निमित्तमात्र
चंगळवादाचे बंड
व्यक्तिस्वातंत्र्याच्या तलम बुरख्याला पांघरलेल्या समाजाला चंगळवादाच्या कोषातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही तरीही त्यातल्या त्यात कथित सनातनी चादर ओढून घेत विकासाच्या भ्रमात गुरफटणेच त्या भारतीयाचा वैैचारिक जिहाद बनले आहे. जोपर्यंत आधुनिक बनण्याचा वा अद्ययावत होत मन, भावना आणि बुद्धीतून स्थिर होण्याचा विकास साधला जात नाही तोपर्यंत हा विकास चंगळवादाचा समानार्थच राहाणार आहे.
जागतिकीकरण वा मुक्त अर्थव्यवस्था लागू झाल्यापासून भारतातील उर्वरित मध्यमवर्ग हा चंगळवाद नामक आभासी जीवनप्रणालीमध्ये पुरता अडकला गेला… किंबहुना १९७० च्या दशकात इंदिरा गांधी यांनी राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत करून बुद्धिवादाकडे झुकू पाहाणाऱ्या तेव्हाच्या मध्यमवर्गात फूट पाडली;. तशीच या चंगळवादानेही फूट पाडली पण ही फूट मध्यमवर्गात नाही तर एकसंघ समाजातच पाडली… शहरी व ग्रामीण वा निमशहरी व अति दुर्बल गटकांमध्ये पाडली.... तशात तथाकथित पुरोगामी म्हणवणारे बुद्धिवादीही पुरते फसले आणि आता धर्माभिमान्यांच्या चक्रव्यूहात अडकून उजवे… डावे उभे-आडवे सारेच दुभंगले. त्यात स्वभलं करून घेणारा बडा सामाजिक वर्ण मात्र राजकीय… उद्योग… शिक्षण… प्रसारमाध्यमादी विविध क्षेत्रात स्थिरावला आहे तो पूर्वीच्या अनेक संस्थानिकांप्रमाणे रयत शब्दाचा पार चोथा चुराडा करून सुवर्ण वा सवर्ण झाला आहे.
यामुळे रोजच्या कामातून पोट भरणारा. चाकरमानी बुद्धिजीवी वैचारिक… शैक्षणिक… आर्थिक तसेच सामाजिक अनिश्चिततेच्या मानसिकतेमध्ये पिळला जात आहे. उत्तर पेशवाईसारखी सामाजिक स्थिती आहे. आता ती फक्त जागतिक पार्श्वभूमीच्या आधारावर दुसरे १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध होण्याची प्रतीक्षा करीत आहे. ते शिपायांचे बंड म्हणून हिणवले गेले… दाबले गेले आणि त्यामुळे बिथरलेल्या ब्रिटिशांना जनमनाच्या भावनेच्या शांतीसाठी राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेस स्थापन करावी लागली. आज अशा प्रकारचे ब्रिटिशही भारतात नसल्याने ना क्रांती… ना बंड ना नवीन राष्ट्रीय सभा ना नवा प्रामाणिक उठाव होऊ शकत की ना कोणी राष्ट्र ही संकल्पना आधुनिकतेच्या शब्दामध्ये देणारा स्वातंत्र्यवीर निर्माण होऊ शकत. याचे कारण...
⭕ ना कोणी उसळून बोलत
⭕ ना कोणी उन्मळून जगत
⭕ ना कोणी उत्स्फूर्त कृती करत
⭕ ना कोणी ज्वलंत होत
⭕ ना कोणी जागृत राहात
⭕ ना कोणी जिवंत होत
सर्व समाजाच्या बोथट, बुभुक्षित, बनेल बुजगावण्याने मानवी भावनेवर मात केली आहे कारण व्यक्तिस्वातंत्र्याच्या तलम बुरख्याला पांघरलेल्या समाजाला चंगळवादाच्या कोषातून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही तरीही त्यातल्या त्यात कथित सनातनी चादर ओढून घेत विकासाच्या भ्रमात गुरफटणेच त्या भारतीयाचा वैैचारिक जिहाद बनले आहे. जोपर्यंत आधुनिक बनण्याचा वा अद्ययावत होत मन, भावना आणि बुद्धीतून स्थिर होण्याचा विकास साधला जात नाही तोपर्यंत हा विकास चंगळवादाचा समानार्थच राहाणार आहे. एकप्रकारे गेल्या काही वर्षांपासून हे बंड आहे पण ते चंगळवादाचे.
- शल्य बोचरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा