मंगळवार, १३ जून, २०२३

  तत्वज्ञान सावरकरांचे - ४  

वास्तवतेला स्वीकारणारे सावरकर
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

सावरकरांचा विचाराच्या दिशेतूनच त्यांच्या बुद्धिवादाचे सत्त्व समजून येते. देव या सर्वसामान्य संकल्पनेपेक्षा त्यांचा ‘देव’ वेगळा आहे. त्या देवाची ‘पूजा’ ही देखील वेगळी आहे. ते वास्तवाला, प्रतिकूलतेलाही सामोरे जाऊन आव्हानांना तोंड देणारे व्यक्तिमत्त्व आहे. आव्हानांना मोडीत काढणारे त्यांचे वैचारिक रूप हे वास्तववादाच्या तत्त्वाला स्वीकारणारे आहे.

वास्तवतेला स्वीकारण्याचा, वस्तुस्थितीला सामोरे जात, वस्तुस्थितीचे आव्हान स्वीकारण्याचा आणि त्या वस्तुस्थितीला वैज्ञानिकदृष्टीने, तारतम्याने समजावून घेत विचार मांडण्याचा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू हे केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या स्वातंत्र्यवीराचेच नव्हते तर प्रखर वास्तववादी होते. बुद्धिवादी दृष्टीकोनातून जुन्या कल्पनांना बाजूला सारत, त्यातील तथ्ये पडताळून मगच ती स्वीकारायची की नाहीत ते सांगणारे तत्त्वनिष्ठ असे हे व्यक्तिमत्त्व होते. सावरकर हे केवळ या कर्मकांडाने भरलेल्या हिंदु धर्माभोवती पिंगा घालणारे नव्हते तर हिंदु या शब्दाला नवा आयाम प्राप्त करून देत हिंदु हा शब्द- संकल्पना; अद्ययावत आणि नव्या कालाला सामोरे जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचे जनकच त्यांना म्हटले पाहिजे. किंबहुना आजही धर्म- रितीरिवाज, कर्मकांडे याच्याभोवती किंवा चमत्काराभोवती वा आमच्या पंरपरेत विज्ञान कसे होते, यासाठी अट्टाहासाने काही सिद्ध करण्याच्या आवेशाने काम करणाऱ्या आणि तो भारतातील प्राचीन हिंदु धर्म म्हणून सांगत फिरणाऱ्या हिंदुंना सावरकरांचे हिंदुत्व पूर्ण समजलेले आहे, असे म्हणता येत नाही. सावरकरांचे हिंदुत्व हे मुळात आज हिंदुत्व हा शब्द राजकारणी, हिंदु संघटनांचे अग्रणी म्हणवणारे नेते, प्रतिनिधी, इतकेच नव्हे तर संन्यासी म्हणवून घेणाऱ्या काही अशाच अग्रणींना  हिंदुत्व न कळलेल्या गटात समाविष्ट करावे लागेल. ज्याप्रमाणे सावरकरांवर भलतेसलते आरोप वा टीका करणाऱ्यांना सावरकर समजलेच नाहीत तसेच सावरकरांना आपले म्हणणाऱ्यांनाही सावरकर झेपले नाहीत, असेच अनेकदा दिसून येते. तरुणपिढीने यासाठीच सावरकरांचा बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, त्यांचा वास्तववादी दृष्टिकोन, त्यांचा हिंदुनिष्ठ राष्ट्रधर्म सतत काळाबरोबर राहाण्याचा अद्ययावत राहाण्याचा विचार याबद्दल वाचून, अभ्यास करून सावरकर समजून घेतले पाहिजेत.

विश्व आणि विश्वाचा देव या संबंधात सावरकर काय म्हणतात ते पाहाण्यासारखे आहे. ते म्हणतात...

🔷।। विश्वात आपण आहोत, पण विश्व आपले नाही; फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे. असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेवून त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरीखरी तीच पूजा ! 

