सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून -११
धर्मग्रंथांची क्लृप्ति प्रमाणहीन
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

| चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा |
सावरकरांनी लौकिक पारलौकिक या संबंधात धर्माशी संलग्न असणाऱ्या घटकांचे तसे बरेच विवेचन केले आहे. त्याविवेचनातून केलेले विश्लेषण हे बुद्धिवादी स्तरावर चपखलपणे उतरेल असेच आहे. या संबंधात तात्विक आणि तार्किक युक्तिवाद करताना ते पारलौकिक संबंधात सांगतात ती बाब आज सर्वांच्यादृष्टीने महत्त्वाची वाटते याचे कारण आज धर्माचे पालन आणि अनुकरण ज्या पद्धतीने केले जात आहे, ते लक्षात घेता सावरकरांच्या तत्वज्ञानाला समजून घेतले तर त्यांच्या नावाने सध्या काही धर्मवादी मंडळींकडून सावरकरांबद्दल पसरवले जाणारे विचार आणि किती अपप्रचारी असू शकतात ते लक्षात येईल.
सावरकर या पारलौकिकतेबद्दल ते मत मांडतात ते फार गांभीर्याने पाहावे लागेल. कारण त्यांच्या या पद्धतीच्या भूमिकेमुळे धर्म, राष्ट्र, भूमिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद या साऱ्या बाबतीत त्यांचे आकलन केले जाणे सोपे होऊ शकेल.
।। अनुभव व शब्द यापैकी कोणत्याही प्रमाणाने पारलौकिक वस्तुस्थितीचे आज उपलब्ध असलेले वर्णन हे सिद्ध होत नसल्यामुळे त्यास सनातन धर्म, त्रिकालाबाधित नि अपरिवर्तनाय सत्य असे म्हणता येणार नाही. तशा कोणत्याही विधेयास तसे सिद्धांतरुप येताच तेही आजच्या सनातन धर्माच्या स्मृतीत गोवले जाईलच; पण आज तरी तो विषयच प्रयोगावस्थेत आहे आणि आप्तांची व अपौरुषेय ग्रंथांची ही तद्विषयक विधाने सिद्धांत नसून क्लृप्ति (Hypothesis) आहेत, फार तर सत्याभास आहेत; पण सत्य नव्हेच ! ती जाणण्याचा प्रयत्न यापुढेही व्हावयास हवा.
ऐहिक - लौकिक व पारलौकिक या संबंधात त्यांची भूमिका सुस्पष्ट आहे. ती सत्याला सामोरे जाणारी आणि सत्य स्वीकारणारी आहे. त्या आधारे ते धर्मग्रंथामधील असमारे वर्णन हे गृहित आहे असे सांगत विज्ञाननिष्ठ वा प्रयोगसिद्ध मार्गाने चिकित्सा करण्याचा सतत मागोवा घेतात. ते अगदी तार्किक आणि तात्विकतेनेही याची चिकित्सा करतात.
।। मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनास उपकारक आहेत असे समजले जाओ, त्यास आम्ही आचार हा शब्द योजतो. अर्थात् वर दर्शविल्याप्रमाणे पारलौकिक जीवनासंबंधी आस्तिपक्षी वा नास्तिपक्षी अजून कोणताही नक्की सिद्धांत मनुष्यास कळलेला नसल्यामुळे त्याला कोणता ऐहिक आचार उपकारक होईल हे ठरविणे अशक्य आहे. हिंदूंच्याच नव्हे तर मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी यहुदी प्रभृति झाडून साऱ्या धर्म ग्रंथातील कर्मकांडाचा पाया अशा वाळूच्या ढिगावर उभारलेला आहे. 'क्ष' हे बेट की गांव, रान की वैराण, पूर्वेस की उत्तरेस, आहेच की नाही हेच जिथे निश्चित केले नाही; तिथे 'क्ष' भूमध्ये सुखाने नांदता यावे म्हणून कोणत्या दिशेने जावे आणि कोणती शिधा-शिदोरी तिथे उपयोगी पडेल, यावे बारीकसारीक अपरिवर्तनीय नियम बनविणे किती अनमानधपक्याचे काम ? तसेच हे यास्तव अमुक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतो, असे सांगणाऱ्या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत व अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाही. या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत. त्याच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्म, शाश्वत सत्य असे म्हणता येत नाही.
इतके सांगताना एक लक्षात येते की सावरकरांनी हिंदुत्व, धर्म, समाज, रुढी, परंपरा रीतीरिवाज अशा सर्व बाबींचे सखोल अभ्यास आणि चिंतनाने हिंदुत्वाला साकारताना भूमिनिष्ठ, विज्ञानिष्ठ केले पण त्याचबरोबर त्या सर्व बाबी मांडताना हिंदुनी आपल्या इतिहासालाही न विसरता वर्तमानाकडे कसे बघावे आणि ती बाब केवळ हिंदुच नव्हे तर अन्य धर्मांबद्दलही त्यांनी तटस्थपणे सांगितली आहे. देव, विश्व, मानवता, मानवधर्म, पृथ्वी, उपयुक्ततावाद अशा विविध घटकांना सावरकरांनी कसे पाहिले, त्या संबंधात त्यांचे विचार काय होते, ते पाहिले तर समाज आणि मानवतेचा उत्कर्ष व्हावा अशी त्यांची तळमळ असल्याचे दिसते. हीच तळमळ एका परीने सर्व मानवाला समान नजरेतून पाहाणाऱ्या आणि सर्वांना समभावाने जगण्यास शिकवणाऱ्या तत्त्वज्ञान्याची वाटते, हेच सावरकरांच्या भूमिकेचे प्रमुख गमक म्हणावे लागते. तूर्तास इतकेच.
- रवींद्र यशवंत बिवलकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा