रविवार, ३० जुलै, २०२३

कॅलिडोस्कोपसारखं हे सारं क्षणिक असते. सतत बदलत असते, जीवनातील रंगानुसार, सुख, दुःख अशा विविध भावभावनांचे संमिश्र असणारे हे निसर्गाचे भावविहीन तर कधी भावअंकित स्वरूप या कॅलिडोस्कोपमध्ये मिळते. हेच क्षणिक आयुष्य पण प्रत्येक क्षणाला बदलूनही नव नवे आकार दाखविणारे आणि आनंद देणारे; अनुभूती देणारे ते दृश्य भास आणि आभासात असणारे, हे निसर्गाचे रूप कॅलिडोस्कोपसारखेच आहे. आपण याच निसर्गाचे घटक असल्याने सतत बदलत राहून ते बदल स्वीकारणे आणि भविष्यात मी कोणाच्या लक्षात राहिन का याचाही विचार न करता केवळ रंगाचा, भावभावनांचा आकार घेत फिरत राहाणे इतकेच आपल्या हाती असते.  

 काळ येई काळ जाई...

काळ झपाट्याने पुढे सरकतो. जणू पॅकमॅनच्या खेळातील पॅकमॅनसारखी टिंबे गिळंकृत केली जातात, तसेच काहिसे काळाचे असते. तो पुढे सरकतो आणि पुढे सरकताना अनेक ठिकाणे, माणसे, रस्ते, घटना, इतिहास, संस्कृती, धर्म अशा अनेक घटकांना- टिंबांना तो गिळंकृत करत असतो. हीच त्या काळाची झेप असते, काळाची नीती असते. तो आपला, तो परका असे काही त्याच्यापाशी नसते. आपल्या चालीमध्ये तो वाटेत येणाऱ्या या सर्व घटकांना पोटात ढकलत असतो. पुन्हा त्या घटना परत येत नाहीत, ती माणसे पुन्हा होत नाहीत, तो इतिहास पुन्हा घडत नाही, त्या रस्त्यांचे, स्थानांचे रूपडेही संपुष्टात आलेले असते. तर अशा या काळाच्या झेपेत, त्याचा घास व्हायचे की लव्हाळे होऊन सरपटायचे ते ज्याचे त्यांनी ठरवायचे. त्यानुसार मिळणारे, वाट्यास येणारे भोगही जे चांगले किंवा वाईट... ते स्वीकारायचे असतात. नव्हे तर स्वीकारावेच लागतात. अशा या कालमहिम्याला नीट जाणून घेतले तर आपण काळाच्या गर्तेत लुप्त होणार असतोच, पण ते लुप्त होणेही आनंददायी वाटले पाहिजे.

काळ आणि त्याच्या झंझावाताबद्दल खरे म्हणजे आतापर्यंत अनेकांनी अनुभूतींद्वारे आपले मत, विचार मांडले आहेत. पण हे विचार प्रत्येकाने अनुभवलेले असतात आणि नसतातही. असे म्हणण्याचे कारण त्या अनुभूतीचा प्रत्यय तुम्ही कोणत्या दृष्टीने घेता- देता त्यावरही अभिव्यक्ती अवलंबून असते. एकंदर काळ हा असा अक्राळविक्राळ आहे. सारे काही गिळत जातो आपण तर त्याच्यादृष्टीने नगण्यच असतो. मग मी - अहं हे तर कुठल्याकुठे फेकून दिल्यासारखे घटक होतात. असे असूनही आपल्यातील मी पणा मोठा राहातो. मी हे करतो, मी ते करतो, मी ते केले ... सांगणे ठीक आहे पण प्रत्यक्षात आपण जे काही करत असतो, ते क्षणिक आहे. काही क्षणांनंतर मग ते क्षण खरोखरच क्षणाचे असतील तर काहीवेळा ते क्षण महिना, काळ, वर्ष असेही असतील, जे आपल्याला बऱ्याच काळासारखे वाटू शकतात. पण सर्व क्षणिकच आहे, ते नंतर लक्षात येते. 

आजच्या घडीला भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले, प्राणदान दिलेले, सर्वस्व गमावलेले अनेकजण आहेत. आजच्या घडीला देशातील कामासाठी काही ना काही काम करणारे अनेकजण आहेत. काळाच्या पटलावर देश, देव, धर्म, गट, पंथ, समाज, भाषा, संस्कृती अशा विविध घटकांसाठी, काम करणारे मोजके नेतृत्वही तयार होत असते. छोट्या छोट्या नेत्यांपासून, कार्यकर्त्यांपासून ते मोठमोठ्या नेते, राजे, महाराजे, संस्थानिक, शास्त्रज्ञ, अभ्यासक असे विविध स्तरीय व्यक्तिमत्त्व काळाच्या गर्तेत तयार झाली, आणि लोपही पावली. क्षणिकता हा निसर्ग जीवनाचा अविभाज्य भाग असतो. 

कॅलिडोस्कोपसारखं हे सारं क्षणिक असते. सतत बदलत असते, जीवनातील रंगानुसार, सुख, दुःख अशा विविध भावभावनांचे संमिश्र असणारे हे निसर्गाचे भावविहीन तर कधी भावअंकित स्वरूप या कॅलिडोस्कोपमध्ये मिळते. हेच क्षणिक आयुष्य पण प्रत्येक क्षणाला बदलूनही नव नवे आकार दाखविणारे आणि आनंद देणारे; अनुभूती देणारे ते दृश्य भास आणि आभासात असणारे, हे निसर्गाचे रूप कॅलिडोस्कोपसारखेच आहे. आपण याच निसर्गाचे घटक असल्याने सतत बदलत राहून ते बदल स्वीकारणे आणि भविष्यात मी कोणाच्या लक्षात राहिन का याचाही विचार न करता केवळ रंगाचा, भावभावनांचा आकार घेत फिरत राहाणे इतकेच आपल्या हाती असते.  प्रत्येक क्षणाला जगले ते जीवन क्षणिक असते की नाही, ते प्रत्येकाने ठरवायचे. उद्याची चिंता करत असतानाच बदल कधी होतो तेच कळत नाही आणि तो बदल का होतो, ते कळायच्या आत पुढचा बदलही सुरू झालेला असतो, यामुळेच काळ येई काळ जाई.... देव सर्वांभूता ठायी असे स्वसमज करून घेत जगावे, तेच हितकर .... त्यामुळे कसला देश, देव, धर्म, गट, पंथ इतकेच नव्हे तर कसला अहं, कोण मी, कोण आपण, कसली बायको, कसली मुलगी, कसला मुलगा, कसले माय-बाप आणि कसला गोतावळा... हे सारे उशिराने समजते.... याला अध्यात्म म्हणा, लौकिक म्हणा, पारलौकिक म्हणा वा अलौकिक म्हणा... काळचा वेग, दिशा, झोत, दृश्यमानता पकडणे अजूनही हाती आलेले नाही, हाती येणारही नाही. कारण अशाश्वतता हेच शाश्वत सत्य आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...