तत्वज्ञान सावरकरांचे -१२
सावरकरांचे हिंदुत्व राष्ट्रनिष्ठ, भूमीनिष्ठ आणि अद्ययावत
स्वातंत्र्यवीर आणि त्यांचे हिंदुत्व हे हिंदु समाजाला पराभूत मानसिकतेमधून वर काढणारे होते. सावरकरांची हिंदुसंबंधातील व्याख्या ही त्यांनी त्यावेळच्या राजकीय स्थितीचे, भारताच्या इतिहासातील गुण-दोषांचे अवलोकन करून, हिंदुंच्या एकजुटीसाठी मांडली. हे करताना हिंदु कोण ही बाब नीटपणे पाहिली तर लक्षात येते की, त्यांनी त्यासंबंधात हिंदुस्थानातील मूळ पंथांना, धर्माला, गटांना, ज्यांचे तत्त्व येथेच निर्माण झाले त्या धर्म-पंथांना हिंदु म्हटले. हिंदु म्हणजे केवळ सनातनी- वैदिक नव्हे. त्यामुळे सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये हिंदु हा धर्म केवळ प्रार्थना पद्धतीवरील नव्हे, केवळ पंथावरील नव्हे तर तो या भूमिशी एकरूप असलेला, वर्षानुवर्षे रुजलेला आणि अशा या होली लँड वा पुण्यभूमीमध्येच त्याचे सारसत्त्व असलेला तो हिंदु समाज अभिप्रेत आहे.
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:।।
ही हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांनी मांडली. ज्या काळात मांडली त्या वेळी मुस्लिमांच्या नेत्यांचा मनमानीपणा वाढलेला होता, त्यांना ब्रिटिशच काय पण गांधीजींच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानानेही पाठिशी घालीत लाचारी पत्करलेली होती. भारतात त्या आधी झालेली खिलाफत चळवळीची आफतही गांधीजींच्या धोरणामुळे ओढवून घेतलेली होती, तशातच केरळमध्ये झालेल्या मोपला बंडामुळेही हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांची बाजू घ्यायला सोडा मांडायलाही काँग्रेस तयार नव्हती, गांधीजी तयार नव्हते. ना ब्रिटिश शासनाचे तसे धोरण होते. अशा प्रकारामुळे हिंदू हे मूळचे या भूमीमधील अधिवासी असूनही एकप्रकारे देशापासून अलग पाडण्याचा घाटच जणू घातला गेला होता. यामुळेच सावरकरांनी सांगितलेले हिंदुत्व हे हिंदु समाजाच्यादृष्टीने खरे म्हणजे च्यवनप्राश होते. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यवीरांच्याच देशातील हिंदुंना गांधींच्या अहिंसेवर आणि काँग्रेसच्या धुंदीत गुंग होण्यावर अधिक विश्वास होता. आणि त्याचीच परिणती मुस्लिमांसाठी केल्या गेलेल्या गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँंग्रेसने स्वीकारलेल्या भारत-पाकिस्तान फाळणीत झाली. बरे इतके होऊनही त्यावेळी फाळणीसाठी जीनांच्या पारड्यात बहुसंख्या मुस्लिमांनी मते टाकूनही त्यातील बहुतांश मुस्लीम हे भारतातच राहिले. तरीही त्यांना स्वीकारणाऱ्या हिंदुना दुखावून अल्पसंख्याकांना अधिक सवलती देण्याचा काँग्रेसचा ‘उदारहस्त’ हिंदुंच्याच मुळावर उठला आहे.
या सर्व स्थितीमध्ये स्वातंत्र्यवीर आणि त्यांचे हिंदुत्व हे हिंदु समाजाला पराभूत मानसिकतेमधून वर काढणारे होते. सावरकरांची हिंदुसंबंधातील व्याख्या ही त्यांनी त्यावेळच्या राजकीय स्थितीचे, भारताच्या इतिहासातील गुण-दोषांचे अवलोकन करून, हिंदुंच्या एकजुटीसाठी मांडली. हे करताना हिंदु कोण ही बाब नीटपणे पाहिली तर लक्षात येते की, त्यांनी त्यासंबंधात हिंदुस्थानातील मूळ पंथांना, धर्माला, गटांना, ज्यांचे तत्त्व येथेच निर्माण झाले त्या धर्म-पंथांना हिंदु म्हटले. हिंदु म्हणजे केवळ सनातनी- वैदिक नव्हे. त्यामुळे सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये हिंदु हा धर्म केवळ प्रार्थना पद्धतीवरील नव्हे, केवळ पंथावरील नव्हे तर तो या भूमिशी एकरूप असलेला, वर्षानुवर्षे रुजलेला आणि अशा या होली लँड वा पुण्यभूमीमध्येच त्याचे सारसत्त्व असलेला तो हिंदु समाज अभिप्रेत आहे. त्यात आर्य आहे, द्रविड आहे, मराठी आहे, कन्नड आहे, तेलुगू, आहे, तामीळ आहे, आसामी आहे, उडीया आहे, बंगाली आहे, गुजराती आहे, हिंदी आहे. संस्कृत आहे, राज्य, भाषा यांचाही एकप्रकारे मूलभूत तत्त्वानुसार विचार करून सावरकरांनी या हिंदुत्व संकल्पनेला साकारले आहे. या भूमिनिष्ठ हिंदुत्वाला संलग्न असणारे सनातनी वैदिक, जैन, बौद्ध, आदिवासींचे पंथही अभिप्रेत आहेत कारण त्यांची व्याख्या नीट समजून घेतली तरच ते लक्षात येऊ शकते. यासंबंधातही त्यांनी हिंदुत्वाचती संकल्पना तयार करताना राष्ट्र या संकल्पनेचा भारताच्या भूमि संबंधात मांडलेला विचार अधिक परिपक्क्व होता, विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत होता. इतकंच नव्हे तर त्यांनी हिंदुंप्रमाणेच अहिंदुनाही त्या काळात पोथिनिष्ठता सोडून विज्ञानाची कास धरण्यास सांगितले, ही बाब साम्यवाद्यांपेक्षाही आणि आजकालच्या पुरोगाम्यांपेक्षाही त्या काळातच मांडलेली अधिक पुढारलेली होती. त्यांच्या खेरीज अन्य कोणा राजकीय नेत्याने अन्य धर्मातील समाजाला असा सल्ला दिल्याची फारशी उदाहरणे दिसत नाहीत.
अल्पसंख्याक असूनही आक्रमक पार्श्वभूमी असणाऱ्या मुस्लीम समाजालाही सावरकरांनी नीट समजून घेतले आहे. ितकेच नव्हे तर त्यांच्या आक्रमकपणामुळे त्यांच्यापासून सावध राहाण्याचा हिंदुंना दिलेला इशारा वेळोवेळी देऊनही हिंदु समाज, हिंदुंचे काँग्रेसी नेतृत्व सुधारले नाही. मुस्लीमांच्या इस्लामी आत्यंतिकतेविरोधात सावध राहाण्यास सांगणे हे सावरकरांचे काम किती महत्त्वाचे आहे, होते, ते आजही लक्षात येऊ शकते. इतकेच नव्हे तर हिंदु समाजातील विविध अनिष्ट चाली रिती, रिवाज, प्रथा, कर्मकांडे आदींबद्दलही सात्त्याने दुरुस्त करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या आणि त्यासाठी एक स्वतंत्रपणे समाजोद्धाराचे क्रांतिकारक काम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना दुर्दैवाने हिंदुसमाज समजून घेऊ शकलेला नाही. या त्यांच्या हिंद समाजामध्ये भूमिवर निष्ठा असणारा सर्व अहिंदु समाजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मुस्लीम समाजातील मुस्लीम लीग आणि त्यांच्यातील मुस्लीम कट्टरपंथी वगळता देशाशी समरूप होण्यासाठी त्या धर्माने किती मानसिकता बदलली हे पाहावे लागते. ते पाहिले म्हणजे सत्यार्थ लक्षात येतोच आणि सावरकरांची क्रांतिकारक वृत्ती ही वैचारिक, बौद्धिक स्तरावरही राष्ट्र आणि भूमिनिष्ठ धर्माला मानणारी होती. अनेक संस्थानांच्या आणि राजवटींच्या एकत्रिकरणातून तयार होत असलेल्या भारताला सावरकरांनी ज्या पद्धतीने एकाच मुशीत बांधण्याचा मार्ग दाखवला, हिंदु आणि अहिंदु हे भेद करीतही सर्वांना नागरिक म्हणून समान अधिकार, हक्क आणि जबाबदाऱ्या असल्याचे स्पष्ट सांगितले, वाढत्या शहरांची स्थिती त्यावेळीच त्यांनी लक्षात घेऊन औद्योगिकीकरणाबरोबर, यांत्रिकीकरणाबरोबरच त्यांनी नवीन समाजरचनेला ऐतिहासिक अस्मितेच्या बंधाने घट्ट करीत विज्ञाननिष्ठ होत अद्ययावत करण्याचा त्यांचा हिंदुमार्ग, हिंदुनेस हा देश आणि व्यक्तीला, व्यक्तीसमूहाला अधिक बळकट करणारा होता. पण त्यांचे हे हिंदुपण मुस्लीमलाचार काँग्रेस नेत्यांच्या मृगजळामुळे हिंदु-अहिंदुंपर्यंत पोहोचले नाही. त्याची फळे आजही सारा समाज भोगत आहे. समानतेची फळे स्वातंत्र्यानंतर सर्वांना मिळावीत, ही भावनाच मुळात काँग्रेसच्या त्यावेळच्या एकांगी मुस्लीमअनुनयी विचारात वाहून गेली. ब्रिटिश सरकारने या काँग्रेसी अनुनयाला मौनपणे खतपाणीही दिले.
ऐतिहासिक सत्य लोकांपुढे मांडून हिंदु या शब्दाला अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी सावरकरांनी एक विचारांची मालिकाच मांडली होती. ती दिशादर्शी होती. प्रत्येकाने त्याचा विचार करून त्यात भर घालावी, अशा दृष्टीने लोकांना सामावून घेणारी होती. पण त्यावेळी आणि आजही दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. समाजात वैचारिक संघर्षासाठी लोकांना उद्युक्त करणाऱ्या सावरकरांसारख्या विचाराला समजून घेण्याची परिपक्क्वताच अद्याप निर्माण झालेली नाही. हिंदुंच्या इतिहासातील पराभवाची मानसिकता बाजूला सारून जेत्यांची पार्श्वभूमीही त्यांनी मांडलेली आहे. यामुळेच याच राष्ट्रातील झालेल्या अत्याचारयुक्त वा आक्रमक परदेशी, धर्मांध राजकारण्यांनी, राज्यकर्त्यांनी वा धर्ममार्तंडांनीही केलेल्या धर्मांतरामुळे अनेक मूळ हिंदू बाटले गेले. त्यांनाही परत आपल्या धर्मात येण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले. वरील व्याख्येत न बसणारे धर्म-पंथ हे अहिंदु म्हटले. मात्र त्यांना भारताच्या अखंडतेतून बाहेर जा म्हणून सांगितले नाही. त्यांना स्वतंत्र भारतात मिळणारा दर्जा हा सर्व नागरिकांना समान असणाराच मिळेल असे सांगितले असे असूनही लालची मुस्लीम नेत्यांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना, अहिंसावादात वाहावत चाललेल्या नेत्यांना सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मुस्लिमांना अनेक सवलती बहुसंख्य हिंदुंपेक्षाही अधिक प्रमाणात बहाल कराव्याशा वाटल्या यातच हिंदु समाजाचा घात झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र सर्वांना समान अधिकार देऊ पाहाणाऱ्या सावरकरांना मात्र नको ती दूषणं देण्याचा राजकीय स्वार्थ स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्यानंतर आजतागायत चालू आहे. ही दूषणं बाटलेल्या मुस्लिमांनी वा त्यांच्या नेत्यांनी दिली नाहीत तर तथाकथित पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी, धर्मनिरपेक्षतेचा कावेबाज आव आणणाऱ्यांनी, डाव्या विचारसरणीचे असल्याचा कावा करणाऱ्यांनी देऊन सावरकरांचे तत्त्वज्ञान, विचारही लोकांप्रत कसा पोहोचणार नाही, पोहोचलाच तर विखार कसा निर्माण होईल ते पाहात हिंदु संघटनांच्या हातात सत्ता जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. तर दुसऱ्या बाजूला हिंदु संघटनांनीही सावरकरांचे परिपूर्ण विचार समाजापर्यंत नीट पोहोचविण्याचे काम केले नाही, हे देखील तितकेच खरे. हिंदु महासभेला धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय सभा म्हणवून मोठी करू पाहाणाऱ्या सावरकरांनाच गांधीहत्येनंतर बदनाम करून हिंदुत्वाच्या खऱ्या प्रसारालाच रोखण्याचा नाकर्तेपणा या देशात बहुतांश राजकीय पक्षांनी मांडला हे देखील तितकेच सत्य आहे. यामुळेच हिंदु आणि अहिंदु समाजाला अद्ययावत करण्यासाठी, पोथिनिष्ठा सोडून विज्ञानाची कास धरून त्यावर आधारित सनातन सत्य सांगण्याचा, समजून घ्या तसेच काळाबरोबर सतत चाला आणि अद्यतनी म्हणजे अपटुडेट राहावे असे शिकवण देणाऱ्या सावरकरांना, त्यांच्या विचारांना पुसून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला हे हिंदुंचेही दुर्दैव आणि या देशातील अहिंदुंचेही दुर्दैव. कारण औद्योगिक क्रांतिनंतर बदललेल्या जगाच्या गतीबरोबर चालण्यास अजूनही भारतातील नागरिक सर्वार्थाने स्वतंत्र झाला आहे, असे म्हणता येत नाही.
(क्रमश:)
- शल्य बोचरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा