तत्वज्ञान सावरकरांचे - ७
धर्मालाही दिला व्यापक आयाम
हिंदु समाजाला पराजितांच्या मानसिकतेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या काळात केला, ज्या पद्धतीने केला ती कृती अतिशय महत्त्वाची आहे. राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक स्तरावरून त्यांनी हिंदु धर्माच्या संबंधात एक नवा आयाम दिला हे मान्य करावे लागेल. त्यांचा तो प्रयत्न दुर्दैवाने समाजातीलच हिंदु लोकांना समजू शकला नाही. त्याकाळातही काँग्रेसच्या आणि ब्रिटिशांच्या वरदहस्ताने झालेल्या नेत्यांना समाजात मिळणारा मान हा त्या त्या नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या मुस्लीमधार्जीण्या लांगूलचालनाला मार्केटिंगने मिळाला होता. धर्मनिरपेक्षतचे भूत तसेच अल्पसंख्य असणाऱ्या मुस्लीम समाजापुढे मान तुकवण्याचे राजकारण हे त्यावेळीही हिंदु समाजाचा अवसानघात करणारे होते. तरीही ते कृत्य सावरकरविरोधकांकडून केले गेले. मुस्लीम नेते, मुस्लीम लीग यांना प्रोत्साहीत करून त्यांच्या मागण्यांना कशाही प्रकारे स्वीकारून आणि बहुसंख्य असणाऱ्या हिंदु समाजाचे नुकसान करून अहिंसेच्या वातावरण निर्मितीची प्रतीक्षा करणाऱ्यांना आजपर्यंतही त्या मुस्लीम समाजाचे समाधान मिळवता आलेले नाही. त्यामुळेच आजही मुस्लीम वा अहिंदु धार्मिक नेते, राजकीय पाठबळावर हिंदुस्थान ही हिंदुची भूमी आहे असे सोडा पण हिंदुंचीही भूमी आहे असे मानायला तयार नाहीत, हेच मोठे भीषण सत्य स्वीकारावे लागत आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा मूलभूत विचार म्हणजे सावरकरांनी समाजसुधारणेचा मार्ग ज्या पद्धतीने हाताळला होता, तो. जो बुद्धिवादी होता, खऱ्या अर्थाने धर्ममार्तंडाना समान पातळीवर पाहावयास लावणारा होता. मग तो धर्म हिंदूंमधील आर्य सनातनी असो की ख्रिश्चन असो वा मुस्लीम असो. भविष्य काळातील घडामोडींवर आणि भविष्यावर सावरकर यांची नजर इतकी भेदक होती की पुढील काळात कसे युग अवतरणार आहे, याची पूर्ण जाणीवच त्यांना झालेली होती. त्यामुळेच रत्नागिरीतील हिंदु धर्मासंबंधातील सुधारणेचे काम असो किंवा मुस्लीमांनीही पोथिनिष्ठा सोडावी असे सांगणे असो की, मानसिक दृष्टीने काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदुंच्या बोटचेप्या वृत्तीलाही धुडकावून सर्व मानवतेला समान मानणारे तत्त्वज्ञान असो, हे सारे काम करताना सावरकरांनी कधीही मनात एक आणि जनात एक असे केले नाही. त्यामुळेच हिंदुंच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी मते मागणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रीय म्हणवणाऱ्यांना त्यांनी नेहमीच खडसावले. हिंदु आणि अन्य धर्माची तुलना करीतही त्यांनी सत्य सांगत हिंदुंना विश्वासाने जगण्याचा मार्ग दाखवला. बहुसंख्य हिंदुना हा मार्ग दाखवणे हे देखील खरे म्हणजे राष्ट्रीय कार्य होते. स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मुक्त होणे इतकेच अभिप्रेत नाही, त्याही पुढे जाऊन ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळवायचे त्या लोकांनाही समाजधर्माचा वा राष्ट्रधर्माचा खरा अर्थ कळणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यासाठीच हिंदुंमधील धार्मिकता ही केवळ अस्मिता जागृतीसाठी होती. मुस्लीम नेत्यांतची तळी उचलण्यापेक्षा त्यांच्या समाजानेही पुढे जाऊन पोथिनिष्ठ न होता विज्ञानवादाची कास धरावी हे सागणारे सांवरकर त्यामुळेच अन्य धर्मांमधील गुणावगुणांचाही अभ्यास करून त्यावर तुलनात्मक मीमांसा करून मोकळे झाले होते. जे अन्य कोणाही राष्ट्रीय नेत्यांनी केले नव्हते. आज त्यांच्या त्या कार्याची दखल घ्यावीशी वाटते. मात्र सर्वधर्मसमभावाच्या वा तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या विचारांमधील फोलपणाही आता खरे म्हणजे अधिक स्पष्ट होऊ लागला आहे. शहरीकरणामुळे वास्तविक विविध धर्मामधील सामान्यांना जीवन म्हणजे काट, जगणे म्हणजे काय, धर्माचा नेमका उद्देश काय ते समजू लागले आहे. मात्र ते वळत नाही अशी स्थिती आहे कारण सावरकरांसारखे सुस्पष्ट नेतृत्व अभावाने दिसत आहे.
सावरकरांच्या या संबंधातील राजकीय, सामाजिक आणि तात्विक विचारांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचे विचार लोकांना समजण्यासाठी त्यांची काही विधाने, भाषणे लक्षात घेण्यासारखी आहेत.
🔴🔴🔴
🔷🔷 ७ जुलै १९३७ मधील पुण्यात केलेल्या एका भाषणात सावरकर म्हणतात की,
🔷।। आमच्या समाजवादी मित्रांना जर्मन संस्कृती, इंग्लिश संस्कृती, फ्रेंच संस्कृती समजते, मग त्यांना हिंदू संस्कृती का समजू नये ? ती जशी राष्ट्रे आहेत त्याप्रमाणे सिंधूपासून सागरापर्यंत पसरलेले हे हिंदुस्थान हे एक हिंदुराष्ट्र आहे. आमचा देश एक आहे. आमच्या भाषा संस्कृतोत्पन्न आहेत. आमची आकांक्षा एक आहे. आचार विचारात साम्य आहे. इंग्लंडला फार तर एक सहस्र वर्षाचा इतिहास असेल. पण आमचा इतिहास प्राचीन आहे. त्याचा प्रारंभ केव्हा झाला तेही आजच्या विद्वानांना ठरविता येत नाही. या दृष्टीने आम्ही एक राष्ट्र आहोत. आजचे ज्यू जगभर फेकले गेले आहेत. त्यांना आज त्यांचा देशही उरलेला नाही. तरीही एका धर्म पुस्तकाने ते एक होत आहेत. मग आपण आपली भाषा, संस्कृती, धर्म, इतिहास आणि एक देशवासी असताना हिंदुत्वाच्या भावनेने एक का होऊ नये ?
सावरकरांनी गांधीगट वा काँग्रेस यांच्यावरच प्रखर टीकेने हल्ला केला नाही तर राष्ट्रीयत्वाची नेमकी व्याख्याच सांगम्याचा त्याद्वारे प्रयत्न केला. तसेच समाजसुधारणेचे महत्त्वही त्यावेळीच त्यांनी ओळखून त्यासाठी प्रयत्न केले ाणि समाजसुधारणेची गरज का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले मात्र, त्यांचे उद्देश, त्यांची त्यामागची भूमिका आणि धर्म, समाज आणि राष्ट्र यांचे परस्परांमधील असमारे संबंध वा नाते हे त्यांनी अचूक ओळखले होते. विशदही केले मात्र ते ना हिंदंुनी बौद्धिकदृष्टीने मनावर घेतले, ना त्यांच्या विरोधकांनीही समजून घेतले. यामुळे नुकसान या भूमीचे झाले, हे नाकारता येत नाही. समाजसुधारणेच्या आपल्या भूमिकेबद्दल कार्याबद्दल त्यांची मते यासाठी पाहाण्यासारखी आहेत. आजही ती पटू शकतात.
🔷।। समाजकारणातही लोखंडाचे चणे खावे लागतात. ते येरागबाळाचे काम नव्हे.
🔷।। हिंदुराष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण नि समाजकारण हीं दोन्हीही साधने अत्यावश्यक आहेत. राजकारण ही एका हातातील चढती तलवार; समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल. हीं दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे.
🔷।। समाजकारण राजकारणापेक्षा गौण वाटले, तरी त्यांचा निकट संबंध असल्याने समाजकारणही हाती घेणे आवश्यक आहे. कालामानाप्रमाणे सुधारणा होईल, म्हणून गप्प बसणे योग्य नाही. कारण आजच्या गोष्टी आपण कालमानाने घडल्या, असे म्हणतो. त्या त्यापूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळेच घडून आलेल्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी घडाव्या, असे आपणांस वाटते. त्यासाठी तीव्र प्रयत्नांची आवश्यकता आहे.
🔷।। पुस्तकी राजकीय चळवळीपेक्षा हे जात्युच्छेदनाचे प्रत्यक्ष कार्य अधिक महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यावाचून समाजसुधारणा अशक्य, हे निर्विवाद. तरी पण ते स्वातंत्र्य टिकविण्यासाठी समाजसुधारणेचा पाया घातला गेला पाहिजे...'
🔷।। सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही...
🔷 ।। अर्थात ज्याअर्थी समाजकारण हेंही हिंदुराष्ट्राच्या अभ्युत्थानार्थ एक अपरित्याज्य साधन होऊन बसलेले आहे आणि ज्या अर्थी हिंदुराष्ट्राच्या पायांत आमच्या आम्हीच ठोकून घेतलेल्या रोटीबंदी प्रभृति आम्ही अनेकवार उल्लेखिलेल्या सात 'स्वदेशी' शृंखला तोडून टाकल्यावाचून हिंदुसमाज एकजीव, एकजात, एकात्म, संघटित, प्रबळ नि प्रगत होणे दुर्घट आहे, त्याअर्थी ज्या पोथीजात उच्चनीचतेच्या मानवी जातिभेदाने ह्या सात शृंखला आमच्या हिंदुराष्ट्राच्या पायात ठोकल्या, त्या जातिभेदाचे उच्चाटन करणे हेही राष्ट्रकार्यच आहे. एक अपरिहार्य कर्तव्यच आहे.'यास्तव जात्युच्छेदक सहभोजनांचे आंदोलन हेंही एक अपरिहार्य राष्ट्रीय आंदोलनच होऊन बसलेलें आहे. कारण जन्मजात जातिभेदाचा राक्षस हा जो आज शतकोशतके त्याच्यावर होणारे सारे हल्ले परतवीत अजिंक्य ठरत आला आहे, तो मुख्यतः रोटीबंदीच्या अभेद्य दुर्गाचे बळावर! त्या रोटीबंदीच्या दुर्गावर बरोबर लागू होणारा भडिमार बाँबच्या गोळ्यांचा नव्हे, तर बुंदीच्या लड्डू गोळ्यांचा ! जे जे सहभोजन प्रकटपणे जात्युच्छेदनार्थ म्हणून घडते, त्याच्या त्याच्या धडक्यासरशी जातिभेदाच्या ह्या आजवर अजिंक्य ठरलेल्या अजस्र दुर्गाच्या तटबंदीस एकेक भगदाड पडतेच पडते; यात शंका नाही ! म्हणून आजच्या परिस्थितीत अखिल हिंदू सहभोजनातून आपल्या महार चांभार- भंगी धर्मबंधूंच्या पंगतीत गोड लाडू खाणे हेच एक कटू कर्तव्य होऊन बसले आहे खरे.
🔷🔷 सावरकरांचे विचार इतके सुस्पष्ट होते की, त्यांनी ते वेळोवेळी सांगितले. आमच्या 'अस्पृश्य' धर्मबंधूंना धोक्याची सूचना हा त्यांचा लेख १ सप्टेंबर १९२० रोजी श्रद्धानंदमध्ये प्रसिद्ध झाला. त्यात ते म्हणतात...
🔷।। आपल्या हिंदू समाजात जी अत्यंत अन्याय्य आणि आत्मघातकी अशी अस्पृश्यतेची रूढी पडलेली आहे, तिचा नायनाट करण्यासाठी आम्ही किती तत्परतेने झटत आहो, हे ‘श्रद्धानंदा' च्या वाचकांस तरी सांगावयास नकोच. अस्पृश्यता जी निघाली पाहिजे, ती मुख्यतः आमच्या सात कोटी धर्मबंधूंना निष्कारण पशूहूनही 'अस्पृश्य' लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे, तर आपल्या स्वतःच्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय, म्हणून निघाली पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. अस्पृश्यतानिवारणाने आज आपल्या हिंदू समाजाचे हित आहे, म्हणूनही ती निघाली पाहिजेच. पण वेळ प्रसंगी त्या रूढीपासून हिंदू समाजाचा आंशिक लाभ जरी होत असता, तरीही आम्ही तिच्याविरुद्ध इतक्याच प्रबळपणे खटपट केली असती. कारण माझ्या अस्पृश्य समजलेल्या बंधूस जेव्हा मी, तो केवळ अमक्या जातीत उत्पन्न झाला म्हणूनच, स्पर्श करीत नाही आणि एखाद्या कुत्र्यामांजरास स्पर्श करतो, तेव्हा मी मनुष्यत्वाविरुद्धच एक अत्यंत गंभीर असा अपराध करीत असतो. केवळ आपद्धर्म म्हणून अस्पृश्यता काढणे अवश्य आहे, इतकेच नाही, तर धर्माचा कोणत्याही दृष्टीने विचार केला, तरीही त्या प्रस्तुतच्या अमानुष रूढीचे समर्थन करणे अशक्य आहे, एतदर्थ धर्माची आज्ञा म्हणूनच ती रूढी नष्ट केली पाहिजे. न्यायाचे दृष्टीने, धर्माचे दृष्टीने माणुसकीचे दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे. त्यापासून आजच्या परिस्थितीत लाभालाभ काय आहेत, हा प्रश्न दुय्यम आहे. हा लाभालाभाचा प्रश्नच आपद्धर्म होय आणि अस्पृश्यतानिवारण हाच मुख्य आणि निरपेक्ष धर्म होय.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा