गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  २  

स्वातंंत्र्य म्हणजे नेमके काय, स्वातंत्र्याचे काही प्रकार आहेत का आदी विविध प्रश्न गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवरील चर्चेतून जाणवू लागले आहेत. यातच भारताचे स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे वीर, सैनिक, व्यक्ती, महात्मे, हुतात्मे असे अनेक आत्मे आज्या भारतीयांची मानसिकता पाहून खरे म्हणजे तळमळत असतील. ब्रिटिश राजवटीपासून मुक्तता मिळवण्यासाठी भारतातील स्वातंत्र्ययुद्धामध्ये अनेकांनी योगदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे याच योगदानामधील महत्वाची व्यक्ती तर सशस्त्र क्रांतिचे ते एक अर्ध्वयूच होते. दुसऱ्या बाजूला अहिंसात्मक कामाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि त्याच अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले असल्याचा दावा करीत सुमारे ७० वर्षे भारतावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसने अहिंसात्मक मार्ग कितीदा चोखाळला होता, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण स्वातंत्र्य हा विषय काही ब्रिटिशांच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतरही संपलेला नाही.

स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक संकल्पनेची व्याप्ती


यामुळेच स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय, त्याचे काही प्रकार आहेत का आणि ते आपण किती अंगिकारले आहेत, त्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळाला आहे का आणि तो कळण्यासाठी आपण व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद या सर्व बाबींसाठी आजही पात्र वा लायक आहोत   स्वत: करायला हवा. स्वातंत्र्य म्हणजे अशी संकल्पना आहे की, व्यक्ती वा समूहाला त्यांच्या इच्छेनुसार, हक्कानुसार, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कार्य करण्याची मुक्तता अर्थात स्वातंत्र्य म्हटले की त्यात निर्धार, स्वत्व, गुलामगिरी वा दास्य यांना बाजूला फेकणे अशा विविध पैलूंचा समावेश जसा होतो तसाच त्या स्वातंत्र्यासंबंधातील विविध प्रकार व घटक यांचीही गणना होत असते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पूजेचे, धर्मपालनाचे स्वातंत्र्य, फिरण्याचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, लिहिण्याचे स्वातंत्र्य, शिकण्याचे स्वातंत्र्य इतकेच काय तर चळवळ करणे, आंदोलन करणे याचेही स्वातंत्र्य, संघटन करण्याचे स्वातंत्र्य अशी यादीच या स्वातंत्र्याच्या प्रकारांमध्ये लागेल. मुळात हे स्वातंत्र्य असणे याबरोबरच जबाबदारीही येत असेत आणि त्यामुळेच स्वातंत्र्य उपभोगताना त्याची जबाबदारीही असते जी व्यक्ती, संघटना, समूह, गट, प्रांत या सर्वांवर बंधनकारक असते. आज त्यासाठी आपण पात्र आहोत का, असा प्रश्नही प्रत्येकाने मनाला विचारला पाहिजे आणि त्याचे प्रामाणिकपणे उत्तरही किमान स्वमनाला दिले पाहिजे. ते दिले तरी खरे म्हणजे खूप होईल, कारण त्यासाठी विचारही सर्वांगाने करावा लागेल. ब्रिटिश तत्त्वज्ञ सर आयझेया बर्लिन (१९०९–९७) यांनी स्वातंत्र्याचे 'नकारात्मक स्वातंत्र्य' आणि 'सकारात्मक स्वातंत्र्य' असे दोन प्रकारही वर्णिले आहेत.  अशा या स्वातंत्र्यासंबंधात विचार करता, स्वातंत्र्यवीर असा शब्द वापरताना तो किती अर्थाने व्यापक असू शकतो, त्यामागील प्रेरणा किती अनेक आयामी असू शकते, त्यात मानवतावादाचे महत्त्वही किती मोठे असते. मनशक्तीही त्यात येत असते. हा विचार करता स्वातंत्र्यवीर ही उपाधी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांना दिली गेली ती नक्कीच परिपूर्ण आहे. 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘द माइंड इज विदाऊट फिअर’ या कवितेची आठवण येते. स्वातंत्र्य उपभोगणे असो की माणसाने मुक्त जगणे असो त्या ठिकाणी टागोरांची ही कविता अतिशय बोलकी आणि अर्थपूर्ण आहे.

