रविवार, ११ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - २  

वैश्विक विचाराचा सूत्रधार


विज्ञाननिष्ठ निबंधामध्ये सावरकरांनी ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव!’ या निबंधात- लेखात मांडलेली तार्किकता खरे म्हणजे सावरकरांच्या देव, धर्म, विश्व, समाज, रिती रिवाज- आदी विविध घटकांना तपशीलवार उलगडत जाते. त्यामुळे अनेकांना ‘आस्तिक’ वाटणारे सावरकर हे ‘नास्तिक’ वाटू शकतात.

विश्व, देव अशा संकल्पनांबद्दलही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुस्पष्टपणे आपले विचार मांडले आहेत. किंबहुना ते वाचल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर सावरकरांचे देव मानणे वा आजच्या सर्वसाधारण भाषेत आस्तिक असणे या बाबीला तडा जाऊ शकतो. पण सावरकरांच्या या विचारांबद्दल हिंदु समाजाने अतिशय सोयीस्करपणे काणाडोळा केला आहे. एकप्रकारे त्याकडे दुर्लक्षच केले आहे. सावरकरांचे तत्त्वज्ञान हे देव, रीती रिवाज, धार्मिकता, सर्वसामान्यांच्ये धर्म या संकल्पनेबद्दलचे मत वा धारणा यापेक्षा वेगळे होते, किंबहुना ते अधिक सखोलपणे तात्विकतेने मांडलेले आहे. यामुळे त्याकडे अधिक गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे.  माणसाने विश्वाची दोन भागात विभागणी केलेली आहे, यावर सावरकर सांगतात ते लक्षात घेण्यासारखे आहे.

🔷।। सुरुप आणि कुरुप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदुल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवीं आणि राक्षसी, ही सगळी द्वंदे, मनुष्य हा ह्या यच्चयावत् विश्वाचा, वस्तुजाताचा केंद्र कल्पिल्यामुळेच, मध्यबिंदु समजला जाताच, अकस्मात उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुप्यास जो दुःखद तो दुसरा. पहिला चांगला, दुसरा वाईट ... ज्याने मनुष्यास सुखद होणारा चांगला भाग निर्मिला तो देव आणि दु:ख देणारा दुसरा... तो राक्षस...

विज्ञाननिष्ठ निबंधामध्ये सावरकरांनी ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव!’ या निबंधात- लेखात मांडलेली तार्किकता खरे म्हणजे सावरकरांच्या देव, धर्म, विश्व, समाज, रिती रिवाज- आदी विविध घटकांना तपशीलवार उलगडत जाते. त्यामुळे अनेकांना ‘आस्तिक’ वाटणारे सावरकर हे ‘नास्तिक’ वाटू शकतात. मुळात आजही अनेकांच्या मते ‘आस्तिक’ म्हणजे देव मानणारा आणि ‘नास्तिक’ म्हणजे देव न मानणारा असा अर्थ काढला जातो.  तो आधी स्पष्ट करणे आवश्यक वाटते. वेदप्रामाण्य मानणारा आणि वेदप्रामाण्य न मानणारा असे विभाजन आस्तिक आणि नास्तिक या दोन संकल्पनांनामध्ये आहे. हे वाचकांनीही लक्षात घ्यायला हवे. तत्त्वज्ञानासारखा विषय ज्यावेळी सावरकर हाताळतात, तेव्हा त्यांनी त्यामध्ये सखोल विचार आणि चिंतन केलेले आहे, असे सुस्पष्ट जाणवते. मात्र हे आपल्यापर्यंत नीट पोहोचणे गरजेचे आहे, त्ासाठी आपल्या सोयीप्रमाणे त्याकडे पाहाता कामा नये, हे महत्त्वाचे.

या विश्वाच्या आकलनातून त्यांनी मानवानेच त्या विश्वाची उपयुक्तता मोजली असल्याचे सांगितले. सावरकरांचे हे मत त्यांच्या बौद्धिक आणि तार्किक अशा उच्च स्तरावरचे वाटते. पण त्यातून विचार करण्याची कुवत सध्या न राहिल्याने सावरकरांना समजण्यात आणि त्यांना केवळ धार्मिकतेच्या पारड्यात ठेवून हिंदुपुरते मर्यादित ठेवण्याचा करंटेपणा आजही अनेकजण करीत आहेत. विश्व विचाराच्या चिंतनात सावरकर यांची धारणा अनुभवावी अशी आहे.

🔷।। विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादी सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकणार. विश्वातील वस्तुजात एकेकी गणून, तिचे पृथक्करण करून, ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंत्री करीत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोषातील वस्तुजाताचे मोजमाप करणे केवळ अशक्य असे समजून आपल्या प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी आपल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच ज्या अर्थी हे सर्व विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणारे आहे ते जाऊ शकते, त्या अर्थी त्याचे 'पंचीकरण' करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरविले ते आहे! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करायची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या ठायी या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.

सावरकरांची ही विचार मांडणी लक्षात घेता त्यांची धर्म, समाजविषयक धारणा किती सखोल होती ते लक्षात येते. मात्र त्याचबरोबर ते अशा प्रकारच्या बौद्धिकाने समाजाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात, ते समाजातील व्यक्तिवादाला चालना देण्याचा प्रयत्न करतात. आपला विचार कोणावर लादण्याऐवजी लोकांनी विचार करावा आणि त्यातून शहाणपण शिकावे, अशी दृढ धारणा त्यांच्या लिखाणातून दिसते. ही समाजसुधारक आगरकरांसारखी तिखट बोचरी आणि प्रवृत्तीपर आहे.

विश्वाच्या ताकदीबद्दल, क्षमतेबद्दल आणि व्याप्तीबद्दलही त्यांची चिंतन वृत्ती यामुळेच अधिक प्रवाही वाटते. ते म्हणतात ...

🔷।। ती विश्वाची आद्यशक्ती ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होअल तसा त्याचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट, अशी नीति-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले, आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते या दोन्हीही समजुती खुळचट आहेत. कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत. पण विश्व आपले नाही. फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे. फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे- असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे, समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!

सावरकरांच्या या भाष्यामधून सावरकरांचा व्यापक मानवतावादी दृष्टिकोन दिसतोच पण तो धर्म- जात, प्रदेश भाषा या सर्वांना पार करून जाणारा असल्याचेच दिसून येते. त्यांचे हिंदुत्व, समाजसुधारणावादी विचार, विज्ञाननिष्ठ, भूमिनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ तळमळ याच चिंतनातून तयार झालेली आहे.

(क्रमश:)

- शल्य बोचरे

 (लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...