रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

हिंदुत्व, काँग्रेस आणि दिग्विजय!

 धर्म- कर्म आणि वर्म - २

हिंदुत्व, काँग्रेस आणि दिग्विजय!

मानव हाच एक धर्म आहे, असेही मानलेल्या सावरकरांनी हिंदुस्थानाचा विचार करताना राष्ट्रधर्म स्पष्ट केला होता. पण खिलाफतीचा मार्ग स्वीकारण्याची परंपरा मानणाऱ्या काँग्रेसला ना धर्म कळला ना राष्ट्रधर्माचे वर्म कळले, साहजिकच हिंदुत्व हा शब्द न कळण्याचे त्यांचे कर्म हे देशाचेच दुर्भाग्य म्हणावे लागेल.

हिंदु, हिंदुत्व यावरून भाजप आणि संघ यांचे विरोधक असणारे काँग्रेस, साम्यवादी पक्ष, तथाकथित सेक्युलर यांनी गेल्या काही काळापासून हिंदुत्व, हिंदुत्वधार्जीणेपण इतकेच नव्हे तर हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरही टीका, हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस सरकारला २०१४ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि तेव्हापासून सत्तावंचित झालेल्या काँग्रेस जनांना त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेबद्दल शंकाही आली नाही उलट त्यांनी हिंदुंचे ध्रुवीकरण झाल्याने, फायदा झाल्याने भाजपवर , पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ही टीका करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वेठीसच धरले. काहीही नीट माहिती नसणारे काँग्रेसचे तरुण तडफदार ५० वर्षीय युवा नेते राहुल गांधी यांनी तर सावरकरांना माफीवीर म्हणण्यापर्यंत मजल मारली. मुळात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सत्तेची पायरीही न चढलेल्या हिंदुमहासभेचे नेते राहिलेल्या सावरकरांना काळाच्या पडद्याआड जाऊन इतकी वर्षे झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी अशा प्रकारे सावरकर यांची या हीन पद्धतीने मानहानी केली. त्या सावरकरांबद्दल त्यांच्या आजीनेही चांगले गौरवोद्गार काढले होते. स्वातंत्र्यवीरांनी प्रायोपवेशन केले ते १९६६ मध्ये आणि राहुल गांधी जन्माला आले १९७० मध्ये... तरीही माफीवीर म्हणण्याचा उद्धटपणा करण्याचे कृत्य त्यांनी कोणाच्याही सांगण्यावरून केले असले तरी स्वत:ची बुद्धी मात्र गहाण ठेवली असेच म्हणावे लागेल. सावरकर स्थानबद्धतेतून रत्नागिरीहून सुटून आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये येतील अशी आशाही काँग्रेसमधील नेत्यांना वाटली, इतकेच नव्हे तर अनेक दिग्गज काँग्रेस नेते त्यांच्या मुंबईतील स्वागत- सत्काराला उपस्थित होते. त्यांचाही त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्य, कृत्यामुळे अवमानच झाला आहे, असेच म्हटले पाहिजे. म्हणजे राहुल गांधी यांच्या मते तत्कालिन काँग्रेस नेतेही माफीवीरच म्हणावे लागतील. त्यानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही सलमान खुर्शीद यांच्या अलीकडेच प्रकाशित केलेल्या सनराइज ओव्हर अयोध्या या वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकानंतर आपल्या हिंदुत्वाबाबतच्या आणि सावरकरांसंबंधातील वक्तव्याने आपला ‘अज्ञानधर्म’ दाखवून दिला आहे.
