सावरकर आमचे... पण - ४
बुद्धिवादाची तर्कसंगत परखड मांडणी स्वीकारीत सावरकरांनी रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत असताना केलेले काम हे कृतिवीर सुधारकाचे होते. त्यातून समाजाशीच लढताना समानतेचे धडे किती महत्त्वाचे आहेत, ते स्पष्ट करण्यासाठी मांडलेले तत्त्वज्ञान हे जुने जोखड झुगारून द्या असे सांगणारे होते ते केवळ क्रांतिकारक वा बंडखोरी करणाऱ्या तरुणांसारखे नव्हे तर कृतिशील तत्त्वज्ञान्यासारखे ठरले. संस्था- संघटनांमधील त्यांचटा बैठकीतील वावर, त्यांची भाषणे आणि युक्तिवाद हा याच बुद्धिवादी विचारवंताची, सारासार विवेकाने मांडलेल्या आणि लोकांनाही विचारप्रवृत्त करणाऱ्या धर्म नव्हे तर कर्ममार्तंडासाऱखा आहे.
बुद्धिवादी परंपरेचे पुढचे पाऊल
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंंदुत्ववादी आणि बुद्धिवादी होते. विज्ञानायुगाला आपले म्हणत नवीन काळाला सामोरे जाणारे आणि सतत कालनिहाय बदल करण्याचे अद्ययावत राहाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होत. पेशवाईची अखेर १८१८ मध्ये झाली आणि ब्रिटिश सत्ता साऱ्या हिंदुस्थानात लादली गेली. धर्म, संस्थाने यांच्या मक्त्यामध्ये सारा समाज गुंतलेला होता. त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्र आणि ते कसे असावे, याची काही कल्पना मांडलेली नव्हती. स्वराज्य या छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेला पेशवाईमध्ये मोठ्या प्रमाणात रुजवले गेले. मोगलाई मुस्लीम राजवटीला अंकुश लावण्यात आणि जरब बसवण्यात पेशवाईमध्ये मराठा राजवटीने यश मिळवले होते. मात्र त्याचवेळी ब्रिटिशांची सत्ता आली. थोडक्यात एक राजवट संपवून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजण्यापूर्वीच पुन्हा एकदा पारतंत्र्याचा फटका भारताला बसला. मुस्लीम राजवटीमधून मराठेशाहीने पेशवाई काळात उत्तर भारतात जम बसवण्यास सुरुवात केली होती मात्र पेशवाईतील अंतस्थ हेवेदावे, कलह यामुळे पुन्हा ही स्वराज्याची जाण ठेवणारी सत्ता लयास गेली. उत्तर पेशवाईतील अनेक अयोग्य प्रथांनी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. समाजातील एकूणच आर्थिक ताकदही खचली होती, हे अमान्य करता येणार नाही. अशा स्थितीत ब्रिटिश येण्याचे दु:ख सर्वसामान्यांना फार होईल अशी अपेक्षाही खरे म्हणजे करणे योग्य ठरणार नाही. पेशवाईतील हा उत्तर कालखंड आणि त्याचबरोबर अन्य मुस्लीम आणि हिंदु राजवटींमधील - संस्थानांमधील कलह, आर्थिक स्थिती, ब्रिटिशांचे कवायती सैन्याचे जोखड, यामुळे आर्थिक ताणाचा मोठा दुष्परिणाम जनतेवरही झाला होता. त्यानंतर १८५७ चे स्वातंत्र्य समर होईपर्यंत तसेच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होईपर्यंतचा काळ हा भारतीय जनतेच्यादृष्टीने तसा अधांतर अवस्थेत, अनिश्चिततेच्या गर्तेतच बुडालेला होता. अशात सार्वत्रिक शिक्षणाच्या ब्रिटिशांच्या धोरणामुळे हळू हळू पुन्हा वेगळी दिशा समाजाला मिळू लागली. औद्योगिक क्रांतीचे परिणाम जगभरात होत होतेच ते भारतातही दिसू लागले होते. जगातील विविध राजकीय स्थित्त्यंतरे, फ्रेंच राज्यक्रांतीसारख्या घटना आणि त्यामुळे निर्माण झालेली एक वेगळी दृष्टी यामुळे हिंदुस्थानातील शिक्षितांमध्ये विचारप्रवाह वेगळ्या अंगाने वाहू लागला होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, जांंभेकर, गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, काळकर्ते परांजपे, ज्योतिराव फुले आदी महाराष्ट्रातील विविध व्यक्तींच्या लेखनाने विचाराने लोकांमध्ये वैचारिक समज निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. या व्यक्तींच्या लेखनांनी समाजाचे डोळे उघडण्यासाठी झालेली वाटचाल ही मोठी होती. त्यातही विशेष करून काँग्रेसमध्ये असणारे जहाल व मवाळ गट, क्रांतिकारकांच्या बलिदानांच्या घटना यामुळे समाजावर मोठा परिणाम झाला. लोकमनामध्ये विचारांना चालना मिळत होती. केवळ ब्रिटिशांची सत्ता आणि त्यांच्याकडून होणारे अत्याचार, मग ते धार्मिक पद्धतीने असोत की, आर्थिक सामाजिक असो की राजकीय यामधील कच्चे दुवे शोधण्याची दृष्टी लोकांना मिळू लागली. पूर्वीच्या राजेरजवाड्यांच्या नंतरचा हा कालखंड लोकांचा होता, लोकांना त्याचे महत्त्व जरी पूर्ण कळले नसले तरी त्याचे अस्तित्त्व रुजण्यास सुरुवात झाली होती. पाश्चिमात्य शिक्षणामधूनही येथील सुशिक्षितांमध्ये, विचार करणाऱ्यांमध्ये तारतम्य शोधण्याची नजर तयार होऊ लागली होती. यातूनच समाजाबद्दल, धर्माबद्दल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्यांबद्दल उहापोह होऊ लागला. चांगले आणि वाईट यामधील गुणदोषांचे मूल्यमापन करण्याची मानसिकता लेखकांमध्ये तयार होत होती. अशातूनच बुद्धिवादी परंपरेचे उदय झाला असे म्हणता येते. अशा या बुद्धिवादी परंपरेत समाजसुधारणा हा महत्त्वाचा घटक होता त्यात गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाने लिहिलेले निबंध समाजाला वेगळी दिशा देऊ पाहाणारे होते. अशाच बुद्धिवादी परंपरेचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पुढचे पाऊल होते.
ब्रिटिशांविरोधातील सशस्त्र क्रांतिकारक म्हणून काम असो की, समाजाला काळाप्रमामाणे बदलण्यासाठी विज्ञानाची कास धरून अद्ययावत होण्याची तळमळ असो, इतिहासातील घटनांवरून लोकांना हिंदुपणाच्या अस्तित्त्वाची जाण करून देणारा लिखाणाचा धागा असो की धर्मग्रंथाना बाजूला सारून विज्ञानच्या कसोटीवर तावून सुलाखून एखादी बाब पारखून घ्या असे सांगत समाजाला विविधांगानी अद्ययावत मानसिकतेत आणण्यासाठी निबंध, भाषणे, लेख, ऐतिहासिक लिखाण यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धारणेमधील हिंदुत्ववादी नव्हे तर बुद्धिवादी दृष्टिकोन व तळमळ दिसते. धर्माच्या संबंधात त्यांनी मुस्लिम समाजाची मीमांसा करताना कुराणाचा केलेला अभ्यास, ख्रिश्चनांच्या बायबलाचा आणि भारताताली सनातनी वैदिक धर्माचा आणि त्या आधारे रुढ असलेल्या हिंदु धर्माचा अभ्यास करून धर्मग्रंथांबद्दल व्यक्त केलेले ठाम प्रतिपादन पाहाता सावरकरांच्या बुद्धिवादाचाच प्रत्यय यावा. तार्किक आणि तात्त्विकतेने मुद्दे मांडत लोकांना शहाणे करून सोडण्याची त्यांची तळमळ ही स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढतानाही हिंदुस्थानातील लोकांना राष्ट्र म्हणून जाण करून देण्याची त्यांची पद्धतही सुस्पष्ट आहे. त्यांचे हिंदुत्व हे राष्ट्रनिष्ठ, भूनिष्ठ आणि मानवतेला स्वीकारणारे होते. आक्रमक मुस्लिमांनाही त्यांच्याच शब्दांमध्ये कठोरपणे सुनावणारे होते. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळावे म्हणून बहुसंंख्याक हिंदुंनी आपल्याच एकमेव अशा हिंदुभूमीत जगायचे आहे., त्यासाठी अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमाचे लांगूलचालन करण्याची गरज कशी नाही, हे सावरकरांनी परखडपणेच नव्हे तर बुद्धिने पटवूनही त्याचे महत्त्व हिंदुंना कळू शकले नाही, हा भाग वेगळा!
