धर्म- कर्म आणि वर्म - १
सत्तास्पर्धेतील युद्धापूर्वी जागृती महत्वाची !
गेल्या काही काळामध्ये सत्तासंघर्षातून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे सर्वस्तरीय नेते सरसावून करीत आहेत. राजकारण म्हटले की, सर्व काही माफ असते असा समज करून तोंडाला येईल ते बरळणे, इतिहासातील व्यक्तींवर मनमानी टीका करणे, समाजातील सर्व घटकांमध्ये आणि विशेष करून प्रत्येक माणसामध्ये जसा एक देव आणि एक राक्षस दडलेला असतो, त्यामधील राक्षसाला जिवंत करण्याचे काम भारतातील राजकीय स्तराने चालवले आहे. आजच्या घडीला प्रत्येकाने आपला धर्म, आपले कर्म आणि या दोन्ही घटकांचे वर्म ओळखण्याची गरज आहे. ते जर त्याने जाणले नाही, तर राक्षसाला जिवंत करणारे शुक्राचार्य संजीवनी विद्येचा गैरवापर करतील, हे ध्यानात घेणे अतिशय आवश्यक आहे. वैदिक-सनातनी परंपरेतील या प्रतिकात्मक बाबींना मुद्दाम येथे मांडण्याचे कारण आहे, ते म्हणजे हिंदुत्व या शब्दाभोवती निर्माण झालेले सत्ताकेंद्राचे वलय. केवळ हिंदु मतांच्या ध्रुवीकरणामुळेच नव्हे तर हिंदुंची मते फोडण्यासाठीही तयार असलेले अन्य विरोधक आणि त्या दोन्ही प्रकारांमध्ये आणखी भर असणाऱ्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांची. मात्र या सर्वांचे धर्म वेगळे आहेत. त्यांचा राष्ट्रधर्माशी काही संबंध आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे. त्यामुळेच कोणी हिंदुत्वाची तुलना बोको हरामशी, आयसीसशी करतो तर कोणी देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, या आधी मिळाली ती भीक होती, असा दावा करतो. त्यानंतर त्यावरूनही वादावादीला सुरुवात होते.
देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न झाले, योगदान, बलिदान दिले गेले. हिंसा- अहिंसा यांच्या वैचारिक मतभेदामधूनही वादळ निर्माण झाले. इतके होऊनही देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली आणि त्याच धर्माच्या नावावर झालेल्या फाळणीमध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदुना अहिंसावादाच्या समर्थकांनी भारत नावाच्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये समाविष्ट केले. ज्या मुसलमानांनी मुस्लीम देशासाठी मते दिली आणि त्या मतांच्या आंकडेवारीपेक्षाही खूप कमी प्रमाणात मुस्लीम मतदार फाळणी झाल्यानंतर मुसलमानांसाठी मागण्यात आलेल्या देशामध्ये न जाता बहुसंख्य हिंदुंच्या बरोबर राहिले. अल्पसंख्याक समाजामध्ये संख्येने वरचा क्रमांक असल्याने मुस्लिमांचा आधार मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली घेत अनेक वर्षे सत्ता ज्यांनी उपभोगली त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याने अयोध्येवर लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना बोको हराम- आयसिससारख्या दहशतवाद्यांशी केली. त्यामध्ये करण्यात आलेल्या शब्दाचा वापरही मोठ्या चतुराईने केला आहे. साधु-संत ज्या सनातन हिंदुधर्माला आणि जुन्या प्राचीन हिंदु धर्माला मांडत होते ते रूप आज नाही. आज वाढवण्यात येणारा हिंदुत्ववाद हा बोको हराम आणि आयसीस या इस्लामी दहशतवादी संघटनेचे राजकीय रूप आहे. हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी आणि निवडणुकांमधील सभाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारासाठी केला जातो, त्यांच्या या विधानांवरून निर्माण झालेल्या वादांबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला मात्र त्याने काही फायदा झाला नाही. मुळात सत्ताधारी भाजप आणि रा. स्व. संघावर निशाणा साधण्याच्या नादात खुर्शीद महाशयांनी अनेक बाबींकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. त्याचप्रमाणे ते ज्या सनातनी हिंदुच्या संबंधात बोलत आहेत, त्या हिंदु धर्माने मुस्लीम आक्रमणे स्वीकारून आपल्या धर्मातील अनेकाचे बलिदान धर्मांतराद्वारे दिले, त्याच्याबद्दल मात्र खुर्शीद यांना कणवही नाही. कारण त्यांना हिंदु धर्मापेक्षा त्यांचा इस्लाम धर्मनिरपेक्ष भासतो.
दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, या आधी मिळाली ती भीक होती, असा दावा करणाऱ्या कंगना रानावत या अभिनेत्रीचेही म्हणणे, याच प्रकारच्या वादविवाद वाढवणाऱ्या पठडीतील आहे. यामध्ये हिंदुत्त्वाचा खरा विचार मागे पडू लागला आहे. यातून देशाचे आणि बहुसंख्य असणाऱ्या हिंदुंचे किती भले होणार आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यासाठी केवळ काँग्रेसने काम केलेले नाही, तसेच केवळ अहिंसेचे तत्वज्ञान मांडणाऱ्या गांधीजींचाही प्रभाव त्यात नाही, ब्रिटिशांविरोधा लढलेले क्रांतिकारक, बलिदान दिलेले क्रांतिकारक, फासावर लटकलेले क्रांतिकारक, आपल्या घरादाराचाही विचार न करता झुंजणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकर बंधू, नेताजी सुभाषचंद्र बोस, यांच्यासारखे दिग्गजही तितकेच मोलाचे होते. नौदलातील बंड-संप, दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम, आझाद हिंद सेनेची कामगिरी अशा सर्व बाबींचे एकत्रित परिणाम ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडावा लागण्यात झाले. त्यामुळेच जरी फाळणी होऊनही स्वातंत्र्य मिळाले तरी त्याचा आनंद मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही तिरंगा फडकावला होता. यामुळे या गोष्टींचे भान ठेवूनच कंगना रानावतसारख्यांचे दावे बेतालच म्हणावे लागतील. यामुळेच आता लोकांनी विशेष करून हिंदु समाजाने सावरकरांच्या हिंदुत्वाचे भान ठेवून, विज्ञाननिष्ठ होऊन आणि बुद्धी, विचाराने अद्ययावत बनून जागृत झाले पाहिजे. सत्तास्पर्धेत भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट, स्थानिक पक्ष या सर्वांसंबंधात पूर्ण विचाराने आणि सावधपणे विचार करून आतापासूनच प्रत्येकाने आपला धर्म, आपले कर्म आणि या दोन्ही घटकांचे वर्म ओळखण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा