सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून - ३
हिंदुंची अस्मिता जागवणारा जागल्या
चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा

| चित्र- चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ क्रांतिकारकांचे शिरोमणीच नव्हे तर ते एक तत्त्वज्ञानच होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अद्ययावत होणारे सावरकर म्हणजे अनुभव आणि स्वानुभव यामधून विकसित झालेले भूमिनिष्ठ, विज्ञाननिष्ठ असे राष्ट्रवादी तत्त्वज्ञान म्हणजेच वि. दा. सावरकर होत. हिंदु समाजाची अस्मिता जागविण्याचे आणि इतिहासातून शहाणे व्हा असे हिंदुंना सांगणारा आधुनिक काळचा ‘जागल्या’ असणारे सावरकर हे दुर्दैवाने भारतातीलच नव्हे तर फाळणीपूर्व भारतातीलही अनेकांना समजू शकले नाहीत. किंबहुना आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या जगाबरोबर हिंदुस्थानालाही नेण्यासाठी धडपडणारे सावरकरांचे तत्त्वज्ञान, त्यांचे विचार आजही खरोखरच कितींना समजले आहेत, ते तपासण्याची आवश्यकता आहे. सनातनी वा वैदिक किंवा तथाकथिक बैरागींच्या व्याख्येतील हिंदुत्वाला अद्ययावत करू पाहाणारे सावरकर हे आधुनिक भारतासाठीचे तत्त्वज्ञ होते. मात्र आजही त्यांना एका विशिष्ट रिवाजधारी वा रीतीधारी समूहाने वा धर्माने जखडून ठेवण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी धर्माबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली विधाने आणि त्यांचा हिंदुत्व या शब्दाचा अर्थ नेमका किती वेगळेपण सांगणाऱ्या धर्माचा आहे, ते लक्षात घेणे गरजेचे आहे.
सावरकर हे हिंदुधर्माचे कडवे असे अभिमानी होते, पण तरीही धर्मप्रसार करण्यासाठी बुद्धिवादाने धर्मप्रसार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे ते सांगत. भारतात आज प्रचलित असलेल्या हिंदु धर्माच्या व्याख्येपेक्षा त्यांची व्याख्या वेगळी होती. हिंदु धर्म या शब्दाचा वा संकल्पनेचा त्यांच्यादृष्टीने असणारा अर्थही तितकाच वेगळा होता. त्यामुळेच प्राचीन अशा हिंदुपरंपरांचा अभिमान असला किंवा त्या परंपरा महान होत्या, असे सांगत हिंदु धर्म कधी पराभूत झाला नाही, आमचा पराभूतांचा इतिहास नव्हता, असे मानत असतानाच सावरकरांनी धर्मसुधारणा करण्यासाठी विरोध करणाऱी पुराणवादी मंडळी वा संस्था, अगदी शंकराचार्यांवरही सुधारणांचे क्षेपणास्त्र सोडण्यास ते कचरले नाहीत.
हिंदुराष्ट्र ही संकल्पना म्हणजे त्यांच्या मनातील प्राचीन भारतीय परंपरेचा, संस्कृतीचा, विद्येचा, एक मोठा कप्पा होता खरा, परंतु त्यांनी त्या साऱ्या बाबी प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगनिष्ठ वा प्रयोगक्षम निकषांवर वा विज्ञाननिष्ठ घटकांनी तपासून, तावून सुलाखून घेऊन स्वीकारण्याचे वा अंमलात आणण्याचे स्पष्ट केले. अद्ययावत अशा अद्यतनी संस्कृतीचा अवलंब करावयास हवा असे ते स्पष्ट सांगत. काळाप्रमाणे बदल स्वीकारण्यासाठी अद्ययावत आणि विज्ञानवादी दृष्टीला भारतीयांनी स्वीकारावे वा प्रत्येकांने तसे पाहावे, याकडे त्यांचा भर होता. त्यामुळेच हिंदु संस्कृतीचा अभिमान असतानाही, प्राचीन काळापासून निंदनीय मानलेला वर्णसंकर ते गौरवत, गोपूजेवरही त्यांनी केवळ टीका केली नाही, तर गाय हे केवळ उपयुक्त पशू असल्याचे स्पष्ट करीत गायीपेक्षा मनुष्य श्रेष्ठ असल्याचे सांगत अशा प्रकारच्या गोपूजनावर वा त्या प्रकारच्या श्रद्धांवर त्यांनी टीका करताना लोकांनी अद्ययावत व्हावे, यासाठी तार्किक आणि बुद्धिवादी दृष्टीने बाजू मांडली.
विशेष म्हणजे हे सारे करताना त्यांनी व्यक्तिवाद वा व्यक्तीस्वातंत्र्य यालाही तितकेच महत्त्व दिले. यामुळे धार्मिक वर्तनावर टीका करताना त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर आक्षेप न घेता त्याचा व्यक्तिवादही स्वीकारून त्यांच्याबरोबर त्या वर्तनातही सहभागी झाले. मात्र स्ववर्तनामध्ये त्यांनी स्वच्छ विज्ञाननिष्ठ दृष्टी ठेवून आपल्या तत्त्वानुसार आदर्शच लोकांपुढे ठेवला.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा