कालप्रवाही सावरकर - २
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विज्ञाननिष्ट निबंधांमधून त्यांची वैचारिक दिशा, त्यांची मानवविषयक, धारणा, देव, धर्मविषयी धारणा, राष्ट्राबद्दलची प्रखर जाणीव, विश्वात्मकतेचे आकलन अशा सर्व घटकांना बुद्धीच्या - विज्ञानाच्या आधारावर तोलून मापून त्यांनी काळाबरोबर जाणाऱ्या जगाला आपले म्हटले आहे. हिंदुराष्ट्र या त्यांनी दिलेल्या संकल्पनेला खरा आधार हा याच बुद्धीनिष्ठ, विज्ञाननिष्ठ अशा धारणेतून त्यांनी घालून दिला आहे. सर्वसाधारणपणे त्यांच्या प्रत्येक निबंधांमधून मिळणारी ही जाणीव त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमधून अतिशय तार्किक व तात्विक पद्धतीने मांडलेली दिसते.
सावरकरांच्या निबंधामधून त्यांच्या विचारांच्या दिशेचा वेध घेणे हे ही सोपे काम नाही. त्यांची वाक्यरचना, त्यातून विषय समजून घेऊन तो मांडण्याची पद्धती, त्या काळातील त्यांच्या लांबलचक वाक्यांमुळे व संदर्भांमुळे तौलनिकदृष्टीनेही त्यांनी केलेली विषयांची मांडणी हे त्यांच्या निबंधांच्या शैलीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागते. भाषा, शब्द यामुळे आजच्या नवकालातील मराठी माणसांनाही त्यांची माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या विविध महत्त्वाच्या निबंधांचे हे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न वा धाडस आहे.
विश्व म्हणजे काय, सुख व दुःख किंवा चांगले वा वाईट या दोन संकल्पना माणसाच्यादृष्टीने कशा तयार झाल्या, हे सांगताना देव व राक्षस या दोन साध्या घटकांची माहिती सावरकर सुरुवातीपासून देतात. तात्विकतेतून व काहीशा सुलभ तार्किकतेतूनही ते त्याचे विश्लेषण करतात. विश्वाचे आकलन करण्यासाठी प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी जे काही पृथ्थकरण केले आहे, ते करताना सावरकर अतिशय सोप्या शब्दात अभ्यासकांना किंवा चिकित्सक वृत्तीच्या लोकांना समजेल, अशा भाषेत विश्लेषण करतात पाच इंद्रियांनीच विश्वाचे आकलन होऊ शकते, असे सांगताना ते पंचीकरण असा शब्द वापरतात. तर विश्वातील शक्तीच्या वर्गीकरणाचा तो उत्तम मार्ग असल्याचे सांगत पंचमहाभूतांची माहिती देतात. पाच गुणांच्या तत्वांनीच विश्व घडलेले असेल, असे सांगताना तर्कशास्त्राने व तत्त्वज्ञान्याप्रमाणे सावरकरांनीही प्राचीन काळात मनुष्याने विश्वाचा शोध कसा घेतला असेल, त्याचे अस्तित्त्व कसे जाणण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचे गुणधर्म पंचेंद्रियांच्या आधारे कसे समजून घेतले असतील हे ते सांगतात. त्यासाठी त्यांनी आस्तिकांना, धर्म मानणाऱ्यांनाही न दुखाविता सृष्टीच्या रचनेची माहिती कधी हळूवारपणे तर कधी परखडपणे व तौलनिक समतोल साधत निबंधातून उतरविली आहे. उदाहरणे देतानाही त्यांनी व्यावहारिक बाबींनाही लोकांसमोर मांडून विश्वाचे हे स्वरूप समजाविण्याचा केलेला प्रयत्न हा आधुनिक काळातील एखाद्या उत्तम शास्त्रशिक्षकाच्या हातोटीने केलेला आहे. विज्ञानवादी असणारे सावरकर त्यामुळे देव या शब्दालाही तितक्याच रितीरिवाजांना मानणाऱ्या तसेच रुढ अशा धर्म शब्दाला धरून चालणाऱ्या समाजाच्या मानसिकतेतून हळूवारपणे व देव या संकल्पनेची लोकांमधील जाणीव न दुखावता विश्वाचे शास्त्रीय पृथक्करण करू पाहातात.
केवळ इतकेच नव्हे तर विश्वातील प्राणीमात्रांची उदाहरणे आणि तुलना, त्यांची वैशिष्टये याचीही माहिती सांगत मनुष्याचे महत्त्व त्यांनी अधिकाधिक अधोरेखीत केले आहे. किंबहुना माणसाला केंद्रस्थानी मानून माणसांचे गुणविशेष, गुण व अवगुण अशा विविध बाबींनाही त्यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट केले आहे.
'एक गव्हाचा दाणा पेरला की त्याचे शंभर दाणे या जगात होऊन उठतात; एक आंबा! रसाने, स्वादाने, सत्वाने कोण भरपूर भरलेले ते देवफळ! पण तरीही ते इतके सुपीक की एक आंबा रुजवला की त्याचा वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजार हजार आंबे त्याला लागावे नि असा क्रम वर्षानुवर्षे चालावा; फार काय सांगावे, एका आंब्याच्या फळापासून होणारी ती लाखो फळे, सगळीची सगळी जरी मनुष्यांनी खाल्ली तर पुन्हा आंब्याचा तोटा म्हणून पडू नये, यासाठी आंब्याच्या झाडाच्या फांदीचीच कलमे करून त्यांच्या आंबरायांच्या आंबराया भरभराटण्याची सोय ज्या जगात देवाने केलेली आहे….' सावरकरांची ही विश्लेषण करण्याची पद्धत पाहाता त्यांनी तत्कालिन धार्मिकतेला न दुखाविता देवाने मनुष्यावर कसे कसे उपकार केले आहेत, ते सांगत मनुष्य त्याचा उतराई तरी कसा होणार, असे विचारीत मनुष्य देहाच्या रचनेवरही ते भाष्य करतात. सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत शरीराची रचना इश्वराने केलेली आहे, त्या मनुष्याच्या देवाचेही गुणगान ते गातात. हे करताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी विज्ञानविचारांना ज्या पद्धतीने सादर केले आहे, ते बारकाईने लक्षात घ्यावे असे आहे. सारे काही मनुष्यासाठी देवाने निर्माण केले आहे, त्याचे अगदी रसाळ वर्णन करत सावरकरांनी साऱ्या पृथ्वीवरील वस्तू, तरीही सर्व काही मनुष्यास पूर्णानुकूल नसल्याचे सांगतात. येथे 'उपयुक्ततावाद' ही सावरकरांची दृष्टी सुरू होते. ऐहिकतेला पुढे ठेवणारी व पारलौकिकतेला गौण ठरवणारी त्यांची विचारसरणी येथून अनेक तपशीलांचे विश्लेषण करणारी ठरते.
मग विज्ञानवादी विचारांमधून त्याची मीमांसा करीत निसर्गातील घटकही मनुष्यास कसे मारक असू शकतात, कसे मारक ठरतात ते सांगत धर्मग्रंथांचीही काही उदाहरणांनी माहिती देत भाबड्या भक्तीवर ते तुटून पडतात. निसर्गातीलच घटक कसे परस्परावर उठून बसलेले दिसतात. हे सांगताना बळी देण्याच्या प्रथांवर आसूड ओढतात व त्याचवेळी मनुष्याचे मांस खाण्यासही वाघ, चित्ते, लांडगे यांची देवाने निर्मिती केलेली आहे, हे सांगतात. एकंदर विश्व निर्मिती, त्यामागील स्थिती, प्रेरणा, हेतू वा उद्देश यांची विश्लेषणात्मक मीमांसा या 'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' निबंधांत केली आहे. कधी हळुवारपणा तर कधी परखडपणा व स्पष्टपणा तर कधी तार्किक व तात्विक पद्धतीने त्यांनी हे विश्लेषण केले आहे. थोडक्यात विश्व म्हणजे नेमके काय आहे, सत्य आणि असत्य या त्या संबंधात असणाऱ्या घटकांना कसे ओळखावयाचे, देवाला आवडते व नावडते असे काही नसते. अशा खुळचट समजुतींना दूर करा - बाजूला सारा हे सांगणारे सावरकर माणुसकीवर भर देतात व विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा असे सांगताना जो धडा देतात, तो पाहून सनातन धर्माचा हवाला देत 'बाबा वाक्यं प्रमाणंम्' सांगणारे हिंदू असोत वा कुराण, बायबल याचे 'श्रुती स्मृती पुराणोक्त' म्हणणारे आणखी कोणी असोत, त्यांचे डोळे उघडण्याचे काम सावरकरांच्या या विश्वाच्या देवाने केले आहेत. पण दुर्दैवाने आज त्यांच्या विश्वाचा देव ना मनुष्याला कळला आहे ना पृथ्वीवरील अविज्ञानी जनांना उमगला आहे. तरीही मी ही सावरकर म्हणविणारे भक्तगण टोप्या घालत आहेत. (क्रमशः)
- रवींद्र यशवंत बिवलकर
(संदर्भ - विज्ञाननिष्ठ निबंध - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ प्रकाशन आवृत्ती २०००-२००१, मुद्रक प्रकाशक - पंडित बखले मुंबई व नाना गोडसे पुणे. मुद्रणस्थळ जॉली ऑफसेट १४ वडाळा उद्योग भवन, मुंबई ३१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा