सोमवार, २२ जुलै, २०२४

स्वातंत्र्यवीरांचे पहिले दर्शन

  🔹 अत्रे उवाच... (६)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे यांनी त्यांना कसे वाटले, त्यातून त्यांनी ते कसे मांडले हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकेकाळी सुरुवातीला टीका करणाऱ्या व स्वातंत्र्यवीरांवर पराकोटीची टीका करणाऱ्या अत्रे यांना सावरकर यांना बघण्याची व भेटण्याची उत्कंठा लागली होती, ती रत्नागिरीमधील सावरकर यांच्या वास्तव्यात त्यांना पूर्ण करता आली, त्यातून अनुभवलेले सावरकर यांनी या सावरकर यांच्या पहिल्या दर्शनापासून मांडले आहे हे नव्या पिढीला वाचण्यासारखे आहे.

तेवीस-चोवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी चित्रपटाच्या कामासाठी मी कोल्हापूरला हंस पिक्चर्समध्ये काही दिवस जाऊन राहिलो होतो. त्यावेळी एक दिवस श्री. अनंतराव गद्रे अचानक येऊन माझ्या पुढे उभे राहिले. ते म्हणाले," चला आपण रत्नागिरीला जाऊ. सावरकर निर्बंध मुक्त झाले."

सावरकरांना बघण्याची आणि भेटण्याची मलाही अनिवार उत्कंठा होती. त्यांच्या कीर्तीचे चौघडे अगदी लहानपणापासून कानावर झडत होते. म्हणून अनंतरावांचे म्हणणे मी ताबडतोब मान्य केले. खेरीज सावरकरांशी थोडेसे नातेही त्या काळात आमचे जमले होते. अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यासाठी स्पृषास्पृश्यांच्या सहभोजनाचा संप्रदाय त्यांच्याच प्रेरणेने अनंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केला होता. त्यात अनंतरावांचा मी एक सहकारी होतो.

दुसऱ्या दिवशी माझ्या मोटारीतून अनंतराव, मी, माझी पत्नी, आणि दोन मुली असे आम्ही कोल्हापूरहून निघालो. अकरा वाजता रत्नागिरीला पोहोचलो. रत्नागिरीला मी तत्पूर्वी कधीच आलो नव्हतो. त्यामुळे कोकणचे सृष्टी सौंदर्य आणि रमणीय वातावरण या गोष्टी मला नवीनच होत्या. आम्ही सावरकरांच्या घरीच उतरलो. त्यांचे घर लहानसे दुमजले होते. मागच्या अंगणात नारळी आणि केळी यांची गर्दी होती. पण आमचे लक्ष त्यांच्या घराकडे थोडेच होते?  सावरकर कधी दिसतील? हा एकच ध्यास मनात होता.
*तेजस्वी व्यक्तिमत्व *
दहा पंधरा मिनिटांनी नमस्कारसाठी हात छातीवर जोडलेले असे सस्मितवदन सावरकर एका दारातून प्रविष्ट झाले. त्यांचा सतेज गौर वर्ण आणि विलक्षण प्रभावी डोळे यांचा माझ्या अंत:करणावर जो परिणाम झाला, तो अद्यापही मी विसरलेलो नाही. त्यांची बोलण्याची पद्धत तर त्याहीपेक्षा चित्तवेधक होती. आवाज मऊ आणि लवचिक होता. पण त्याच्यात एक विलक्षण धार आणि ठसका भरलेला होता. दहा-पंधरा मिनिटेच आमची पहिली मुलाखत झाली, पण तेवढ्यात अनेक गोष्टींची चर्चा झाली. अनेक सुभाषितांची आणि संदर्भांची खैरात झाली. अगत्य, उत्कटता आणि आत्म्यियता यांनी त्यांचे हृदय तुडुंब भरलेले आहे असा मनोमन प्रत्यय आला. अंतरात्मा तृप्त झाल्यासारखे वाटले.
    सावरकरांच्या घरी आम्ही दोन दिवस राहिलो. सबंध दिवस त्यांचे वाचन आणि चिंतन चाललेले असे. त्यामुळे दिवसातून काही थोडा वेळ त्यांच्याशी बोलावयास मिळे. भोजनाला मात्र आम्ही सर्व एकत्र बसत असु. प्रकृतीसाठी त्यांना अनेक पथ्य पाळावी लागत. राजकारणाविषयी आम्ही विशेष बोललो नाही, पण जातीच्छेदन, अस्पृश्यता निवारण आणि मराठी भाषेचे शुद्धीकरण या विषयावर मात्र त्यांचे विचार आम्हाला विस्ताराने ऐकावयास मिळाले. 'हिंदू समाजाची कशी सुधारणा होणार?' या विषयावर अनंतरावांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्याच दिवशी माझे जाहीर भाषण झाले. त्या प्रसंगी सावरकरांनी हजर राहण्याचे कबूल केले होते, पण ऐनवेळी प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांना येता आले नाही.
*चैतन्यदायी सहवास*
सावरकरांना भेटण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्यांना आमंत्रण देणे हा होता. त्यांच्या दौऱ्याची रूपरेषा आखून आणि नक्की करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर काही दिवसांनी ते कोल्हापुरात आले. त्यांचा मुक्काम हंस  पिक्चर्स मध्येच होता. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य हे आहे की जेथे जेथे ते जात, तेथे तेथे आपल्या विचारांच्या प्रभावाने भोवतालचे वातावरण संपूर्ण बदलून टाकत. अवघ्या दोन दिवसात त्यांनी हंस पिक्चर्सचा परिसर संपूर्ण मराठी मय करून टाकला. आज भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अनेक इंग्रजी शब्दांचे जे देशी पर्याय रूढ झालेले आढळतात, त्याचा प्रारंभ त्याचवेळी सावरकरांनी केला. कोल्हापुरात विविध विषयांवर त्यांची अनेक व्याख्याने झाली. सावरकरांचे वय त्यावेळी बावन त्रेपन वर्षाचे असेल. त्यांच्या ऐन तारुण्यातल्या व्याख्यानाच्या अनेक 'दंतकथा' आम्ही पूर्वी ऐकल्या होत्या. एखाद्या नागासारखे त्यांचे व्यक्तिमत्व चपल आणि प्रखर होते, आणि वाणीमध्ये विद्युलतेचा कडकडाट होता ,असे त्यांचे एक समकालिन पुण्यपुत्तनस्थ 'पुराणपुरुष' म्हणत असत. तो प्रत्यय संपूर्णतया यावेळी येणे अर्थातच शक्य नव्हते. पण त्यांच्या वाणी मधील विद्युलता मात्र पूर्वीच्याच दिमाखाने कडाडत होती, असा त्यावेळी भास झाला. लांब लांब उड्या मारीत जसा एखादा चित्ता जंगलातून धावतो तशी एक एकामागून एक लांब सडक आणि प्रभावी वाक्ये झपाट्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडत. त्यामध्ये एक शब्द किंवा एक अक्षर मागे पुढे किंवा इकडचे तिकडे होत नसे.  प्रत्येक वाक्यात प्राचीन इतिहास असे किंवा रोमहर्षक घटनांचे उल्लेख अगदी ठासून भरलेले असत. वाचनाचे आणि व्यासंगाचे एवढे प्रचंड ओझे पाठीवर घेऊन त्यांची वाक्ये एवढ्या वायूवेगाने कशी चालू शकत? या विचाराने श्रोतुवृंद थक्क होत असे.
    कोल्हापुरा नंतर काही दिवसांनी सावरकर पुण्यात आले. त्यावेळी काही दिवस त्यांचे वास्तव्य आमच्या बालमोहन नाट्यमंडळीच्या बिऱ्हाडी असल्याने त्यांचे यथास्थित सानिध्य आम्हाला लाभले. तेथे त्यांच्या पूर्व चरित्रामधल्या कित्येक अद्भुतरम्य गोष्टी आम्हाला खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळाल्या. ते दिवस मला अद्याप आठवतात. सावरकरांच्या पराक्रमाची एक एक वर्णने ऐकून  डोके भणाणून जाई, पायापासून डोक्यापर्यंत रक्त उसळून जाई. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या माणसांना आपणासारखे तत्काळ करून टाकण्याचे विलक्षण जबरदस्त सामर्थ्य सावरकरांच्या वाणीत आणि व्यक्तिमत्वात आहे, याचा त्यावेळी आम्हाला अनुभव आला. सावरकरांच्या सहवासामुळे त्यांचे समग्र साहित्य आणि चरित्र विषय ग्रंथ पुन्हा एकदा वाचून काढण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली. आणि ते काम एका पंधरवड्याच्या आत मी झपाट्याने पूर्ण केले. सावरकरांच्या उत्तेजनामुळे मी आणि माझे मित्र नि ज्ञानप्रकाशचे लोकप्रिय संपादक काकासाहेब लिंमये यांनी 'हिंदू समाज सेवा संघ' आणि 'मराठी भाषा शुद्धीकरण मंडळ' अशा दोन संस्था स्थापन केल्या. काकासाहेबांच्या हाती दैनिक ज्ञानप्रकाश असल्यामुळे सावरकरी टाकसाळी मधील अनेक चलनी नाणी त्यांनी रोजच्या रोज आपल्या पत्रात वापरून लोकप्रिय करून टाकली. 'दिनांक' हा शब्द आज इतका परिचीत वाटतो पण तो शोधायचे श्रेय जसे सावरकरांना आहे, तसे तो रूढ करण्याचे काकासाहेबांनाही आहे. *काँग्रेसवाल्यांचा अपशकुन*
      सावरकरांचा पुण्यामधील पहिला  जाहीर सत्कार 'शिवाजी आखाड्यात' झाला. या समारंभाचा स्वागताध्यक्ष मी होतो. हा सत्कार होण्याचे पुण्यामध्ये जेव्हा जाहीर झाले, तेव्हा सदर सत्कार समारंभात कोणाही काँग्रेसवाल्याने भाग घेऊन नये असे काकासाहेब गाडगीळ यांनी एक पत्रक काढले. वस्तुतः सावरकर त्यावेळी कोणत्याही पक्षात नव्हते.  हिंदू महासभेचा आणि त्यांचा त्यावेळी काहीही संबंध नव्हता. असे असताना त्यांच्या पुण्यातील पहिल्या पहिल्या सत्काराला काँग्रेसने विरोध करायचे काही कारण नव्हते. असा विरोध करण्यासारखे निदान सावरकरांच्या हातून काही घडले नव्हते.
      शिवाजी आखाड्यातील सावरकरांची सभा प्रचंड झाली. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना "स्वातंत्र्यवीर" हे विशेषण मी प्रथम त्यांच्या मागे उपयोजिले. त्या दिवशी सावरकरांच्या अंगात पुष्कळ ताप होता. तरीही तशा स्थितीत त्यांनी दीड तास जे उस्फुर्त आणि तेजस्वी भाषण केले, ते ऐकून पुणेकर स्तिमीत झाले. जवळ जवळ 30/ 32 वर्षांनी सावरकर पुण्यामध्ये जाहीर रीतीने प्रकट झाले होते. त्यांचे समकालीन त्या सभेत किती उपस्थित होते? हे काही सांगता येत नाही. पण सावरकरांबद्दल पुणेकरांच्या मनात ज्या अद्भुतरम्य कल्पना आणि अपेक्षा वास्तव्य करून होत्या, त्या त्या दिवशी आपल्या प्रभावी वक्तव्याने सावरकरांनी यथास्थिक परिपूर्ण केल्या. त्यावेळी गायकवाडवाड्यात सावरकरांचा मुक्काम होता. डॉ. मुंजे, अण्णासाहेब भोपटकर, कर्मवीर राजवाडे, वालचंद कोठारी अन् मी अशी आम्ही सर्व मंडळी सावरकरांच्या भोवती त्यावेळी जमत असू आणि सावरकरांनी यापुढे कोणत्यातरी राजकीय पक्षात शिरावयास हवे असा एकंदर आमच्या चर्चेचा सूर असे. 'लोकशाही स्वराज्य पक्षाचा' जिर्णोद्धार सावरकरांनी करावा, अशी ही एक सूचना प्रामुख्याने त्यावेळी त्यांच्यापुढे मांडण्यात आली. सावरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असा माझा आग्रह होता. पण गांधीजींचे नि आपले सुताराम जमणे शक्य नाही, असे सावरकर पुन्हा पुन्हा म्हणत. 1906 साली विलायतेत असताना Cult of Killing अथवा 'मारो- काटो का पंथ'  या नावाचे एक चोपडे गांधीजींनी लिहून आपल्या विरुद्ध ब्रिटिश सरकारकडे चहाड्या केल्या होत्या, त्याचा साध्यंत इतिहास सावरकरांनी त्यावेळी मला सांगितला. काँग्रेसचे पहिले मंत्रिमंडळ त्यावेळी मुंबई इलाख्यात नुकतेच अधिकारारूढ झाले होते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याला विलक्षण धार चढली होती. म्हणून अशावेळी सावरकरांसारखा क्रांतिकारक जर काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाला, तर त्या लढ्यामध्ये एक निराळे सामर्थ्य निर्माण होईल अशी माझी धारणा होती. पण सावरकरांच्या डोक्यामध्ये त्यावेळी निराळ्यास विचारांचे तांडव माजले होते.
 *काँग्रेसवाल्यांचा फजितवाडा*
     मध्यंतरी एक विलक्षण घटना घडून आली. पुण्यातील विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानपत्र देण्यासाठी सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात एक सभा बोलावली. या सभेचे आमंत्रण श्री ग.वि. केतकर यांनी दिले होते. तथापि या मानपत्राच्या कल्पनेला काँग्रेस मधल्या काही समाजवादी विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्यामुळे या सभेत काहीतरी गडबड होणार, अशी तातडीची बातमी कोणी मला येऊन सांगितली.  तेव्हा वस्तूत:   या प्रकरणाशी माझा काही संबंध नसताना मी सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यामध्ये लगबगिने केलं गेलो. मला पाहताच काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी गिल्ला केला. ते ओरडले ,"ही विद्यार्थ्यांची सभा असताना अत्रे येथे कसे?" तेव्हा मी उत्तरलो की," या सभेच्या अध्यक्षस्थानी जर श्री. ग. वि. केतकर हे बसू शकतात, तर माझ्या येथे येण्याबद्दल तुमची हरकत का असावी?" त्याबरोबर कोणीतरी एक विद्यार्थी किंचाळला की या सभेचे अध्यक्षस्थान आचार्य अत्रे यांनी स्वीकारावे. त्याला दुसऱ्या एका विद्यार्थ्याने अनुमोदन दिले. त्याबरोबर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. मी सरळ व्यासपीठावर चालून गेलो व ग. वि. केतकर यांच्या जागी जाऊन बसलो. आता सभेला सुरुवात होणार, तोच कोणीतरी विजेचे दिवे बंद केले, आणि सभागृहात गडद अंधार पसरला आणि एकदम खुल्या मारामारीला सुरुवात झाली. काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी अर्थात चारी बाजुनी माझ्यावर हल्ला चढवला. मी हाताने एकेकाला जेव्हा मागे ढकलू लागलो, तेव्हा मग माझ्या भोवतालची गर्दी कमी झाली. एवढ्यात कोणीतरी पोलिसांना बोलावले. फरासखान्यांमधून शिपायांची एक तुकडी दाणदाण पाय आपटीत आत घुसली आणि मला पकडून त्यांनी सभागृहाबाहेर काढले.
      रस्त्यावर आणून पोलिसांनी मला सोडून दिले. तसाच मी ज्ञानाप्रकाशाच्या कार्यालयात गेलो. काकासाहेब लिमये चिंताक्रांत होऊन माझी वाट पाहत बसले होते. नंतर आम्ही दोघांनी या सर्व प्रकाराचा साध्यंत इतिहास ज्ञानप्रकाशात दुसऱ्या दिवसाच्या अंकात प्रसिद्ध करून काँग्रेसवाल्या विद्यार्थ्यांची न भूतो न भविष्यती अशी फटफजिती केली.
  *जीवनाची कृतार्थता*
     पुढे टिळक स्मारक मंदिरात पुण्यामधल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सावरकरांना जाहीर मानपत्र दिले, त्यावेळी 'आचार्य अत्रे' यांना तुम्ही येथे आणल्या वाचून या मानपत्राचा स्वीकार मी करणार नाही, असा सावरकरांनी हट्ट धरला. मी त्यावेळी कुठेतरी होतो. विद्यार्थ्यांची एक टोळी माझ्याकडे धावत आली, त्यांनी मला अक्षरशः पकडूनच त्या समारंभाला नेले  सभागृहात प्रवेश करता साऱ्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. व्यासपीठावर बसलेले सावरकर एकदम उठून उभे राहिले, आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली. माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय असा तो क्षण होता. सावरकरांचे मला जेव्हा जेव्हा स्मरण होते, तेव्हा तेव्हा  ह्याच प्रसंगाची मला आठवण होते. त्यावेळी मला जी धन्यता वाटली, तीच आजही  वाटत आहे. जीवन कृतार्थ झाल्याचा त्या क्षणी मला भास झाला. एवढे सांगितल्यावर अधिक काय लिहावे बरे?
१३/३/१९६६

सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन/आंतरजालावरून साभार)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...