कालप्रवाही सावरकर - ३
सावरकरांचा हा दृष्टिकोन, लक्षात घेतला की, रितीरिवाज, धर्म, धर्मग्रंथ, ग्रंथातील लिखाण, त्याला मानणे वा न मानणे यापेक्षा व्यावहारिकतेला सावरकर महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, असे सांगण्याची क्षमता बाळगूनही ते माणुसकीची खरी व्याख्या ज्या पद्धतीने सांगतात, ती विद्यमान सनातन धर्म अंधत्वाने, पोथिनिष्ठतेने स्वीकारणाऱ्यांना पटणारी आहे का, ते आधी त्या सर्वांनी ठरवावे, मगच आपण सावरकरवादी आहोत, सावरकरांना आपण मानतो असे सांगावे.
'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' हा निबंध सुरुवातीपासूनच इतक्या प्राथमिक बाबींचा विचार करतो, की जणू 'कोsहम' असा प्रश्न विचारून जणू स्व चा शोध घेण्याची जी धडपड अध्यात्मिक स्तरावर माणूस करतो, त्याप्रमाणेच सावरकर या निबंधात माणसाच्या अस्तित्त्वाचाही विचार करताता, मात्र त्यांचा हा अस्तित्त्वाचा शोध अध्यात्मिकतेकडे झुकमारा नाही,. लौकिकतेकडे, ऐहिकतेकडे झुकणारा आहे. आधुनिक काळाची चाहुल त्यांना त्यांना त्याकाळात ज्या पद्धतीने लागलेली असावी, ती पाहाता, आजच्या आधुनिक काळातील बदलांबद्दल ते बऱ्याच अंशी वैचारिक स्तरावर आत्मशोध घेणारे होते. पण त्यांचा हा आत्मशोध स्वत:पुरता नव्हता तर एकंदर माणसाच्या समाजासाठी होता. बदलत्या विश्वाला, बदलत्या काळाला समजून त्याला सामोरे जाण्याची त्यांची विचारसरणी यामधून दिसून येते.
मनुष्याचा देह, त्याची रचना याचा विचार करताना सावरकर बारकाईने विचार करतात, त्या त्या अवयवयवांचे महत्त्वही सांगतात. केवळ मनुष्यच नव्हे तर जगाला निर्माण करणाऱ्या देवाने मनुष्यावर अमर्याद दया केली आहे, त्याचा मनुष्य कसा उतराई होणार, असेही विचारतता. हा प्रश्न जितका वाटतो तितका साधा नाही. यात अनेक बाबींना गुंफलेले आहे. निसर्गाचाही असाच विचार त्यांनी यामध्ये केला आहे. त्यामुळेच त्यांनी या निसर्गाचे माणसाशी असणारे नाते, त्यातील समतोल किती महत्त्वाचा असतो हे ओळखले आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे सावरकरांनी यंत्रयुगाला नेहमीच प्राधान्य दिले असले तरी त्यांनी निस्रग आणि माणूस यांचे नाते त्यातील समतोल हा देखील बारकाईने लक्षात घेतलेला होता. माणूस असो वा निसर्गातील जीव, पशू पक्षी, प्राणी, झाडे, फळे, फुले अशा सर्वांचा विचार करीत, त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेत सावरकरांनी मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव यांचे स्वरूप मांडले आहे. त्यातूनही ते महत्त्व मनुष्याला देतात कारण त्या मनुष्य, त्याचा समाज, त्याचे जगणे, त्याची इतिहास, संस्कृती, परंपरा, धर्म, अधर्म, चांगली व वाईट कृत्ये अशा सर्व बाबींचा विचार त्यांनी केला आहे. त्यामुळेच निसर्गाचा घटक असलेल्या मनुष्याला देवाने जे दिले आहे ते कसे पाहायचे ते या निबंधातून ते शिकवितात. त्यामुळेच चांगले आणि वाईट हा भेद ते मांडतात. यामुळेच देव या संकल्पनेला सांगताना असणारा त्यांचा दृष्टीकोन हा अतिशय वेगळा व स्वतंत्र आहे. त्यामुळेच त्या संबंधातील त्यांची वाक्ये नीट लक्षात घेण्यासारखी आहेत.
🔴 🔴 🔴
।। भोगात रुचि आहे, योगात समाधी आहे-देवा! ते हे जग ज्या तू आम्हा मनुजांना इतके सुखमय होऊ दिलेस, होऊ देत आहेस, ते तू आमच्या सुखासाठीस निर्मिले आहेस असे आम्हास का वाटू नये?…
।। आम्ही माणसे देवा तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेस! आईला देखील दूध येते तू दिलेस म्हणून! आम्ही मनुष्ये तुझे भक्त आहोत आणि देवा तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस. इतकेच नव्हे तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तुझ्यावाचून दुसरा देव नाही.
।। पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता तेव्हाही नद्या वाहात होत्या. झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या. मनुष्यावाचून तर काय पृथ्वीही नव्हती तेव्हाही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता आणि आता हा सूर्यही जरी त्याच्या साऱ्या ग्रहोपग्रहांसुद्धा हरवला तरी एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते तितकेदेखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. या विश्वाच्या देवाला एक पलाचेही सुतक असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवसात जरी मरू लागले तरी धरावे लागणार नाही !
।। परंतु त्यापलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लाचार हाव मनुष्याने आमूलात्सोडून द्यावी हेच इष्ट ! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे ! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव ! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो. त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.
।। ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मनुष्याच्या हातात आहे. मनुष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी नीती अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही;फार फार थोड्या अशी ते आपणास अनुकूल आहे; विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे, असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा !!
🔴 🔴 🔴
हे सांगताना सावरकर विश्वातील सूर्य, समुद्र आणि त्यामुळे माणसावर होणारे उपकार आणि हानि यांचीही उदाहरणे देतात. नदी, पाणी यांचीही उदाहणे देतात. त्यामुळे असणारी उपयुक्तताही सतत सांगत सावरकर पुन्हा पुन्हा उपयुक्ततावादाला मांडत आहेत. त्यातून होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे पडसाद त्यांनी मांडले आहेत. निसर्गातील नानाविध प्राणी त्यापासून मिळणारे मांस याचे वर्णनही सावरकरांनी ज्या पद्धतीने केले आहे, ते सुरवातीला इतके सहज, हळूवार वाटते ते नंतर उपयुक्ततावादाच्या आणि तार्किकतेच्या पटलावर जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा त्या सर्व मांडणीचे महत्त्व कळते. त्यातून उमजते ते सावरकरांचे जीवनविषयक धोरण. या विश्वातील मनुष्य प्राण्याखेरीज असलेल्या सर्व घटकांना सावरकरांनी आपल्या वेगळ्या नजरेने पाहिले आहे. ही नजर विज्ञानाची कास धरणारी आहे, उपयुक्ततावादाला स्वीकारणारी, मांडणारी आणि बदलत्या काळाबरोबर अद्ययावत होऊ पाहाणारी आहे. देवाविषयीच्या सुस्पष्ट धारणा त्यांनी येथे मांडलेली आहे. अंधभक्ती, भाबडी भक्ती, वा दृष्टिकोन सावरकर ठेवू इच्छित नाहीत. सावरकरांचा हा दृष्टिकोन, लक्षात घेतला की, रितीरिवाज, धर्म, धर्मग्रंथ, ग्रंथातील लिखाण, त्याला मानणे वा न मानणे यापेक्षा व्यावहारिकतेला सावरकर महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, असे सांगण्याची क्षमता बाळगूनही ते माणुसकीची खरी व्याख्या ज्या पद्धतीने सांगतात, ती विद्यमान सनातन धर्म अंधत्वाने, पोथिनिष्ठतेने स्वीकारणाऱ्यांना पटणारी आहे का, ते आधी त्या सर्वांनी ठरवावे, मगच आपण सावरकरवादी आहोत, सावरकरांना आपण मानतो असे सांगावे. केवळ विशिष्ट हेतूंसाठी सावरकरांना जवळ करण्याऐवजी त्या सावरकरांचा देव करण्याऐवजी त्यांच्यातील माणूस नेमका काय सांगतो ते ऐकावे, पटले तर घ्यावे न पटले तर सोडून द्यावे. असे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या घडीला सावरकरांच्या संबंधात काहीही बरळले जाते. मुळात काळानुसार चालावे, जगावे असे सांगणारे सावरकरांचे हे तत्त्वज्ञान. ते प्रवाही आहे. त्यांनी सांगितलेलेा विचार पाहाता तुम्हीही प्रवाही राहावे, असाच त्याचा अर्थ निघतो. 'बाबा वाक्यंम प्रमाणाम' सारखे 'सावरकर वाक्य प्रमाणम' असेही मानून त्यांना पोथिनिष्ठ करू नये. किंबहुना प्रवाहीपणा हा बुद्धीनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने प्रत्येक पिढ्यांनी स्वीकारला तर प्रत्येक पिढीत कालप्रवाही वि. दा. सावरकर तयार होऊ शकतात. त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्ष-प्रवृत्तीना आज सावरकरांचे हे कालप्रवाहीपण झेपणारे नाही, कारण राष्ट्र या संबंधातून त्यांनी मांडलेली प्रखर राष्ट्रनिष्ठाही त्यासाठी आधी समजून घेणे गरजेचे आहे. हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या संबंधातील सध्याच्या राजकीय कल्पना तर खूप दूरच राहिल्या. (क्रमशः)
- रवींद्र यशवंत बिवलकर
(संदर्भ - विज्ञाननिष्ठ निबंध - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ प्रकाशन आवृत्ती २०००-२००१, मुद्रक प्रकाशक - पंडित बखले मुंबई व नाना गोडसे पुणे. मुद्रणस्थळ जॉली ऑफसेट १४ वडाळा उद्योग भवन, मुंबई ३१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा