रविवार, ११ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - १  

मानवी अधिष्ठानाचा बुद्धिवाद
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे आणि त्याही पलीकडे जाऊन मानवता, देश, भूमिनिष्ठा, धर्म याचाही विचार करीत समाजाच्या बदलाची संकल्पना तयार करणे आणि ती त्या बदलत्या काळानुसार कशी स्वीकार्य आहे, हे सांगण्यासाठी एक अद्ययावत, विज्ञानवादी भूमिका मांडणे हे सर्वात मोठे काम, सावरकरांनी केले आहे. तितके मोठे काम हे १९ व्या शतकानंतर फार कमी लोकांनी केले आहे. काहींनी अंशत: करण्यास सुरुवात केली असेल, काहींनी त्यातील एक विशिष्ठ घटक मांडला असेल तर काहींनी आयुष्याचा मिळालेला अल्पकाळही त्या कामासाठी वाहिला असेल. मात्र सावरकरांनी अखेरीपर्यंत हे काम निष्ठेने आणि दृढपणे केले आहे. विविधांगाी विचार करून त्यांनी तत्त्वज्ञानच मांडले आहे.

धर्म म्हणजे काय, तो कशासाठी, त्याचा उपयोग काय याबद्दल विचार करताना ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही अंगानी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी विचार केला. नवीन कालाच्या परिमाणांना सामोरे जावे, यासाठीही त्यांनी सतत प्रतिपादन केले. त्यामुळे एखादा विषय मांडताना त्यांनी ठामपणे आपले प्रतिपादन केले आहे. त्यांची काही वाक्ये ही त्यामुळेच अतिशय अनुकरणीय अशी आहेत.

🔷।। आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानवधर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर.

🔷।। अधिकांत अधिक मनुष्याचे हित हेच सर्व सद्गुणांचे समर्थन होय.

त्यांची ही दोन वचने इतकी खुल्या पद्धतीने मानवता सांगणारी आहेत. विश्वाची निर्मिती, तो निर्माण करणारा देव, त्याचा हेतू याबद्दलही त्यांनी अशा दृष्टीने केलेले विवेचन गंभीरपणे लक्षात घेण्यासारखे आहे.  सावरकरांचे सर्व लिखाण पाहाताना ते नास्तिकही होते आणि आस्तिकही होते तसेच ते नास्तिकही नव्हते आस्तिकही नव्हते, असे म्हणावे लागते. कारण ते अद्ययावत बनण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञानी होते. याचेच एक प्रमाण वाक्य म्हणजे

🔷।। देवाने हे सारे विश्व मनुष्यास मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखासाठीच निर्मिले आहे, ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे.

त्यांचे हे असे सांगणे कोणत्याही विचारसरणीच्या, अपौरुषेय धर्मसंस्थेला सर्वस्व मानून जाणाऱ्याला धक्का देणारे आहे. पण त्याचबरोबर ते वास्तवही आहे, त्याची जाणही देणारे आहे.

त्यांचे साहित्य मग ते निबंध असो वा काव्य त्यांची भूमिका ही काय स्पष्ट आणि ठाम राहिलेली आहे. त्यांच्या विचारामधून सनातन धर्म या संकल्पनेचा अर्थ सुस्पष्ट आहे. त्यांचे विचार हे प्रामुख्याने मानवकेंद्रीत होते, मानवाच्या हितासाठी वा त्या संदर्भात आहेत. ऐहिक जीवन या मुद्द्याला त्यांनी गंभीरपणे पाहिलेले दिसते. त्यामुळेच अशा ऐहिकतेसंबंधात जगणाऱ्या एकंदर मानवी समाजाने, माणसानेही कोणते नियम पाळावेत, यासाठी ते आग्रही असल्याचे दिसतात, वा कटाक्षाने त्याबद्दल ते विचार करतात. त्यादृष्टीने त्यांनी समाजसुधारणेसाठी रुढ हिंदुधर्मातील जातीव्यवस्था संपुष्टात आणण्याचे केलेले काम, जुन्या धर्माने घालून दिलेल्या बेड्यांमधून समाजाला मुक्त करण्याची त्यांची कृती या साऱ्या बाबी या मानवहिताभोवती आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या देश- राष्ट्र संकल्पनेभोवती त्यांचे धर्मविचार केंद्रीत झालेले आहेत.  यामुळेच धर्म या शब्दाचा अर्थ त्यांनी ज्या पद्धतीने स्वीकारला आहे, तो बुद्धिवादाला बरोबर घेऊन जाणारा आहे. त्यांचा धर्म बुद्धिवादाशी निगडित राहतो. विज्ञानाला स्वीकारीत नवबदलांना सामोरे जाऊ पाहातो. यासाठीच सावरकरांच्या विचारांसंबंधात पाहाताना देव, विश्व, सृष्टी,  या संबंधातील त्यांचा तार्किक आणि तात्विक विचार लक्षात घेतला तर खऱ्या अर्थाने सावरकर समजू शकतील. अर्थात त्यासाठी तितके गांभीर्य हवे, संवेदनशीलता हवी. ज्याला हे तार्किक बारकावे समजतील तो ही सावरकरी तत्त्वज्ञानातील एक तर्कनिष्ठ होऊ शकेल. सावरकरांचे हे तत्त्वज्ञान त्यांच्या हिंदुत्वाइतकेच गहिरे आहे.

(क्रमश:)

- शल्य बोचरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...