सावरकरांचा या विचाराच्या दिशेतूनच त्यांच्या बुद्धिवादाचे सत्त्व समजून येते. देव या सर्वसामान्य संकल्पनेपेक्षा त्यांचा ‘देव’ वेगळा आहे. त्या देवाची ‘पूजा’ ही देखील वेगळी आहे. ते वास्तवाला, प्रतिकूलतेलाही सामोरे जाऊन आव्हानांना तोंड देणारे व्यक्तिमत्त्व आहे. आव्हानांना मोडीत काढणारे त्यांचे वैचारिक रूप हे वास्तववादाच्या तत्त्वाला स्वीकारणारे आहे.

अलीकडच्या काळात हिंदु, हिंदुत्व याची मनमानी व्याख्या करीत वा प्रचलित राजकारण आणि राजकीय वा तत्संबंधित संघटना यांच्याशी संलग्न असलेल्या व्यक्ती, त्यांचे विरोधक वा टीकाकार इतकेच नव्हे तर त्या राजकारण, संघटना यांचे प्रतिनिधी- अनुयायी हे देखील  हिंदु- हिंदुत्व सांगत आहेत, त्याचा आणि सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेचा दुरान्वयानेही संबंध नाही. इतकेच कशाला त्यांच्या संबंधात (विरोधक वा टीकाकार आणि तथाकथित अनुयायी) तत्त्वज्ञान असा शब्दही वापरणे अयोग्य आहे, इतके सावरकरांचे विचार हे मूलगामी, वास्तववादी आहेत.

प्रचलित हिंदुत्व, त्यातील चातुर्वर्ण्य, त्यातील जातिव्यवस्था, त्यातील रुढ- रिती रिवाज या सावरकरांच्या हिंदुत्वाचा भाग नाहीत. सात बेड्या जशा त्यांनी तोडल्या त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पोथिनिष्ठ धर्माला, पोथ्यांना कपाटात ठेवून देणेच इष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळेच सावरकरांच्या धर्माला पोथी नाही, त्यांचा हिंदु हा भूमिनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून आणि विविध ऐतिहासिक आक्रमणातून मुक्त करण्यासाठी उभारलेला तसेच अशा प्रकारच्या आक्रमणाने शहाणा होऊन राष्ट्र संकल्पनेला सामोरा जाणारा हिंदु आहे. या हिंदुंच्या जाणीवा आक्रमणातील विविध भीतींपासून नव्या अद्ययावत विज्ञानवादाला सामावून घेणाऱ्या असाव्यात तसेच अहिंदुंनाही सामावून घेत राजकीय शहाणपणातून राष्ट्र संकल्पनेला, मानवतेला समजून आतापर्यंत झालेल्या आक्रमणासारख्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सिद्ध होणाऱ्या असाव्यात अशीच सावरकरांच्या हिंदुची धारणा आहे. हीच त्यांच्या हिंदुत्वाच्या एकसंघटितपणाची शक्ती आहे. ती शक्ती आम्हाला कळली आहे का, याचे चिंतन होणे गरजेचे आहे.

ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय? या निबंधात समर्थ रामदास स्वामींच्या ... सामर्थ्य आहे चळवळीचें। जो जो करील तयाचें। परंतु तेथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।

या चरणाचा उल्लेख केला आहे. केवळ उल्लेख केलेला नाही, तर त्यातून प्रचलित अर्थ सांगत त्याला विरोध न करताही त्यांनी त्याची फोड करीत ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे नेमके काय असते, याचे विवेचन अतिशय तार्किक आणि बुद्धिवादी पद्धतीने केले आहे. या निबंधात महाराष्ट्राच्या इतिहासाचे जसे विवेचन आहे तसेच त्यातून आपण काय शिकावयाचे त्याचेही सुंदर सूत्र त्यांनी मांडले आहे. त्यात ईश्वर येतो, धर्म येतो, धर्मवेड येते, मुस्लीम अत्याचाराचे वर्णन येते, आपल्या उणीवाही येतात अशा विविधांगी तपशीलांमधून सावरकर ईश्वर आणि त्याचे अधिष्ठान समजावून सांगतात तोच खरा वास्ववादाला सामोरे जाणारा विचार असल्याचे प्रचलित हिंदुने ध्यानात घ्यायला हवा. या निबंधातील विवेचनातून सावरकरांच्या हिंदुत्वाचे वैचारिक आणि वास्तववादी अधिष्ठान नक्कीच प्रत्ययास येऊ शकते.

(क्रमश:)

- शल्य बोचरे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...