सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

 तीन माकडांची सध्याची गोष्ट (भाग ३)


किंबहुना याच सध्याच्या माकडचाळ्यांद्वारे मिजारू, किकाजारू आणि इवाजारू यांना आंजारू- गोंजारू - बाजारू अशी नवीन नामाभिधाने प्राप्त झाली तर नवल वाटण्याचे कारण नाही. शिजारू हे माकड तर आता चांगलेच पिसाळल्यासारखे वागू लागले आहे तर हातात भांडे घेऊन आवश्यकतेपेक्षा अधिक खाऊ नका असे सांगणारे पाचवे माकड नेमके उलट करू लागले आहे.


मिजारू, किकाजारू आणि इवाजारू ही तीन बुद्धिमान माकडे सध्या मात्र केवळ मूर्त स्वरूपात बद्ध झाली आहेत. थोडक्यात या माकडांनी दिलेल्या संदेशाला केवळ मूर्तीतच बद्ध करण्यात समाजधुरिण यशस्वी झाले आहेत. या माकडांनी दिलेल्या बुद्धिमान संदेशाला आम्ही केवळ कागदावरच जखडून टाकले आहे. यामुळेच मानवाचा वंशज म्हणूनही माकडाकडे पाहाण्याचे धारिष्ट्य माणसाला होऊ शकणार नाही वा आम्ही माणसाचे वंशज आहोत, असे सांगण्याचे धैर्यही माकडांना राहाणार नाही. यामधील जे योग्य वाटते ते मानले तरी माकडाची सध्याची गोष्ट पार बदलून गेलेली आहे.

तीन बुद्धिमान अशा या माकडांना जपानमध्ये स्थान मानाचे असले तरी आता भारतात त्यांचा अर्थ बदलला आहे. चंगळवाद, जीवघेण्या रॅट - रेस, आत्यंतिक शहरीकरणाचे परिणाम, शालेय जीवनापासून द्याव्या लागणाऱ्या अनाठायी स्पर्धांमुळे होणारा मानसिक ताणतणाव यामुळे या माकडांचा संदेश बदलला आहे. बौद्ध भिख्खूंनी वा त्यांनी दिलेल्या सशक्त संदेशालाही आम्ही विसरलो आहोत. त्यामुळे सध्या माकडांच्या कृतीतून मिळणाऱ्या संदेशाचा अर्थ बदलून गेला आहे वा आम्ही माणसांनी पार बदलला आहे.

मिजारू, किकाजारू आणि इवाजारू यांच्या मते आता त्यांनी दर्शवलेली हस्तकृती कायम आहे फक्त त्यांचे संदेश बदलले आहे.  मिजारू म्हणजे दोन्ही हाताने आपले डोळे झाकून घेणारे माकड आहे. तर किकाजारू हे माकड दोन्ही हाताने आपले कान झाकून घेते, इवाजारू हे दोन्ही हाताने आपले तोंड बंद करत असते. 

यात मिजारू आपले दोन्ही डोळे हाताने झाकून घेत सांगते की, डोळे असून पाहायचे नाही. चांगले असो वा वाईट काहीच पाहायचे नाही.

किकाजारू दोन्ही हाताने आपले कान बंद करीत सांगते की, कान असून ऐकायचे नाही. चांगले असो की वाईट ऐकायची गरज नाही.

इवाजारू आपले दोन्ही हात तोंडावर ठेवून सांगते, की तोंड असून बोलावयचे नाही. चांगले वा वाईट काहीच बोलावयाचे नाही.

सध्या गांधीजींच्या या तीन माकडांची अवस्था यामुळेच बिकट झाली आहे. माकडच काय पण माणसालाही सुखी जीवनासाठी याच प्रकारच्या माकडकृतीचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे सरकार असो, प्रशासन असो, पोलीस असो, वाहतूक पोलीस असो, महापालिका- नगरपालिका आदी स्वराज्य संस्था असोत वा ग्रामपंचायतींपासून संसदेपर्यंतचा लोकप्रतिनिधी, पक्ष, कार्यकर्ता यांच्यासंबंधात बोलणाऱ्यांना सुखी जीवनाचा मूलमंत्र पाळण्यासाठी 'सध्याच्या' या 'तीन बुद्धिमान माकडांचा' सहारा घ्यावा लागत आहे. किंबहुना याच सध्याच्या माकडचाळ्यांद्वारे मिजारू, किकाजारू आणि इवाजारू यांना आंजारू- गोंजारू - बाजारू अशी नवीन नामाभिधाने प्राप्त झाली तर नवल वाटण्याचे कारण नाही. शिजारू हे माकड तर आता चांगलेच पिसाळल्यासारखे वागू लागले आहे तर हातात भांडे घेऊन आवश्यकतेपेक्षा अधिक खाऊ नका असे सांगणारे पाचवे माकड नेमके उलट करू लागले आहे. कदाचित सध्याच्या  तीन माकडांची सध्याची गोष्ट आता पाच माकडांपर्यंत अशा ‘विकसित’ स्वरूपात जाऊ लागल्याने सारासार विचार मात्र संपुष्टात आल्यासारखाच झाला आहे, हेच सारसत्त्व दिसू लागले आहे.


- रवींद्र यशवंत बिवलकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...