बुद्धिवादाची तर्कसंगत परखड मांडणी स्वीकारीत सावरकरांनी रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत असताना केलेले काम हे कृतिवीर सुधारकाचे होते. त्यातून समाजाशीच लढताना समानतेचे धडे किती महत्त्वाचे आहेत, ते स्पष्ट करण्यासाठी मांडलेले तत्त्वज्ञान हे जुने जोखड झुगारून द्या असे सांगणारे होते ते केवळ क्रांतिकारक वा बंडखोरी करणाऱ्या तरुणांसारखे नव्हे तर कृतिशील तत्त्वज्ञान्यासारखे ठरले. संस्था- संघटनांमधील त्यांचटा बैठकीतील वावर, त्यांची भाषणे आणि युक्तिवाद हा याच बुद्धिवादी विचारवंताची, सारासार विवेकाने मांडलेल्या आणि लोकांनाही विचारप्रवृत्त करणाऱ्या धर्म नव्हे तर कर्ममार्तंडासाऱखा आहे. रत्नागिरीतील त्यांचे काम, हिंदुत्व पुस्तकाची धारणा यातून त्यांनी देशाची घडण कशी असावी, यासाठी केलेली वाटचाल ही बुद्धिवादीच होती पण केवळ तात्त्विक नव्हे तर कर्म करीत कृतिवीरची होती. त्यात त्यांचे द्रष्टेपणही होते. आज ना उद्या आपल्याला देशापुढे भवितव्य कसे असेल हे सांगायचे आहे, याची कुढे तरी कळकळ त्यांना असल्याने पुढील काळात राजकारण करण्याची संधी मिळणारच आहे हे ही ज्ञान झाले असल्याने त्यांनी ज्यांच्यासाठी राजकारण करावयाचे त्यां हिंदु समाजाला घडवण्याचे, प्रातिनिधीक स्वरूपात हिंदुपणाची भावना लोकांना समजावत समानता, मानवता ही तत्त्वेही भविष्यात नगरे निर्माण होणार असल्याचे जाणून नागरिकत्त्वाचेच एक प्रकारे धडे देण्याचा हा चंग सावरकरांनी रत्नागिरीत बांधला होता. हाच त्यांच्या बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वाचा एक अत्युच्च भाग होता. स्वातंंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मुक्तता इतकेच अभिप्रेत धरून चालणार नाही, तर त्यासाठी जे स्वातंत्र्य ब्रिटिशाच्या राजवटीतून मुक्त होऊन मिळणार आहे, ते उपभोगण्यासाठी समाजाची पात्रताही असावी लागेल, हेच ध्यानात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या आपल्या स्थानबद्धतेमध्येही केलेले काम हे बुद्धिवादाचा कळस म्हणावा, असेच आहे. १९२४ ते १९३७ च्या दरम्यानचा रत्नागिरीतील त्यांचा कालखंड एखाद्या कर्ममार्तंडासारखा होता. धर्ममार्तंडांना कर्माने, विज्ञानाने, बुद्धिने जगण्यास प्रवत्त करीत देशाची भवितव्यातील वाटचाल कशी असू शकेल हे सांगणारा होता. आजही शंभर वर्षे होत असली तरी तितक्या ताकदीचा बुद्धिवादी कर्ममार्तंड हिंदुस्थानात दिसून येत नाही, हेच सावरकरांच्या बुद्धिवादी जीवनाचे यश म्हणावे की अपयश हे हिंदुस्थानी जनतेनेच ठरवावे.
(क्रमशः)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा