रविवार, ३० जून, २०२४

सावरकर साहित्याचे तेजस्वी पैलू

 🔹 अत्रे उवाच... (३)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेले लिखाण हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची पूर्णत्वाने ओळख करून देण्याचा त्याकाळातील महत्त्वाचा यशस्वी प्रयत्न होता. आजही त्यांच्या त्या लिखाणातून सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व किती बहुआयामी होते, किती राष्ट्रनिष्ठ होते, किती व्यासंगी , अभ्यासू होते, किती राष्ट्रनिष्ठ व देशभक्त होते याची प्रचिती येते. काळाच्या पडद्याआड जरी अत्रे आणि सावरकर अशी दोन्ही व्यक्तिमत्त्वे गेली असली तरी त्यांची त्यांच्या या लिखाणाच्या निमित्ताने आठवण करण्याचा हा प्रयत्न आहे.   आचार्य अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या लिखाणाला उजाळा देण्यासाठी व नवीन पिढीला अत्रे यांच्या लिखाणाची आणि सावरकर यांच्या व्यक्तित्वाची ओळख व्हावी यासाठी व्हॉट्सअपच्यामाध्यमातून ओळख करून देत आहोत. संगीता महाजन- बेहेरे यांनी हे सारे लेख स्वत: वाचून टाईप व संपादित केले आहे.  आचार्य अत्रे यांचे सावरकर यांच्यावरील लेख जे पूर्वी दैनिक मराठातून प्रसिद्ध झाले व नंतर त्यांचे परचुरे प्रकाशनने पुस्तकरूपाने प्रकाशित केले, ते जुने पुस्तक घेऊन त्यातील लिखाण लोकांपर्यंत पोहोचविले. 'प्रज्वलंत' या सावरकर विचारांना लोकांप्रत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वेबसाइटनेही ते अधिका लोकांप्रत जावे म्हणून साईटवर प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.  आचार्य अत्रे यांच्या त्या लेखांची मालिका त्यानिमित्ताने प्रज्वलंतवर देत आहे. 

सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ओजस्वी  पर्वच आहे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा जो होम केला आणि जे दैदिप्यमान पराक्रम केले त्याला तुलना नाही. त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूला मूर्तिमंत आव्हानच होय. श्रीशिवछत्रपतींपासून स्वातंत्र्यवीरांची जी उर्जस्वल परंपरा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि ज्या परंपरेत गेल्या चार शतकात अनेक महान  नरनारी रत्ने निर्माण झाली, त्या परंपरेमध्ये सावरकर एखाद्या कोहिनूर हिऱ्यासारखे चमकत राहतील. त्यांचे साहित्य म्हणजे स्वातंत्र्यप्रीतीचे आणि देशभक्तीचे धगधगते अग्नीकुंडच होय. त्यांच्या वाणी मधून आणि लेखणी मधून 'ज्वाला आणि ठिणग्यां'चे खेरीज दुसरे काहीच बाहेर पडले नाही. त्यांचा एकेक शब्द म्हणजे आगगाडीच्या इंजिनामधला लाल रसरशीत दगडी कोळसा. त्याच्या धगीनेच सर्वांगाचा भडका उडवायचा. सारा समाज नव्हे, सारा देश पेटवण्याची ज्यांच्या वाङ्मयामध्ये विलक्षण दाहाकता आहे, असा सावरकरांखेरीज दुसरा लेखक या भारतात क्वचितच होऊन गेला असेल. आमच्या लहानपणी तर त्यांच्या 'सिंहगडाच्या पोवाड्याने' साऱ्या महाराष्ट्राला आग लावली होती याचे स्मरण अद्याप आम्हाला आहे.

ते धन्य मराठे गडी,
घेती रणी उडी
करुनि तातडी
देशार्थ मृत्यूही वरिला
शाहिस्ता चरचर चिरीला! गनिमांनी वचक बहु धरीला


किंवा
निर्जीव अन्न का रुचेल
उदर शत्रूचे
फोड  तेथिचे
आतड्यांनि भूक शमवावी
रक्तानी भूक शमवावी
मासानी भूक शमवावी घ्या गड कडकड चावुनि अधरा
धाव ये काजी
प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गा जी


या त्यांच्या ओळीच्या संथा महाराष्ट्रात तरुण त्यावेळी घरोघर घोकीत बसले होते. त्यांच्या 'जोसेफ मॅझिनी'ची प्रस्तावना तर पहिल्या ओळी पासून तो शेवटच्या ओळीपर्यंत घडघड म्हणून दाखवणारे कितीतरी तरुण त्यावेळी आढळले असते." स्वातंत्र्य हे फायद्याचे आहे, म्हणून नव्हे, तर ते मर्दाचे कर्तव्य आहे म्हणून ते मिळवले पाहिजे! भाकर स्वस्त आहे किंवा महाग आहे, हा प्रश्न नाही त्या भाकरीवर गुलामगिरीचा शिक्का आहे की नाही हा मुख्य प्रश्न आहे." ही त्या प्रस्तावने मधील सावरकरांची अमर सुभाषिते त्या वेळेपासून आमच्या डोक्यात घुसून बसली आहेत. आणि त्यांचा 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ तर भारतीय क्रांतीचे अमरगीतच होऊन बसला आहे. ब्रिटिश राज्य उलथून पाडण्यासाठी प्रचंड सैनिकी युद्ध कसे उभारावे ह्याचा तो ज्वलंत इतिहासच आहे. गेल्या पन्नास वर्षात ह्या देशात किंवा देशाबाहेर भारताच्या सशस्त्र क्रांतीचे जेवढे म्हणून काही प्रयत्न झाले, त्या सर्वांची प्रेरणा म्हणजे हा एकच ग्रंथ. हिंदुस्थानच्या अगदी कानाकोपऱ्यात ह्या ग्रंथाचा गुप्तपणे प्रचार झाला. अमेरिकेमधल्या 'गदर पक्षा'ने त्याचे पंजाबी, हिंदी आणि उर्दू भाषांतून भाषांतर करविले. भगतसिंहाने आणि त्याच्या सहकार्यानी या ग्रंथाच्या दोन इंग्रजी आवृत्ती छापून काढल्या. आणि नेताजी सुभाषचंद्रांनी तर आपल्या 'आझाद हिंद फौजे' मधील प्रत्येक सैनिकाला पाठ्यपुस्तकाप्रमाणे ह्या ग्रंथाचा अभ्यास करायला लावला. सारांश गेल्या अर्धशतकातील बहुतेक सर्व भारतीय क्रांतिकारकांना क्रांतीचा गुरुमंत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याने दिलेला आहे. या दृष्टीने भारतीय क्रांतीच्या आणि स्वातंत्र्याच्या भव्य आणि जाज्वल्य इतिहासात सावरकरसाहित्याचे अनन्य साधारण स्थान आहे.
      मराठी साहित्यामध्ये असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यामध्ये सावरकरांची लेखणी दिमाखाने संचार करत नाही. कथा, कादंबरी, नाट्य, निबंध आणि काव्य या वाग्मयाच्या सर्व दालनात त्यांच्या प्रतिभेने आणि कल्पनेने एकाही पेक्षा एक भव्य आणि दिव्य विलास करून दाखविलेले आहेत. त्यांची भाषा म्हणजे एखाद्या ज्वालामुखीच्या तोंडातून वाहणाऱ्या लाव्हारसाच्या प्रवाहासारखी वाटते. विचार ,भावना आणि भाषा यांचे जळजळीत रसायन बनवून ते पराकाष्ठीच्या द्वेषाने, आवेशाने आणि झपाट्याने उधळणारा त्यांच्यासारखा गोलंदाज लेखक निदान आम्ही तरी पाहिला नाही. स्वतंत्र भारतामध्ये आमच्या राष्ट्रीय पुण्यसरीता मुक्त झाल्या. पण त्या पुण्य सरितांमधील पुण्यतम सरिता जी सिंधू ती मात्र अद्याप आमच्या महाराज्यात सामावलेली नाही. हा हृदयभेदक विचार व्यक्त करताना त्यांची भाषा जे तेजपुंज रूप धारण करते, ते पाहून अक्षरशः डोळे दिपतात. ते सर्वच सिंधू स्तोत्र येथे देण्याचा मोह आम्हाला आवरत नाही.
     "सिंधूस आम्ही विसरू? सिंधू वाचून हिंदू? अर्था वाचून शब्द! प्राणा वाचून कुडी! अशक्य! अशक्य! अशक्य! जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर तो सिंधूस विसरणे शक्य नाही. जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्शींनी ऋचांची पहिली सामगायने गायली, जिच्या पुण्यसलीलांनी आपल्या संध्यावंदनांनी अर्ध्ये दिली आणि जिला अत्यादराने वेदातील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सुक्ते रचली ,त्या तुला,-   हे अंबितमे, नदीतमे, देवितमे, सिंधू, आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्या परिसरामध्ये आमच्या प्राचीनतम राजर्षींनी, ब्रम्हश्रींनी केलेल्या यज्ञांच्या प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवी समर्पिले, तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधांनी लालाईत होऊन इंद्र,वरूण, मरूतादी देव त्यांचे त्यांचे हविर्भाग स्वीकारण्यास तुझ्या तीरी येत आणि सोमरसासमावेतच तुझे सुमधुर सलिल पिऊन प्रसन्न होत ,त्या तुला हे सुरसरीते सिंधू, आम्ही कधीही विसरणार नाही. तुला इतर कोणीही जरी एक वेळ विसरले तरी हे स्तोत्र:स्विनी सिंधू हा आमचा एकटा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा विमुक्त केल्यापासून राहणार नाही.
      मॅझिनीचरित्राच्या 'प्रस्तावने'चा शेवट करताना सावरकरांच्या भाषेचा हा दाहक दिमाख पाहा :
    ज्याचा जन्म परतंत्रित झालेला आहे, परंतु जे आपल्या पराक्रमाने त्या परतंत्रेचे निर्दालन करून आपला स्वदेश स्वतंत्र झालेला पाहतात व त्या स्वतःच्या कर्तबगारिने दास्यमुक्त केलेल्या भूदेवीच्या अंकावर आपले शुभ्र मस्तक ठेवून चिन्मय होतात, त्यांच्या आनंदाला सीमा नाही. मग जगात काही निर्मल सुखाचे क्षण असतील तर त्यांच्यात तो क्षण शुद्ध सुखाची परम सीमा करणारा होय, की ज्या क्षणी आपल्या अत्यंत प्रिय देशजननीला ज्याने असह्य दुःख दिले, तो शत्रू मार खात खात देशाच्या हद्दीबाहेर पळून चाललेला आहे, हे पाहता येते. जर निर्मळ धन्यतेचा एखादा दिवस असेल तर तोच होय, की ज्या दिवशी देशजननीला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून रणांगणातून देशभक्त परतत आहेत व त्या स्वातंत्र्यासाठी पतन पावलेल्या देशवीरांच्या आत्म्यांना संबोधून अशी गर्जना करीत आहेत की, "देशवीरहो! आपला देश स्वतंत्र झाला आहे! तुमच्या रक्ताचा सूड उगवला आहे!"
      सावरकरांच्या प्रतिभेचे सव्यसाचित्व हे आहे की क्रांतीचा अंगार ती जितक्या प्रखरतेने उधळते, तितक्याच कोमलतेने काव्याचीही कारंजी तिच्यामधून उचंबळू शकतात. हा नमुना बघा :  'ज्या जगात रात्री चांदणे आहे, उषःकाल गुलाबी आहेत, तारुण्य टवटवीत आहे, निद्रा गाढ आहे, भोगात रुची आहे, योगात समाधी आहे.--- तेव्हा ते हे जगत् तू आमच्या सुखासाठीच निर्मिलेस असे आम्हाला का वाटू नये? देवा, तू आमची खरी आई आहेस --आईला देखील दूध येते-- तू दिलेस म्हणून गौरवाची एवढी सुमनांजली देवाच्या मस्तकावर वाहिल्यानंतर त्याच हाताने उधळलेली ही 'लाखोली' आता वाचा.: ही सुगंधी फुले, हे सुस्वर पक्षी, तो मनोहर पिसारा पसरून नाचणारे हे सुंदर मोरांचे थवे, रानचे रान अकस्मात पेटून भडकलेल्या वणव्यात, चुलीत वांगे भाजावे तसे फडफड करतात न करतात तोच भाजून राख करून टाकतो. तो कोण? गाय दिली तो दयाळू, तर त्याच गायीचे दूध पिऊन तिच्याच गोठ्यात बिळ करून राहणारा तो विषारी साप, त्या गायीचे दूध देवाच्या नैवेद्यासाठी काढायला येणाऱ्या व्रतस्थ साध्वीला कडकडून डसून तिचा जीव घेणारा तो साप, तो ज्याने दिला तो कोण? प्रत्येक भोगामागे रोग, केसागणित ठणठणारे केसतोड, नखानखाचे रोग, दाता दातांचे रोग, ते कण्हणे, त्या कळा, ती आग, त्या साथी, ती महामारी, ते प्लेग,ती अतिवृष्टी, ती अनावृष्टी, ते उल्कापात, हे कोणी केले? हे जगडव्याळ विश्व परमेश्वराने कोणत्या हेतूने वा हेतूवाचून निर्माण केले, त्याच्याबद्दल माणसाने निष्कारण तर्ककुतर्क करीत बसू नये. हा एक तात्विक विचार चित्रमय स्वरूपात प्रकट करण्यात सावरकरांचे कौशल्य पहा:  पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच नांदत होत्या, नि मनुष्याचा मागमुसही नव्हता, तेव्हाही नद्या वाहत होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्या वाचून तर काय, पृथ्वी नव्हती, तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता. आणि हा सूर्यही जरी त्याचा साधा ग्रहोपग्रहां सुद्धा हरवला, तरी एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते, तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. या विश्वाच्या देवाला एक पलाचे सुतक असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरू लागले, तरी धरावे लागणार नाही!"
       स्वातंत्र्याइतकाच शुद्ध बुद्धिवादाचा अत्यंत निकराने पुरस्कार करताना सावरकरांनी समाजाच्या रोषा, लोभाची सुतराम पर्वा केली नाही. पारतंत्र्यावर हल्ला चढवताना त्यांनी जसे अक्षरशः तळहातावर शीर घेतले होते, त्याप्रमाणे समाजातील जुलमी अन अन्यायी रुढीवर आणि दूधखुळ्या देवभोळेपणावर मारा करताना त्यामुळे आपल्या लोकप्रियतेला आपल्याला मुकावे लागेल याची त्यांनी बिलकुल पर्वा केली नाही. राजकीय दृष्ट्या सावरकर जेवढे क्रांतिकारक होते, तेवढेच सामाजिक बाबतीतही ते बंडखोर होते. गाईला देवता समजून हिंदू लोकांनी तिची पूजा करावी या रुढाचाराचे त्यांनी जेवढे वाभाडे काढले, तेवढे कोणीही काढले नसते. "गोठ्यात उभ्या-उभ्या गवत कडबा खात असलेल्या एकीकडे खाता खातास उभ्या-उभ्या दुसरीकडे मूलमूत्रोत्सर्ग स्वेच्छ्या बैठक मारून बसणाऱ्या, शेपटीच्या फटकार्याने स्वतःच्या शेणमुत्राचा तो चिखल अंगभर उडवून घेणाऱ्या, दावे सुटून थोडा फेरफटका करण्याची संधी मिळताच अनेक समयी कुठेतरी जाऊन घाणीत तोंड घालणाऱ्या, नि तसेच ओठ चाटीत  गोठ्यात आणून बांधल्या जाणाऱ्या त्या गाईस, शुद्ध नि निर्मळ वसने नेसलेल्या सोज्वळ ब्राह्मणाने व महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पुजावयास जावे आणि तिच्या शेपटीस स्पर्शून आपले सोवळे न विटाळता उलट अधिक सोज्वळले आणि तिचे ते शेण नि ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पिताना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे!"
        उपयुक्ततेच्या दृष्टीने कुत्रा हा गायीपेक्षा अधिक उपकारक असताना त्याची आपण जी अक्षम्य विटंबना करतो, त्याचे किती प्रभावी चित्र सावरकरांनी रेखाटले आहे ते पहा. गायीने दूध दिले तर कुत्र्याने अनेक प्रसंगी मनुष्यास जीवदान दिलेले आहे. मुलांचा मित्र मृगयेची बंदूक, घराचे कुलूप, पडतो दाराशी, खातो भाकरीचे तूकडे, करून घेतो साऱ्यांची हडहड, नुसते यु म्हटले की चटकन त्याने पाय चाटू लागावे इतका विनम्र, संकटात जीवास जीव देण्या इतका कृतज्ञ, शिवाय शेतकऱ्यापासून शाहू सम्राटापर्यंत ज्याचा त्याचा एकनिष्ठ चाकर. त्या कुत्र्यास सन्मान कोणता? वेतन काय? तर त्याचे नावही एक शिवी.
       हिंदू समाजास 'अभक्ष' आणि 'अपेय' यांचे जे ब्राह्मणीत थोतांड अनेक शतकांपासून माजून राहिले आहे, त्यावरही सावरकरांनी कडकडून हल्ला चढवलेला आहे. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की काय खावे, नि काय प्यावे हा प्रश्न धर्मशास्त्राचा नसून तो वैद्यकशास्त्राचा असल्याने जे रुचेल नि पचेल ते, वैद्यकशास्त्र दृष्ट्या स्वच्छ आणि आरोग्य्स अनुकूल असलेल्या कोणत्याही माणसाच्या हातून किंवा पंक्तीत बसून खाण्यास काहीही प्रत्यवाव नाही. ब्रोंकायटिस झाला तर थोडी ब्रँडी सुद्धा घेतलीच पाहिजे. त्यावेळी ती आवश्यकच असते. मिळेल ते नि पचेल ते खाऊन जगात मानाने जगायला शिकले पाहिजे. तोच आहे आजचा धर्म.
       महात्मा गांधी आणि गांधीवाद या नावाने ओळखले जाणारे त्यांचे यंत्रविरोधी आणि अहिंसावादी तत्त्वज्ञान यांची तर सावरकरांनी संधी सापडेल तेव्हा तेव्हा अशी काही टर उडवली आहे की काही विचारू नका. मनुष्य हा शरीराने अत्यंत दुबळा आहे. कोणत्याही श्वापदा पुढे टिकाव धरणे त्याला अशक्य आहे. माणसाला सुळे नाहीत, शिंगे नाहीत, राट किंवा केसाळ कातडे नाही, पंख नाहीत, चोच नाही, नखे नाहीत ,द्रंष्ट्रा नाही, दंश नाही, नांगीही नाही. इंग्रजांनी नि:शस्त्र करण्याच्या आधी कितीतरी युगे माणसाला सृष्टीने निशस्त्र केले आहे. असे असून मनुष्य आज साऱ्या प्राण्यांचा राजा, शास्ता आणि जेता म्हणून मिरवतो आहे. कशाच्या बळावर? कळीच्या हत्याराच्या, यंत्राच्या! यंत्राने मनुष्य दुबळा होत नाही. उलट त्याने आपली दुर्बलता यंत्राच्या सामर्थ्यावर मारून टाकून तो सर्व प्राण्यात आज प्रबळतम झालेला आहे. मंत्रबळे नव्हे तर यंत्रबळे. यंत्र हा शाप नसून मनुष्याला अतिमानूश करणारे विज्ञानाचे वरदान आहे.' यंत्राच्या या सावरकरी समर्थनाला गांधीवादाजवळ काहीही उत्तर नाही.
       स्वामी श्रद्धांनंदांची हत्या करणाऱ्या रशीदला जे महात्मा गांधी 'भाई' म्हणाले. त्यांनीच एका इंग्रजांचा वध करणाऱ्या गोपीनाथ सहाला हिंसक या विशेषणाचे निषेधले. यावेळी ढोंगाने आणि विसंगतीने भरलेल्या महात्माजींच्या अहिंसा तत्त्वज्ञानाची सावरकरांनी अशी काही भंबेरी उडवली म्हणता! भयानक उपरोधाने भरलेल्या आपल्या या लेखाची अखेर त्यांनी अशी केली आहे:' प्रत्यक्ष बहिणीवरही बलात्कार करावयास येणाऱ्या पाप्यावरही निरुपायाने शस्त्र चालवणे ही हिंसा असल्याने, ती करू नये म्हणून म्हणणारे महात्माजी, इंग्रजांचा पक्ष घेऊन जर्मन लोकांची कत्तल उडवण्यासाठी इंग्रजी सैन्यात भरती व्हा म्हणून हिंदी तरुणास उपदेश करीत, आजारी पडेतो अट्टाहासाने प्रयत्न करते झाले. ते का? आपल्या 'संन्यास्त खड्ग' या नाटकात एका पात्राच्या तोंडून "वाटेल त्या संन्यासाश्रमात येणाऱ्या आणि अशा रीतीने लाखो लोकांस शस्त्र संन्यासाच्या प्रतिज्ञाने हतविर्य करून ठेवणाऱ्या या भयंकर भूलीचे भीषण परिणाम पंचविसाव्या पिढीपर्यंत या भारतात भोगावे लागतील!" हा जो सावरकरांनी अहिंसेला शाप देऊन ठेवलेला आहे, तो फाळणीच्या वेळी महात्माजींच्या वारसदारांनी घडवून आणलेल्या नरमेधयज्ञाने  खराच ठरलेला आहे.
      राष्ट्रातील तरुणांत स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती आणि स्वाभिमान या सद्गुणांचा कसा विकास होईल आणि त्याचबरोबर समाजातील ढोंग आणि अंधश्रद्धा यांचा नायनाट होऊन शुद्ध बुद्धिवादाची आणि पौरुषाची उपासना देशातील तरुण पिढी कशी करू लागेल? या एकाच ध्येयाचा आपल्या आयुष्यात सावरकरांनी निदीध्यास धरला. 'राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण हीच साहित्याची आद्य चिंता असावी.' असे मुंबईच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मुळी सांगूनच ठेवलेले आहे.त्यात ते म्हणाले, "राष्ट्रीय साहित्य म्हणजे शस्त्रबळ. शास्त्रचर्चा नव्हे. शिवछत्रपतींनी लेखणी टाकून भवानी उचलली म्हणून तर आज 'महाराष्ट्र सारस्वत' जिवंत राहिले आहेत. "शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते."
      विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच आजच्या महाराष्ट्रीय जीवनाचा, मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या शिल्पीकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो मोठा भाग आहे असे त्यांचा शत्रू सुद्धा कबूल करील.

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...