खुर्शीद यांच्या त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते दिग्विजय यांनी हिंदू धर्माचे ५०० वर्षांच्या मुघल आणि १५० वर्षांच्या ब्रिटिशांच्या राजवटीत काही नुकसान झालेले नाही, काही बिघडलेले नाही, मग धोका कसला आहे, अशी पृच्छा करीत हा धोका संकुचित विचारसरणीचा असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या फोडा आणि राज्य करा या विचारसरणीचा हा प्रकार असल्याचे सांगत त्याद्वारे सत्ता ज्यांना पाहिजे आहे, त्यांना हा धोका वाटतो. समाज आणि हिंदू धर्माला धोका नसल्याचे सांगतानाच हिंदुत्वाचा हिंदु धर्माशी काही संबंध नाही, आणि सावरकर हे धार्मिक नव्हते, त्यांनी गायीचे मांस भक्षण करण्यामुळे काही समस्या नसल्याचे सांगितले तसेच त्यांनी लोकांमध्ये हिंदु ही अस्तित्त्वाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी हिंदुत्व शब्द मांडला त्यामुळे लोकांमध्ये भ्रम- गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिग्विजय सिंग यांचे हे वक्तव्यही अज्ञानमूलकच आहे. किंबहुना इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहून त्यांनी हिंदुस्थानातील हिंदु या शब्दाची महतीही जाणीवपूर्वक विसरण्याचे काम केले आहे. हिंदुत्वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुरस्कार करताना भारताच्या ज्या भौगोलिक रचनेचा स्वीकार करीत त्या भौगोलिक रचनेत रुजलेल्या, रुजविलेल्या तत्त्वज्ञानाला, विचारांना, मार्गदर्शक नीती नियमांना, पुण्यभू अर्थात होली लँड या शब्दाचा वापर करीत हिंदुस्थानाचा खरा धर्म स्पष्ट केला. सनातन हिंदु धर्माला नवविचारांची संजीवनी देण्यास सुरुवात केली. त्यांनी तो हिंदु धर्म स्पष्ट केला, ती संकल्पना खरे म्हणजे राष्ट्र या संकल्पनेला खऱ्या खुऱ्या अर्थाने स्पष्ट करणारी होती. पण काँग्रेसने विशेष करून तुर्कस्थानातील खिलाफत चळवळीला आपले म्हणत हिंदुस्थानातील मुसलमानांनाही त्यात ओढले आणि मुसलमानी जोखडाखाली काँग्रेसला जुंपून बहुसंख्या हिंदुनाच वेठीस धरले. बहुसंख्या हिंदुच्या सर्वधर्मसमभाव या मानसिकतेला ओळखून अहिंसेच्या नावाखाली ज्यांनी मुस्लीम अनुनय पत्करला आणि ब्रिटिशांच्या फोडा - झोडा राजकारणापुढे गुमान मान तुकवली अशा काँग्रेसनेच खरे हिंदु समाजाचे नुकसान केले आहे. या वस्तुस्थितीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी दुर्लक्ष केले आणि मग अहिंसावादाचा उदय घडवून हिंदु समाजाला दिशाहीन करण्याचाच प्रयत्न केला गेला. हिंदुंचा खरा इतिहास बदलण्याचे कामच त्यावेळेपासून सुरू झाले. काँग्रेसचे हे कर्म हाच त्यांचा धर्म बनला आहे आणि त्यामुळे हिंदु समाजातील वर्ण-जातिभेदासारख्या भेदाभेदी स्थितीमुळे हिंदुंच्याच नव्हे तर हिंदुत्वाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या वर्मावरच घाला घातला गेला आहे.
केवळ हिंदुनाच नव्हे तर मुसलमानांना पोथिनिष्ठ धर्मातूनही विज्ञाननिष्ठ पद्धतीने जगण्याचे तळमळीचे आवाहन करणाऱ्या सावरकरांनी हिंदु समाजालाही भेदाच्या भिंती पाडण्यासाठी अंदमानोत्तर कालखंडात जाणीवपूर्वक जागे केले, त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मानव हाच एक धर्म आहे, असेही मानलेल्या सावरकरांनी हिंदुस्थानाचा विचार करताना राष्ट्रधर्म स्पष्ट केला होता. पण खिलाफतीचा मार्ग स्वीकारण्याची परंपरा मानणाऱ्या काँग्रेसला ना धर्म कळला ना राष्ट्रधर्माचे वर्म कळले, साहजिकच हिंदुत्व हा शब्द न कळण्याचे त्यांचे कर्म हे देशाचेच दुर्भाग्य म्हणावे लागेल.

- रवींद्र यशवंत बिवलकर
(16 nov. 2021)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...