तत्वज्ञान सावरकरांचे - ३
बुद्धिवादातून सूक्ष्मविज्ञानाकडे
धर्मासारखा एक महत्त्वाचा घटक माणसाने निर्माण केलेला आहे. त्याचा अर्थ सावरकरांनी अतिशय अचूकपणे मांडला आहे. चमत्कार आणि चमत्कृती यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळेच देवाबद्दलच्या लोकांच्या कल्पनांना ते तडा देणारे बोलतात, सांगतात. यामागे त्यांचा हेतू अतिशय सुस्पष्ट आणि ऐहिकतावादाकडे झुकणारा आणि लौकिकताही नीट उमजून घेणारा आहे. याचे कारण पारलौकिक प्रकार त्यांना अधिक सूक्ष्मपणे समजलेला आहे. त्यातूनच ते आपले हिंदुत्व साकारताना या सर्व आपल्या तत्त्वज्ञानाला आणि तार्किकतेला समांतर असेच भूमिनिष्ठ समूहजीवनाला साकारताना दिसतात.
प्रत्यक्ष जीवन जगताना माणसासमोर असणारे सत्य स्वीकारण्याची ताकद स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होती. किंबहुना मानवतेबरोबरच जीवन जगण्याची ऊर्मी विविधांगांनी तयार होत असते. यामध्ये धर्मासारखा एक महत्त्वाचा घटक माणसाने निर्माण केलेला आहे. त्याचा अर्थ सावरकरांनी अतिशय अचूकपणे मांडला आहे. चमत्कार आणि चमत्कृती यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळेच देवाबद्दलच्या लोकांच्या कल्पनांना ते तडा देणारे बोलतात, सांगतात. यामागे त्यांचा हेतू अतिशय सुस्पष्ट आणि ऐहिकतावादाकडे झुकणारा आणि लौकिकताही नीट उमजून घेणारा आहे. याचे कारण पारलौकिक प्रकार त्यांना अधिक सूक्ष्मपणे समजलेला आहे. त्यातूनच ते आपले हिंदुत्व साकारताना या सर्व आपल्या तत्त्वज्ञानाला आणि तार्किकतेला समांतर असेच भूमिनिष्ठ समूहजीवनाला साकारताना दिसतात. सर्वसाधारणपणे वैदिक हिंदु धर्माला मानणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून धर्माच्या नावाने जीवन जगण्यास सांगणाऱ्या नियमांच्या समुच्चयाला स्वीकारणाऱ्या हिंदुधर्माचा, भारतातील अन्य विविध उगम पावलेल्या धर्मकल्पनांना स्वीकारून जीवन जगणाऱ्या पारलौकिक स्तरावर धर्म मानून तो ऐहिक जीवनात कर्मकांडाद्वारे उतवणाऱ्या संकल्पनेला म्हणजेच त्या धर्माचा आणि हिंदुत्वाचा तसा काही संबंध नाही. किंवा सावरकरांचे हिंदुत्व हे सामान्यपणे लोक मानत असलेल्या वैदिक- वेदप्रामाण्य मानणाऱ्या वा न मानणाऱ्या पारंपरिक हिंदुधर्माला कर्मकांडाने स्वीकारणारे नाही. ते हिंदुत्व हे भूमिनिष्ठ समाजाला एकीकृत करण्यासाठी त्यांनी मांडले आहे. धर्म म्हणून लोकांनी काय स्वीकारावे, त्याबद्दल म्हणजे वैदिक धर्माचे, भारतात निर्माण झालेल्या ज्या तत्त्वज्ञानावर आधारित जे धर्म, पंथ आहेत त्या आधारे जगण्याचे नियम सांगणारे सावरकरांचे हिंदुत्व मार्गदर्शक नाही. त्यांचे हिंदुत्व हे त्यांनी मांडलेल्या व्याख्येनुसार दिलेल्या भूभागातील रहिवास असलेल्या या भूमीमध्ये निर्माण झालेल्या धर्मांच्या एकत्रित जगत असेल्या समूहाला म्हणजेच हिंदुस्थानातील या व्यक्ती समूह, पंथ यांचे एकत्र आणून, बळकट समाजाभिमुख करण्यासाठी आहे. या भूभागाला असणारे वैशिष्ट्य हे राष्ट्र म्हणून कसे स्वीकारावे ते सांगणारे आहे. त्यासाठी ते इतिहासातील विविध घटनांचा मागोवा घेत, माहिती देत या हिंदुराष्ट्रातील वा या भूभागातील एकत्रित जीवन जगणाऱ्या आणि त्या भूभागात निर्मिलेल्या पंथ, धर्म, गट, विचार यांना धरून- त्यांनी मांडलेल्या जीवनपद्धतीला स्वीकारणाऱ्यांना ते हिंदु म्हणतात. त्यांचा इतिहास सांगताना तो देदिप्यमान होता, पराभूतांचा नव्हता, असे सांगत सावरकर हिंदुना जागृत करीत ते ज्वालामुखीप्रमाणे धगधगत्या स्वरुपात सामावू पाहातात. याचे कारण त्यांना हिंदु संघटन करण्यासाठी कोणत्याही वेदाधिष्ठित समूहाची, वैदिक- अवैदिक तत्त्व धरून श्रुतिस्मृति पुराणोक्त कर्मकांड वा नियमावलीची, धर्म नीतीची गरज भासत नाही. त्यांना हिंदु संघटन करण्यासाठी या भूमिनिष्ठांमधील भूमीप्रती असणारी संवेदना, चेतना, जाणीव, संवेदना कालानुसार जागवायची होती. त्यांचा हा हिंदुत्व धर्म आहे. जो हिंदुत्व धर्म भूमिनिष्ठ आहे आणि कालानुसार मार्गक्रमण करणारा म्हणजे कालाप्रमाणे जगणारा आहे. यामुळेच सावरकर हे गृहितक मांडून तर्कशास्त्राच्या आधाराने मनुष्य आणि सृष्टी यांचा संबंधही ज्या प्रकारे मांडतात, त्या प्रकाराला जातीय नव्हे, प्रचलित अशा हिंदु संकल्पनेनुसार मांनलेल्या हिंदुधर्मानुसार - तत्त्वज्ञानानुसार नव्हे तर बुद्धिवादाला आधारभूत ठेवून आहे. त्यातून सूक्ष्मविज्ञानालाच त्यांनी स्वीकारले आहे. अशा बुद्धिवादी पद्धतीला आपण अजूनही समजून घेतलेले नाही. मानवतावाद, विज्ञान, प्रत्यक्षानुभूती घेण्याची तळमळ, तर्कशास्त्राला स्वीकारून जीवनपद्धती ठरवण्याचे त्यांचे दिग्दर्शन हे महत्त्वाचे ठरते.
सावरकर विश्व आणि निसर्ग यांचा संबंध अतिशय तार्किकपणे समजावून देतात, ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ या निबंधामधून सावरकरांची ही तार्किक विचारसरणी सहजपणे दिसते. विश्व आणि मानव यांचा संबंध हा तसे म्हणजे गहन आणि क्लीष्ट विषय आहे. मात्र अध्यात्म तो ज्या पद्धतीने मांडतो त्यापेक्षा सावरकर हा तर्काधिष्ठित बुद्धिवादी मांडणीने तो समजावतात. मात्र तो आपल्याला झेपत नाही. कारण ते सत्य आहे आणि ते स्वीकारण्याची तयारी आपली हवी, असेच म्हणावे लागते. विश्व आणि मनुष्य यांच्या संबंधात सावरकरांचे विचार जहाल, प्रखर, बुद्धिवादी आहेत की ते आपल्याला स्वीकारता येतील का, ते खरोखरच ठरवावे लागेल. इतके ते बुद्धिवादाला स्वीकारून वास्तवतेची धग देणारे आहेत. सावरकर म्हणतात...
🔷।। कोणत्या हेतुने वा हेतुवाचून हे जगव्याळ विश्व प्रेरित झाले आहे, हे मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही.
🔷।। देवाने हे सारे विश्व मनुष्यास मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखासाठीच निर्मिले आहे, ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे.
🔷।। जशी कीड, मुंगी, तशाच ह्या अनादि अनंत कालाच्या असंख्य उलाढालीत, हा मनुष्यही एक अत्यंत तुच्छ परिणाम होय. त्याला खायला मिळते म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत, कोथिंबीर खमंग झालेली नाही. धान्य पिकते म्हणून तो खावू शकतो, इतकेच काय ते. पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता, तेव्हाही नद्या वाहतच होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्यावाचूनच काय पण, पृथ्वी नव्हती तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता, आणि हा सूर्यही जरी त्याच्या साऱ्या ग्रहोपग्रहा सुद्धा हरवला तरी, एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेले वाटते तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. विश्वाच्या देवाला एक पलाचेही सुतक, असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरु लागले तरी, धरावे लागणार नाही.
🔷।। ज्या कोणत्या हेतुने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगद्व्याळ चालू आहे, तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या मापाने मोजता यावे, इतकें नि इतक्या सोयी उपभोगिता येतात, हा मात्र आणि एवढाच काय तो विश्वाचा देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर या विश्वाची रचना त्या विश्वाच्या देवानें केली असती तर, त्याचा हात कोण धरणार होता ? हे सुगंध, हे सुस्वर, हे सुख स्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि या सोयी आहेत, त्याही अमुप आहेत. ज्या योगायोगानें मनुष्यास या सर्व लाभत आहेत, त्या योगायोगाला शतशः धन्यवाद असोत !
🔷।। विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही; फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे. असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेवून त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरीखरी तीच पूजा !
सावरकरांची ही सारी विधाने पाहाता त्यांचा केवळ बुद्धिवादच नव्हे तर देव, देवाची पूजादी कर्मे तसेच निसर्ग आणि त्याविषयीची कृतज्ञतेची जाणीव आणि अतिशय सखोल-सूक्ष्म चिंतन यातून त्यांनी समाजाला, हिंदुभूमीतील हिंदुंच नव्हे तर एकंदर मानवालाच चेतवण्याचा, जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा विचार सक्षमतेने आपल्यामध्ये तरी जोडण्याचा, आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न पडतो. त्यांचे हे विचार पारंपरिक हिंदुधर्मनियमांच्याही पलीकडे मानवाला आणि हिंदुंना नेणारे आहेत. पारंपरिक श्रद्धेतून विज्ञाननिष्ठ- तर्कनिष्ठत्व विचारसरणीकडे माणसाला नेऊ पाहातात. ते हिंदुस्थानातील कितींना झेपले आहे, उमगले आहे, यातच सावरकर यांच्या बुद्धिवादाचे आकलन झाले असे म्हणता येऊ शकेल.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा