🔹 अत्रे उवाच... (५)
१९२४ साली हिंदू सभा ही मुख्यतः समाजसुधारणेचे नि धार्मिक कार्य करणारी एक संस्था म्हणून ओळखली जाई. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे काँग्रेसचे नेते हिंदू सभेचेही नेते होते. हिंदू सभेची वार्षिक अधिवेशाने अनेकदा काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनांना जोडूनच त्यावेळी भरत असत. म्हणून राजकारणापासून अलिप्त राहण्याचा सरकारी निर्बंध पाळुनही सार्वजनिक कार्य करीत राहण्यासाठी हिंदू सभेच्या आंदोलनात भाग घेणे स्वातंत्र्यवीरांना भाग पडले. पण त्या क्षणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा एवढा प्रचंड प्रभाव हिंदू सभेवर पडला की सावरकर म्हणजे हिंदू सभा आणि हिंदू सभा म्हणजे सावरकर असे जणू समीकरणच झाले.
आसिंधूसिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभू:पुण्यभूश्चैव स वै हिंदू: इति स्मृत: ।।
अशी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या होती. "हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या सिंधू नदीपासून कन्याकुमारीच्या सागर तीरापर्यंत पसरलेल्या भारताच्या भूमीला जो जो आपले पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू ." अशी सावरकरांची भूमिका होती. "मुसलमान, ख्रिस्ती, यहुदी इत्यादी भारतामधल्या लोकांची पितृभूमी भारत जरी असली तरी त्यांची धार्मिक श्रद्धास्थाने भारताबाहेर असल्याने ते भारताला आपली पुण्यभूमी मानत नाहीत, आणि म्हणून ते हिंदू राष्ट्राचे घटक नव्हेत. तसेच आशिया खंडातल्या चीन, जपान आदी देशांमधले बौद्ध धर्मीय लोक भारताला आपली पुण्यभूमी मानीत जरी असले तरी त्यांची पितृभूमी वेगळी असल्यामुळे तेही हिंदू नव्हेत", असे सावरकरांचे म्हणणे होते. "मात्र भारतामध्ये बौद्ध, जैन, शीख इत्यादी धर्मश्रद्धा अनुसरणारे लोक आपला धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे असे सरी मानीत असले तरी भारत हीच त्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी असल्यामुळे ते हिंदूच होत.",असे सावरकर प्रतिपादन करीत. भारतामधल्या परिस्थितीत धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा एकमेकांपासून सर्वस्वी वेगळ्या काढणे अशक्य आहे, या भूमिकेतून सावरकरांची ही विचारसरणी निर्माण झाली होती. इंग्रज साम्राज्यवाद्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फूट पाडण्यासाठी मुस्लिम जातीयवादाचा जो सवतासुभा उभा केला होता, त्याचा सावरकरांवर झालेला परिणामच त्यांच्या या विचारसरणीत व्यक्त झाला होता. मुस्लिम पुढाऱ्यांना काँग्रेसच्या चळवळीत आणण्यासाठी लोकमान्य टिळकांना त्यांच्याशी लखनौ करार करून स्वराज्यामध्ये मुसलमानांना वेगळ्या सवलती देण्याचे मान्य करावे लागले. तुर्कस्तानच्या खलिफा या मुस्लिम धर्मगुरूचे राज्याधिकार इंग्रजांनी काढून घेतल्यामुळे त्या विरुद्धची चळवळ झाली तिची सांगड गांधीजींनी स्वराज्याच्या चळवळीशी जेव्हा घातली, तेव्हाच काँग्रेसच्या सत्याग्रहात महंमद अली, शौकात अली इत्यादी मुस्लिम पुढारी सामील झाले. अखेर तर मुसलमानांसाठी भारताची फाळणी करून पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र निर्माण केले पाहिजे, असा जात्यंध आग्रह जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने धरला, आणि धर्मांध यादवीत रक्ताचे पाट वाहून तो तडीस नेला. धर्मभेदावर आधारलेल्या हा वेगळेपणाचा हट्ट जे जे धरतात त्यांना स्वतःला या राष्ट्राचे नागरिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही, अशी सावरकरांची निष्ठा होती. म्हणूनच हिंदुत्वनिष्ठा राष्ट्रनिष्ठेची मुळीच विसंगत नाही, असा सावरकरांचा ठाम सिद्धांत होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मुस्लिम जातीयवाद, त्यांची मनधरणी करण्याचे धोरण स्वीकारले, ते राष्ट्राच्या ऐक्याला , स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला, प्रगतीला नि स्थैऱ्याला मारक ठरल्याखेरीच राहणार नाही, असा खणखणीत इशारा या देशांमध्ये सगळ्यात प्रथम जर कोणी दिला असेल, तर तो सावरकरांनीच होय! पण अशी वेगळेपणाची भावना न बाळगता भारताशी जो जो एकनिष्ठ राहील ,त्याच्या विरुद्ध केवळ धार्मिक कारणांसाठी कोणताही भेदभाव करता कामा नये, असेही सावरकर निक्षून सांगत. सावरकरांच्या हिंदुत्वनिष्ठेची घडण जी होती ती अशा प्रकारची होती.
९/३/१९६६.
सौजन्य- संगीता महाजन- बेहेरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा