🔹 अत्रे उवाच... (२)
देशाचे एकत्व सांगताना ते एकदा म्हणाले, "हिमालयाला आग लागली, तर सिंधूसागराने भिजवायला धावले पाहिजे. माझ्या हृदयात अखंड भारताचा आलेख कोरला गेला आहे. त्यातला कोणता प्रात मी तोडून देऊ? पेशावर देईन तर त्या प्रांतात पाणिनी आपल्या गिर्वाणवाणीचा मोठ्यात मोठा व्याकरणकार होऊन गेला, द्वारका देईन तर साक्षात श्रीकृष्णाच्या अवतार तेथे झाला, बंगालमध्ये कालीमातेची चैतन्याची पूजा होते, महाराष्ट्र म्हणाल तर मी माझे हृदयच तोडून दिल्यासारखे होईल. व्यास, वाल्मिकी, पराशर अशा महान तपस्व्यांनी पावन केलेल्या देशाचे या अखंड भारताचे तुकडे करण्यास कोणता हाडाचा हिंदू सिद्ध होईल? वक्ता दशसहस्रेशु अशा कोटीतले ते महान वक्ते होते. गंगेचे पाणी नि सावरकरांची वाणी यांची तुलना विशालतेत, वेगात नि पावित्र्यात यथार्थपणे करता येईल.
केवढाही मोठा समाज असो त्याला नागाप्रमाणे डोलावयाला लावण्याची किमया सावरकरांच्या वक्तृत्वात होती. सभास्थानी सावरकरांचा प्रवेश झाला रे झाला, की श्रोत्यांच्या सर्वांगावर विद्युत् कंप उठे. सावरकरांची मध्यम उंचीची, गौरवर्णाची, कृष बांध्याची तेजस्वी मूर्ती व्यासपीठावर उभी राहिली की, श्रोते आपले देहभान विसरत असत. त्यांच्या भाषणाची सुरुवात जितकी सामान्य तितकीच श्रोत्यांच्या काळजांना भिडणारी अशी असे. "हिंदू बांधव हो!" किंवा "हिंदू बंधूंनो!" अशा कोमल आणि लाघवी स्वरात जेव्हा ते आपल्या श्रोत्यांना संबोधित असत, तेव्हा श्रोत्यांच्या काळजात ज्या सद्भावनेच्या संवेदना उठत, त्याचे वर्णन करायला आमच्याजवळ शब्द नसत. यशस्वी वक्त्यांच्या अंगी अनेक गुण असावे लागतात. कारण भिन्नभिन्न मतांच्या बहुरंगी समुदायाची नाडी वक्त्याला चटकन ओळखावी लागते. अंतरीची तळमळ, बिनतोड युक्तिवाद, प्रसंगावधान, प्रत्युत्त्पन्नमती या सर्व गुणांचे पाठबळ वक्त्याला असल्याखेरीज श्रोते सहजासहजी त्याच्या काबुत येत नाहीत. रत्नागिरीच्या स्थानाबद्धतेतून सावरकरांची जेव्हा सुटका झाली, तेव्हा महाराष्ट्रात किती माणसे त्यांच्या पाठीशी उभी होती बरे? केवळ आपल्या असामान्य वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर सारा महाराष्ट्र सावरकरांनी आपल्या मागे उभा केला. सावरकरांनी आपले व्याख्यान सुरू केले, की अगदी पहिल्याच वाक्यात ते श्रोतृसमाजाच्या काळजाला हात घालत असत. ज्या शहरात किंवा ज्या वास्तू समोर ते बोलायला उभे राहत त्याचा ते पहिल्याच वाक्यात इतका अचूक उल्लेख करीत की श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहत. उमरावतीला ते एकदा व्याख्यानाला गेले असताना त्यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ कोणाच्या नावाने करावा? अर्थात, दादासाहेब खापर्ड्यांच्या! ते म्हणाले, "ज्यांना प्रति टिळक असे म्हटले जात असे, त्या दादासाहेब खापर्डे यांच्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत मी आज व्याख्यानाला उभा राहिलेलो आहे." भागानगरच्या म्हणजे दक्षिण हैदराबादच्या लढ्यासंबंधी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर व्याख्यान देत असताना त्या वाड्याच्या दिंडी दरवाजाकडे एकदम हात फेकून ते म्हणाले की, "अरे नाना फडणविसांनी काढलेल्या निजामाच्या नाड्या आखडणाऱ्या राजाज्ञा ह्याच वाड्याच्या आतल्या तालनातून सुटल्या ना?" जमनादास मेहतांच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या एका सभेत पायाला काही दुखणे झाले असताना सावरकरांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली की "आज एक पाय रुग्णाईत आहे. असे असताना सुद्धा मी आज येथे व्याख्यानाला आलेलो आहे. त्याअर्थी जमनादासांना पाठिंबा द्यायला मी एका पायावर उभा आहे. हे आपल्याला दिसून येईल." मुंबईमध्ये सावरकरांचा एकसष्टी समारंभ सर रघुनाथ परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यावेळी प्रारंभीच्या भाषणात आप्पासाहेब परांजपे यांनी सावरकरांची खूपच स्तुती केली. मागाहून सत्काराला उत्तर देताना सावरकर म्हणाले की, "मी अप्पारावांचा महाविद्यालयातल्या विद्यार्थी. माझे गणित फारच कच्चे. अप्पारावांनी माझ्या उत्तर पत्रिकेवर चूक म्हणून कितीतरी फुल्या मारल्या होत्या. तेव्हा मला वाईट वाटे. पण आज तेच माझे गुरुवर्य माझे राजकारणातले गणित तंतोतंत बरोबर असल्याचे कबूल करतात, याचा मला अत्यंत आनंद होत आहे." मुंबईच्या आंग्रेवाडीत त्यांचे व्याख्यान झाले तेव्हा ते म्हणाले," इंग्रजांना नौयुद्धात जरब बसवणाऱ्या या आंग्ऱ्यांच्या वाड्यात मी आज बोलतो आहे." एक काळ असा होता की, सावरकर कुठेही जावोत त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडला नाही असे कधीही झाले नाही. सिंधच्या दौऱ्यानंतर 'सिंध ओब्सर्वर' पत्राने सावरकरांबद्दल पुढील अभिप्राय व्यक्त केला होता "He came, He spoke, He conquered!" उपहास नि उपरोध हि सावरकरांची अत्यंत आवडती शस्त्रे असत. लाठीधारी तरुणांच्या मेळाव्या पुढे भाषण करताना एकदा ते हसत हसत म्हणाले, "आजकाल पोरी सुद्धा लाठी फिरवू लागल्या आहेत. आता निदान बंदुका तरी हातात घ्या. नाहीतर पोरीच तुमची डोकी शेकून काढतील." मुंबईच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून त्यांनी सैनिकीकरणाचा दिलेला संदेश म्हणजे वक्तृत्व कलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. जे राष्ट्र खुरटे आणि दुबळे त्याचे साहित्यही कसे खुरटे व दुबळे असते, ते तुम्ही नालंदेला विचारा, तक्षशिलेला विचारा. असे सांगून त्यांनी श्रोत्यांना सवाल केला की, "ऑस्ट्रियाच्या मरणाची किंकाळी ऐकलीत ना? परवा त्याच्या शेवटच्या अध्यक्षांनी शेवटचे वाक्य हे उच्चारले की ' We yield under German swords and not under German Sounets!' आपल्या विरोधकांच्या वर्मी घाव घालण्याची कला सावरकरांना उत्तम साधलेली होती. डॉक्टर पट्टाभी सितारामय्यानी लिहिलेल्या काँग्रेसच्या इतिहासात क्रांतिकारकांच्या कार्याचा त्यांनी अनुल्लेख केला आहे. त्याला उद्देशून सावरकर एकदा कडाडून म्हणाले की,"अरे तुम्ही खूप दडवाल. पण तुमचे बाप आम्ही येथे जिवंत आहोत ना? आम्ही येथे जिवंत असताना राष्ट्रात खरीखुरी चळवळ वीस सालापासून सुरू झाली असे तुम्हाला म्हणवले तरी कसे?" दुर्दम्य आत्मविश्वास हे सावरकरांच्या वक्तृत्वाचे एक अविस्मरणीय वैशिष्ट्य आहे. नागपूरच्या एका दौऱ्यात एका कम्युनिस्टाने त्यांना विचारले की तुम्ही मार्क्स वाचला आहे काय? तेव्हा सावरकरांनी ताडकन त्यांना विचारले की "मार्क्सने सावरकर वाचला होता काय?" त्यांच्या आत्मविश्वासाचा निदर्शक असा 'च' हा त्यांच्या व्याख्यानात पदोपदी आढळून येत असे.' घडवून आलेच पाहिजे', 'करतीलच', 'नाहीच नाही', 'शंकाच नको',' करणारच', 'होणारच', असे प्रयोग त्यांच्या तोंडी वारंवार येत असत. या 'च' मुळे सावरकरांचे वक्तृत्व अतिशय परिणामकारक होत असे. 'याल तर तुमच्यासह' या सावरकर सूत्राचा जनक हा 'च' आहे. त्यांच्या वाणीला ठाशिवपणाचा आणि सिद्धांत वाणीचा पीळ हा च भरीत असे. गवयाची जशी सम, तसा हा सावरकरांचा च होता. त्याला हटकून टाळी मिळत असे. विशिष्ट शब्दांवर जोर देणे, उपरोधगर्भ वाक्य स्वर हेलावीत आणि माना डोलावीत म्हणणे, क्वचित मध्येच स्वर खाली आणणे, प्रश्नांमागून प्रश्नांची फैर झाडणे, साभिप्राय थांबणे, अशा बारीक सारीक गोष्टींनी ते आपल्या वक्तृत्वाचे नाट्य उभे करीत असत. 'स्वातंत्र्य' 'हिंदुत्व' 'दायित्व' 'मानबिंदू' 'एकमेव' 'स्वयमेव' 'सुखेनैव' 'अवश्यमेव' 'हिंदूजग् त','तथाकथित' 'संचालन', 'संघटन', 'भूदल', 'नौदल', 'वायुदल', 'आसेतु हिमाचल', 'आसिंधुसिंधू' हे वाक्प्रयोग त्यांच्या भाषणात वारंवार येत असत. आणि ते शब्द त्यांच्या तोंडून अशा ठसक्याने बाहेर पडत असत, की त्यांचा उच्चार श्रोत्यांच्या कानावर पडताच त्यांच्या अंतःकरणातून एक नादमय लहर उमटून जाई. कधीकधी तर त्यांच्या वाणीला परतत्वाचा स्पर्श होत असे. त्यावेळी अंतरीच्या जिव्हाळ्याने ते स्वतः भारून जात आणि श्रोत्यांना भरून टाकीत. एकदा हिंसाअहिंसेची चर्चा करताना ते म्हणाले, "ही आपली सृष्टी हरिण बालकांचा वध करून स्वतःच्या पिल्लांना ममतेने पाजणारी एखादी व्याघ्री आहे." देशाचे एकत्व सांगताना ते एकदा म्हणाले, "हिमालयाला आग लागली, तर सिंधूसागराने भिजवायला धावले पाहिजे. माझ्या हृदयात अखंड भारताचा आलेख कोरला गेला आहे. त्यातला कोणता प्रात मी तोडून देऊ? पेशावर देईन तर त्या प्रांतात पाणिनी आपल्या गिर्वाणवाणीचा मोठ्यात मोठा व्याकरणकार होऊन गेला, द्वारका देईन तर साक्षात श्रीकृष्णाच्या अवतार तेथे झाला, बंगालमध्ये कालीमातेची चैतन्याची पूजा होते, महाराष्ट्र म्हणाल तर मी माझे हृदयच तोडून दिल्यासारखे होईल. व्यास, वाल्मिकी, पराशर अशा महान तपस्व्यांनी पावन केलेल्या देशाचे या अखंड भारताचे तुकडे करण्यास कोणता हाडाचा हिंदू सिद्ध होईल? वक्ता दशसहस्रेशु अशा कोटीतले ते महान वक्ते होते. गंगेचे पाणी नि सावरकरांची वाणी यांची तुलना विशालतेत, वेगात नि पावित्र्यात यथार्थपणे करता येईल.
सात तीन १९६६
[ वक्तृत्वावरील हे लेख श्री.शि.ल. करंदीकर आणि प्रा. स. गं. मालशे यांच्या लेखनावर सर्वस्वी आधारलेले आहेत.]
सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा