे, तसाच इंग्लीशमध्ये 'लॉ' हा शब्द विशेषार्थी या निर्बंध शासनास आज वाहिला जात आहे. या प्रकरणी धर्म म्हणजे निर्बंध (कायदा 'लॉ').’
सनातन आणि धर्म या शब्दांच्या अर्थाची निष्पत्ती सावरकरांनी विस्तृतपणे केली आहे. त्यांनी सनातन म्हणजे काय हे सांगताना स्वमत परखडपणे व्यक्त केले आहे. ते सांगतात की, ' याचा अर्थ म्हणजे नियम, अपरिवर्तनीय, जे बदलू नयेत इतकेच नव्हे, तर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतील, नियम असतील, त्यासच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईल. इतकेच नव्हे तर सावरकर म्हणतात की, ‘ मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यांस, त्यांसच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो. निःशेष परिगमनास्तव नव्हे, तर दिग्दर्शनार्थ म्हणून खालील नामोल्लेख पुरे आहेत. '
‘प्रकाश, उष्णता, गती, गणित, गणितज्योतिष, ध्वनी, विद्युत चुंबक, रेडियम, भूगर्भ, शरीर, वैद्यक, यंत्र, शिल्प, वानस्पत्य जैव, आणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे (सायन्सेस) आहेत त्याचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. ते नियम आर्यांसाठी, मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी, इस्रायलींसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेत. हा खरा सनातन धर्म आहे. इतकेच नव्हे, तर हा खरोखर मानवधर्म आहे. हा केवळ 'कृते तु मानवो धर्मः’ नाही, तर त्रिकालाबाधित मानवधर्म आहे; म्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते.’
सावरकरांच्या या चिकित्सेतून धर्म आणि विशेष करून सनातन धर्म याचे विवेचन करीत मिळालेली दिशा ही सावरकरांच्या तार्किक आणि बुद्धिवादी भूमिकेला स्पष्ट करते. हिंदु- अहिंदु याची व्याख्या करताना सावरकरांनी यामुळेच भारताच्या वा हिंदुस्थानाच्या स्थानमहतीची मांडलेली संकल्पना ही यामुळेच अधिक तर्कशुद्ध आणि चपखल वाटते. कारण हिंदुत्व ही संकल्पना याच धर्माच्या अनुषंगाने मांडली आहे आणि त्यामागे असणारे सावरकरांचे दृष्टिकोन हे अधिक तार्किक आणि राष्ट्रनिष्ठ ठरतात. मानवी समाज, धर्म याची संकल्पना त्यांना अतिशय बारकाईने समजलेली वाटते. त्यामुळेच त्यांनी धर्म या संकल्पनेला हिंदुंसाठी भूमिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बनवले आहे. यामधूनच त्यांनी समाजसुधारणा करण्यासाठी रत्नागिरीत असताना स्थानबद्धतेच्या काळात जे कार्य आरंभिले ते हिंदुंसाठी दिशादर्शक होते. इतकेच नव्हे तर त्यावेळी लिहिलेल्या हिंदुत्व पुस्तकातूनही त्यांनी केलेले दिग्दर्शन स्पष्ट होते. हे सारे करीत असताना त्यांनी हिंदुधर्माने पूर्वापार टाकलेल्या सात बेड्यांना वा शृंखलांना तोडले ही बाबही त्याकाळातील अतिशय महत्त्वाची घटना होती. त्याचे महत्त्व खरे म्हणजे हिंदु धर्मातील सनातन्यांनीही समजून घ्यायला हवे होते. अनेकदा अशा प्रकारच्या वर्तनातून केवळ ठरावीक उद्दिष्ट साध्य होत असते असे नाही तर त्यातून नव्याने पाऊल टाकण्यास सुरूवात झालेली असते. जुन्या जुनाट आणि कालबाह्य होऊ शकणाऱ्या संकल्पनांना आणि रिवाजांना समजून त्या कालाप्रमाणे बाद करण्याचाही संकेत या त्यांच्या सात बेड्या तोडण्याच्या कृतीमुळे झाला होता. मात्र तो हिंदुंनी आजही समजून घेतलेला नाही. आजही अशा अनेक प्रकारच्या शृंखला तोडण्याची गरज आहे. मात्र हे करताना प्रत्येकजण ज्ञानेश्वर होणे गरजेचे आहे पण दुसऱ्याच्या घरात... अशा भूमिकेत असल्याने अशा या हिंदु समाजाला पुन्हा मनुवादी धर्माला चिकटण्याची वृत्ती गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाली. त्याला कारणे अनेक आहेत, परंतु आजही त्यामुळे पुन्हा कोणी सावरकर निर्माण होईल का, याची वाट पाहात बसल्यासारखे हिंदु बसून आहेत, हे दुर्दैव आहे. वास्तविक व्यक्तिवाद अतिशय तरलतेने समजलेल्या सावरकरांनी समाजासाठी जुन्या परंपरांही दुसऱ्या व्यक्ती करीत असतील तर ते स्वीकारले होते. त्यांनी त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यामध्ये अडथळा आणला नव्हता. ही भूमिका अतिशय समंजस असूनही आणि प्रत्येक मानवाला त्याचा तो व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार असतो, हे स्वीकारण्याची परिपक्वता त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे खरे म्हणजे साक्षर होत असलेल्या हिंदु समाजाने भूमिनिष्ठ हिंदुत्व स्वीकारतानाच बुद्धिवादी हिंदुत्वही स्वीकारण्याकडे कल तरी दाखवावयास हवा होता. मात्र तसे न होता, फाळणीपूर्वीच्या आणि फाळणीनंतरच्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये झालेल्या विविध राजकीय घडामोडींमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो हिंदु संकल्पिला होता, त्या हिंदु समाजाला मात्र व्यक्तिवादाची विज्ञानिष्ठ बौद्धिक उंची काही गाठता आली नाही. संघटनात्मक कार्यामध्ये या उंची ऐवजी मनुवादी दृष्टीला महत्त्व दिले गेल्याने आज हिंदु मतांचे ध्रुवीकरण राजकीय स्तरावर झाले असले तरी सामाजिक आणि समाजबौद्धिक स्तरावर हिंदुनेसचे ध्रुवीकरण झाले नाही. विज्ञानाची फळे ऐहिकदृष्टीने हिंदु चाखत असले तरी त्या विज्ञानाच्या कसोटीवर धार्मिक प्रथा-परंपरा,संस्कृती ही अद्ययावत काळातील विज्ञानयुगातही पारखली जाणे नक्कीच गरजेचे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर देश म्हणून विवेचन करताना मुस्लीम वा अहिंदु समाजासाठीही स्वतंत्र भारतात वा हिंदुराष्ट्रात काय स्थान असेल ते सांगताना त्यांनी मांडलेली भूमिकाही तितकीच सुस्पष्ट होती ...
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा