स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निबंधामधून त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय सुस्पष्टपणे दिसते. त्यांच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्यांच्या विचारांची दिशा, भविष्याचा मागोवा घेत वेध घेण्याची त्यांची तात्विक कृतिशीलता, त्यांचे सामाजिक, आर्थिक, तत्त्वज्ञानात्मक, तर्काधिष्ठित, धर्मविषयक दृष्टिकोन त्या काळात काय होते आणि त्यांना भविष्यातही काय अभिप्रेत होते, त्याचा सुस्पष्टपणा निबंधांमधून जाणवतो. विशेष म्हणजे देश, राष्ट्र, समाज, इतिहास, संस्कृती, धर्म आणि विज्ञानावर आधारित जीवनमूल्ये- धारणा यासह त्यांनी आपली तत्त्वप्रणाली मांडली. दुर्दैवाने त्यांच्या या विचारसरणीला पेलवेल, इतकी हिंदुस्थानातील हिंदु, मुस्लिमांची बौद्धिकता तेव्हाही नव्हती आणि दुर्दैवाने स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही ती धारणा पेलवण्याचीही बौद्धिक क्षमता आजही नाही. याचे कारण सतत काळाबरोबर वैचारिक, बौद्धिक, सामाजिक सुधारणा स्वीकारण्याची ताकद आजच्या समाजाकडे आहे की नाही, किती टक्के समाज प्रगल्भ आहे, साक्षरता आणि विवेकशील भान, विज्ञानाने प्रगती साधलेल्या समाजामध्ये वैज्ञानिक समज किती आहे, त्यानुसार आवश्यक असलेल सर्वस्तरीय बदल स्वीकारले गेले आहेत का, ऐहिकतेत व व्यक्तिस्वातंत्र्य, चंगळवाद यात आजचा समाज पार काळवंडून गेला आहे, हे लक्षात घेता समाजाची वैचारिक स्थिती परिपूर्ण नसल्याचे म्हणावे लागेल. अर्थात यामागे असणारी विविध कारणे ही संशोधनाचा विषय आहे. पण, त्याचबरोबर सावरकरांच्या तात्त्विकतेच्या व तर्काधिष्ठितपणाच्या पासंगालाही समाजमन पुरलेले नाही, समाजाची वैचारिक परिपक्वता ही ऐहिकतेत व अतिव्यक्तिस्वातंत्र्यात गाडली गेलेली आहे.
सावरकरांचे निबंधांमधील विचार, तत्कालिन काळ आणि मानसिकता याबरोबरच आजचा काळ आणि मानसिकता यामध्ये समाज व हिंदु कुठे आहेत, हिंदुंचे नेतृत्व कुठे आहे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वैचारिक मंथन नेमके काय सांगणारे आहे याचा तौलनिक तपशील मांडण्याचा या लिखाणात प्रयत्न करणार आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि वैचारिक पैलू या निमित्ताने मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीचे नाही, सशस्त्र क्रांतिकारकांचे नेते म्हणूनही नाही किंवा केवळ समाजसुधारक, तत्त्ववेत्ते वा कायम एकाच तत्वज्ञानावर ठाम राहाणारेही नाही. सावरकर हे व्यक्तिमत्त्व अद्ययावत राहू पाहाणारे व विज्ञानवादाला- बुद्धिवादाला स्वीकारीत उपयुक्ततावादी जीवनशैलीलाही स्वीकारून राष्ट्र संकल्पनेला वर्गहित साधून आर्थिक दिशा देऊ पाहाणारे आहे. नवीन पिढीलाही पुढे जाण्यासाठी न अडविणारे वा त्यांना कोणत्याही एका विशिष्ट न बदलणाऱ्या ‘बाबा वाक्यं प्रमाणम’ प्रकारच्या वैचारिकतेत जखडून न ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच इतके लवचिक व काळाची पावले ओळखून बदल स्वीकारणारे तत्त्व सांगत प्रत्येकाच्या मनात त्याचे त्याचे पिढीनुसार स्वत्व बाणवू पाहणारे सावरकर आज किती जणांना ओळखू आले आहेत, कितींना पचविता आले आहेत, कितींना समजू शकले आहेत, ते ज्याचे त्याने ठरवावे व मगच त्यांनी त्यांनी सावरकर अनुनय करीत असल्याचे सांगावे, ही वास्तवता सावरकरांच्या संबंधात स्पष्ट दिसून येते. त्यामुळेच त्यांची खरे म्हणजे मीमांसा करण्याचीही आपल्या पिढीची पात्रता आहे, असे मला अजिबात वाटत नाही. मात्र तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा त्यांच्या विज्ञानिष्ठ निबंधांच्या अनुषंगाने मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.
- रवींद्र यशवंत बिवलकर
(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक )

स्वातंत्र्यवीर सावरकर तेव्हाही तथाकथित हिन्दू आणि मुल्ला मौलवी याना कळले नाहीत; आजही नाहीत हे खेदाने म्हणावे लागते.
उत्तर द्याहटवाअगदी खरं आहे
उत्तर द्याहटवा