आयुष्यात प्रत्येक क्षण जगताना त्या त्या अनुभवांचे, घटकांचे, घटनांचे, कृती-अकृतींचे मूल्यमापन करण्याचा एक वेगळाच प्रयत्न द्वंद्वातून करणार आहे. मनाच्या प्रत्येक कप्प्यांमध्ये ही मानसिक स्तरावरील द्वंद्वे चालू असतात. एखादी व्यक्ती अशी का वा गते, तिचे अन्य व्यक्तीबद्दल असणारे मत तसे का असते, तिच्यात त्या दोन्ही व्यक्तींची बाजू नेमकी काय असते त्यात अपरिहार्यता कशी असते. काळाचा प्रभाव त्यामध्ये कसा पडतो, हे पाहाणे या मानसिक द्वंद्वात पाहाणे विचक्षण ठरेल, असे वाटते.
गंभीर आजाराचे गांभीर्य आणि नातेवाईकांच्या भेटी-गाठी
काही दिवसांपूर्वी व्यक्तीच्या आजारपणामुळे विशेष करून असाध्य अशा आजारपणामुळे आजारी असलेल्या त्या व्यक्तीला पाहायला जावे असे मनात आले. खूप विचार केला तेव्हा माझ्या जाण्याने काय फरक पडेल, माझ्या जाण्याने त्यांना बरे वाटेल की त्रास होईल. भेटीने काही फरक पडेल की, केवळ गेल्याचे उपचार वा उपकार ठरतील, माझ्या जाण्याचा काही उपयोग होईल का, मी त्यापेक्षा काही अधिक मदत करू शकेन का, असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले. एक प्रकारे मानसिक युद्धच सुरू झाले. यावर कधी मित्रांमध्ये तर कधी घरामध्येही चर्चा करताना ते युद्ध होते तर कधी स्वमनातील संघर्ष होता. अनेक मुद्दे त्यातून दिसून आले, निष्पन्न झाले.
आपण जाऊन भेटल्यामुळे आजारी व्यक्ती बरी होणार नाही किंवा तिला त्यामुळे मानसिक दृष्टीने तरी बरे वाटेल का, असा विचार केला तेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा असाध्य आजार होतो, ती झगडत असते, हे तिच्या आणि तिच्या निकटच्या व्यक्तींनाही माहिती असते. ते झगडणे सार्थक असेल असे वाटत असले तरी प्रत्यक्षात सत्य स्वीकार करण्यात मन डळमळत असते. ही बाब त्या रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकाचीही असते. अशावेळी आपण त्या रुग्ण वा आजारी व्यक्तीला भेटून काय साध्य करतो तर काही नाही. किंबहुना केवळ कर्तव्य साध्यता इतकेच त्या मागील उद्दिष्ट असते. मी जाऊन भेटलो, माझे कर्तव्य केले असे समाधान. दुसरी बाब आपण सक्षम विविध पद्धतीने विविध प्रकाराने असलो तरी त्या व्यक्तीला आपण सहाय्य काय प्रकाराने करू हे खरे म्हणजे ठरवावे आणि तसे असेल तरच त्या रुग्ण व्यक्तीप्रत वा तिच्या निकटवर्तींपर्यंत पोहोचून आपल्या भावना आणि आपली मदतीची वा सहकार्याची पुंजी त्यांच्यापुढे ठेवावी. ती स्वीकारावयाची की नाही, ते त्यांना ठरवू द्या, त्यासाठी ती पुढे करताना दबाव नको. त्यामुळे खुलेपणा स्पष्ट होईल. पण अनेकदा असे होते का, याचा विचार प्रत्येकाने करावा. खरे म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विशेष करून नगरांच्या आत्यंतिक निर्मितीनंतर त्या पद्धतीचे नगरशैलीचे जीवन जगू लागलो आहोत. हे करताना प्रत्येकाच्या जीवनातील रॅटरेसमुळे परस्परांमधील भाव भावना मारल्या जात असल्याचे दिसत आहे.
अनेकदा आजारी व्यक्तीला पाहायला जाणे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही त्रासदायक होत असते. आजारी झाल्यानंतर अंथरुणावर असणाऱ्या व्यक्तीला पाहायला जावे आणि त्यामुळे कुटुंबीयांना तुमच्यासाठी मानसिक दबाव, ताणतणाव, आजार कथनाने होणारा त्रास, शारिरीक धावाधाव करावी लागणे असे घडणे हे खरे म्हणजे खूप हास्यास्पद वाटते. तुमचे रुग्णाविषयी वा आजारी व्यक्तीविषयी वाटणारे भाव अशा प्रकारे फलद्रुप होणारे असतील तर त्यामुळे त्या आजारी व्यक्ती वा कुटुंबीयांनाही त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी मनस्ताप होऊ शकतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्या आजारी व्यक्तीसाठी कुटुंबातील एक व्यक्ती स्पेअर करता येत असे, आज तसेही नाही. यासाठीच आजारी व्यक्तीला भेटायला जाणे हे कदाचित आजच्या जमान्यात उपकार केल्यासारखे अपकाराचे काम ठरू शकते. अशा या रिती-रिवाजांचा काळाप्रमाणे, जीवनशैलीप्रमाणे पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असे वाटते. व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल, मोबाईल अशा समाजमाध्यमांचा वापरही या संदर्भात संपर्कासाठी केला जाऊ शकतो, नव्हे तो जरी अधिकाधिक पण आवश्यकतेनुसार संयत रूपात झाला तरी या संबंधात एक चांगले पाऊल टाकल्यासारखे होऊ शकते.
आजारी व्यक्तीचा आजार नेमका कसा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, आपण त्याच्यासाठी काय मदत करू शकतो, रुग्णालयात असताना रात्रीच्यावेळी त्याच्या कुटुंबीयांचा ताण कमी करण्यासाठी रात्रसोबतीचे काम करू शकू का, हा देखील एक भाग महत्त्वाचा असतो. आपल्या हातून अशा प्रकारची मदत होणे वा त्यासाठी सर्व स्नेह्यांनी मिळून जरी काम केले तरी ते उपयुक्त आणि पैसे वाचवणारे कामही ठरू शकेल. आज सोबतीसाठी माणूस ठेवणाऱ्या संस्था आहेत, त्यामध्ये अनेकदा रुग्णाला पूर्ण उपचारात्मक सहकार्य करायची गरज असते तेव्हा नर्ससारखे काम करावे लागते पण ते करावे लागणार नसते विशेष करून अतिदक्षता विभागात असताना कुटुंबामधील व्यक्तीला केवळ बाहेर थांबावे लागते, परिचारकासारखे काम नसते अशा वेळी रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाबाहेर थांबणे अनेक अंशी गरजेचे असते, अशावेळी त्याच्या कुटुंबीयांवरील ताण कमी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईंनी, मित्रानी सहकार्य केल्यास खरे म्हणजे मोलाची मानवसेवाच ठरू शकेल.
- रवींद्र यशवंत बिवलकर
अतिशय सुंदर मार्गदर्शनपर पोस्ट
उत्तर द्याहटवा