गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

 सावरकर आमचे... पण   -  १  

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवन म्हणजे विविध घटकांनी साकारलेले तत्त्वचिंतन, कृतिशीलता, यांनी भारलेले   क्रान्तिकारक तत्त्व आहे. हे तत्त्व कालाप्रमाणे प्रवाही असणारे आहे. ते तसे राहिले तर नवनागरी चेतनेलाही चैतन्य आज आणू शकेल, इतकी ताकद त्यात आहे याचे कारण बुद्धिवादाशी  ते संबंधित असल्याने नागरी जीवनातच नव्हे तर एकंदर सर्व स्तरावर शिक्षणाचे, विचारप्रवर्तनाचे महत्त्व अधोरेखित होते. यातील महत्त्वाचे हे घटक म्हणजे समाजकारण, बुद्धिवाद, धर्म, हिंदुपणाची वा हिंदुदुत्वाची व्याख्या, देशातील हिंदु समाजाला भौगोलिक मर्यादेची मालकी किती शिल्लक आहे ते सांगून शहाणे करण्याची व्याख्या, मुसलमांनाच्या आक्रमक कृत्यामुळे तयार झालेले प्रत्युत्तर देणारे हिंदुत्व आणि तितक्या च प्रभावीपणे हिंदुसमाजाप्रमाणेच मुस्लीम धर्मासह अन्य धर्मालाही पोथिनिष्ठ तत्त्वज्ञानातून बाहेर काढण्याची तळमळ, जात्युच्छेद आणि त्यामागील जाणीवा, राजकारण, त्रायातील जाण, परराष्ट्रीय धोरणे, राष्ट्राच्या  आर्थिक आणि सीमेवरील संरक्षणाच्यादृष्टीने तत्त्पर जाण अशा विविध घटकांचा नेमका अर्थ आणि निष्कर्ष यातून 'सावरकर आमचे... पण' यामधून निघून प्रत्येकाने 'सावरकर आमचेपण' असे म्हटले पाहिजे. इतकी ताकद या सावरकर तत्त्वज्ञानात आहे. किंबहुना मानवतावादी वाटचालीकडे जाणाराच त्यांचा राष्ट्रवाद आहे, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. अन्य कोणाशीही फार तुलना न करता सावरकरांच्या या तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष काढण्याचा हा आगावूपणा करावा लागत आहे.

भूमिका


गेल्या काही काळापासून   स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विविधांगी वक्तव्ये, विधाने  राजकीय स्तरावरून केली जात असून त्यामुळे सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे समजून घेण्यात अनेकांनी केलेले स्वैरविचार  दिसू लागले. त्यामुळे सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसणारे अनेक पैलू विसंगतपणाने दिसू लागले असे म्हणण्यापेक्षा ते विसंगत केले गेले परिणामी  सावरकर या व्यक्तिमत्त्वावर अन्यायच केला गेला. तरुण  पिढीसमोर त्यामुळे नक्कीच  सावरकर  हे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान  हे विसंगत वा चुकीच्या  सूत्रांनी ठेवले गेले.  राजकीय वापराच्या दृष्टीने सावरकरांचे तत्त्वज्ञान व विचार हे  गैरपद्धतीने मांडले गेले किंवा काहींनी सोयीप्रमाणे मांडले. जसे काही विरोधकांनी सोयीप्रमाणे सावरकर हे व्यक्तिमत्त्व व विचार बदनाम करण्यासाठी वापरले गेले तसेच सावरकरांचे विचार सोयीप्रमाणे वापरून सावरकरांच्या तत्त्वज्ञानाला, अद्ययावतपणाला, खऱ्या अर्थाने असलेल्या  विज्ञानमार्गी आणि माणसाला पोथिनिष्ठ विचारधारणेतून बाहेर काढू पाहाणाऱ्या तत्त्वालाच बाजूला सारले गेले. त्यामुळे सावरकर यांच्या भविष्यवेधी अशा नागरी, राष्ट्रीय आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला झुगारण्याचा प्रकारच केला गेला आहे. अर्थात हे माझे मत आहे, ते अनेकांना पटेल असेही नाही. व्यक्तिस्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला आपला दृष्टिकोन मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठीच हा लेखनप्रपंच.

------------

प्रास्ताविक

न समजलेले सावरकरी तत्वज्ञान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसच्या वैचारिक अपरिपक्व मंथनामुळे  नव्या पिढीसमोर तसेच देशातील आणि परदेशामधील अनेक लोकांपुढे, देशातील हिंदुंमध्येही ज्या नकारात्मक पद्धतीने ठेवले गेले त्यामुळे सावरकरांबद्दल नेमकेपण जाणून घेण्याचा प्रयत्नही सुरू झाला. अर्थात याबद्दल अशा  नकारात्मकतेतून वा अपरिपक्व मंथनातून स्वातंत्र्यवीरांचा अवमान करण्याचा मार्ग काही बरोबर नाही. यातून काँग्रेस वा तथाकथित डाव्या म्हणवणाऱ्या विचारसरणीच्या पक्ष आणि व्यक्ती वा कार्यकर्त्यांना विशेष करून व्या पिढीमधील या व्यक्तींमध्ये एक प्रकारे मतभेद, वैचारिक यादवी माजवण्याचा प्रकार सुरू झाला.  पन्नाशी ओलांडल्यानंतरही काँग्रेसच्या  तरुण असणाऱ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाने आणि त्यांना बदसल्ला देणारे, त्यातून आपले हेतू साध्य करू पाहाणारे काँग्रेस नेते, डावे नेते आणि असा बदसल्ला स्वीकारणारे अपरिपक्व पात्र असे राहुल गांधी यांनी सर्व देशाचीच दिशाभूल केली आहे.

सावरकरांच्या संबंधातील पाटी अंदमानातून काढून टाकायला लावणारे काँग्रेसचे अद्वातद्वा अविचारसरणीच्या नेत्याने सुरू केलेली ही सावरकर विरोधाची वाट काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडायला लावणारी पळवाट वा पायवाट ठरली. कारण तेव्हापासून काँग्रेसने या वाटेचा इतका वापर केला की, त्या वाटेखेरीज सत्तास्पर्धा वा राजकारणात अन्य काही महत्त्वाचे घटक असतात हेच ते विसरले आणि २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भाजपाला सत्ता साधण्यात यश मिळाले. त्यातूनही शहाणपण शिकता येते हे राहुल गांधींना सुचले नाही ना त्यांच्याबरोबरच्या अनेक अपरिपक्व अशा आणि त्यांना सावरकरविरोधात आवर घालण्यास अपयशी ठरलेल्या बदसल्लागारांनाही ते कळले नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरही संस्थांनानी खंडित झालेल्या देशाला पाकिस्तान फाळणीनंतर एकत्रित झालेल्या भारताला पुन्हा आपल्या हातात ठेवण्यामध्ये काँग्रेसला अपयश येण्यास सुरुवात झाली. किंबहुना स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी त्यासाठी केलेल्या कामांबद्दल सतत काँग्रेसच कशी महत्त्वाची भूमिका वठवत होती हे सांगत देशवासींची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला आता ७० वर्षांनी आपणच तयार केलेल्या त्या पळवाटेवरून सत्ताउतार होण्याची नामुष्की आलेली आहे. इतके होऊनही शहाणपण न शिकण्याची काँग्रेस नेतृत्वाची बेफिकीर वृत्ती काही गेलेली नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करून भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचता येणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहेच पण त्याचबरोबर सावरकर तुमचे गांधी आमचे असे सांगणाऱ्या राहुल गांधी नामक काँग्रेस नेत्याला शहाणे करण्याचा सल्ला मात्र कोणीही दिला नाही.   मुळात या देशात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधीजी या दोन व्यक्तिमत्त्वांनी देशामध्ये स्वातंत्र्यासाठी केलेली कामे ही नाकारण्याचा अधिकार आत्ताच्या कोणाही राजकीय पक्षांना नाही. काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची नैतिक धारणाही आजच्या राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्तेही यांनी गमावलेली आहे. मग ते नेते कोणत्याही विचारधारणेचे असोत. नवीन पिढीला पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या चुका सोडा पण त्यांची कामे किती मोठी होती, त्यांचे महत्त्व किती होते, हे सांगण्याची पात्रताही राजकीय पक्षांनी गमावलेली आहे.

गांधी काय किंवा सावरकर काय हे तुमचे आमचे असे म्हणणे केवळ अपरिपक्वतेचे लक्षण आहे. राहुल गांधी यांचे फार वाचन, अभ्यास या अनुषंगाने शून्य कर्तृत्व असेल पण त्यांना सल्ला देण्याचा मान मिळवणाऱ्यांनी मात्र या साऱ्या प्रकारांमुळे देशवासींच्या मनाचा विचार केलेला नाही. त्यांच्यामध्ये एक प्रकारे फूट पाडलेली आहे. 

सावरकर आणि गांधी यांच्यावरील त्या बेलगाम वक्तव्यानंतर भाजपच नव्हे अन्य राजकीय पक्षांनीही जर अशा वक्तव्याला बाजूला सारून सावरकर आणि गांधी यांच्याप्रती देशात असणारी भावना लक्षात घेऊन राहुल गांधी यांना सुधारले असते तर अधिक बरे झाले असते. पण तसे झालेले दिसत नाही. त्यामुळेच चेव चढलेल्या राहुल गांधी आणि त्यांच्या बदसल्लागारांनीही सावरकरांबद्दल अवमानकारक शब्द आणि भावना व्यक्त करीत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या प्रतीही फुटीच्या भावनांना उभे केले. काँग्रेसशी संलग्न असलेल्या काही पत्रकार म्हणवणाऱ्या आणि विचारवंत लेबलाखाली (अहो रूपम अहो ध्वनि म्हणवणाऱ्या)  काही महाभागांनी सावरकरांविरोधात आघाडी उघडून बेलगाम, अपरिपक्व आणि द्वेषमूलक वक्तव्ये करून इतकेच नव्हे तर काहीही कागदपत्रे दाखवीत आपली कृतिशीलता दाखवत, माकडाच्या हातात कोलीत या न्यायाने निवडणुकीच्या हेतूने आत्तापासूनच लोकभावनांना आगी लावल्या आहेत.  मुळात आपल्या हेतूंसाठी (गैरफायदा) अशा प्रकारे राष्ट्रीय व्यक्ती, महापुरुष यांचा वापर करणेही अपरिपक्क्वतेचे, कुसंस्काराचे लक्षण आहे. चुकणाऱ्यांना वा जाणीवपूर्वक चुकणाऱ्यांनाही न सुधारणे आणि मौनं सर्वार्थ साधनम असे धोरण पत्करून सत्ताकेंद्रित, सत्तालोलूप वर्तन करणाऱ्यांनी देशाचे व नवीन पिढीचीही दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे.  गांधी आणि सावरकर यांच्या संबंधातील त्यांच्या विचारांमधून दिसणारी तुलना पाहून कोणी कोणते तत्त्वज्ञान स्वीकारावयाचे ते ठरवावे. राजकारण्यांप्रमाणे सत्तालोलूप तत्त्वज्ञान न स्वीकारता, प्रसारमाध्यमांनी वा सामाजिक प्रसारमाध्यमांवरही अतिरेकी अभिव्यक्ती न सादर करता लोकांनी या संबंधात वागायला हवे होते. पण तसे झालेले दिसत नाही.

सावरकर समजून घेण्यातही अद्याप एक वाक्यता नाही. त्यांच्या हिंदुत्वाचा अर्थ, त्यांची राष्ट्रीयत्वाची धारणा, सामाजिक क्रांतिकारक भूमिका आणि विज्ञाननिष्ठतेबरोबरच नव्या कालाप्रमाणे जाण्यासाठी अद्ययावतपणा ठेवण्याची शिकवण नव्या नागरी संस्कृतीलाह पोषक होती अगदी त्यावेळी त्यांची असणारी ही दृष्टी आजही तितकीच गरजेची आणि त्यांनीच सांगितलेल्या प्रवाही राहाण्याच्या दिग्दर्शनाला साजेशी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे क्रांतिकारक तत्त्व हे यासाठीच पूर्णपणे समजून घेण्याची  अजूनही गरज आहे. त्यांच्या विविध लेखांमधून, लेखनामधून, भाषणांमधून, कृतिशील वर्तनामधून आणि वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमधून हिंदु समाजाला दिलेल्या दिशादर्शनाला डोळसपणे पाहाण्याचा हा प्रयत्न परत परत करावासा वाटतो, अशीच त्यांच्या तत्त्वज्ञानाची ताकद आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व हे सर्वांगीण अशा विविध अनुभूतींमधून जाणारे आहे. त्यांना अध्यात्मिक, धर्मभावुक, धार्मिक ठरवणे योग्य नाही. त्यांना केवळ ऐहिक ठरवणेही योग्य नाही. क्रांतिकारक या शब्दाला ते अधिक साजेसे आहेत. क्रांतिकारक हा शब्द स्वातंत्र्यवीर या शब्दापेक्षाही व्यापक आहे. किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असे दोन्ही घटक हे त्यांचे तत्त्वज्ञान व्यापून टाकणारे आहेत. याचे कारण त्यांना या दोन्ही संकल्पनांनीच सामावून घेतले होते. यामुळेच ते द्रष्टे वाटतात, काळाच्या पुढे पाऊल असणारे दिसतात. त्यासाठी त्यांनी धर्म, समाज, विविध राष्ट्रे, त्यांचा इतिहास, तेथील व्यक्ती, युरोपातील राष्ट्रे, तेथील इतिहास, त्यांचे राष्ट्रपुरुष वा क्रांतिकारक, तेथील विज्ञाननिष्ठा अशा विविध बाबींचा अभ्यास, उहापोह करून सावरकरांनी आपली विचारधारणा अधिक प्रगल्भ केली. अनेकदा अंदमानानंतर सावरकर वेगळे जाणवले असल्याचे काहींना वाटते, पण यातही एक विचार करण्यासारखी बाब आहे ती म्हणजे अंदमानात जाण्याआधी त्यांनी स्वातंत्र्यकार्यात आणि क्रांतिकारकांमध्ये ज्या प्रकारे झोकून देऊन काम केले होते, त्यांना आपल्या देशासंबंधात १८५७ च्या स्वातंत्र्यसमराबाबत, मॅझिनीच्या चरित्राबाबत लिखाण करताना जो स्त्रोत आणि शक्ती लाभली होती त्यामुळे त्यांची भारतातील क्रांतिकारकांचे आणि राष्ट्राच्या संकल्पनेचे महत्त्वही लक्षात आले होते. शिक्षेमुळे अंमदानत गेल्यानंतर आलेले अनुभव आणि आधीच्या विविध अनुभूतीमुळे मिळालेली प्रेरणा यातून काळ्या पाण्याच्या शिक्षेने स्वातंत्र्याचा विचार अधिक प्रगल्भपणे सुचला देश म्हणजे केवळ क्रांतिकार्य नव्हे, त्याच्याशी संलग्न असणारा समाज हा देखील महत्त्वाचा आहे. त्यासाठी समाजाची धारणा कशी असायला हवी, त्याची गरज कदाचित त्यांना अंदमानातील शिक्षेच्यावेळी मिळालेल्या काळामध्ये लक्षात आली असेल कारण तेवढा वेळ त्यासाठी त्यांना तेथे मिळू शकला. तसेच तेथे इंग्रजांनी मुस्लीम कैद्यांना आणि पर्यायाने मुस्लीम समाजाला दिलेली वागणूक ही हिंदु समाजापासून कशी मुस्लीमांना वेगळी करणारी आहे आणि त्याने काय दुष्परिणाम होणार आहेत, हे समजून घेण्यात सावरकर नक्कीच कमी पडणारे नव्हते कारण ते केवळ  ब्रिटिशांविरोधात लढणारे क्रांतिकार्यातील नेते राहिले नव्हते. ब्रिटिशांचा जुलूम जगाच्या पटलावर उघड करणारे स्वातंत्र्यवीर होते क्रांतिकारक होते, अभ्यासाने जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींना त्यांनी अधिक बारकाईने अभ्यासलेले होते, त्यावर विचार केलेला होता. त्यामुळेच त्यांच्यातील सशस्त्र क्रांतिकार्याचा देशभक्त हा केवळ तितका मर्यादित नव्हता. त्याने स्वातंत्र्याचा खरा अर्थ ओळखला होता. त्यातूनच ब्रिटिशांनी हिंदु आणि मुस्लिमांमध्ये केलेला दजाभाव त्यांनी अधिक बारकाव्याने ओळखला होता, इस्लामच्या आणि अन्य धर्माच्या अभ्यासातूनही त्यांनी इस्लाममधील कच्चे धागे जाणले होते. यामुळेच हिंदुत्व सांगताना त्यांनी हिंदुस्थानचा आणि जगामधील हिंदुना भविष्यकाळात काय स्थितीला तोंड द्यावे लागू शकते, त्याची पूर्ण जाणीव ठेवून हिंदुंना त्यांच्या पुण्यभूची जाणीव करून देणे त्यांना अगत्याचे वाटले, महत्त्वाचे वाटले. हे करीत असताना त्यांनी लिहिलेल्या निबंधांमधून सामाजिक क्रांतिकारक तत्वही त्यांनी स्पष्टपणे मांडण्यास सुरुवात केली होती. यामुळेच त्यांचे चरित्र अभ्यासताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असे दोन्ही घटक हे त्यांचे तत्त्वज्ञान व्यापून टाकणारे आहेत, असे प्रबळपणे जाणवते. किंबहुना यातूनच त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा उगम झाला असावा. भारतात प्रामुख्याने असणाऱ्या हिंदुधर्माच्या व हिंदु समाजाच्या व्यक्तींमधील संत, पंत आणि तंत हे त्यांनी पुरते जाणले होते त्यामुळेच रत्नागिरीतील वास्तव्यात त्यांचे समाजकार्य हे राष्ट्रवादी क्रांतिकारक दिशेने जाणारे होते. त्याचे पुढचे पाऊल हे हिंदु महासभेकडे जाणारे होते, हे स्पष्ट होते. त्यामागील राजकीय प्रेरणा ही केवळ हिंदुंचीच नव्हे तर या हिंदुस्थानच्या भूमीसाठी झगडणाऱ्या नेतृत्वाची होती. अशा या विविधांगी घटकांद्वारे सावरकर या व्यक्तिमत्त्वाला शोधणे अधिक तार्किक आणि संयुक्तिक ठरेल असे वाटते. त्यातून सावरकर हे एक कालाबरोबर जायला शिकवणारे तत्त्वज्ञान असल्याचे जाणवते, त्याचे प्रवाहीपण शोधण्याचाही हा एक छोटा प्रयत्न आहे.

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...