सोमवार, १७ जून, २०२४

सावरकर नि त्यांचे वक्तृत्व

 🔹 अत्रे उवाच... (१)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेले लिखाण हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची पूर्णत्वाने ओळख करून देण्याचा त्याकाळातील महत्त्वाचा यशस्वी प्रयत्न होता. आजही त्यांच्या त्या लिखाणातून सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व किती बहुआयामी होते, किती राष्ट्रनिष्ठ होते, किती व्यासंगी , अभ्यासू होते, किती राष्ट्रनिष्ठ व देशभक्त होते याची प्रचिती येते. काळाच्या पडद्याआड जरी अत्रे आणि सावरकर अशी दोन्ही व्यक्तिमत्त्वे गेली असली तरी त्यांची त्यांच्या या लिखाणाच्या निमित्ताने आठवण करण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्या स्नेही आणि साहित्याच्या अभ्यासक संगीता महाजन- बेहेरे यांनी अलीकडेच यासाठी आचार्य अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या लिखाणाला उजाळा देण्यासाठी व नवीन पिढीला अत्रे यांच्या लिखाणाची आणि सावरकर यांच्या व्यक्तित्वाची ओळख व्हावी यासाठी व्हॉट्सअपच्यामाध्यमातून ओळख करून दिली. संगीता महाजन- बेहेरे यांनी हे सारे लेख स्वत: वाचून टाईप व संपादित केले आहे.  आचार्य अत्रे यांचे सावरकर यांच्यावरील लेख जे पूर्वी दैनिक मराठातून प्रसिद्ध झाले व नंतर त्यांचे परचुरे प्रकाशनने पुस्तकरूपाने प्रकाशित केले, ते जुने पुस्तक घेऊन त्यातील लिखाण लोकांपर्यंत पोहोचविले. 'प्रज्वलंत' या सावरकर विचारांना लोकांप्रत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वेबसाइटनेही ते अधिका लोकांप्रत जावे म्हणून साईटवर प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.  आचार्य अत्रे यांच्या त्या लेखांची मालिका त्यानिमित्ताने प्रज्वलंतवर देत आहे.  

 वीर सावरकरांचे वक्तृत्व हा त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्वामधला एक विराट भाग होता. इंग्रजी,
हिंदी नि मराठी या तिन्ही भाषांत सावरकर हे वक्तृत्व करीत असत. आम्ही त्यांचे इंग्रजी वा हिंदी वक्तृत्व फारसे ऐकलेले नव्हते. थोडेसे ऐकले, पण त्यांच्या इंग्रजी नि हिंदी वक्तृत्वाबद्दल आमच्या मनात फारसा आदर नव्हता. सावरकर मराठी भाषा जितक्या वेगाने बोलत तितक्याच वेगाने ते इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलत असत. त्यांचे समकालीन 'बिपीन चंद्र पाल' यांचे इंग्रजी वक्तृत्व त्यांच्या भरदार आवाजांनी एकदम उठून दिसत असे. सरोजिनी नायडूंच्या इंग्रजी वक्तृत्वाला काव्यात्मकता अन्  शब्दश्रीमंती यांचे तेज चढे. ह्या प्रसिद्ध  वक्त्यांचे वक्तृत्वशयक विशेष सावरकरांच्या इंग्रजी वक्तृत्वात आढळत नसत, हे खरे. पण त्यांच्या मराठी वक्तृत्वात जे विशेष होते तेच त्यांच्या इंग्रजी वक्तृत्वाला शोभा देत असत. सावरकरांचे हिंदी वक्तृत्व अगदी सामान्य होते, पण त्यांचे मराठी वक्तृत्व मात्र असामान्य होते. सावरकरांचे वक्तृत्व हे सावरकरांसारखेच होते, असे म्हटले पाहिजे. वक्तृत्वाचा अपूर्वक गुण आपल्याला लाभलेला आहे याची जाणीव सावरकरांना आपल्या १२-१३ वर्षाच्या वयातच आली. होती १९६५ साली पुण्यामध्ये विदेशी कपड्यांची होळी लकडी पुलाच्या पलीकडे एका शेतामध्ये झाली. त्यावेळी दे. शिवरामपंत परांजपे, भालाकार भोपटकर आणि लोकमान्य टिळक हे हजर होते. ज्या ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी व्हावी त्या ठिकाणी व्याख्याने मुळी होऊच नयेत, ती दुसरीकडे व्हावी, असे लोकमान्य टिळकांनी सुचवले. पण सावरकरांना ती गोष्ट पसंत पडली नाही. जळणाऱ्या होळीला रसरसणाऱ्या वक्तृत्वाची साथ मिळाली, तर विदेशी वस्तु बद्दलचा द्वेष लोकांच्या मनात पक्केपणी रुजेल, असा मुद्दा सावरकरांनी त्या व्याख्यानात मांडला. 'होळीशेजारी व्याख्याने करावयाची नाही, तर काय मंडईपाशी कोरडी व्याख्याने करून लकडी पुलापाशी होळी पेटवायची? असा सवाल तरुण सावरकरांनी टिळकांना जेव्हा केला, तेव्हा तरुणांच्या भावना जाणणाऱ्या टिळकांनी अखेर सावरकरांचे म्हणणे मान्य केले. काळकर्ते परांजपे यांचे व्याख्यान यावेळी अत्यंत बहारीचे झाले. एका पेटलेल्या परदेशी कापडाचा कोट हातात धरून त्यांनी लोकांना चेतवीत म्हटले की,' याच परदेशी कोटाच्या खिशातून व्यापाऱ्याच्या मिषाने ते खिसे भरभरून हिंदुस्तान लुटणाऱ्या इंग्रजांचा हा पातकी कोट मी आता अग्निसमर्पण करतो.'  त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. याप्रसंगी सावरकरांनी जे जहाल भाषण केले, त्याबद्दल त्यांना दहा रुपये दंड करण्यात आला आणि त्यांची कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली. सावरकरांचे वक्तृत्व हा त्यांच्या महान व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. आम्ही स्वतः सावरकरांचे वक्तृत्व अनेक वेळी ऐकलेले आहे. त्याप्रमाणे भारतातल्या लोकमान्य टिळकांपासून तो पंडित मदन मोहन मालवीय पर्यंत अन् ॲनी बेझंट पर्यंतच्या अनेक वक्त्यांची व्याख्याने आम्ही पुण्यात ऐकलेली आहेत. पण ज्या काळी 'ध्वनिक्षेपक'यंत्र नव्हते, त्याकाळी इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजी भाषेत सावरकरांनी ८-१० हजाराच्या सभा मंत्रमुग्ध केलेल्या होत्या. पुढे ध्वनिक्षेपक यंत्र आले. त्या यंत्राचा आणि सावरकरांच्या वक्तृत्वाचा संयोग इतका बेमालून बसून गेला की ते यंत्र केवळ सावरकरांच्या वक्तृत्वाच्या लहरी वातावरणात उठवण्यासाठीच जणू काही निर्माण झालेले असावे, असे श्रोत्यांना वाटत असे. सावरकरांच्या आवाजाचे चढउतार, त्यांच्या वक्तृत्वाची गती, त्यांच्या वाणीची गोडी हे सर्व गुण त्या यंत्राच्या वैशिष्ट्यापाशी जणूकाही मिलाफ होण्यासाठी सिद्ध झालेले असावेत, असा त्याकाळी श्रोत्यांना भास होत असे. सहचरणीप्रमाणे आपल्याबरोबर असणारी छत्री आपल्या समोरच्या टेबलावर ठेवून, अत्यंत संथ आवाजात सावरकर आपल्या भाषणाला नेहमी सुरुवात करीत असत. ते हातवारे करीत नसत. आपल्या आवाजाची विनाकारण धडपड ते करीत नसत, शब्दांची उतरंड लावण्याचा आटापिटा ते करीत नसत, खोट्या उपमा, अलंकार वगैरे साधण्याचा हव्यास त्यांना नव्हता, तथापि हे सर्व गुण अंगात नसताना सुद्धा सावरकरांनी बोलावयाला सुरुवात केली की हा वक्ता आता आपल्यावर हळूहळू मोहिनी पसरत चाललेला आहे, अशा विचारात श्रोते जो निमग्न आहेत, तो सावरकरांच्या भावना उद्दीपित होत असत, आणि त्यामुळे त्यांचा आवेश, वाणीची गती, मुद्रेचा आविष्कार यांना पराकाष्ठेने उत्कर्ष होत जाई. सावरकरांच्या वक्तृत्वात नाटकीपणा होता असा काही लोकांचा त्यांच्यावर आक्षेप होता. पण तो त्यांच्या बोलण्यातला नाटकीपणा नसून ती त्यांच्या मनातील अपरंपार तळमळ होती. १९०८ साली लंडनच्या भारत भवनात एका तथाकथित राष्ट्रीय मुसलमानाशी त्यांची वक्तृत्वाच्या बाबतीत झटापट झाली. त्यावेळी बॅरिस्टर असफअल्ली हजर होते. त्यांनी सावरकरांच्या वक्तृत्वाचे पुढील प्रमाणे वर्णन केले: ' Fragile as an anemic girl, restless as a mountain torrent and as keen as the edge of a Toledo blade.'

( रक्तशून्य मुलीसारखे नाजूक, डोंगरातून खळखळणाऱ्या जलप्रवाहासारखे अस्वस्थ अन् टोलेडो तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार असे सावरकरांचे वक्तृत्व होते.) व्याख्यानाच्या आधी किंवा व्याख्यानाच्या सुरुवातीला सावरकरांना कोणी डीवचले, की सावरकरांचे व्याख्यान प्रारंभापासूनच वरच्या पट्टीत सुरू होई आणि मग पुढे श्रोत्यांना अक्षरशः पंचपक्वान्नाची मेजवानी मिळे. गाण्याच्या मैफिलीत रंगणारे रसिक जसे सांगतात की खऱ्या अर्थाने रंगलेली बैठक जेव्हा समाप्त होते, तेव्हा गाणारा गवई नि ऐकणारे श्रोते यांची अशी काही लय लागते, की बैठक संपल्यानंतरही बराच वेळ त्या गाण्याचे पडसाद श्रोत्यांच्या अंतःकरणात घुमत राहतात. सावरकरांच्या उत्कृष्ट व्याख्यानाच्या शेवटी हीच स्थिती होत असे. एकोणचाळीस साली मे महिन्यात पुण्याच्या 'वसंत व्याख्यानमाले'त सावरकरांनी 'लाला हरदयाळां'वर व्याख्यान दिले. यावेळी या महान देशभक्ताच्या बाबत काँग्रेसने दाखवलेल्या उपेक्षा वृत्तीवर टीका करताना सावरकर कडाडले की, ' अरे इकडे कोणी उंदीर मेला तरी तुम्ही स्तंभच्या स्तंभ खरडता नि तिकडे 'लाला हरदयाळ' देशासाठी फकीरी पत्करून वणवण करीत पतन पावला, तरी त्याच्यासाठी साध्या दोन ओळी ही तुम्हाला लिहावत नाही का?' सावरकरांचे ते व्याख्यान ऐकल्यानंतर नादब्रम्हाचा साक्षात्कार व्हावा, अशी पुणेकर श्रोत्यांची स्थिती झाली. पुढे त्याच वर्षी ऑगस्टच्या पहिल्या तारखेला 'टिळक स्मारक मंदिरात' त्यांचे व्याख्यान झाले  त्याचा समारोप करताना सावरकर म्हणाले,'कवी श्रेष्ठ गटेच्या काळी प्रशियाचे तुकडे तुकडे होऊन ते राज्य नेपोलियनच्या हाती गेलेले होते. तेव्हा गटेने कविता रचली की मी माझ्या राज्याच्या सिंहासनावर माझा राजा परत बसलेला पाहीपर्यंत मी भीक मागत हिंडेन.' गटेचे ते स्वप्न चार पाच पिढ्यानंतर साकार झाले. आज हिटलरच्या नेतृत्वाखाली सारे जर्मन राष्ट्र एका निशाणाखाली एकत्र झालेले आहे. वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते, पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते, ती वाढता वाढता तिचा प्रचंड वृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात. उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो. मलाही अशीच एक वल्गना करू द्या. माझे गाणे मला जाऊ द्या. या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे, आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या पिढीत नाही तर पुढील पिढीत ही वल्गना खरी ठरेल. माझी ही वल्गना खोटी ठरली, तर मी वेडा ठरेल, माझी ही वल्गना खरी ठरली, तर मी प्रॉफिट ठरेल. हा माझा वारसा आज मी तुम्हाला देतो आहे. त्या सभेचे अध्यक्ष तात्यासाहेब केळकर होते. सावरकरांच्या व्याख्यानाचा हा समारोप जसजसा रंगत चालला, तसतसे केळकर आनंदाने डोलू लागले, आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ठिपकू लागले.

६/३/१९६६

  आचार्य अत्रे

(लेखातील छायाचित्र सौजन्य  - आंतरजालावरून साभार)

1 टिप्पणी:

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...