मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  १०


सावरकर झेपण्यासाठी विज्ञाननिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ, जात्युभेदोच्छेदक समाजमनाची तयारी होणे आवश्यक आहे, सावरकर हे पुतळ्यात, मूर्तीत, टोपीत मावणारे नाहीत. आम्ही सावरकर म्हणून ते राजकीय बेरीज करणारेही नाहीत, हे आमचे ते तुमचे असे म्हणणारेही ते नाहीत. 'सावरकर आमचे .... पण ' असे चाचरत म्हणण्याऐवजी 'सावरकर आमचे पण' असे म्हणावयाचे असेल तर हिंदु धर्माची खोटी झूल जशी बाजूला काढावी लागेल, तशीच तथाकथित धर्मनिरपेक्ष व मुस्लीम लांगूलचालनाचीही राजकीय बेगडी लकाकी खरडवून काढावी लागेल.

सावरकर झेपतील का?


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पन्नासवर्षांपूर्वी जे होते, ते आजही लागू झालेले दिसत नाहीत. त्यांच्या हिंदुत्वाला उजवे राजकीय पक्ष मतपेटीच्या आणि सत्तेच्या वापरासाठी वापरू पाहात आहे. तर त्यांच्या हिंदुत्वाला विरोध दर्शवणारे तथाकथित पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या दिशेने झुकणारे पक्ष वा डाव्या विचारांचे साम्यवादी वा तत्सम विचारांना मानत असल्याचा धिंडोरा पिटणारे पक्षही सावरकरांच्या मूलभूत विचारांना न समजून घेता त्यांच्याविरोधात अनाकलनीय आणि अभ्यासविरहीत तसेच हिंदुविरोधी मतगठ्ठ्यासाठी सावरकर विरोधाचा वापर करत आहेत. हिंदुत्ववादी म्हणविणारे पक्ष वा संघटना असोत वा तथाकथित पुरोगामी व धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारे पक्ष वा संघटना असोत. या सर्वांनी स्वतःचे स्वतंत्र तत्वज्ञान तरी तयार केले आहे का, असा प्रश्न पडतो. सत्तापिसाटासारखे वा सत्ताकेंद्रीत राजकारणासाठी विद्यमान भारतातील राजकारण आणि त्या अनुषंगाने समाजकारणही चालविले जात आहे, ते पाहाता स्वातंत्र्यवीर सावरकर वा तत्संबंधित प्रेरणास्रोतांचाही अपमान केला जात आहे, असे साकल्याने जाणवते. मुळात सावरकर हे प्रवाही व कालानुरूप जाऊ पाहाणारे, तसे समाजालाही त्याप्रमाणे जायला सांगणारे भविष्यवेधी तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्यांना द्रष्टे म्हणण्याचे धाडस केले जाते, कारण आजही त्यांच्या अनेक विधानांचे अस्तित्त्व अद्ययावत वाटते. ते आजही नवीन पिढीलाही पटू शकेल, इतके ताजे आहे. क्षकिरण असो वा  विज्ञाननिष्ठ निबंध यामधील त्यांचे विचार हे याच पद्धतीचे आहेत. धर्मासंबंधातील त्यांचे तर्क, दिग्दर्शन, धर्माकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी या घटकांचा विचार केल्यास आजही ते बुद्धीनिष्ठतेकडे विचारप्रवर्तनाकडे समाजाला नेऊ पाहाणारे तत्त्वज्ञान वाटते. 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोथिवादाला बाजूला करू पाहाणारे सावरकर ज्या पद्धतीने विचार मांडतात, बुद्धीवादी पद्धतीने विचार करा असे सांगतात, तेव्हा त्यांचे विचार आजच्या अनेक हिंदुना पटणारे नाहीत. याचे कारण वैचारिक प्रगल्भता आजही अनेक हिंदु समाजातील घटकांमध्ये तयार झालेली नाही. समाजाचा बारकाईने अभ्यास करून त्या समाजाला बदलण्याचे धाडस करण्याचे व तरीही बंड करून उठून धर्म सोडण्यापेक्षा आहे त्या धर्मशिक्क्याखालीही कसे सुधारता येईल, त्यासाठी विचार कोणत्या पद्धतीने करावा, हे सांगणारे सावरकर 'श्रुतीस्मृती पुराणोक्त' वा 'बाबा वाक्य प्रमाणं'मानू नका असे सांगणारे व्यक्तिमत्त्व होते. ते किती हिंदु वा सनातन म्हणविणाऱ्यांना झेपणारे आहे, असा प्रश्न आहे.
भारत हा विश्वगुरू आहे व होता, असे मार्केटिंग करणाऱ्या विद्यमान काळातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष असो किंवा संलग्न असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना असो यांचे सनातन धर्माचे प्राचीनत्व महत्त्वाचे कसे हे सांगणारे व सतत त्यावर जोर देणारे तत्त्व व विचार पुन्हा पोथिनिष्ठतेकडे जाणारे आहेत. नव्या पद्धतीने नव्या काळासाठी, नव्या काळाच्या भाषेत समजावून सांगणारे व श्रेष्ठत्त्व कसे योग्य आहे, हे विज्ञानाच्या आधारे सांगणारे किती आहे, त्याचा विचार प्रत्येकाने तटस्थपणे केला तर सावरकरांचा प्रखर बुद्धिवाद हा केवळ विज्ञाननिष्ठ होता असे नव्हे तर तो राष्ट्र संकल्पनेला अधिक वास्तव भरारी देणारा होता, असे म्हणता येते. 
यामुळेच सावरकरांचे रत्नागिरीतील काम, त्यासाठी त्यांना झालेला विरोध व त्या त्यावेळी त्यांनी तेथे धर्ममार्तंडांशी केलेले युक्तिवाद, संयुक्तिक तार्किकता पाहाता सावरकर हे प्रवाही होते, समाजाला हिंदु संस्कृती, परंपरा यांच्याबरोबरच इतिहासातील स्मरणीय, स्पृहणीय, स्फुरणीय घटनांबरोबरच त्याकालातील झालेल्या हिंदु समाजातील दोषांचेही मूल्यमापन करणारे सावरकर खरे म्हणजे आजच्या काळात असते तर ते त्याही पुढे जाणारे ठरले असते. केवळ सात बेड्या तोडण्याची त्यांचे आवाहन आणखीही विविध अप्रयोजक, अनावश्यक, दोषपूर्ण, भेदपूर्ण, क्रूर बेड्यांना तोडून समाजात बुद्धिवादाला पुढे नेणारे होऊ शकले असते. त्यांचे ते कर्तृत्व, त्यांचे ते विचार आज नव्या काळात कसे असते, त्यांचे विज्ञानवादी व्यवहार्य व उपयुक्ततावादाला धरून जातानाच ऐहिकतेला महत्त्व देत नवनागरी समाजाला उभारी देणारा त्यांचा दृष्टिकोन आज त्यांचा उदो उदो करणाऱ्या वा त्यांचे अनुनय करतो असे सांगणाऱ्यांना तरी झेपला असता का, तर त्याचे उत्तर नाही, असेच येईल. याचे कारण सावरकरांचा जीवनक्रम आणि त्यांची एकंदर वाटचाल पाहिली की, त्यांच्यातील विविध बदल हे कालानुसार विकसित होणाऱ्या प्रवाही तत्वांचे असल्याचे जाणवते. त्यामुळेच कुठे पुढे जायचे व कुठे थांबायचे हे एक शरीर म्हणून स्वीकारताना सावरकरांनी प्रायोपवेशनाचा मार्ग स्वीकारला होता. किंबहुना हाच त्यांच्या स्वमर्यादा ओळखत मानवी समाजाला प्रगतीपर बौद्धिक, वैचारिक आणि ऐहिकतेला वाटचाल करावयाची आहे, हेच सांगणारी त्यांची जीवनदृष्टी होती. यामुळेच त्यांच्या पश्चातही त्यांचे विचार मृतप्राय ठरत नाहीत, कारण ते बदल स्वीकारणारे आहेत. 
बदल स्वीकारतानाही त्यांनी राष्ट्र या संकल्पनेबद्दल मांडलेला विचार हा खरे म्हणजे रुढ धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेला स्पष्ट स्वीकारणारा होता. त्यामुळेच त्यांचे हिंदुत्व हे धर्माधिष्ठित नव्हते, सनातन नव्हते, वैदिकही नव्हते तर ते अस्सल राष्ट्र संकल्पनेला मानणारे होते. त्यामुळेच हिंदु कोण व अहिंदु कोण हे भेद करूनही त्यांनी अल्पसंख्याक वा मुस्लिमांना वेगळे सांगितले तरी स्वतंत्र भारतात त्यांच्यापेक्षा आम्हाला अधिक काही नको, असे सांगत समान पातळीवर सर्वांना नागरिक म्हणून साकारण्याचाच समानतेचाच दृष्टिकोन स्पष्ट केला. मुस्लीम नेत्यांच्या आक्रमक, हिंदुविरोधी धोरणाला, ब्रिटिशांच्या कावेबाजपणाला खरे म्हणजे हेच चोख उत्तर होते. किंबहुना तथाकथित काँग्रेसी अहिंसावादावरही त्याने कडी केली असती. जिनांची आणि सावरकरांची धर्मासंबंधातील तुलनाच मुळात होऊ शकत नाही, कारण सावरकरांनी अखंड भारत मागितला होता, त्यात सर्व समाविष्ट असतील, अशीच सुस्पष्ट व समानतेची हाक असणारी भूमिका होती. कोणाचेही लांगूलचालन नव्हते की, तुष्टीकरण नव्हते. इतिहासाला स्वीकारीत त्यातील गुणावगुणांचा विचार करून त्यांनी हिंदु समाजाला हाक दिली होती. दुर्दैवाने तो समाज आजही बहिरेपणाच्या व्यंगावर मात करू शकलेला नाही आणि धर्ममार्तंडांच्या बौद्धिक वैचारिक गुलामगिरीतूनही बाहेर पडू शकलेला नाही. यामुळेच सावरकर अद्यापही आम्हाला झेपलेले नाहीत. सावरकर झेपण्यासाठी विज्ञाननिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ, जात्युभेदोच्छेदक समाजमनाची तयारी होणे आवश्यक आहे, सावरकर पुतळ्यात, मूर्तीत, टोपीत मावणारे नाहीत. आम्ही सावरकर म्हणून ते राजकीय बेरीज करणारेही नाहीत, 'हे आमचे ते तुमचे' असे म्हणणारेही ते नाहीत. 'सावरकर आमचे .... पण ' असे चाचरत म्हणण्याऐवजी 'सावरकर आमचे पण' असे म्हणावयाचे असेल तर हिंदु धर्माची खोटी झूल जशी बाजूला काढावी लागेल, तशीच तथाकथित धर्मनिरपेक्ष व मुस्लीम लांगूलचालनाचीही राजकीय बेगडी लकाकी खरडवून काढावी लागेल. तूर्तास इतकेच.

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...