चिमणी पाखरं आपल्या पिल्लांना ती मोठी झाली की घरातून ढकलून देतात. यात त्या पिल्लांना मिळालेले बळ त्यांना उडायला ताकद देते पण त्याहीपेक्षा आता आपल्याला एकटंच वावरायचं आहे, याची कल्पनाही देते. त्यामुळे आपला जीवनसाथी निवडण्यासाठी ती तयार होऊ लागतात, तसा शोधही घेत असतात. त्यांच्यासारखेच असे जीवही त्यांना भेटतात हाच निसर्ग आहे.
नव्या पिढीचे पंख
अनेकदा नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्ष, वाद वा मतभेद या नावाखाली होणारी चर्चा खरे म्हणजे माझ्यादृष्टीने विफल असते. विफल अशासाठी की, अशा प्रकारच्या चर्चेतून वादातून काही घडत नाही. वादानंतर जर दोन्ही पिढ्यांमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी स्वतःहून विचार केला आणि विचार बदलला तर वेगळे काही घडू लागते. ते वेगळे घडणे हे देखील तसे तात्कालिक असते. मुळात काळाच्या गर्तेत, कालौघात अनेक गोष्टी वाहून जातात, अनेक नामवंतही वाहून जातात, बुडून जातात. आपल्यालाच असे वाटत असते की मी सांगतो ते शाश्वत आहे. खरं म्हणजे शाश्वत काही नाही. प्रत्येक क्षणाला बदल होत असतात. शरिरात, मनात, पेशींमध्ये, विचारांमध्ये, नजरेमध्ये होणारे बदल हे स्वीकारण्याचे बळ मात्र पाहिजे. ते बळ हत्तीचे असते. तसे ते मिळाले तर तो जीव, तो माणूस प्राणी नशीबवान. बदल स्वीकारण्याची मानसिकता वा ताकद हवी. किमान सकृतदर्शनी तुम्ही ते बदल स्वीकारले असल्याचे दाखविले नाहीत, तरी चालेल पण मनाने जर ते सारे स्वीकारलेत, तर ते अधिक महत्त्वाचे. याचे कारण तुमच्या आयुष्यातील जगण्याची ती एक ऊर्जा असते. ती ऊर्जा तयार करावी लागते, तुमची तुम्हाला मिळवावी लागते. ती कोणी देऊ शकत नाही, दिली तरी तुम्ही ती घेऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने काय करावे, काय करू नये, काय करत आहे आदी विचार करणे, विचारणेही सोडून देण्याचे बळ हवे. माझे वडील मला उदाहरण देताना सांगायचे की, चिमणी पाखरं आपल्या पिल्लांना ती मोठी झाली की घरातून ढकलून देतात. यात त्या पिल्लांना मिळालेले बळ त्यांना उडायला ताकद देते पण त्याहीपेक्षा आता आपल्याला एकटंच वावरायचं आहे, याची कल्पनाही देते. त्यामुळे आपला जीवनसाथी निवडण्यासाठी ती तयार होऊ लागतात, तसा शोधही घेत असतात. त्यांच्यासारखेच असे जीवही त्यांना भेटतात हाच निसर्ग आहे.
केवळ इतकेच नव्हे तर त्यांना ढकलून देणाऱ्या त्यांच्या मायबापांनाही त्यामुळे एक मोठी जाणीव होऊ लागते. ती जाणीव म्हणजे आपण एकटेच आहोत, आपल्याला आता जगण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर जगून कमी होणाऱ्या शारिरीक ताकदीला सांभाळत, अजमावित मार्ग काढावयाचा आहे. पशू-पक्षी यांच्यातील भावभावना, संबंध आणि माणसाचे जीवन येथे यात फार मोठा फरक आहे. अनेकदा पशू-पक्षी नवीन जीव तयार करण्यासाठी सरसावतात. प्रजोत्पादन आणि आपली प्राणसृष्टी वाढवण्याचा त्यांचा नैसर्गिक मार्ग असतो. माणसाचं मात्र आता तसं राहिलेले नाही. हम दो हमारे दो हे देखील मागे राहिले गेले आहे. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा काळही खूपच मागे गेला. आज अशी अनेक जोडपी आहेत, त्यांना पहिल्या प्रयत्नांचीही अपेक्षा वाटत नाही. त्यांना मूल काढणे हेच आता महाग वाटू लागते. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक स्थितीमुळे मुलाला जन्माला घालून त्याला काय देतो, त्याच्यापुढे काय ताट वाढून ठेवतो, ते लक्षात घेता त्या नवजात अर्भकाला जन्माला येण्याच्या विचारापूर्वीच बाजूला ठेवले गेले जात आहे. काहींना झालेल्या मुला-मुलीला वेळ देता येत नाही म्हणून दुःख आहे. अशा या स्थितीत विद्यमान नागरी जीवनाच्या झपाट्यामध्ये जगणे हे देखील वैवाहिक, सहजीवनाचे वा वैयक्तिकतेचे सुखावह असे राहिलेले नाही. एकटेपणाची जाणीव नंतर होण्यापेक्षा सुरुवातीपासूनच भानाने स्वीकारली तर ती अधिक चांगली नाही का?
गेल्या काही वर्षांमध्ये एकंदर सामाजिक स्थित्यंतर सर्व पातळ्यांवर झाले आहे. अर्थात त्याला अनेक कारणे आहेत, त्यामुळे नवीन पिढीला जगण्यासाठी विविध तडजोडी कराव्या लागत आहेत, त्याप्रमाणे त्या करत आहेत पण यातून स्थिरचित्त हा प्रकार जवळपास संपुष्टात आला आहे. सर्वच गतिमान करू पाहात आहेत. राजकीय नेतृत्व असो की शास्त्रज्ञांनी लावलेले ऐहिक शोध असोत, त्यामुळे तुमचे आयुष्य विकासाच्या नावाने गतिमान करण्याचा कल वाढला आहे. या गतिमानतेच्या वेगात आपण आपला काळही कतिमान करत आहोत, जगण्याचा अनुभवही गतिमानतेने घेऊ लागलो आहोत. यामुळे जगण्याचा क्षणही झरकन सटकू लागला आहे. हे टाळायचे की नाही, ते मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. मग ती पिढी नवी असो की जुनी. जगण्याची गती कशी असावी, ती आपल्याला झेपते की नाही, आपल्या आयुष्याचे नेमके गमक काय आहे, चंगळवाद मोठा, विज्ञानाच्याद्वारे तयार झालेल्या आधुनिक पण न परवडणाऱ्या सुविधा गरजेच्या की कसे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. प्रत्येकजण काही पंंतप्रधान बनू शकत नाही, त्याच्या मनातील इप्सित ध्येयही तो पूर्ण करू शकतोच असेही नाही. हे सांगण्याचे कारण इतके महत्त्वाचे आहे, की, त्यातून प्रत्येक नव्या पिढीला आपला मार्ग सुकर व सुखकर बनविणे भवितव्यासाठी गरजेचे आहे. त्यांच्या निर्णयावर देश, समाज, पिढी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे आप्तसुहृद अशा अनेकांचे जीवन व भविष्यही अवलंबून असते. यासाठीच नव्या पिढीचे पंख गतिमानतेमध्ये सक्षम करायचे की दीर्घकालीन उपयोगासाठी सक्षम - बळकट करायचे ते त्या त्या पिढीतील प्रत्येक व्यक्तीवर आणि त्या तरुण व्यक्तीसमूहावर अवलंबून आहे. राज्यकर्ता म्हणून त्या पिढीला घडवण्याचे अधिकार दुर्दैवाने साऱ्याच पक्ष कार्यकर्ते व नेते यांनी गमावले आहेत, हे मात्र खरे.
- रवींद्र यशवंत बिवलकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा