गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

  सावरकर आमचे... पण   -  ९


सावरकरांचे हिंदुत्व हे अलीकडच्या काळात अध्यात्मिक वा धार्मिक दृष्टिने अधिक मानले जाऊ लागले. खरे म्हणजे धर्माची परिपूर्ण व्याख्या समजून व समजावून घेऊन देखील त्यांच्या हिंदुत्वाला सनातनी पद्धतीच्या विचारात बद्ध करणाऱ्या हिंदु समाजान, त्यांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांनी, काँग्रेस विरोधकांनीह, काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनीही सावरकरांचे हिंदुत्व नेमके ओळखेल नाही. त्यामुळेच देशाच्या अस्मितेची अचूक नाडी ओळखूनही देशवासींमध्ये सावरकर यांच्या ऐहिक, लोकिक तार्किक विचारांनी जी जागृती व्हायला हवी होती, ती आली नाही. सावरकर आस्तिक की नास्तिक या वादात कोणी गुरफटले, सावरकर मुस्लीम विरोधकच इतकेही कोणी मानले, सावरकर पूर्ण गांधी विरोधक मानून काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांना आपले मानले. वास्तविक राष्ट्रपुरुष म्हणजे काय दिशा दाखवू शकतो, हेच भारतीय वा हिंदुस्थानींना समजले नाही. इस्लाम मानणाऱ्यांची गोष्ट बाजूलाच राहूंद्या पण हिंदुंनीही त्यांना ओळखले नाही. कारण हिंदुंनीच स्वतःला एखाद्या फतव्यात बांधून घेतले होते. तुम्ही तुमचा त्व सोडा मी माझा हिंदुत्वातील त्व सोडतो, असे किंवा ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना असे मुसलमानांना स्पष्ट बजावणारे सावरकर दुर्दैवाने ना मुसलमानांना कळले ना हिंदुंना.

हिंदुत्व - अध्यात्मिक पाया की इहवादी, वुद्धिवादी

हिंदुत्व हा शब्द सध्या तसा तात्विक वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. विशेष करून भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील विद्यमान म्हणते २०१४ नंतरच्या राजकीय चक्रामध्ये हिंदुत्वाचा ज्या प्रकारे वापर केला गेला आहे, त्यामुळे हिंदुत्वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेला अर्थ आणि सध्या सर्वसामान्य हिंदु जनता, रुढार्थाने सनातन धर्म मानणारे आणि अन्य पंथिय यांनी सध्या मानलेला अर्थ तसेच  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी, भाजपा नेत्यांनी मानलेला व स्वीकारलेला सोयीस्कर अर्थ यात चांगलाच फरक वाटतो. स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्माचा विशेष करून सनातन धर्माचा अघ्यात्मिक पद्धतीने मांडलेला तात्विक अर्थ हा प्रामुख्याने सर्वांना समानतेच्या पातळीवर आणू पाहाणारा होता. त्यात त्यांनी राष्ट्र या संकल्पनेनुसार मांडलेला हिंदुस्थान हा देखील सनातन्यांपेक्षा पारंपरिक तत्त्वज्ञानाला मांडणाऱ्या आणि मानणाऱ्या तत्कालिन धारणांना छेद देणारा होता. तसं पाहिला गेले तर स्वामी विवेकानंद यांना असणारी देशाविषयीची कळकळ ही वेगळ्या स्वरूपाची होती. ती पारमार्थिक आणि पारलौकिक तत्त्वज्ञानाला अधिक साकारत जाणारी होती. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्वी हिंदुत्व हा शब्द फार वापरला गेला असल्याचे दिसत नाही, मात्र सावरकरांनी तो वापरला त्या शब्दाची संकल्पना, व्याप्ती आणि दिशा ही वेगळी होती. त्यामध्ये रुढार्थाने सनातन हिंदु धर्मीय सध्या ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा वापर करीत आहे, तशी सावरकरांची हिंदुत्व ही संकल्पना नव्हती. सावरकर हे हिंदु धर्मातील व सनातनी धर्मातील विविध परंपरांना, रुढी, रिवाजांना धर्मनियमाना वा कायद्यांना झुगारणारे होते, मात्र त्यासाठी त्यांनी हिंदु धर्म वा सनातन धर्म पाळणाऱ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा द्वेष केला नाही, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नाही, किंबहुना धर्म या संकल्पनेला आणि राष्ट्र या संकल्पनेला लक्षात घेऊन भारतवर्षात हिंदु समाजावर मुस्लीम धर्मीयांकडून भूतकाळात झालेल्या अत्याचार, आक्रमण, राजकीय वर्चस्व, धर्मांतर अशा विविध बाबींच्या पार्श्वभूमीवर हिंदुंना जागृत करण्याचे, त्यांची धार्मिक अस्मिता जागी करण्याचे काम केले. सावरकरांची ही भूमिकादेखील तत्कालिन मुस्लिमधर्माच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वर्चस्व गाजवत मनमानी भूमिका घेण्याविरोधात होती. ब्रिटिशांनी मुस्लिम नेत्यांना हाताशी धरून भारतीय समाजात धार्मिक भेदांचा फायदा घेत फूट पाडण्याच्या भूमिकेला मुस्लिम नेत्यांनीही दिलेल्या होयबा भूमिकेला दिलेले प्रत्युत्तर होते. हिंदु व मुस्लिम ही या देशातील तत्कालिन स्थितीतही अविभाज्य अंग आहेत, ही त्यांना मान्य असणारी बाब होती, त्यांचा विरोध होता, तो मुस्लिमांच्या इतिहासातील राजवटीला पुन्हा जागृत करू पाहाणाऱ्या मुस्लिमांच्या सरंजामी मानसिकतेला, त्यांच्या पोथिनिष्ठ धर्माने सांगितलेल्या आपणच सर्व काही श्रेष्ठ असल्याच्या दाव्याला आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या मुस्लिम लांगूलचालन केल्या जाणाऱ्या हिंदुंच्याही बोटचेप्या, लाचार वृत्तीला. हे सर्व व्यावहारिक होते. त्यामुळेच ऐहिकतेला प्राधान्य देत उपयुक्ततावादाला स्वीकारत अद्ययावात व्हा असे सांगणाऱ्या विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी असलेल्या सावरकरांनी हिंदुत्व हे धर्माधारित पोथ्यांवर आधारित कर्मकांडावर मांडले नाही, ही बाब आजही नीटपणे लक्षात घेतली जात नाही, याचे कारण स्वार्थी राजकीय हेतूंमुळे हिंदुत्वाला पुन्हा संरजामी, वर्णवादी वा सामाजिक श्रेष्ठत्वाच्या गटवादी भूमिकेवर  हिंदुहिताऐवजी सत्तालोलूप वा सत्तापिसाट भूमिकेतून हिंदुंचे ध्रुवीकरण वा हिंदु मतांचे ध्रुवीकरण करण्याचा होत असलेला प्रयत्न. त्यातही कथित धर्मनिरपेक्षवाद्यांकडूनही सावरकर यांच्या हिंदुत्वाची पोचही नसणारे युक्तिवाद व दावे केले जात असताना सावरकरांच्या तत्वज्ञानाचा विपर्यास होऊ देत आपली पोळी भाजून घेणारे विचारवंत, संघटक, नेते, सत्ताभक्तिपायी गतिमंदबुद्धीचे अनुयायी कमी नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुबहुल देशातील हिंदुसमुदायाला केवळ सनातनी वैदिक धर्मामध्ये गणले नाही वा मोजले नाही. हिंदुबहुलता ही या भूमीमध्ये पसरलेल्या रुजलेल्या, याच मातीत उगवलेल्या वा पेरलेल्या धर्म- पंथ - विचार, आचार, तत्वज्ञान, संत- तत्वज्ञान आणि याच हिंदुस्थानच्या मातीत असलेल्या या धर्म- पंथ, विचारांशी संलग्न असलेल्या याच मातीतील समानशीलेषु अशा वास्तुंना तीर्थक्षेत्रांना पवित्र धर्म-तत्त्व क्षेत्रांना एकत्र मानण्याचा आणि मांडून त्यांना स्वीकारण्याचा सावरकरांचा प्रयत्न त्यांच्या हिंदुत्वाचा गाभा होता. इतके असूनही केवळ मुस्लिम धर्मावरच पोथिनिष्ठतेचा आरोप वा दावा त्यांनी केला नाही, पोथिनिष्ठ होऊ नका, त्यांना बाजूला ठेवा, इतिहास म्हणून कपाटात ठेवा, असे हिंदुंनाही सांगणाऱ्या सावरकरांचे हिंदुत्व हे म्हणूनच अध्यात्मिकतेच्या आधारावर वा धर्मातील कर्मकांडे रिवाज यांना अंधभक्तीने बरोबर नेणारे नाही. त्यांचे  हिंदुत्व डोळस आहे. त्यामुळेच जुन्या प्रमाण मानलेल्या बाबींना विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घ्या, असे सांगण्याचा बुद्धिवादी भाग हा जातीय नव्हे तर अद्ययावत होता. त्यामुळेच रत्नागिरीमधील त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी केलेले कार्य हे नीट पाहिल्यास, डोळसपणे पाहिल्यास ते राष्ट्रीयत्वाचा संदेश देणेारे होते. जुन्या रुढी-रिती रिवाजाना बाजूला सारीत नव्या काळाच्या वैज्ञानिकक कसोट्यांवर त्यांना पारखू पाहाणारे होते. नवकालाच्या भविष्याचा वेध घेत समाजाने मार्गक्रमण करावे हे सांगणारे होते. मुस्लिमांच्या लांगूलचालनापेक्षा हिंदु समाजाला एकजुटीने उभे करत समानतेच्या तत्वावर नेऊ पाहाणारे होते. सनातन्यांच्या कर्मठपणाला उत्तर देत त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्यही राखीत त्यांना अद्ययावत- काळाच्या बरोबर नेऊ पाहाणारे सावरकर हे हिंदु समाजाने खरे म्हणजे विज्ञानवादाकडे नेणारे समाजसुधारक राष्ट्रपुरुष म्हणूनन स्वीकारायला हवेत, तसे त्यांच्यायाकडे पाहायला हवे. स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश राजवटीपासून मिळवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला नाही, तर समाजाला आधुनिकतेचा वसा देण्याचा त्यांचा  प्रयत्न होता. त्यांच्या कामात हिंदु समाजाने व विशेष करून नेत्यांनीही जितका सहभाग द्यायला हवा होता, विविध विचारांच्या राजकीयत्वाच्या पुढे जाऊन त्यांना स्वीकारायाला हवे होते, ते न स्वीकारल्याने भारताने खूप काही गमावले आहे.

सावरकरांचे हिंदुत्व हे अलीकडच्या काळात अध्यात्मिक वा धार्मिक दृष्टिने अधिक मानले जाऊ लागले. खरे म्हणजे धर्माची परिपूर्ण व्याख्या समजून व समजावून घेऊन देखील त्यांच्या हिंदुत्वाला सनातनी पद्धतीच्या विचारात बद्ध करणाऱ्या हिंदु समाजान, त्यांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांनी, काँग्रेस विरोधकांनीह, काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनीही सावरकरांचे हिंदुत्व नेमके ओळखेल नाही. त्यामुळेच देशाच्या अस्मितेची अचूक नाडी ओळखूनही देशवासींमध्ये सावरकर यांच्या ऐहिक, लोकिक तार्किक विचारांनी जी जागृती व्हायला हवी होती, ती आली नाही. सावरकर आस्तिक की नास्तिक या वादात कोणी गुरफटले, सावरकर मुस्लीम विरोधकच इतकेही कोणी मानले, सावरकर पूर्ण गांधी विरोधक मानून काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांना आपले मानले. वास्तविक राष्ट्रपुरुष म्हणजे काय दिशा दाखवू शकतो, हेच भारतीय वा हिंदुस्थानींना समजले नाही. इस्लाम मानणाऱ्यांची गोष्ट बाजूलाच राहूंद्या पम हिंदुंनीही त्यांना ओळखले नाही. कारण हिंदुंनीच स्वतःला एखाद्या फतव्यात बांधून घेतले होते. तुम्ही तुमचा त्व सोडा मी माझा हिंदुत्वातील त्व सोडतो, असे किंवा ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना असे मुसलमानांना स्पष्ट बजावणारे सावरकर दुर्दैवाने ना मुसलमानांना कळले ना हिंदुंना. हे सांगण्यामागील त्यांचा श्रुढ राजकारणीही हिंदुना कळला नाही की मुसलमानांनाही आपली चूक कळली नाही. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती होत आजची दुर्दशाही स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आली. मूळ हिंदु असलेल्या मुसलमानांना स्वीकारण्यास सावरकर तयार होते, पण मुसलमानांनाही तसे करण्याची बुद्धी होऊ नये यात त्यांनी त्यांचे कडवेपण, पोथिनिष्ठ धर्म स्वीकारण्याचा आत्यांतिक हटवादीपणा न सोडल्याचे परिणाम आजही त्यांना भोगावे लागत आहेत.

सावरकरांचे राजकारण हे ही देशहिताचे होते, केवळ तितकेच नव्हे तर देशाच्या भवितव्याबद्दल नजर ठेवून क्षितिजापलीकडे पाहाणारे त्याचे द्रष्टेपण होते. अध्यात्मिकतेच्या भासमान वा आभासी दुनियेत ते नसल्याने व समानपणाच्या जाणीवेसाठी ते झगडत राहूनही खऱ्या अर्थी साम्यवादी विचारांनाही मागे टाकणारे, राष्ट्रासाठी सर्व काही, या दृष्टीने उभे राहाणाऱ्या या व्यक्तीला समजण्यात तेव्हाही विलंब झाला आणित्यांच्या मृत्युनंतर इतके वर्षे लोटल्यानंतरही विलंब झाला आहे. त्यांना समजण्यातील ती जाण जेव्हा येईल आणि काळाप्रमाणे बदल स्वीकारम्याची मानसिकता आम्ही जोपासू तेव्हा सावरकरी तत्वांना स्वीकारले असे म्हणता येई शकेल. केवळ मी सावरकर या टोप्या घालून सावरकर समजणार नाही, हे ही तितकेच खरे !

(क्रमशः)

- शल्य बोचरे

(लेखातील चित्र सौजन्य - चित्रकार योगेंद्र पाटील, पाचोरा)
(लेखातील छायाचित्र सौजन्य - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फिर सुबह होगी .... पण कधी?

सुबह कभी तो आयेगी... हे गाणे आज नेहरूवादी नसलेल्या  व नेहरूंच्या राजवटीवर आसुड ओढणाऱ्या विचारसरणीच्या सत्ताधारी ‘भाजपवादी’ अशा १० वर्षांच्या...