स्वातंत्र्य या शब्दाचा हा एकूणच व्यापक अर्थ आणि त्याबरोबर क्रांतिकारक या शब्दाचाही तितकाच सखोलपणा  लक्षात घेता सावरकर या व्यक्तिमत्त्वाने स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक या दोन्ही शब्दांना, संकल्पनेला पूर्ण स्वीकारून आत्मसात केले होते. किमान तत्कालीन विविध राजकीय नेते, विचारसरणी यांच्या तुलनेत सावरकरांनी स्वीकारलेली स्वातंत्र्यांची संकल्पना, देश-राष्ट्र आणि त्याचे स्वातंत्र्य, मानवतेचा विचार, हिंदुपण वा हिंदुसमाजासाठी सांगितलेले हिंदुत्व यांचा अवलंब करताना स्वातंत्र्याला भक्कम अधिष्ठान दिलेले आहे. व्यक्ती, त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य याचा विचार करताना न्याय्य अंगाने त्यांनी केला होता. त्यांनी शुद्धिकरणाची मोहीम राबवण्याचा मांडण्याचा केलेला प्रयत्न हा बळजबरीने नव्हता तर तो लोकांना पटवून देऊन व्हायला हवा या अंगाने केला. इतकेच नव्हे तर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना एका शुद्धिकरणानंतर हिंदु या रुढ धर्मामध्ये प्रवेश केलेल्या एका कुटुंबातील मुलाची मुंजही करण्यासाठी सावरकर स्वत: उभे राहिले. ज्या सावरकरांनी आपल्या मुलांच्या मुंजीही केल्या नव्हत्या म्हणजेच जेथे त्यांनी स्वत:च्या बाबतीत धर्म या संकल्पनेला दिलेले स्थान पाहाता अन्य समाजबंधुंसाठी मात्र त्यांनी आपल्या धारणा, मते बाजूला ठेवून त्या व्यक्तीच्या भावनेला न दुखावता मुंजीत सहभागी झाले. सत्यनारायणाचा प्रसादही त्यांनी खाल्ला. ही बाब ज्या काळात सावरकरांनी धर्मातील कर्मकांडावर, रुढी रिवाजांवर, अंधश्रद्धांवर, सात बेड्यावर प्रहार केले आणि तत्कालिन धर्मधुरिणांच्या रोषालाही सामोरे गेले, टीका सहन केली, त्याचवेळी त्यांनी सर्वसामान्य हिंदु बंधुंना एकत्र आणण्यासाठी सहभोजन आयोजित करणे, त्यात सहभागी होणे, आणि पतितपावन मंदिर प्रवेश आणि त्यातून साध्य केलेले स्वातंत्र्य, साध्य केलेली समाजक्रांति करतानाही व्यक्तीस्वातंत्र्याला, लोकभावनेचे असणारे महत्त्वही स्वीकारले होते. दुर्दैवाने इतके होऊनही रुढी-रिवाजांपासून पोथिनिष्ठ धर्मापासून स्वतंत्र होऊन स्वत: विज्ञानाधिष्ठित विचार करावयास सावरकर प्रयत्न करीत असूनही हिंदु समाज, त्यातील अनेक नेते, समाजधुरिण म्हणवणारी मंडळी यांनी मात्र काहीच बोध सावरकरांच्या धोरणांमधून, मतदर्शनातून, मार्गदर्शनातून, युक्तिवादातून वा तार्किक आणि तात्विकतेमधून घेतला नाही. खरे म्हणजे स्वातंत्र्य हे केवळ एखाद्या जेत्यापासून, त्याच्या अन्यायापासून, त्याच्या राजवटीपासून वा त्यांच्या धर्मापासून, धार्मिक बळजबरीपासूनच मुक्त होण्यात नव्हे, तर स्वत:च्या व्यक्तिस्वातंत्र्याला समजण्यामधून, जीवनशैली काळाबरोबर राखण्यासाठी नवीन विचार स्वीकारण्याचेही आणि जुन्या विचारदास्यामधून बाहेर पडण्याचेही काम महत्त्वाचे असते. जुन्या- जुनाट विचारसरणीतून, कर्मठ, कालबाह्य रुढींच्या कोषातून बाहेर पडणे, मुक्तपणे नवविचारांना समजणे- स्वीकारणे हे देखील स्वतंत्र होण्याचेच काम आहे. ते काम सोपे नाही, कारण त्याचा संबंध मनाशी, बुद्धीशी, भावनेशी येतो आणि हा संबंध पिढ्यांशी संघर्ष करण्यासाठीही प्रत्ययकारी आणि जुन्यांना प्रलंयकारी वाटू शकतो. यामुळेच स्वातंत्र्य हा शब्द इतका महत्त्वाचा आहे, की तो समजून घेणे आणि अंगी बाणवणे हे सोपे नाही ते क्रांति म्हणजेच बदल घडवणारे आहे. जसे कोषातून फुलपाखरू बाहेर पडते. जसा बुद्धाने राजकोषातून बाहेर पडून नवधर्म जागवला तसेच ती धर्माची वास्तवता लोकांप्रत नेण्याचे काम केले तेच क्रांतिकारक होते, स्वातंत्र्ययुद्धासारखेच होते. त्यामुळेच अशा विचारातून सावरकरांनी रत्नागिरीमधील आपल्या स्थानबद्धतेतही केलेेल काम हे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यासाठी केलेली वीरवाणी होती.  त्यांची ही वीरवाणी स्वातंत्र्यवीराचीच होती ती केवळ त्या स्थानबद्धतेमधून तयार झालेली नव्हती तर त्या कर्माचा मागोवा घेता ते त्यांच्या पूर्वायुष्यातील अनेक अनुभवांमधून तयार झालेली निष्पत्ती होती. त्यांचे क्रांतिकारकत्व हे केवळ ब्रिटिशांविरोधातील सशस्त्र क्रांतिच्या कार्याशीच संबंधित नव्हते तर समाजकारण, धर्मकारण, मानवतावाद, राष्ट्रवाद, गुलामगिरी, दास्य, मन, भावन, बुद्धी, आचार-विचार, समानता, समाजोद्धार, अशा विविधांगांना दिशादायी असे संलग्न होते. म्हणूनच स्वातंत्र्य आणि क्रांति या दोन घटकांना खऱ्या अर्थाने जीवनात सामावून घेणारे विनायक दामोदर सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक’ होते. ही प्रगल्भता हिंदुस्थानातील ना हिंदुंना समजली, ना मुस्लिमांना उमगली ना समकालीन आणि अनुनय करणाऱ्या अनेकांना कळली नाही वा तत्कालीन राजकीय- सामाजिक- धार्मिक- वैचारिक सहकारी, समविचारी, विरोधक यांनाही मानवली नाही, पेलली नाही हे या देशाचेच दुर्दैव आहे, असे आजच्या राजकीय अपरिपक्वतेतून आढळून येत आहे.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...