🔹 अत्रे उवाच... (७)
व्यक्तिमत्त्व कसे होते व ते ही एका असाधारण, असामान्य, अलौकिक, अद्भुत आणि लोकविलक्षण माणसाचे.... अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आचार्य अत्रे यांनी एका लेखात जे सादर केले आहे, ते सांगण्यासाठी अनेकांना शब्द पुरलेले नाहीत. त्यामुळेच सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व इतक्या कमी शब्दात मांडूनही सावरकर यांचे पूर्ण व्यक्तिमत्त्व व्यक्त करून अनेकांच्या मनातील अव्यक्त भावनांनाही हात घातला आहे, असे म्हणावे लागेल. स्वातंत्र्यवीरांविषयीचा हा लेख यामुळेच अतिशय महत्त्वाचा वाटतो.
एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास सावरकरांचे व्यक्तिमत्व हे असाधारण, असामान्य, अलौकिक, अद्भुत आणि लोकविलक्षण होते. तथापि त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजळा देणारे दोन पैलू दैदीप्यमान होते, ज्यामुळे त्यांच्या चरित्राकडे साऱ्या जगाचे लक्ष गेले. ते दोन पैलू म्हणजे अपारंपार देशभक्ती आणि परमोत्कट स्वातंत्र्यलालसा. जगामध्ये किंवा भारतामध्ये आजपर्यंत जे जे महान देशभक्त होऊन गेले, ते प्रसंगपरत्वे आणि परिस्थितीपरत्वे देशभक्तीकडे वळले. पण सावरकरांच्या जीवनाचा उगमच मुळी देशभक्ती मधून झाला. ते जन्माला आले, तेव्हापासूनच ते देशभक्त आहेत. त्यामुळे त्यांची देशभक्ती इतर देशभक्तांपेक्षा वेगळी आहे. त्यांची देशभक्ती स्वातंत्र्यलालसेच्या अग्नीरसात निर्माण झाली आहे. त्यामुळे निर्भेळ स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना, त्यांनी मागेपुढे कधीही पाहिले नाही. त्यांनी तळहातावर शिर घेऊनच स्वातंत्र्याच्या समारांगणात उडी घेतली. स्वातंत्र्यासाठी मृत्यूची पर्वा न करणारा एवढा ज्वलंत देशभक्त केवळ भारतातच काय पण जगात उत्पन्न झालेला नाही. अगदी बालपणापासूनच असामान्य कोटीची काव्य स्फूर्ती आणि काव्य शक्ती त्यांच्या अंगी जी निर्माण झाली, त्याची प्रेरणा देशभक्ती आणि स्वातंत्र्य प्रीती हीच होती. विलायतेला ते जे गेले ते काही बॅरिस्टर होण्यासाठी गेले नाहीत, ते त्यांचे केवळ वेशांतर होते. तिकडे जाऊन भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक जबरदस्त आंतरराष्ट्रीय संघटना उभारण्याचा त्यांचा मानस होता. वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी "अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर" लिहून, भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक 'सशस्त्र क्रांती'ची गीताच निर्माण करून ठेवली. मॅझिनीचे चरित्र लिहून सुद्धा अंतिम स्वरूपाचा राष्ट्रवादच त्यांनी प्रतिपादिला. भारतामधील क्रांतिकारक तरुणांना सावरकरांनी विलायतेहून काय काय पाठवले? तर बॉम्बगोळे आणि पिस्तुले. १९०५ पासून १९२० पर्यंत इंग्लंडात म्हणा मार्सेलसच्या बंदरात म्हणा व अंदमानात म्हणा, सावरकर नि मृत्यू हे एकमेकांसमोर दंड थोपटून एकमेकांना जणूकाही आव्हानच देत होते. मार्सेलस बंदरात पोहत असताना सावरकरांवर ज्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी एखादी गोळी जरी त्यांना लागली असती, तरी खचित त्यांचा मृत्यू झाला असता. गोळी लागली नाही हे त्यांचे नशीब. अंदमानातल्या छळांनी, हाल अपेष्टांनी, शरीरकष्टांनी, चाबकाच्या मारांनी, आजारांनी त्यांना मरण कसे आले नाही? हेच महत्त्वाचे होय. अंदमानच्या तुरुंगातल्या भिंतीवर सुद्धा त्यांनी देशभक्तीची आणि स्वातंत्र्यप्रीतीची उर्जस्वल काव्ये लिहिली आणि तुरुंगातील कैद्यांकडून पाठ करून ती मातृभूमीच्या दास्यमुक्ततेसाठी स्वदेशी पाठवली. देशभक्ती प्रभावी ठरावी आणि स्वातंत्र्यप्रेम सफल व्हावे म्हणूनच मृत्यूला न भिता त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग आपल्या वाणीतून आणि लेखणीतून छाती ठोकपणे प्रतिपादिला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा उघडपणे पुरस्कार करणारे सावरकर हे पहिले स्वातंत्र्यवीर आणि दुसरे नेताजी सुभाष चंद्र बोस. पण त्यांनाही सावरकरांच्या क्रांती गीतेने प्रेरणा दिली. नीती अनीतीचा आणि अहिंसेसा पगडा भारताच्या मनावर फारा दिवसापासून बसलेला आहे, म्हणून सशस्त्र क्रांतीचे नाव काढले, तर मोठ्या मोठ्या देशभक्तांच्या अंगाला घाम फुटतो. महात्मा गांधींनी 'सशस्त्र प्रतिकारा'ला अगदी सोयीस्करपणे पापाच्या सदरात घालून टाकले होते. राष्ट्रीय सशस्त्र प्रतिकाराला पाप ठरवू पाहणारा विपरीत वावदूक तत्त्ववादी आयर्लंडच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एकही आढळणार नाही. शस्त्रशक्तीने संपन्न असलेल्या एका राष्ट्राने जर दुसऱ्या राष्ट्राला गुलाम आणि नि:शस्त्र केले असेल, तर सशस्त्र क्रांती ह्याच एका प्रभावी साधनाने नि मार्गाने नि:शस्त्र आणि पादक्रांत राष्ट्रे स्वातंत्र्यसंपन्न होऊ शकतात, हा सावरकरांचा ठाम सिद्धांत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभापासून त्यांनी हिंदूंना लष्करीकरणाचा जो उपदेश धडाक्याने करावयाचा सपाटा लावला, त्याचे बीज हेच होते. हिंदू लोकांना शस्त्रे वापरण्याचे ज्ञान आणि शस्त्रे बनवण्याच्या शास्त्राचे ज्ञान मिळून, हिंदुराष्ट्र ह्या महायुद्धकाळात सज्ज झाले, तर उद्याच्या स्वातंत्र्यसंगरात त्या सज्जतेचा उपयोग झाल्याखेरीस राहणार नाही, असा त्यांचा अढळ विश्वास होता. याच भावनेने त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य संमेलना'च्या अध्यक्ष स्थानावरून "लेखण्या मोडा नि बंदुका घ्या" असा एखाद्या झुंजार रणयुद्ध्याला साजेल असा आदेश दिला होता. शस्त्र पुरस्कारा इतकाच शास्त्र पुरस्कार किंवा विज्ञान पुरस्कार हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सावरकरांना सनातन किंवा प्रतिगामी म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावयाला पाहिजे होते की, ते शस्त्रविद्येचा पुरस्कार अत्यंत आधुनिक विज्ञानाच्या भूमिकेवरून करत असत. त्यांनी लिहिले आहे की,' महाभारतात शत्रूच्या छातीचा थरकाप उडवण्यासाठी श्रीकृष्णाचा पांचजन्य फुंकला जात होता, तसा पांचजन्य हल्लीच्या युद्धात कोणी फुंकीत गेले, तर त्याला पांचजन्य करतच परत यावे लागेल. महाभारतातले गांडीव धनुष्य आता भंग पावलेले आहे. आता 'मशीनगन्स'शी गाठ आहे." यांत्रिक आणि वैमानिक संस्कृती ही जगाच्या संस्कृतीचा एक अपरिहार्य भाग म्हणून इतउप्परच्या काळात सतत नांदणार आहे; तिच्याकडे पाठमोरे होणे हा शुद्ध बुद्धिभ्र॔श आहे. तिचा डोळसपणाने स्वीकार करणे, अन् तिचे आनंदाने स्वागत करणे, यातच भारतीय समाजाच्या उत्कर्षाची बिजे साठवलेली आहेत. तिचा उपहास करून समाजातील भोळसटपणाच्या वाढीला मदत करणे, हे राष्ट्रघातकीपणाचे कृत्य आहे. असे सावरकरांनी आपल्या लेखातून आणि व्याख्यानातून शेकडो वेळा प्रतिपादिलेले आहे. 'स्वातंत्र्यप्राप्तीस्तव सशस्त्र क्रांती' या तत्त्वासाठी सावरकरांनी जे जन्मभर आकाश पाताळ एक केले, ते लक्षात घेता सावरकरांनी हिंदू महासभेमध्ये प्रवेश न करता 'स्वातंत्र्यसैनिक पक्ष'(Freedom Fighter's Party) स्थापन केला असता आणि 'स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यावेळी जी साधने वापरणे शक्य आणि आवश्यक होईल त्यांचा हा पक्ष बेधडकपणे वापर करेल!' असे जर त्याचे ब्रीत ठेवले असते तर प्रतिगामी अन् जातीयवादी म्हणून त्यांची भारतीय राजकारणात निर्भसना करण्याची आणि त्यांना डावलण्याची काँग्रेसची कधीही हिंमत झाली नसती, असे आम्हाला अनेक वेळा वाटते. अर्थात ही आमची स्वतःची धारणा आहे. सावरकरांना त्याची कल्पनाच नसेल असे आम्ही कसे म्हणावे? आधीच शतकानूशतके अडाणी, देवभोळ्या, वैराग्यप्रेमी असलेल्या सर्वसामान्य हिंदू समाजाच्या डोळ्यात आत्मबलाची, त्यागाची, ब्रह्मचर्याची, सत्याची आणि अहिंसेची धूळ टाकून स्वतःच्या बुवाबाजीची हंडी त्यांच्या डोक्यावर चढवण्याचा गांधीवादी उपद्व्याप सावरकरांनी कधीच केला नाही. उलट कित्येकदा तर हिंदू बहुजनाला न पचणारे आणि न पेलणारे पुरोगामी विचार त्यांनी आग्रहांनी मांडले. त्यामुळे कित्येकदा हिंदू समाजाने त्यांचा सार्वजनिक रीतीने निषेधही केलेला आहे. पण त्यांनी त्या निषेधांना घाबरून स्वतःची तत्त्वनिष्ठा लवमात्र ढळू दिलेली नाही. कारण 'वरं जनहितं ध्येयं l केवला न जनस्तुति : - म्हणजे लोकांच्या स्तुतीनिंद्येची पर्वा न करता जनतेचे हित हे सर्वश्रेष्ठ मानायचे, हे सावरकरांच्या जीवनक्रमाचे बाणेदार ब्रिद असल्याने त्यांनी कारागृहातील हाल अपेष्टांचे आणि मुक्त झाल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांच्या नींदेचे सारे हलाहल 'नीलकंठा' प्रमाणे धीरगंभीर अन् शांत वृत्तीने पचविले. रत्नागिरीहून निर्बंध मुक्त झाल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तेव्हापासून त्यांच्या लौकिक वर्तनाविरुद्ध अनेक आक्षेप घेण्यात येऊ लागले. सर्व सामान्य लोक तर राहू द्याच पण मोठमोठ्या लोकांना ते भेटत नाहीत, बाहेर कोणाकडे ते भोजनाला किंवा चहापानाला जात नाहीत, सामान्य सामाजिक संकेत किंवा शिष्टाचार त्यांच्याकडून पाळले जात नाहीत, असे अनेक अक्षेप चांगली चांगली माणसे त्यांच्याबद्दल घेत असत, आणि त्या आक्षेपात तथ्य नव्हते असे नाही. त्यामुळे अनेक मोठमोठे लोक दुखावले गेले असे आम्हाला माहित आहे. तथापि लौकिक व्यवहाराचा आणि शिष्टाचाराचा त्याग केल्यामुळे लोकप्रियता खर्ची पडली तरी बेहत्तर, पण भारतीय राजकारणात अज्ञ जनतेत सवंग लोकप्रियता मिळवण्याचे सारे मार्ग कटाक्षाने टाळावयाचे, असे सावरकर यांनी कर्तव्य बुद्धीने ठरविले होते. आणि ते त्यांच्या प्रखर व्यक्तिमत्वाचे एक प्रधान अंग होते, असेच आता म्हटले पाहिजे. इतिहासाचे सूक्ष्म अवलोकन, आकलन आणि तंत्रशुद्ध नि वास्तववादी विचारसरणी यामुळे मोठमोठ्या मुत्सद्यांवर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडे व क्रांतिकारक म्हटला की तो भडक वल्गना करणारा आणि सिंहासारख्या कारण नसताना डरकाळ्या फोडणारा, अशी जे कोणी सावरकरांना भेटण्याआधी त्यांच्याविषयी कल्पना करत असत, ते प्रत्यक्ष त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या शांत,संयमी पण सडेतोड आणि निश्चयी युक्तिवादाने मंत्रमुग्ध होत. याचे अनेक पुरावे देता येण्यासारखे आहेत. दोन काळ्या पाण्याच्या पोलादी ऐरणीवर देहदंडाचे राक्षसी वज्रप्रहार सोसूनसुद्धा ज्यांच्या देशभक्तीचा आणि स्वातंत्र्य प्रीतीचा हिरा अखेर अभंगच राहिला, त्यांच्या अमर व्यक्तिमत्वाचे अधिक काय वर्णन करावे?
१०/३/१९६६
सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा