रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ५  

श्रीकृष्णाने गीतेत केलेल्या उपदेशातून बदल या गोष्टीला अतिशय महत्त्व दिले आहे. सावरकरांनीही यामुळेच नेहमी बदल स्वीकारण्यासाठी आणि त्यासंबंधात बुद्धीचा वापर करावा म्हणून विज्ञानाच्या कसोटीवर तावूनसुलाखून एखादी बाब घ्यावी असे सातत्याने सांगितले आहे. त्यांचा काळानुसार अद्ययावत राहाण्याचा हाच तर खरा उद्देश समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ म्हणजे १९२४ पासून १९३७ पर्यंतचा आता त्याला १०० वर्षे होतील. हा काळ आणि इतक्या वर्षानंतरही त्यामधील अनेक घटक लक्षात घेतले तरी सावरकरांनी सांगितलेल्या या सात बेड्यांना संपुष्टात आणण्याचे महत्त्व लक्षात यावे.


रत्नागिरीतील कृतिशीलता


स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेच्याकाळात आले त्यापूर्वी त्यांना रत्नागिरीत तुरुंगातही ठेवले गेले होते. रत्नागिरीत दोन ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले होते. आपल्या या रत्नागिरीमधील वास्तव्यात त्यांनी केलेले कार्य हे डोळसपणे आणि बुद्धीला प्रमाण मानीत, वैचारिक क्रांतीचा उद्देशही ठेवीत वा त्यादृष्टीने वैचारिक बदलांचे प्रतिनिधीत्व करणारे सावरकर हे विविध घटनांमधून पाहिल्यास त्यांची त्या त्या कामांमधील दूरदृष्टी आणि समाजाला आधुनिक करण्याची धडपडच दिसते. केवळ इतकेच नव्हे तर अशा प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातील बदलांमधून त्यांना राष्ट्राच्या भविष्याचा वेध घ्यायचा होता. जो वेध होता तो त्यांच्या दृष्टीने भवितव्यात बदलणाऱ्या आणि जगाबरोबर जाऊ पाहाणाऱ्या आधुनिक समाजाच्या प्रवासाचा, त्यातील बदल स्वीकारू पाहाणाऱ्या मानसिकतेचा. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या सुमारासच त्यांचा हिंदुत्व ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचू लागला होता. त्यातूनच हिंदुत्वाचा त्यांनी सांगितलेला अर्थ आणि केलेली व्याख्या ही लक्षात घेत त्यांच्या हिंदुपणाचा वेध घेतला तर जात्युच्छेदन हा त्याचा महत्त्वाचा एक पाया होता. त्यातून भावी हिंदुराष्ट्रा वा राष्ट्राच्या वाटचालीच्या अनुषंगाने सावरकरांना काय अभिप्रेत होते, त्यांना समाज कसा अभिप्रेत होता, हे ही लक्षात येते. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील त्यांची कामगिरी लक्षात घेत तिचे विश्लेषण करणे औचित्याचे ठरते. 

जातिभेद संपुष्टात आणण्याचा उद्देश हाच मुळात राष्ट्राच्या आणि हिंदु समाजाच्या भवितव्याशी संलग्न आहे.  या भेदाभेदांना संपुष्टात आणण्यासाठी स्पर्शबंदी, वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, शुद्धीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी आणि रोटी बंदी अशा सात शृंखला वा बेड्या तोडण्याची जाणीव समाजाला करून दिली. वरवर पाहाता या बेड्यांना संपुष्टात आणणे ही काळाची गरज आहे, हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना काळाप्रमाणे राहावे, बदलावे हेच सूत्र सावरकरांनी सातत्याने राखण्याने वा तशी धारणा ठेवल्याने ते काळाच्या पुढे राहिले, असे म्हणावे लागते. विज्ञाननिष्ठ निबंधांमधून त्यांनी त्या संबंधात विश्लेषणही केले आहे. सुबुद्धीचा नव्हे तर दुर्बुद्धीचा भेद करायला हवा असे सांगताना त्यांनी एका भाषणात श्रीकृष्णाने अर्जुनाला न लढण्याच्या दुर्बुद्धीपासून परावृत्त केले त्यामुळे दुर्जनांचा नाश करणे शक्य झाले असे सांगितले. येथे श्रीकृष्णाचा उल्लेख स्पष्ट होतो तो आणखी एका महत्त्वाच्या विचारातून, श्रीकृष्णाने गीतेत केलेल्या उपदेशातून बदल या गोष्टीला अतिशय महत्त्व दिले आहे. सावरकरांनीही यामुळेच नेहमी बदल स्वीकारण्यासाठी आणि त्यासंबंधात बुद्धीचा वापर करावा म्हणून विज्ञानाच्या कसोटीवर तावूनसुलाखून एखादी बाब घ्यावी असे सातत्याने सांगितले आहे. त्यांचा काळानुसार अद्ययावत राहाण्याचा हाच तर खरा उद्देश समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे.

रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ म्हणजे १९२४ पासून १९३७ पर्यंतचा आता त्याला १०० वर्षे होतील. हा काळ आणि इतक्या वर्षानंतरही त्यामधील अनेक घटक लक्षात घेतले तरी सावरकरांनी सांगितलेल्या या सात बेड्यांना संपुष्टात आणण्याचे महत्त्व लक्षात यावे. आजही त्या आणि त्यापेक्षाही अन्य काही बेड्या समाजाने आपल्याच हातात घालून घेतल्या आहेत. त्यांचा संबंध रुढार्थाने मानल्या जात असलेल्या धर्म कल्पनेतही येतो, त्याही तोडण्याची गरज आहे. जन्मजात जातिभेद मोडायचा म्हणजे काय करावयाचे यावर सावरकरांनी त्यासाठी मांडलेले उद्दिष्ट वेगळे आहे. त्यामागे हिंदुराष्ट्राचे अस्तित्त्वही या हाजारो वर्षांच्या रचनेला उलथल्यास नामशेष होऊ शकेल, अशा धारणेतून त्या संलग्न प्रश्नाची भीती लक्षात घेत त्या संबंधात लोकांना वा लोकांच्या मानसिकतेला तयार करण्याचाच प्रयत्न सावरकर करतात. जातिभेदाबद्दल तो मोडण्याचा प्रयत्न करणारा जो वर्ग वा गट आहे, त्याच्या मनात असणारा गोंधळ  आणि नसणारा निश्चित कार्यक्रम यासाठी सावरकरांचा त्या बद्दल विचार करणारा हा निबंध अतिशय भेदक आहे. त्यांची काही विधाने, संक्षिप्त विधाने मुद्दाम या अनुषंगाने देत आहे. 

►“ जन्मजात जातिभेदाचे उच्चाटन म्हणजे जन्मजात म्हणून केवळ गृहीत धरलेल्या उच्चनीचतेंचे उच्चाटन.”

►“ जन्मजात जातिभेदामध्ये जे काही आपणास राष्ट्रीय दृष्ट्या अनिष्टतम असल्याने मुख्यत: उच्छेदावयाचे आहे ते आजच्या जातीतील जन्मजातपणाची नुसती उपपत्ती वा भावना नसून तिच्याशी घातलेली मानीव उच्चनीचतेची आणि विशिष्टाधिकारांची सांगड ही होय.” या संबंधात ते स्पष्ट सांगतात की, “ अमुक मनुष्य ब्राह्मण कुलात जन्माला आला म्हमूनच केवळ त्याच्यात तसा विशेष गुण नसूनही त्यास अग्रपूजेचा, वेदोक्ताचा, पूर्वीच्या निर्बंधानुसार अवध्यत्वाचा इत्यादी जेविशिष्ट जन्मजात अधिकार वा सवलती देण्यात येतात त्या तेवढ्या बंद करावयाच्या आहेत….” 

►“ कोणतीही जात दुसरीहून मूलत:च श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे, ही गोष्ट केवळ पोथींत तसे सांगितले आहे, म्हमूनच गृहित घेता कामा नये” 

अशा विवध प्रकारच्या विश्लेषमातून सावरकरांनी व्यवसायबंदी तोडण्यासाठी काय करावे ते सांगितले. ती रुढीच होती आणि ती देखील आज जवळजवळ नाहिशी केली गेलेली आहे, असे सांगितले तरी त्याचा उल्लेख करीत सावरकरांनी त्यासंबंधातील पार्श्वभूमी स्पष्ट करीत समाजाच्या मानात साचलेली रुढीनिहाय आनुवांशिक हक्कांबद्दलची जागाही संपवण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. व्यवसायबंदी, रोटीबंदी, स्पर्शबंदी आणि बेटीबंजी हे जन्मजात जातिभेदाचे चार प्रमुख पाय असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी या बेड्यांना तोडून टाकम्यासाठी समाजाची मानसिकता सुधारण्याचे काम केले. तसे प्रातिनिधीक स्वरूपातून दाखवून देत त्यांनी देशापुढेही कृतिशील उदाहरण समोर ठेवले. 

स्पर्शबंदीच्या बद्दल केवळ स्मृश्यच अस्पृश्यांचा छळ करतो असे नाही तर एक अस्पृश्य दुसऱ्या अस्पृश्याचाही छळ करतो, असे सांगत त्या संबंधातील उदाहरणे दाखवून देत त्यांनी हे रोख्यासाठी कंबंर कसली. रुढार्थाने असलेल्या हिंदु धर्मामधील या रुढींनी बंदीने ग्रासलेल्या हिंदुंना जागे करीत एकाच जातीत म्हणजे हिंदु या जातीत आणण्याचे सावरकरांचे प्रयत्न मोलाचे होते, सक्रीय होते. तार्किक आणि तात्विकही होते. सुधारकांनी त्यासाठी काय केले पाहिजे, कुठे कुठे त्याचा अवलंब करीत स्पर्शबंदी संपवण्यासाठी झटले पाहिजे, ते सावरकर सांगत, स्वत: त्यासाठी सक्रीय असत. शाळांमधून मुलांना सरसकट सर्वांबरोबर बसवण्याचा त्यांचा त्या काळातील कार्याचा भाग हा लक्षात घेता त्यांचे सक्रीयत्व आहेच पण त्याचबरोबर राष्ट्र म्हमून पुढे निर्माण होणार असलेल्या एका संकल्पनेमध्ये कसे राहावे, याचेही शिक्षणच आहे. सावरकरांनी रत्नागिरीच्या या स्थानबद्धतेत केलेले हे कार्य केवळ हिंदु संघटनाचे नव्हे तर मानवतेच्यादृष्टीनेही तितकेच मोलाचे होते. राष्ट्रनिर्मितीमधील हा घटक भावी राष्ट्राला घडवणारा एक महत्त्वाचा भाग होता, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

रोटीबंदीसारखी बेडी तोडणे हे देखील किती गरजेचे आहे ते सांगताना सावरकर म्हणतात की,

► “जातिभेदांच्या या चार पायांमध्ये मुख्यत्वे करून हा पाय असा आहे की, त्यावर हाणताच धूड खाली कोसळणार आहे. आजच्या या हजारो जाती एकमेकांपासून पृथक करणारे मुख्य नी सर्वगामी जिवंत लक्षण रोटीबंदी नी बेटीबंदी हेच होय.”

► “नुसते जेवायचे… भिन्न जातियाबरोबर जेवायचे की हा एवढा दुर्गम दुस्साध्य वा टणारा जातिभेदाचा प्रचंड गड गडगडत कोसळलात पाहिजे… जातिभेद एकत्र लढून जन्मात मरायचा नाही पम एकत्र जेवताच तो ठीकच्या ठीकाणी मरुन पडतो.  यासाठी खर्या सुधारकाने हे सूत्र वेशीवर टांगावे की, रुचेल नी पचेल ते वैद्यकीयदृष्ट्या योद्या त्या कोणत्याही मनुष्याने खावे नी प्यावे. तो हिंदु असो, मुसलमान असो, अंदमानीज असो कोणाबरोबरही खाण्याने, पिण्याने, सहभोजनाने, सहपानाने जात जात नाही, धर्म बुडत नाही….”

सावरकरांचे अशा प्रकारचे विश्लेषण सहभोजनाच्या कल्पनेलाही तारक ठरवीत त्यांनी धाडसाने समाजातील तत्कालिन जाचक रिवाजांना, रुढींना बाजूला करीत हिंंदु समाजाला एक करीत त्यातील माणसांमधील माणूस जागा करण्याचे काम केले. 

बेटीबंदीबद्दल त्यांनी सर्व प्रकाराने विश्लेषण केले आहे. केवळ इतकेच नव्हे तर त्यामागील संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणतात

► “ बेटीबंदी तोडणे म्हणजे अमक्या जातीच्या मुली तमक्या जातीत दिल्याच पाहिजेत अशी आज्ञा नसून तर कोणा हिंंदुने प्रेमशील, सुप्रजननक्षमता प्रभृति वैवाहीक गुणानुकूल असा अन्य जातीचा हिंदु वधूवर निवडला तर केवळ जात भिन्न एवढ्यासाठीत तो विवाह निषेधिला जाऊ नये वा त्या योगे त्या वधूवरांस पूर्णपणे सव्यवहार्य समजण्यास हरकत असू नये अशी एक अनुज्ञा आहे.”


रत्नागिरीमधील सावरकरांच्या कामावरून सनातनींनी दिलेले सहकार्य, बहुजन समाजाच्या नेत्यांनीही केलेले कौतुक आणि सन्मान्य स्वीकार, कर्मठ वा जुन्या विचारांना धरून बसणाऱ्या सनातनी वैदिकांनी केलेला विरोध, अगदी हिंदुमहाभेतूनही झालेला विरोध, संस्था संघटना, ब्राह्मण वा अन्य उच्चवर्णात गणला जाणारा तत्कालीन समाज यांनी केलेला विरोध व टीकेचा भडिमार असा स्रव प्रकार सावरकरांनी सन केला. त्याला तोंड दिले. त्यांच्या रत्नागिरीतील या कामामुळे खरे म्हणजे राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या धारणेलाच सुस्पष्टता आणणारे होते. याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, की,. स्थानबद्धतेनंतर राजकारणात प्रत्यक्ष जावे लागेल याची जाणीव त्यांना होती, भविष्यात काय करायचे आहे, याचीही मानसिक, बौद्धिक जुळवणी त्यांनी केलेली असावी. किंबहुना अंदमानात रवानगी झाल्यानंतरच्या विविध अनुभवांमुळे त्यांनी हिंदुं समाजाच्या गुणावगुणांचा, गुणदोषांचा आणि ब्रिटिशांच्या कूटनीतीचा तसेच त्यातून मुस्लिमांनी केलेल्या आक्रमक राजकीय मागणींचा पुरेपूर अभ्यास - तपशील याचा आलेख त्यांनी मनात तयार केला होता, यामुळेच अंदमानातून सुटका करून घेण्याची त्यांची तळमळ ही पलायनाची नव्हे तर देशाला उभारी देण्यासाठी नव्या आव्हानात्मक खेळीची होती. त्यांना साथ देण्यात हिंदु समाज कुठे कमी पडला हे हिंदु समाजाने लक्षात घ्यायला हवे. बुद्धी म्हणजेच विज्ञान असेच समीकरण स्वीकारलेल्या सावरकरी तत्त्वज्ञानाला आपण गमावले का याचा विचार करीत अजूनही अद्ययावत होण्यासाठी नव्याने सावरकरी धारणेचा अभ्यास करण्याची व स्वीकारण्याची तयारी समाजाने करायला हवी.  

सावरकरांची या प्रकारे बेड्या तोडण्याची कृती ही यासाठीच त्याकाळात केलेली राष्ट्रनिर्मितीमधील महत्त्वाची पायरी होती, हिंदु समाजामध्ये एकत्व निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले रत्नागिरीतील स्थानबद्धतेमधील हे प्रयत्न केवळ धर्मसुधार, समाजसुधार, राष्ट्रनिर्मितीमधील घटक म्हणूनच नव्हेत तर त्यामागील उद्देश हा बुद्धिवादी पद्धतीने मांडून अनेक ठिकाणी सनातनींचा रोष पत्करून आणि त्यांना तोंड देत, त्यांच्या टीकांना उत्तर देत त्यांनी वेळप्रसंगी काही मार्ग सुचवूनही समाजसुधारणेची रत्नागिरीतील प्रातिनिधीक कृती देशभरात पोहोचवली होती. नव्हे ती पोहोचली होती, त्यामुळेच ती कृती केवळ स्थानबद्धतेच्या काळात जोपासलेला फावल्या वेळातील उद्योग नव्हता, तर भविष्यातील विविधांगी घटनांना सामोरे जावे लागणार आहे, यासाठीच तयार केलेला पाया होता. त्यांच्या या कृतिचा अर्थ समजून येतो तो त्यांच्या हिंदुत्वविषयक संकल्पनेतून, हिंदुत्वाच्या जाणीवेतून. मग ती कृती व जाण केवळ सुधारणेची नसते, तर ती राष्ट्रनिर्मितीमधील एक पायरी असते. बहुसंख्य असलेल्या हिंदुसमाजाला मुस्लीम लांगुलचालनापायी वा ब्रिटिशांच्या कूटनीतीमधील समाजात दुफळी माजवण्याच्या कृतीलाही दिलेले अस्मितापूर्वक आणि स्वाभिमान व स्वत्व जपत दिलेले उत्तर असते. तो अखंडत्वासाठी सांगितलेला मार्ग होता, केवळ हिंदुसमाजरक्षणासाठी नव्हे तर या संपूर्ण आसिंधुसिंधुपर्यंत…. अशा हिंदुत्वाच्या व्याख्येत बसणाऱ्या हिंदुंसाठी आणि अहिंदुनाही त्यात त्यांचे न्याय्य हक्क देत त्यांच्या अस्तित्वालाही न धुडकावता सामावण्याचा प्रयत्न करणारे ते तत्त्वज्ञान होते. राजकीय स्तरावर त्यांना त्यात जरी यश मिळाले नसले तरी त्यांचा प्रयत्न हा अतिशय गरजेचा होता, हे आज राहून राहून पटू लागते. तार्किकतेच्या दृष्टीने त्यांचे हिंदुत्व हे केवळ हिंदुंनाच नव्हे तर अहिंदुनांही तारणारे होते, ही बाब आज अन्य बाबतीत पटू लागते. फक्त ती प्रामाणिकपमे स्वीकारण्याची मानसिकता हवी.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...