सावरकर : काल, आज आणि उद्या
माझ्या नजरेतून - ६
सनातन धर्म आणि सावरकर
सनातनी बंधूंची ती व्याख्या किती योग्य वा अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील ‘सनातन धर्म’ या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे.’ सावरकरांनी या लेखाची सुरुवातच सुधारक आणि सनातनी यांच्या परिभाषेतून स्पष्ट केली आहे. ती अशासाठी की, यातील नेमकेपण सांगत त्यांनी आपल्यादृष्टीने सनातन म्हणजे काय, धर्म कोणत्या अर्थाने सनातन पदवीला योग्य वाटतो हे देखील त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे. यातच त्यांनी पोथिनिष्ठतेला विरोध करीत अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्माचा अर्थ वा व्याख्या त्यांच्या पद्धतीने आणि नवीन कालाला धरून केली. हे करीत असताना त्यांनी सुधारक, सनातन यातील भेद आणि त्यासंबंधातील समजाचे, व्याख्येचे दोषही त्यांनी मांडले होते. तत्कालीन परिस्थितीत असणारी विचारसरणी आणि सामाजिक मानसिकता यासंबंधातील त्यांचे लिखाण पाहाता आजही ते अधिक चिकित्सक वाटते.
‘विज्ञाननिष्ठ निबंध’ या पुस्तकातील ‘खरा सनातन धर्म कोणता’ यामधील त्यांची ही चिकित्सा विचारात घेण्यासारखी आहे. त्यावरून सुधारक आणि सनातन धर्म यामधील नेमकेपण त्यांनी अचूक मांडले आहे.
ते म्हणतात की, श्रुतिस्मृतीपासून तो शनिमाहात्म्यापर्यंतच्या साऱ्या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषेयत्वापासून तो वांग्याच्या अभक्षत्वापर्यंतचे सारे सिद्धात सनातन धर्म या अंकाच पदवीस पोचलेले आहेत. उपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेकू नये, कोवळ्या अन्हात बसू नये, लोखंडाचा विक्रय करणाऱ्याचे अन्न कदापि खाऊ नये, रोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमाणे असून सावकारी करणाऱ्या व्याजबट्टा घेणाऱ्या गृहस्थाचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेवू नये. (मनु. ४-२२०); गोरसाचा खरवस, तांदुळाची खीर, वडे, घारगे खाणे निषिद्ध असून लसूण, कांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेविजः! मनु. ५ - १९); परंतु श्राद्धनिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी अकवीस जन्म पशुयोनि पावतो. (मनु. ५-३५) 'नियुक्तस्तु यथान्यय यो मास नात्ति मानवः । सत्य पशुता याति संभवानेकविंशतिन!!’ हे सारे सनातन धर्मच.’
अशी उदाहरणे देत सावरकरांनी सनातन धर्माचे स्वरूप उघड केले आहे. यामुळे त्यावर जोरदार ताशेरे ओढताना सावरकर लिहितात की, या अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणाऱ्या विधिनिषेधांस आणि सिद्धान्तांस सनातन धर्म हाच शब्द लुगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या साऱ्या स्मृतिपुराणांतील सनातन धर्मग्रंथांतूनच ही परंपरा पाडलेली आहे. वरील प्रकारच्या साऱ्या मोठ्या, धाकट्या, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते की, एषा धर्मस्सनातनः!'
रिवाज, रितीभाती प्रचलित प्रथा- परंपरा यावर खरे म्हणजे सावरकरांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या सनातन या संकल्पनेची व्याख्या ही वेगळी होती आणि धर्म या शब्दाची व्याप्तीही वास्तव होती. मात्र ती आजही समजलेली नाही. हिंदु असो वा मुस्लीम- ख्रिश्चन यांनी अद्ययावत वा विज्ञानवादी दृष्टीपासून पळ काढत प्रथा, पोथीला कवटाळले आहे. ही स्थिती आजही कायमच आहे. यालाच धर्म म्हणताना कोणी मुस्लीम तर कोणी हिंदु तर कोणी ख्रिश्चनही ठरवतो. यामुळेच वास्तवाकडे पाठ करून भावनिक आणि पारंपरिकतेला धर्म मानण्याचा अट्टाहास आजही चालूच आहे.
(क्रमश:)
- रवींद्र यशवंत बिवलकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा