सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३


ग्रंथसेवेत ८० व्या वर्षात पदार्पण

‘बलवन्त पुस्तक भाण्डार’ची अथक वाटचाल

आजच्या मराठी दिनाच्या निमित्ताने गिरगावातील ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’च्या अथक वाटचालीचा घेतलेला छोटासा आढावा. आजची मराठी दिनाच्या दिवशी असणारी मराठी भाषा, साहित्य यांची अवस्था आपणा सर्वांपुढे असतानाच त्या मराठी दिनाविषयी 'दीन'पणे शुभेच्छा देणाऱ्या मराठी जनांच्या माहितीसाठी हा आढावा सादर करीत आहे.

ग्रंथ हेच गुरू असे म्हटले जाते, पण आज दुर्दैवाने पुस्तकांसाठी वाचक शोधावे लागत असल्याची स्थिती आहे. पुण्याच्या एका प्रकाशकाने चर्चेच्या ओघात खूपच विदारक सत्य सांगितले. त्यांचे ग्रंथालयही असून तेथे काय किंवा पुस्तक दुकानांमधूनही काय आता पुस्तक खरेदीसाठी वा पुस्तके वाचनासाठी असणारी पुणेकरांची रीघ- रांग आता नाहिशी झाली आहे. कदाचित यात काहीसे अतिवास्तव असेले तरी दुर्दैवाने ते खरे आहे. अशाही स्थितीत प्रकाशन आणि विक्री या दोन्ही घटकांना एका मिशनसारखे जपणारी माणसंही मराठी आहेत. काही का होईना पण तग धरून टिकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष करून एकेकाळी प्रसिद्ध पुस्तकांना प्रकाशित केलेल्या, नामांकित लेखक आणि कलावंतांनी गाजवलेल्या नाटकांच्या - संगीत नाटकांच्या पुस्तकांना लोकांप्रत नेणाऱ्या अशा मुंबईतील मराठमोळ्या, सुसंस्कृत अशा गिरगावातील 'बलवंत पुस्तक भांडार' या संस्थेने अलीकडेच ७९ व्या वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी गिरगावात 'बलवंत पुस्तक भांडार' या प्रकाशक संस्थेने ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही त्यांची पुस्तक विक्री त्यांनी चालू ठेवलेली आहे. अर्थात आजची त्यांची पुस्तके नाटकांची नाहीत. धार्मिक आहेत, हिंदु सण व व्रते यावर असणारी पुस्तकेही परंपरा, रिती, तसेच संस्कारादी माहितींना सादर करणारी असतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर, कै. गणेशशास्त्री फाटक, गो. ब. देवल, न. चिं. केळकर, भा. वि. वरेरकर, य. ना. टिपणीस, स. अ. शुक्ल, प्रबोधनकार ठाकरे आदी अनेक नामवंत व्यक्ती, लेखक यांची पुस्तके ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’ने प्रकाशित केली होती. सध्या ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’चा व्याप मकरंद परचुरे हे पाहात असून त्यांचे वडील श्री. बापू परचुरे यांनी या आधी समर्थपणे ‘बलवन्त पुस्तक भाण्डार’ सांभाळले होते. त्यांनीही वयाची ९० पूर्ण केली आहे. एकंदर परचुरे कुटुंबीयांची ही ग्रंथसेवा ही नक्कीच मोलाची अशीच आहे.

- रवींद्र यशवंत बिवलकर

----------------------------


*** अरविंद परचुरे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी शब्दांकित केलेला या प्रकाशन आणि प्रकाशक कुटुंबाबद्दलचा माहिती देणारा लेख नक्कीच वाचनीय आणि मननीय आहे.  ***


माधव त्रिंबक परचुरे - एक मराठी पुस्तक विक्रेते व प्रकाशक


बलवन्त... च्या एका धार्मिक
पुस्तकाचे मुखपृष्ठ
माधव त्रिंबक उर्फ बापू यांचे एक काका श्री. बलवन्त विष्णु परचुरे उर्फ नाना यांनी इ.स. १९०१ च्या सुमारास भागीदारीत परचुरे
पुराणिक आणि मंडळी या नावाने माधवबागेत पुस्तक व्यवसाय सुरू केला. नंतर नानांचे धाकटे बंधु श्री. त्रिंबक विष्णु उर्फ अण्णा वयाच्या १४व्या वर्षापासून आपल्या मोठ्या भावाला व्यवसायात मदत करू लागले. त्यामागून काही वर्षांनी नानांचे एक पुतणे, गजानन पांडुरंग (दादा) धंद्यात मदतीला आले. २३ फेब्रुवारी १९४४ ला नानांनी परचुरे पुराणिक या दुकानातील आपला भाग काढून घेतला व अण्णा आणि दादांच्या मदतीने गिरगावात 'बलवन्त पुस्तक भाण्डार' या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. काही काळाने गजानन पांडुरंग (दादा) या व्यवसायातून वेगळे झाले व त्यांनी 'ग. पां. परचुरे प्रकाशन' ही संस्था सुरू केली. तेव्हापासून श्री. अण्णा स्वतंत्रपणे 'बलवन्त पुस्तक भाण्डार'चा व्यवहार बघू लागले. त्यावेळी अण्णांनी प्रकाशन व्यवसायही सुरू केला.

१९४६-४७ च्या दरम्यान शालेय शिक्षण चालू आतानाच वयाच्या १५ व्या वर्षीच श्री. माधव त्रिंबक उर्फ बापू आपल्या वडिलांना-अण्णांना व्यवसायात मदत करू लागले. श्री. अण्णांनी बापूंना बरोबर घेऊन वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत म्हणजे सुमारे ६० वर्षे व्यवसायाची जबाबदारी सांभाळली.
आजच्या रेडीमेड युगात स्पर्धेमुळे नैराश्य वाढले. धकाधकी व धावपळीच्या जीवनात भविष्य, तोडगे, स्तोत्रे, मंत्र, अध्यात्माकडे लोक
मन:शांतीकरिता वळू लागले म्हणून त्या संबंधित विषयावरील पुस्तके प्रकाशित करण्यावर बापू भर देऊ लागले. १९६८ साली त्यांनी 'मयुरेश प्रकाशन' ही संस्था सुरू केली. बापूंच्या दुकानामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, संगीत, नाट्य, योग व ज्योतिष या विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतात, वधुवर पत्रिकामेलन, कुंडलीरहस्यदर्पण या विषयींच्या पुस्तकांना विशेष मागणी असते.

जवळ जवळ ६५ वर्षे बापूंनी 'बलवन्त पुस्तक भाण्डार'ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांचे चिरंजीव श्री. मकरंद माधव उर्फराजू हे १९७४ पासून शिक्षण सांभाळून आपल्या वडिलांना धंद्यात मदत करीत आहेत. व्यवसाय सांभाळून ते बी. कॉम झाले. बापूंच्या दोन्ही डोळ्यांवर काचबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. तरीही सुमारे १५ वर्षे म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत ते गिरगावातल्या दुकानात दादरहून नियमित जात असत. पुस्तके आणि ग्राहक यांच्यावरील प्रेमामुळे लहानपणापासून पुस्तकात रमलेले त्यांचे मन पुस्तकाविना रमत नाही. पुस्तकात गुंतवलेले पैसे हे सोन्यात गुंतवण्यासारखच आहेत असे त्यांचे मत. श्री. बापूंचे शिक्षण विशेष झालेले नव्हते तरीपण पुस्तक व्यवसाय या विषयात त्यांनी पी. एचडी केली आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये, असे त्यांची भावजय सौ. ज्योत्स्ना अरविंद परचुरे या अभिमानाने सांगतात. बलवन्त पुस्तक भाण्डारची धुरा आज बापूंचा मुलगा श्री. मकरंद (राजू), तिसरी पिढी, समर्थपणे सांभाळत आहे. 

----


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...