तत्वज्ञान सावरकरांचे - ५
आधुनिक समाजधारणेचा तत्त्ववेत्ता
सावरकरांची मानवी समाज या विषयी असणारी धारणा स्पष्ट होते. जी ऐहिक आहे, पारलौकिकत्वाला चांगलाच छेद देणारी आहे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीला प्रोत्साहन देणारी आहे. सावरकरांचा हा दृष्टिकोन पाहिला की, त्या काळात त्यांनी तो मांडला आहे, ते लक्षात घेता आजचा भारतीय, आजच्या काळातही त्यांच्या संकल्पनेतील समाजधर्माला आणि देशधर्माला जागत आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. नव्या आधुनिक समाजाची धारणाच त्यांनी त्या काळात सांगितली होती, हेच सावरकरांचे वैशिष्ट्य आणि द्रष्टेपण होते.
सावरकरांच्या संबंधात तत्वज्ञान, धर्म, संस्कृती, पोथिनिष्ठता, लौकिक आणि पारलौकिक, वास्तवता, चिकित्सक, अशा विविध घटकांबद्दल आतापर्यंत विचार केला. मात्र तरीही सावरकर हे व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार- तत्त्वे संपत नाहीत. याचे कारण त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे, सक्षमतेने समाजजीवनाचा आणि मानवतेचा विचार केला. युरोपातील ऐहिक सुखे, सधनता, विज्ञानवादी दृष्टी याची तुलनाही त्यांनी वेळोवेळी भारतासंबंधात भविष्याचा विचार करीत केली आणि भारताला सबळ करण्यासाठी त्यादृष्टीने मार्गदर्शन केले. केवळ हिंदुंच नव्हे तर एकंदर भारतातील विविध धर्म व्यवस्थेच्या आहारी गेलेल्या समाजाला नवकालाकडे पाहाण्याची दृष्टी ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शनच केले. राजकीय व्यासपीठ असो की तात्विक, तार्किक विचार असो, धार्मिक असो की भविष्यगामी विचार असोत सावरकरांच्या दूरदृष्टीचा लाभ अद्यापही भारतीय समाजाने घेतलेला नाही.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, क्रांतिकारी हालचाली करीत ब्रिटिशांच्या मनात सावरकर नावाची भीती निर्माण केली. पण केवळ स्वातंत्र्य मिळवणे इतकेच त्यांच्या लेखी नव्हते, तर स्वातंत्र्यानंतर एक राष्ट्र निर्माण होणार आहे, ते कसे असले पाहिजे, याचा जगातील विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आराखडा सातत्याने सादर केला. त्या काळात सध्यासारखी अतिप्रगत दळणवळणाची साधनेही नव्हती की, गूगलसारखे आंतरजालसंलग्न माहिती प्रसारक, माहिती शोधन यंत्रही नव्हते. अशा काळात मानवतेला महत्त्व देत, उपयुक्ततावाद, विज्ञानाचे महत्त्व आणि यंत्राची, यंत्रयुगाची वाढ अशा सर्व पार्श्वभूमीवरही जग जात असताना भारतात हिंदु-मुस्लीम वादामुळे झालेली अनेक स्तरावर झालेली बौद्धिक पीछेहाट त्यांना मानसिक धक्का देणारी वाटली होती. ब्रिटिशांचा कावा यामागे असला तरीही लोकांनी समाजनिष्ठता स्वीकारत विज्ञानायुगाला सामोरे जात धर्माचा खरा अर्थ सांगत पोथिनिष्ठा बाजूला सारा असे सांगणारा एकमेव राजकीय नेता सावरकर हाच होता. अद्ययावत होण्यासाठी तळमळून समाजाला सांगतानाच मुस्लीम लीगच्या अतिरेकी धार्मिक भूमिकेला विरोध करीत काँग्रेसच्या मुस्लीमलाचारीला सतत विरोध करून बहुसंख्य हिंदुंना अद्ययावत करण्यासाठी आणि त्याच बरोबर मुस्लीमांनीही पोथिनिष्ठा सोडून विज्ञानवादी दृष्टीची कास धरावी असे सांगणारा मुस्लीमेतर नेताही सावरकरच होते. मात्र त्यांच्या आधुनिक विचारांना स्वीकारण्याची मानसिक क्षमताच तेव्हा समाजाच्या सोडा पण तत्कालीन अन्य नेत्यांमध्येही नव्हती, हेच दुर्दैव म्हणावे लागते. आज ती स्थिती काही बदलली आहे का, त्याचा विचार आजच्या समाजानेच करावा कारण काही का होईना तो साक्षर तरी बनला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सावरकरांच्या विविध वैचारिक वैशिष्ट्यांचा आढावा घेत त्यांच्या विचारप्रणालीचा वा तत्त्वज्ञानाचा मागोवा घेता येतो. त्यांच्या विविध साहित्य प्रकारांमधून हे दिसून येते. निबंध, आत्मचरित्र, काव्य, भाषणे इतकेच नव्हे तर पत्रांमधून आणि निवेदनांमधूनही सावरकरांची ही सारी वैशिष्ट्ये प्रतीत होत असतात.
सावरकरांच्या आयुष्यातील टप्पे पाहिले तर आस्तिक असणारे सावरकर साधारण वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत त्यादृष्टीने विचार करीत होते. त्यानंतर अनुभवामुळे त्यांच्या मनातील धर्म वा ईश्वरी भावनेबद्दल भक्तीभाव हा बुद्धिवादी दृष्टीने बदलू लागला. अर्थात तरीही त्यांनी पोथ्यांना बाजूला करा असेे सांगतना त्या कपाटात ठेवा, आदरभावाने वाचा असे मानत भगवंताचे अधिष्ठान वेगळ्या रूपात स्वीकारले. धर्म आणि तत्त्वज्ञान यामध्ये असमारी विसंगीत त्यांनी हेरली त्यांच्या बुद्धिने स्वीकारलेले तत्त्व, विज्ञानाचा पाया स्वीकारीत स्वीकारलेली वास्तववादी दृष्टी ाणि त्यातूनच अद्ययावत होण्यासाठी राष्ट्र वा देश या संकल्पनेला देवत्व देत त्या संकल्पनेला सुधारण्यासाठी समाजसुधारणेचा क्रांतिकारी मार्गही त्यांनी स्वीकारला. त्याचा प्रत्यय रत्नागिरीतील त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळात येतो. तो इतका व्यक्तीवादाला सामोराही जाणारा आहे की, अन्य व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यालाही त्यांनी तेथे कायम ठेवीत, आपले ध्येय त्यांच्यापुढे मांडले. प्रसंगी आपल्याच समाजातून टीका, आरोप, सहन केले. पण हे सारे त्यांनी देशधर्माच्या स्वातंत्र्यासाठी. किंबहुना स्वातंत्र्य हाच धर्म त्यांनी मानल्याने व्यक्तिस्वातंत्र्यही त्यांना अचूक उमगले होते आणि धर्मभावनेला त्यांनी वेगळा आणि स्वतंत्र आयाम दिला. त्यांची अनेक विधाने यादृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहेत.
🔷।। ज्या सत्याने मनुष्याचे एकंदरीत कल्याण साधते ते सत्य.
🔷।। ऐहिकावाचून पारलौकिक पंगू आहे
🔷।। मनुष्य जातीचे हित हेच सर्व सद् गुणांचे समर्थन.
🔷।। पारलौकिक प्रकरणी नाना क्लुप्ती सांगणारे कोणतेही धर्मग्रंथ आपौरुषेय वा इश्वरदत्त नसलून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत.. त्यामुळे क्लृप्ती प्रमाणहीन असल्याने त्याना सनातन धर्म असे म्हणता येणार नाही.
🔷।। मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीती, रिती, निर्बंध हे त्यास जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच ठरवले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत.
🔷।। धर्मसंस्कारात ज्या ज्या क्रिया धार्मिक म्हणून चिरस्थायित्व पावतात, त्या बहुधा त्या त्या काळचा इतिहास असतात. भूगर्भित स्तरांतून जशी त्या त्या काळची सृष्टिस्थिती नि समाजस्थिती चिरेबंद करून टाकलेली असते, तसेच धार्मिक संस्कारांतून त्या त्या काळचे ज्ञान नि अज्ञान अस्थि - स्थिर चिरेबंद नि चिरंतन करून ठेवलेले असते.
धर्मग्रंथात श्रद्धा ठेवणारा माणूस कसा आहे तर तो एका दूरध्वनी यंत्रासारखा आहे, असे सावरकर सांगतात. ते या अनुषंगाने म्हणतात...
🔷।। शब्दप्रामाण्य हेच जिथे धर्मनिर्णयाचे साधन, तिथे लहानपणी अंकाच्या काळात 'कुराण हाच धर्म' हे गुणगुणले की तो मुसलमान, 'बायबल हाच धर्म ' हे पटविले की तो जन्माचा ख्रिस्ती ! कुराण खरे की बायबल, की वेद हे त्याला स्वत: तोलून पाहण्याची सोयच नाही. ....
ज्या मनुष्याला धर्माचे नुसते एक दूरध्वनियंत्र बनायचे नसेल, माणूस म्हणून स्वतःचे बुद्धिनिष्ठ मत हवे असेल, त्याने शब्द निष्ठेला उच्छेदून वेदअवेस्ता बायबल कुराण हे सारे आदरणीय नि अभ्यासनीय पण निव्वळ मनुष्य कृत ग्रंथ आहेत, असे ठाम ठरवून, त्यास इतर कोणत्याही मनुष्यकृत ग्रंथाप्रमाणेच सादर अभ्यासावे. जे जिथे आजच्या विज्ञानाच्या कसोटीस उतरेल ते तेथून घ्यावे; जे आज मनुष्यहितसाधक ते आचरावे; जे अनुभवांती आज टाकाऊ, अडाणी, बुद्धिशून्य ठरते ते साफ सोडावे.
🔷।। धर्मछाप एखाद्या भावनेवर पडला की, ती आंधळी होते आणि तिच्या प्रकरणी मनुष्य प्रज्ञाहत झालाच म्हणून समजावे ! मग तो हिंदु असो, मुस्लीम असो, वा ख्रिश्चन वा यहुदी ! तिथे बुद्धिविजय संपून भक्तिविजयाचा अध्याय लागलाच म्हणून समजावे
सावरकरांची ही विधाने पाहिली की, त्यांच्या देवधर्माविषयीच्या कल्पना स्पष्ट होतात आणि त्यांच्या मानवी समाज या विषयी असणारी धारणाच स्पष्ट होते. जी ऐहिक आहे, पारलौकिकत्वाला चांगलाच छेद देणारी आहे आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीला प्रोत्साहन देणारी आहे. सावरकरांचा हा दृष्टिकोन पाहिला की, त्या काळात त्यांनी तो मांडला आहे, ते लक्षात घेता आजचा भारतीय, आजच्या काळातही त्यांच्या संकल्पनेतील समाजधर्माला आणि देशधर्माला जागत आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. नव्या आधुनिक समाजाची धारणाच त्यांनी त्या काळात सांगितली होती, हेच सावरकरांचे वैशिष्ट्य आणि द्रष्टेपण होते.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विज्ञानवाद, वैज्ञानिक दृष्टी व आधुनिक समाज रचना बनविण्यासाठी केलेला प्रयत्न त्यासोबत धर्म व धर्मग्रंथ यांना सन्मानपूर्वक बाजूला ठेवणे ही त्यांच्या कार्याची, बौद्धिकतेची व राष्ट्रीय एकात्मता जोडणीसाठी केलेली महान कृती होय.
उत्तर द्याहटवा