शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ३  

 सावरकरांचे मत हे बुद्धिवादी, भविष्यदर्शक, सुधारकाच्या अंगाने जाणारे होते. त्यांचे समाजाविषयीचे विचार वा समाजरचनेचा पाया कोणता हवा, या विषयीची मते ही विज्ञाननिष्ठ, अद्ययावततेकडे जाणारी, उपयुक्ततावादाकडे लक्षकेद्रीत करणारी तसेच जात्युच्छेदक हिंदुत्वाला म्हणण्यापेक्षा भौगोलिक क्षेत्राधारित हिंदु समाजाला बौद्धिक, वास्तविक, भावनिक, कर्माधारित आणि चातुरवर्ण्याबद्दल तार्किक विचार करून सर्व हिंदु समाजाला जातिरहीत अशा समान पातळीवर आणू पाहाणारी होती. साम्यवादी विचारसरणीच्या तुलनेत त्यापेक्षाही सरस पद्धतीने हिंदुस्थान या भौगोलिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला हिंदुत्व असे नामाभिधान देणारी सावरकरी विचारसरणी होती. पारंपरिक सनातनी वृत्तीला वा चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेला छेद देण्यासाठी वैचारिक स्तरावरच नव्हे तर कृतिशील स्तरावरही त्यांनी कामाला सुरुवात केली होती. 

सुधारकाच्या परंपरेतील विचारसरणी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी नेमकी कशा पद्धतीने तयार होत गेली, ते लक्षात घेणे गरजेचे आहे. लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांना ब्रिटिशांविरोधात असणारी भावना आणि त्यामागील पार्श्वभूमी ही बाब जशी महत्त्वाची आहे, तसेच त्यांचे त्या काळातील वागण्यामधील वर्तनामधील आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमधील धागेदोरेही त्यांची विचारसरणी तयार होण्यामध्ये कारक ठरतात. त्यांच्यावर शि. म. परांजपे यांच्या ‘काळ’ने केलेले संस्कार हे अतिशय महत्त्वाचे वाटतात. युरोपामध्ये गेल्यानंतर त्यांनी तेथे पाहिलेली सामाजिक, धार्मिक, वैचारिक स्थिती ही देखील त्यांना भारतीय स्थितीशी तौलनिक विचार करायला लावणारी ठरली. केवळ युरोपातील धर्मच नव्हे तर अन्य धर्मांसबंधातही त्यांनी भौगोलिक अधिक्य, समाज रचना, धर्माचे महत्त्व, संख्याबळ आदी विविध बाबींचा विचार करताना विज्ञाननिष्ठतेला पायाभूत मानले, जातिव्यवस्थेला बाजूला करण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्थेलाही त्यांनी धुत्कारले होते. जात्युच्छेद करण्याचे महत्त्वाचे काम स्पष्ट करीत हिंदु या समाजात कोणतीही जात अभिप्रेत नसल्याचेच सतत स्पष्ट करीत राहिले किंबहुना त्या पद्धतीने विचारतर्क मांडत, युक्तिवाद करीत

काळकर्ते शि. म. परांजपे

राहिले. मात्र ते युक्तिवाद तत्कालिन समाजालाच नव्हे तर आजच्या समाजालाही कळले आहेत, झेपले आहेत, असे म्हणता येत नाही. बुद्धिवादाने जीवन जगण्याची प्रणाली ठरवली गेली पाहिजे, असेच मत त्यांनी समाजासमोर ठेवले. उपयुक्ततावाद हा त्यांचा सिद्धांत खरे म्हणजे त्या काळात त्यांनी मांडलेला अद्ययावततेकडे नेणारा मार्गच होता. व्यावहारिकता, वास्तवता यांचे हे निदर्शकच होते. यामुळेच त्यांनी ऐहिकतेबद्दल वा इहवादाबद्दल मांडलेले विचार हे भविष्यालाच उलगडणारे ठरले. त्यांच्या काळात इतके द्रष्टेपणाचे विचार वा आढावे फार कोणी मांडल्याचे दिसत नाही. किमान समकालीन राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या अनेकांकडून ते मांडले गेल्याचे म्हणता येत नाही. यामुळेच सावरकरांचे मत हे बुद्धिवादी, भविष्यदर्शक, सुधारकाच्या अंगाने जाणारे होते. त्यांचे समाजाविषयीचे विचार वा समाजरचनेचा पाया कोणता हवा, या विषयीची मते ही विज्ञाननिष्ठ, अद्ययावततेकडे जाणारी, उपयुक्ततावादाकडे लक्षकेद्रीत करणारी तसेच जात्युच्छेदक हिंदुत्वाला म्हणण्यापेक्षा भौगोलिक क्षेत्राधारित हिंदु समाजाला बौद्धिक, वास्तविक, भावनिक, कर्माधारित आणि चातुरवर्ण्याबद्दल तार्किक विचार करून सर्व हिंदु समाजाला जातिरहीत अशा समान पातळीवर आणू पाहाणारी होती. साम्यवादी विचारसरणीच्या तुलनेत त्यापेक्षाही सरस पद्धतीने हिंदुस्थान या भौगोलिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला हिंदुत्व असे नामाभिधान देणारी सावरकरी विचारसरणी होती. पारंपरिक सनातनी वृत्तीला वा चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेला छेद देण्यासाठी वैचारिक स्तरावरच नव्हे तर कृतिशील स्तरावरही त्यांनी कामाला सुरुवात केली होती. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील टप्पे लक्षात घेतले तर त्यांनी विविध टप्प्यांमध्ये त्या त्या कालातील अनुभव आणि अनुभूतीनुसार विचार मांडले, त्यात आवश्यक ते बदलही केले आणि स्वीकारले मात्र ते करताना देश आणि देशातील लोकांना कायम केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विशेष करून समाजाच्या भल्याचा विचार मांडला. ब्रिटनला जाईपर्यंतचा काळ, त्यानंतर अंदमानात रवानगी होईपर्यंतचा काळ आणि त्यानंतर रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा काळ, स्थानबद्धतेमधून मुक्त झाल्यानंतर हिंदुमहासभेत प्रवेश करण्यापूर्वीपासून ते हिंदुमहासभेत प्रवेश  केल्यानंतर हिंदुमहासभेतील राजकारणाचा काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ, गांधी हत्येमुळे ठेवला गेलेला ठपका, त्यावेळी मांडलेले स्पष्ट विचार आणि त्यानंतर फाळणी होऊनही जरी स्वातंत्र्य मिळाले तरी त्याचा झालेला व्यक्त केलेला आनंद, भारत- चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, कास्मीर प्रश्न, नेहरूंचे राजकारण यावरही त्यांनी व्यक्त केलेली सूचक मते या सर्व बाबींचा विचार करता विविध टप्पे आणि त्यात त्यांनी नेहमी केलेल्या वैचारिक सुधारणा, मांडणी याचा विचार करता सावरकर हे अद्ययावतच होते. पण दुर्दैवाने त्यांच्या या सुधारकी अद्ययावतपणाचा लाभ हिंदु समाजाला उठवता आला नाही. हिंदु नेत्यांनाही नीट स्वीकारता आला नाही. मग ते नेते हिंदु महासभेचे असो वा रा. स्व. संघाचे असोत   

सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध, वैचारिक-धार्मिक भेद करणारे निबंध काळाप्रमाणे लोकांनी जगायला पाहिजे, तत्त्व स्वीकारायला पाहिजेत, वर्तन करायला पाहिजे हे सांगण्यासाठी लिहिलेल बुद्धिवादी लिखाण लक्षात घेतले तर त्यांचे लिखाण हे सुधारकी, समाजक्रांति घडवण्याची इच्छा बाळगून केलेल्या वैचारिक तत्त्ववेत्त्याप्रमाणेच कृतिशील व्यक्तीचेही होते. त्यांच्या त्या वृत्ती, उक्ती आणि कृतीया अनुषंगाने नामवंतांनी केलेले त्यांच्याविषयीचे अभिप्राय यासाठीच लक्षात घेणे गरजेचे आहे. 

🔴 बुद्धिवादी विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी सावरकरांचा उल्लेख इहवादाचे थोर आचार्य असा केला आहे. आपल्या इहवादी

पु. ग. सहस्त्रबुद्धे
शासन या पुस्तकात समारोपाच्या लेखात ते म्हणतात की, …

► ‘गेल्या शंभर-दीडशे वर्षांमध्ये होऊन गेलेल्या भारतीय नेत्यांमध्ये इहवादाचे ते सर्वश्रेष्ठ पुरस्कर्ते होते. त्यांच्यातले ते मुकुटमणी होते.’

‘विज्ञानपूत, बुद्धिप्रामाण्यवाद असा हिंदुधर्म त्यांना अभिप्रेत होता.’

‘सावरकरांच्या तत्त्वज्ञानाविषयी हिंदुसमाजाची व त्यांच्या तथाकथित नेत्यांची ही उपेक्षावृत्ती जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत हा समाज इहवादी होणे शक्य नाही.’

🔹🔹

🔴 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र लेखक धनंजय कीर यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी
धनंजय कीर

सावरकरांची तुलना केली आहे. त्यांनी सावरकरांविषयी मांडलेली मते ही देखील सावरकरांचे सत्त्व नेमके काय आहे, तेच स्पष्ट करणारी आहेत. कीर म्हणतात की,...

► ‘बुद्धिनिष्ठ दृष्टिकोण आपल्या समाजाने स्वीकारावा आणि ही समाजक्रांती घडवून आणून नवीन समाजरचना करावी असा संदेश देणाऱ्या भारतीय बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत पुढाऱ्यांपैकी सावरकर हे एक होत.’

► ‘आगरकरांच्या या क्षेत्रातील वडिलकीच्या स्थानाला सन्मानूनही असे म्हणणे अयोग्य होणार नाही की, महाराष्ट्रातील विज्ञानवादी नि बुद्धिनिष्ठ वैचारिक प्रणालीचे नि आंदोलनाचे सावरकर हे पहिले कृतिशूर महापुरु। होत, विज्ञानेश्वर होत.’

► ‘सावरकरांची बुद्धिनिष्ठ नि विज्ञानवादी क्रांतिकारक विचारप्रणाली ही खरी आधुनिक नि पुरोगामी आहे.’

🔹🔹

🔴 सावरकर यांचे अनुयायी असणारे बाळ जेरे यांनी मांडलेले मतही सावरकरांचे खरे मर्म सांगणारे आहे. ते म्हणतात की, …

► ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर हे पूर्णपणे ऐहिकवादी, विज्ञाननिष्ठ होते. ते अध्यात्मतशास्त्र मानीत पण ते वैयक्तिक स्वरूपाचे. त्याच्या आधारावर समाजाचे व्यवहार चालू नयेत, असे त्यांचे स्पष्ट मत होते.’

🔹🔹

🔴सावरकर अभ्यासक भा. कृ. केळकर यांनीही सांगितलेले सावरकर यांच्या वैचारिकतेचे मर्म लक्षात घेण्यासारखे आहे.  ते म्हणतात की, …

► ‘ सावरकर पारंपरिक अध्यात्मवादी नव्हते, ते ऐहिक जीवनाची नीती निर्मााण करू पाहात होते.’

🔹🔹

🔴 समाजवादी विचारवंत, बुद्धिवादी प्रा. नरहर कुरुंदकर यांनी सावरकरांबद्दल जे स्पष्ट सांगितले आहे, ते म्हणजे आजकालच्या

प्रा. नरहर कुरुंदकर

तथाकथित पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि डाव्या विचारसरणींच्या आधारावर जगणाऱ्या पक्ष, नेते, संघटना यांच्या टीकांना आणि सावरकरांवर अन्यायकारी विरोध करणाऱ्यांना चपराकच आहे. तसेच सावरकरांच्या हिंदुत्वाला हिंदु मतांच्या ध्रुवीकरणासाठी मांडणाऱ्या विचारसरणीच्या पक्ष, संघटना यांनाही फटकार आहे. प्रा. कुरुंदकर म्हणतात की, … 

► ‘सावरकर कठोर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ व जडवादी होते. एकाही अंधश्रद्धेवर त्यांचा विश्वास नव्हता.’

🔹🔹

🔴

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सावरकर यांचे नीतिशास्त्र कसे नक्की केले आहे, त्याबद्दल मांडलेले मतही तितकेच म्हत्त्वाचे ठरते. तर्कतीर्थ जोशी म्हणतात की,...

► ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा निकष स्पष्टपणे आणि निश्चितपणे वापरूनच सावरकरांनी आपले नीतिशास्त्र निश्चित केले होते. नीती-अनीतीची कसोटी धर्मग्रंथावर अवलंबून न ठेवता मनुष्याची विवेकबुद्धीच ठरवू शकते, अशा सिद्धांताप्रत सावरकर आले आहेत.’

► ‘सावरकरांची तत्वमीमांसा निरपवादपणे मानवतावादी आहे हिंदुत्ववादी नाही.’

🔹🔹

🔴 या प्रमाणेच तत्त्वज्ञ असे मे. पुं. रेगे यांनी सावरकरांच्या तत्त्वज्ञानाबद्दल मांडलेला निष्कर्ष अधिक सखोल आणि वास्तव आहे. रेगे म्हणतात की,...

मे. पुं. रेगे

► टिळकांनी पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञानाला आधुनिक विद्या व आधुनिक समाजाच्या गरजा आणि आकांक्षा यांच्या आधारे एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांचे तत्त्वज्ञान असे भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेशी नाते जोडून तिच्या स्वत:साठी स्थान प्राप्त करून घेणारे नाही.भारतीय अध्यात्मिक साधना आणि तत्त्वज्ञान याचा खोल प्रभाव जरी त्यांच्या तत्वज्ञानावर झालेला असला, तरी त्यांचे तत्त्वज्ञान हे त्यांचे स्वत:चे असे तत्त्वज्ञान आहे. त्यादृष्टीने ते पूर्णपणे आधुनिक आहेत.’

🔹🔹

मे. पु. रेगे यांचे हे मत रा. स्व. संघाच्या नेत्यांकडून वा भाजपाच्या विविध नेत्यांच्याद्वारे सांगण्यात येणाऱ्या सावरकर यांच्या तत्त्वज्ञानाशी जवळीक साधू पाहाणाऱ्यांना फटकारणारे आहे. ते अतिशय मार्मिक आणि चपखलपणे मांडलेले आहे. विज्ञाननिष्ठा वा आधुनिक जीवनमूल्य यांचे अस्तित्त्व सावरकरांनी पूर्णपणे जाणले होते. त्यामुळेच भारतीय तत्वज्ञानाशी त्यांचा संबंध जोडण्याचा वा समन्वय साधण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला नाही, असे अभ्यासपूर्ण आणि तार्किकपूर्ण मत रेगे यांनी मांडलेले आहे. 

गोपाळ गणेश आगरकर
महाराष्ट्रात सुधारकांची परंपरा ही नेमकी कोणती आहे, बुद्धिवादी
आगरकरांची की धर्माधारित राष्ट्रवादी अशा विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानी मार्गातील? सावरकर यांचे हेच सुधारक म्हणून असणारे व्यक्तिमत्त्व कसे स्वीकारले जाते, त्यावर सावरकर किती उमजले आहेत ते कळू शकेल. ते प्रत्येकाने सावरकरांचे हे सुधारकी, विज्ञाननिष्ठ, समानतावादी हिंदुत्वाचे तत्त्व समजून घेतले तर त्यांच्या अद्ययावत अशा जात्युच्छेदक हिंदुत्वाचा पाया - गाभा समजू शकेल. त्यात सावरकरांच्या हिंदुत्वाला रुढार्थाने समजल्या जाणाऱ्या हिंदु धर्माचा समावेश नसल्याचे दिसते. विशेष करून त्यांचे विचार- तत्व हे आधुनिक सामाजिक रचनेची सुरुवात होती, कृतिशीलता होती हेच स्पष्ट होते. त्यामुळेच हिंदुराष्ट्रवादाच्या वा हिंदुत्वाच्या रुढार्थाने स्वीकारलेल्या राजकीय - सामाजिक विचारांपेक्षा सावरकरांचे विचार हे सुधारकी, मानवतावादी, राष्ट्रवादी आणि तरीही साम्यवादाला समांतर स्वीकारणाऱ्या हिंदुत्ववादी तत्वज्ञानाने भारलेले होते, असेच म्हणावे लागेल.
स्वामी विवेकानंद

सावरकरांनी १९२४ च्या दरम्यान हिंदुत्व ग्रंथ लिहिला त्यापूर्वी त्या हिंदुत्व शब्दाला असणारा अर्थ हा प्रामुख्याने हिंदु धर्म वा रुढार्थाने स्वीकारला गेलेला हिंदु, सनातनी, वा चातुर्वर्ण्य मानणारा हिंदुधर्म याच कल्पनेने स्वीकारला गेलेला होता. मात्र सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ तत्वाने हिंदुत्व आणि हिंदुधर्म असे दोन स्वतंत्र अर्थही रुढ होऊ लागले. पण सावरकरांचे हिदुत्व हे हिंदुधर्म या रुढ अर्थापेक्षा अधिक व्यापक आणि अद्ययावत हिंदुनेस वा हिंदुसमाज घडवू पाहाणारे तंत्र वा तत्त्व होते. याच त्त्त्वाच्या आधारे त्यांनी राष्ट्र ही संकल्पनाही सिद्ध करीत हिंदु समाजाला असणारी भूमी ही तुमची आहे, तुमच्या संस्कृतीशी एकरूप झालेली आहे, तुमच्यावरील विविध आक्रमकांना आणि त्यांच्या आक्रमक धर्माला स्वीकारूनही त्या अहिंदु

माधव सदाशिव गोळवलकर

लोकांनाही नागरिक म्हणून सहजीवक या अर्थाने याच भूमीत स्थान देऊन समानतेची वागणूक देणारी आहे. मात्र ज्या अहिंदुंची म्हणजेच या भूमीत न जन्मलेल्या, न निर्माण झालेल्या धर्म-पंथ- तत्त्वज्ञान यांच्य़ाशी संलग्न नसणाऱ्यांची नाही कारण पुण्यभू हा शब्द हिंदु या व्याख्येत समाविष्ट करून सावरकरांनी हिंदुंना त्यांचा धर्म नव्हे तर हिंदुपण दिले वा हिंदुनेस दिला, इतके लक्षात घेतले तरी हिंदुत्वाची आणि हिंदुधर्माची मर्यादा लक्षात येऊ शकेल. यासाठीच सुधारकांच्या दृष्टीने सावरकर हे अध्यात्मिकता आणि हिंदुजीवनूल्ये यांच्याशी पारंपरिक प्रकारातील नाते न ठेवणारे तत्त्वज्ञान होते. त्यातूनच संघाचे तत्कालिन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर अर्थात गोळवलकर गुरुजी यांनी सावरकरांच्या हिंदुत्वावर टीका केली. त्यांच्या हिंदुत्वाला त्यांनी प्रतिक्रियावादी वा नकारात्मक असे संबोधले. तरीही आज सावरकरांचे हिंदुत्व हिंदुमतध्रुवीकरणासाठी आमचेच मानले जात आहे, हे ही नसे थोडके… तूर्तास इतकेच!

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)
(लेखातील छायाचित्र सौजन्य  - आंतरजालावरून साभार)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...